You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी; अजित पवार आता काय करतील?
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत दिल्लीत घोषणा केली.
दिल्लीत राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात शरद पवारांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावाची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली.
यासोबतच सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा राज्यातील निवडणुकांची जबाबदारी असणार आहे.
शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवारांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे.
त्यात त्यांनी लिहिलयं की, “शरद पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन!”
पण, सध्या तरी अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाहीये. त्यामुळे मग अजित पवार यांना डावलण्यात आलंय का? त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थान काय असेल? असे प्रश्न उपस्थित आहेत.
या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या महिन्यापासून घडलेल्या घडामोडी पाहणं महत्त्वाचं आहे.
याआधी काय घडलं?
2 मे 2023 रोजी शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली.
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सर्वांनीच पवार यांना निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरला. सर्वच नेत्यांनी भाषण करताना राजीनामा मागे घेण्याचा पवारांना आग्रह धरला. पण पवारांचा हा राजीनामा आधीच ठरलेला होता, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
"पक्षाचा अध्यक्ष जो होईल, तो शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच काम करेल. आपला परिवार असाच राहील. भावनिक होऊ नका. त्यामुळे तुम्ही पर्याय नाही, असं म्हणू नका. साहेबांच्या नेतृत्वात नवा अध्यक्ष येईल. त्याला आपण साथ देऊ. त्यांना पाठबळ देऊ," असंही अजित पवार म्हणाले होते.
शेवटी कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेत शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला.
उत्तराधिकारी नेमले, पण...
"कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर राखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे," असं शरद पवार यांनी त्यावेळी म्हटलं.
राजीनामा मागे घेत असलो, पण उत्तराधिकारी नेमायला हवा, असंही पवार म्हणाले.
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उत्तराधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा पवार यांनी केली.
पण, यावेळी अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात न आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार यांच्या घोषणेचा अन्वयार्थ समजून सांगताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणतात, “राष्ट्रीय स्तरावर सुप्रिया सुळेंचा कनेक्ट जास्त आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत राष्ट्रीय स्तरावर सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार अशी सरळसरळ विभागणी होती. आता मात्र दोन्हीकडे शरद पवारांचीच माणसं असतील.”
सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय स्तराबरोबरच महाराष्ट्राचाही जबाबदारी दिली आहे. याचा अर्थ आता राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत सुप्रिया सुळे यांची माणसं असणार हे स्पष्ट आहे.
दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांच्या मते, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतिम शब्द माझाच चालतो, हे शरद पवारांना राजीनामा प्रकरणातून दाखवून दिलं आहे. पण, राज्यामध्ये जे काही नेतृत्व निर्माण करायचंय, त्यात अजित पवारच पुढे असतील. कारण त्यांच्याकडे विधानसभेची जबाबदारी असेल.
“पण खरा प्रश्न शरद पवार जेव्हा राजकारणातून बाहेर पडतील तेव्हा निर्माण होईल. तेव्हा कोण कोणाचं ऐकणार हा पेच निर्माण होईल. सुप्रिया सुळे अजित पवारांचं ऐकतील की अजित पवार सुप्रिया सुळेंचं ऐकतील?”
2024 च्या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या राज्यातील पक्षांना एकत्र करण्यात आपण गुंतलो तर राज्याकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून सुप्रिया सुळेंकडे जबाबदारी देण्यात आलीय. याशिवाय बाहेरच्या राज्यात जाऊन प्रचार करण्याचा अजित पवारांचा पिंडही नाहीये. त्यामुळे ती जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल पार पाडतील, असंही प्रधान सांगतात.
अजित पवार पुढे काय करतील?
हेमंत देसाई सांगतात, “अजित पवारांना शरद पवारांचा हा निर्णय स्वीकारणं भागच आहे. कारण शरद पवारांनी आपल्या मागे संपूर्ण पक्ष असल्याचं दोनदा दाखवून दिलं आहे. त्यामुळे अजित पवारांना हा निर्णय पटला नसला, तरी त्यांना तो स्वीकारावाच लागणार आहे.
“सध्या तरी अजित पवार हे सावध पवित्रा घेतील असं दिसतंय. ते वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारतील आणि वेळ आल्यास पुढची पावलं उचलतील.”
संदीप प्रधान यांच्या मते, "अजित पवार 2024 ची निवडणूक होईपर्यंत शांत बसतील. निवडणुकीनंतर सत्तासमीकरणाची जेव्हा नव्यानं मांडणी होईल, त्यावेळी कदाचित ते त्यांचा निर्णय घेतील."
अजित पवारांना रिप्लेस करेल असा तुल्यबळ नेताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाहीये. अजित पवारांचं नेतृत्व पॅन महाराष्ट्र आहे, असंही प्रधान सांगतात.
एप्रिल महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता.
नागालॅंडमध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या होत्या. पण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकून राहण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागते.
ती पूर्ण न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा काढून घेण्यात आला होता.
आता सुप्रिया सुळे यांची निवड ही राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय राजकारणात जम बसवणं आणि पक्षाचा राष्ट्रीय दर्जा परत मिळवणं, या हेतूनं करण्यात आली असू शकते, असंही राजकीय अभ्यासक सांगत आहेत.
अजित पवारांकडे पुढचा पर्याय काय हे सांगताना वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, “सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करण्यात आलं. तीन राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यातलं महत्वाचं राज्य म्हणजे महाराष्ट्र .. महाराष्ट्र हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राजकारणाचं मूळ आहे. यापुढे सुप्रिया सुळे महाराष्ट्राची कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहतील. पवारांचा उत्तराधिकारी कोण? हा प्रश्न जेव्हा समोर येत होता, तेव्हा अजित पवार आणि सुप्रिया सुळे ही दोन नावं समोर येत होती. पण आता प्रत्यक्षात सुप्रिया सुळेंच्या दिशेने पवारांनी एक महत्वाची स्टेप घेतलेली आहे. ज्यातून शरद पवार यांचा राजकीय वारसदार भविष्यात सुप्रिया सुळे असतील हे स्पष्ट होत आहे.
अजित पवार हे जरी विधानसभेचे विरोधी पक्षनेते असले तरी आता प्रत्येक निर्णयात सुप्रिया सुळे यांचा सहभाग असेल. यामुळे अजित पवार यांना पक्षात राहून दबदबा टिकवून ठेवणे हा पर्याय आहे किंवा पक्ष सोडून दुसरा मार्ग निवडणे हा पर्याय असू शकतो. पण पक्ष सोडून शरद पवारांविरूध्द जाणे हा मार्ग अजित पवारांसाठी खडतर असेल. त्यामुळे सध्या तरी पक्षात राहून संघटनेत कार्यकर्त्यांमध्ये वर्चस्व टिकवणे किंबहुना वाढवणे यावर अजित पवार अधिक भर देऊ शकतील असं वाटतं.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)