तेलगी घोटाळा नेमका काय आहे? अब्दुल करीम तेलगीने यंत्रणेला कसं वाकवलं होतं?

    • Author, इमरान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

भारतात सर्वांत मोठा बनावट स्टँप पेपर (मुद्रांक शुल्क) घोटाळा करणाऱ्या अब्दुल करीम तेलगी याने देशाच्या शासनव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली होती.

तेलगीने पोलीस कॉन्स्टेबलपासून ते नोकरशहा आणि महत्त्वाच्या पदांवर बसलेल्या राजकीय नेत्यांनाही लाच दिली होती. याच माध्यमातून त्याने आपला व्यवसाय आणि घोटाळ्याचा आवाका प्रचंड वाढवला होता.

तेलगीने केलेल्या बनावट स्टँपचा व्यवसाय इतका अजस्त्र होता की देशातील 13 राज्यांना त्यामुळे नुकसान सोसावं लागलं.

या घोटाळ्यातील सर्वांत विचित्र गोष्ट म्हणजे कोणत्याही राज्याचे पोलीस किंवा CBI सुद्धा आजवर या प्रकरणात सरकारी संपत्तीला झालेलं नुकसान नेमकं मोजू शकलेले नाहीत.

अब्दुल करीम तेलगी याच्या घोटाळ्यावर आधारित एक वेब सिरीज लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे. त्यासोबतच गेल्या काही दिवसांत तेलगीचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणातही गाजत आहे.

या प्रकरणावरून अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

तेलगी घोटाळ्याचा उल्लेख करत माझा दोष नसताना राजीनामा का घेतला, असा थेट सवाल शरद पवारांना भुजबळांनी केला आहे.

“साहेब, तुमच्यावरसुद्धा आरोप झाले होते. पण तुमचा राजीनामा कुणी मागितला नाही आणि तुम्हीही तो दिला नाही. पण छगन भुजबळचा राजीनामा तुम्ही का घेतला," असा सवालही भुजबळांनी यावेळी पवारांना केला.

या संपूर्ण घटनाक्रमामुळे अब्दुल करीम तेलगी आणि त्याने केलेल्या बनावट स्टँप पेपर घोटाळ्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

भुजबळ नेमकं काय म्हणाले?

यावेळी सभेला संबोधित करताना भुजबळ म्हणाले की, “तेलगी प्रकरणात मी त्याला अटक केलं. त्याच्यावर मोक्का लावायला सांगितला. कडक कारवाई केली. काही लोकांनी फक्त आरोप केले. साहेब तुम्ही बोलावलंत आणि सांगितलं की भुजबळ तुम्ही राजीनामा द्या.

“मी म्हटलं का? तर म्हणाले, ते झी टीव्हीचे सुभाष गोयल नाराज होतील. सुभाष गोयलचा पवारांना फोन आला की, भुजबळांचा राजीनामा घेऊ नका, त्यांची काही चूक नाही. पण साहेब तुम्ही माझा राजीनामा घेतला.

“साहेब, तुमच्यावरसुद्धा आरोप झाले होते. 1992-93-94 मध्ये. तुमचा राजीनामा कुणी मागितला नाही आणि तुम्हीही तो दिला नाही. पण छगन भुजबळचा राजीनामा तुम्ही का घेतला?

“मी राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. एके दिवशी पोलीस आयुक्त आले आणि म्हणाले की समीर भुजबळला अटक होणार. ताबडतोब त्याला देशाच्या बाहेर काढा. आम्ही संध्याकाळी त्याला देशाच्या बाहेर पाठवलं. काय चाललं होतं नक्की?

“शेवटी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ही केस सीबीआयकडे द्या. सीबीआयनं एक शब्दसुद्धा आमच्याविरुद्ध त्या चार्जशीटमध्ये म्हटलेला नाही. त्यात माझं नावसुद्धा नाही. मग साहेब आमची काय चूक होती ते सांगा,” असंही भुजबळांनी म्हटलं आहे. भुजबळांच्या या आरोपांवर शरद पवार काय प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पण या निमित्ताने हा घोटाळा नेमका काय आहे हे जाणून घेऊ या.

एका वर्षापर्यंत सरकारी प्रेसमधून स्टँप पेपरची विक्री नाही

बनावट स्टँप प्रकरणाचा तपास करण्यासाठी सर्वांत आधी कर्नाटक राज्याने विशेष तपास पथक (SIT) गठित केलं होतं.

SIT ने केलेल्या तपासात आढळून आलं की कर्नाटकात तब्बल एक वर्ष सरकारी प्रेसमधून स्टँप पेपरची विक्री झालेली नव्हती. बाजारात मोठ्या प्रमाणावर बनावट स्टँप पेपर उपलब्ध असल्यामुळे ही विक्री होत नसल्याचं SIT च्या निदर्शनास आलं.

स्टँप IT नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चर्चित SIT चे प्रमुख राहिलेल्या श्रीकुमार यांनी बीबीसीशी यासंदर्भात चर्चा केली.

ते सांगतात, “बनावट स्टँप पेपर इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते की त्या वर्षी विभागाला स्टँप पेपरच्या मागणीसाठी आदेश देणं आवश्यक वाटलं नाही.”

अब्दुल करीम तेलगी याचे वडील रेल्वेत काम करायचे. तेलगीने कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर गावात फळे आणि भाज्यांची विक्री करून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. पुढे पैसा कमावण्यासाठी तो आखाती देशांमध्ये कामासाठी गेला. नंतर 1970 च्या दशकात तो भारतात परतला.

परतल्यानंतर तेलगीने बनावट पासपोर्ट तयार करण्याचा धंदा सुरू केला. मुंबई पोलिसांनी 1991 मध्ये त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती.

त्यावेळी मुंबई पोलिसांनी विचारही केला नसेल की तेलगी तुरुंगात गेल्यानंतर एका मोठ्या गुन्हेगारी व्यवसायाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होईल.

तुरुंगात तेलगीसोबत कैदेत असलेल्या एका कैद्याने त्याला सांगितलं की हर्षद मेहताच्या शेअर बाजार घोटाळ्यानंतर स्टँप आणि स्टँप पेपरची खूपच कमतरता निर्माण झाली आहे.

पुढे तेलगीला कथितरित्या माहिती मिळाली की लोक जुन्या शेअर ट्रान्सफर सर्टिफिकेटमधून रिव्हेन्यू स्टँप काढत आहेत, त्यांचा वापरही केला जात आहे.

जुन्या मशिनींची खरेदी

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तेलगीने सर्वप्रथम विविध राज्यांमध्ये पुरवठा साखळी तयार केली. यामध्ये 176 कार्यालये सुरू करण्यात आली. ही कार्यालये चालवण्याची जबाबदारी बेरोजगार तरुणांकडे देण्यात आली. अशा प्रकारे तेलगीच्या दिमतीला 600 जणांची टीम देशभरात तयार झाली.

या टीमने देशातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकारचे स्टँप पेपर विकले. त्यामध्ये स्टँप पेपर, ज्युडिशियल कोर्ट फी स्टँप, नॉन ज्युडिशियल स्टँप आणि रेव्हेन्यू स्टँप यांचा समावेश होता. बँका, विमा कंपन्या आणि सरकारी कार्यालये यांना हे स्टँप विकले जात होते.

श्रीकुमार पुढे सांगतात, “तेलगीने नाशिकच्या सरकारी टंकसाळीतून जुन्या आणि कालबाह्य झालेल्या मशिन्स विकत घेतल्या. त्यांच्या मदतीने सुरक्षा चिन्ह (सिक्युरिटी मार्क) स्टँप पेपरवर छापला जात असे.”

श्रीकुमार म्हणतात, “तेलगीने कधीच ही माहिती दिली नाही की बनावट स्टँप पेपर कुठे छापण्यात आले. कोणत्याच तपास पथकाला छपाईच्या स्त्रोताबाबत माहिती मिळू शकली नाही.”

तेलगी यांचे वकील एम. टी. नानैय्या यांच्या मते, “तेलगी हा अत्यंत हसतमुख, मृदूभाषी आणि सभ्य व्यक्ती होता. आपल्या नेटवर्किंग क्षमतेमुळेच तो इतका पुढे जाऊ शकला.”

कर्नाटकच्या पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झालेले श्रीकुमार म्हणतात, “यंत्रणेत प्रवेश होण्यासाठी तेलगीच्या कामाची पद्धत एकच होती. राजकीय ताकद, पैसा आणि बळाचा अत्यंत सढळ हाताने त्याने वापर केला. त्याचं म्हणणं जर कुणी ऐकून घेत नसेल, तर तो त्या व्यक्तीच्या वरीष्ठ अथवा कनिष्ठ पदावर बसलेल्या व्यक्तीकडे जात असे. त्यांना लाच देऊन तो आपलं काम करून घ्यायचा.”

2001 मध्ये अजमेर येथे अटक झाल्यानंतर चौकशीदरम्यान तेलगीने श्रीकुमार यांना सांगितलं होतं, “बनावट स्टँप पेपर हे स्वातंत्र्यापासून चलनात आहेत. मी यातील एक छोटासा खेळाडू आहे. इथे माझ्यापेक्षाही मोठमोठे खेळाडू आहेत. माझ्यानंतरही बनावट स्टँप पेपर चलनात असतील, तुम्ही ते थांबवू शकत नाही.”

पोलिसांनी घरी छापा मारला नाही

चौकशीदरम्यान तेलगीने अत्यंत कमी माहिती पोलिसांना दिली. SIT ने तेलगीची नार्को टेस्टसुद्धा केली.

विविध आजारांनी घेरलेलं असूनसुद्धा तेलगी हा दिग्गज राजकीय नेते (बहुतांश महाराष्ट्रातील) यांची नावं घेण्याशिवाय जास्त काही बोलणार नाही, असं SIT च्या निदर्शनास आलं.

दरम्यान, SIT च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेत अनेक नावे बाहेर आली. बनावट स्टँप पेपर जिथे ठेवले जायचे, त्या ठिकाणांबाबत काही प्रमाणात माहिती मिळाली.

तेलगीने यंत्रणेवर असं काही नियंत्रण मिळवलं होतं की देशातील कोणत्याच राज्यांच्या पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारला नाही.

अखेर SIT ने तेलगीच्या घरात तपास केला. त्यांना तेलगीच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासह काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी त्याची पत्नी आणि मुलगी यांच्याशीही बातचित केली. एका अधिकाऱ्याने विचारलं की तेलगीसोबत शेवटचं बोलणं कधी झालं होतं? त्यावर तेलगीच्या मुलीचं उत्तर होतं, “पप्पांशी कालच बोलणं झालं होतं.”

हे उत्तर ऐकताच SIT चं पथक सावध झालं. त्यांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार तेलगीचा फोन टॅप केला.

श्रीकुमार सांगतात, “तेलगी कायम आपला मोबाईल आणि सिमकार्ड बदलत राहायचा.”

तेलगी : यंत्रणेतील भ्रष्टाचाराचं प्रतीक

बॉम्बे हायकोर्टात या प्रकरणात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. यामध्ये तेलगीच्या टेलिफोन टॅपिंगमध्ये मिळालेल्या माहितीचा तपशील मागण्यात आला होता.

SIT ने कोर्टाला सांगितलं की आम्ही फक्त तपास अधिकाऱ्यालाच ही माहिती देऊ. ही माहिती तपास करत असलेल्या CBI ला देण्यात आली. सदर याचिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती.

श्रीकुमार म्हणतात, “तेलगी हा यंत्रणेतील भ्रष्टाचाराचं प्रतीक आहे.”

नानैय्या सांगतात, “आश्चर्य हे आहे की CBI ने या प्रकरणाचा तपास केला. पण त्यांच्या हातीही काही लागलं नाही. या प्रकरणातून अनेक मोठी नावं सहीसलामत बाहेर निघाली.”

एकट्या कर्नाटकातच 3300 कोटी रुपयांचे बनावट स्टँप जप्त करण्यात आले होते. तसंच विविध राज्यांनी मिळून त्यावेळी सुमारे 7 हजार कोटी रुपयांचे बनावट स्टँप जप्त केल्याचा अंदाजही वर्तवण्यात येतो.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)