कोरोनावरील लस घेतल्याच्या 1 ते 2 वर्षांनंतरही साईड इफेक्ट्स होतात का?

गेल्या काही दिवसांपासून कोरोना काळात घेतलेल्या लसीमुळे साईड इफेक्ट्स होतात, अशा बातम्या समोर आल्या आणि लोकांमध्ये एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं. हे सगळं सुरू झालं अॅस्ट्रोझेनेका या कंपनीमुळे.

अॅस्ट्रोझेनेका या लस उत्पादक कंपनीने ब्रिटनच्या न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये पहिल्यांदा ही बाब मान्य केली आहे की, त्यांच्या कोरोना लसीमुळे काही लोकांना काही गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात.

कोरोनाची लस घेतलेल्या अनेक लोकांनी एकत्र येऊन, या औषध निर्मिती कंपनीवर लसीमुळे होणाऱ्या साईड इफेक्टसंदर्भात नुकसान भरपाईचा खटला दाखल केला आहे.

मात्र, आता ज्यांनी ही लस घेतली आहे, त्यांना घाबरण्याची आवश्यकता आहे का?

जगातल्या इतर देशांप्रमाणेच भारतही कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. जगातला कुणीही माणूस ‘कोरोना’ हा शब्द कधीच विसरणार नाही.

2020 आणि 2021 मध्ये कोरोनानं जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला. हा कोरोना पुन्हा चर्चेत आलाय, याचं कारण आहे कोरोना प्रतिबंधक लस आणि त्या लसीचे साईड इफेट्स यामुळे.

काही लोकांनी आरोप केला आहे की, कोरोना लसीचे साईड इफेक्ट इतके गंभीर आहेत की त्यांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. कारण हे साईड इफेक्ट त्यांच्यासाठी धोकादायक बनले आहेत.

कोरोना लस उत्पादक कंपनीवर खटला दाखल करणाऱ्या काही लोकांचा आरोप आहे की, कोरोना संसर्गामुळे नाही तर कोरोना लसीमुळे त्यांनी आपले काही नातेवाईक गमावले आहेत.

काही लोकांचा आरोप आहे की कोरोना लसीमुळे अनेक लोकांच्या आरोग्याचं खूप नुकसान झालं आहे.

या निमित्ताने निर्माण झालेले काही प्रश्न :

1. हे साईड इफेक्ट्स किती गंभीर आहेत, याचा काही पुरावा आहे का?

2. कोरोना लस घेतल्यानंतर एक किंवा दोन वर्षांनंतरदेखील घाबरण्याची गरज आहे का?

आधी जाणून घेऊया हे सर्व प्रकरण सुरू कसं झालं. हे सर्व प्रकरण ब्रिटनमधून सुरू झालं. कोरोना लस उत्पादक कंपनी अॅस्ट्राझेनेकावर पहिला खटला मागील वर्षी दोन मुलांचे वडील असलेल्या जेमी स्कॉट यांनी दाखल केला होता.

जेमी स्कॉट यांचा आरोप होता की, अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीमुळे त्यांच्या मेंदूची हानी झाली आहे.

त्यांनी सांगितलं की, एप्रिल 2021 मध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती. यामुळे त्यांच्या मेंदूची हानी झाली होती. परिणामी ते आता काम करण्यास सक्षम राहिलेले नाहीत.

कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या अनेक लोकांनी एकत्र येऊन लस उत्पादन करणाऱ्या या कंपनीवर साईड इफेक्टसंदर्भात नुकसानभरपाई देण्याचा खटला दाखल केला आहे. काहीचं म्हणणं आहे की, त्यांनी आपल्या काही नातेवाईकांना गमावलं आहे. तर काहींचं म्हणणं आहे की, त्यांना स्वत:लाच या लसीचे गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत.

जेमी स्कॉट यांच्या वकिलांनी बीबीसीला सांगितलं की, अॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये पहिल्यांदा ही बाब मान्य केली आहे की काही लोकांना काही गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट होऊ शकतात. कंपनीने इंग्लंडच्या उच्च न्यायालयात यावर्षी जानेवारी महिन्यात सादर केलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये ही बाब मान्य केली आहे की, कोरोना प्रतिबंधक लसीमुळे काही खूपच असामान्य प्रकरणांमध्ये टीटीएस होऊ शकतो.

अॅस्ट्राझेनेकानं म्हटलं आहे की, हे मान्य करण्यात येतं की कोरोना लसीमुळे काही खूपच असामान्य प्रकरणांमध्ये टीटीएस होऊ शकतो. हा आजार नेमका कसा होतो, हे मात्र अद्याप माहित नाही.

टीटीएस काय आहे?

या खटल्याशी निगडीत वकील सांगतात की, टीटीएसचा अर्थ थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपिनिया सिंड्रोम असा होतो.

कोरोनाची लस घेतल्यानंतर जेव्हा असं होतं तेव्हा त्याला व्हीआयटीटी म्हणजे व्हॅक्सीन इंड्युस्ड इम्यून थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपिनिया देखील म्हटलं जातं.

टीटीएस किंवा व्हीआयटीटी हा एक असामान्य सिंड्रोम आजार आहे ज्यामुळे थ्रॉम्बोसिस म्हणजे रक्ताच्या गाठी होणे आणि थ्रॉम्बोसायटोपिनिया म्हणजे प्लेटलेट्सची (चपट्या पेशी) कमतरता एकाचवेळी होतात.

काही प्रकरणांमध्ये याचा परिणाम खूप गंभीर आणि जीवघेणे होऊ शकतात. यामुळे ह्रदयविकाराचा झटका येणं, मेंदूत रक्ताच्या गाठी तयार होण्याबरोबरच फुफ्फुसात रक्ताच्या गाठी तयार झाल्यानं रक्तप्रवाह थांबू शकतो. त्याचबरोबर शरीराच्या इतर अवयवांची देखील हानी होऊ शकते.

रक्ताच्या गाठी होण्याचा आजार वेगवेगळ्या रुपानं त्या लोकांनादेखील होऊ शकतो ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही. मात्र टीटीएस किंवा व्हीआयटीटीसारखा गंभीर आजार कोरोनाची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार झाल्यामुळेच होतो.

ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये दिल्लीच्या क्लिनिकल हेमॅटोलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मुकुल अग्रवाल सांगतात की, “औषध किंवा लसीनंतर, शरीरात कधी कधी काही अशा अॅंटीबॉडीज तयार होतात ज्या रक्ताच्या गाठी तयार करू शकतात आणि प्लेटलेट कमी करू शकतात. हा एक दुर्मिळ सिंड्रोम आहे.”

अशा परिणामांना हेपॅरिन या औषधाशी आणि लसीशी जोडून पाहण्यात आलं आहे. डॉ. मुकुल अग्रवाल सांगतात की, औषध घेतल्यानंतर किंवा लसीकरणानंतर कोणताही गंभीर साईड इफेक्ट झालेला नाही यावर आम्ही दीड महिन्यापर्यंत लक्ष ठेवतो.

मात्र, सध्याच्या काळात बहुतांश प्रकरणं हेपॅरिन या औषधाशी निगडीतच दिसून येतात. कोरोना लसीशी निगडीत नाहीत. हेपॅरिन रक्ताला पातळ करतं. आम्ही कोणाला हेपॅरिन दिलं तर आम्ही त्या रुग्णांवर लक्ष ठेवतो. डॉ. मुकुल अग्रवाल सांगतात की रक्ताच्या गाठी म्हणजे क्लॉटिंगबद्दल बोलायचं तर पायात, छातीत किंवा मेंदूत क्लॉटिंग होऊ शकतं.

क्लॉटिंग आणि त्रास

  • क्लॉटिंग जर पायात असेल तर वेदना होऊ शकतात, सूज येऊ शकते.
  • क्लॉटिंग छातीत असेल तर दम लागणे, छातीत दुखू शकते.
  • क्लॉटिंग मेंदूत असेल तर चक्कर येणं, डोकेदुखी, कमकुवत दृष्टी, आकडी येणं किंवा बेशुद्ध होऊ शकतात.
  • पोटात क्लॉटिंग झाल्यास उल्टी होऊ शकते. रक्तस्त्राव होऊ शकतो.

इम्यून थ्रोम्बोसायटोपेनिक पुरपुरा

इम्यून थ्रोम्बोसायटोपेनिक पुरपुरा हा एक दुर्मिळ आजार आहे.

डॉ. मुकुल अग्रवाल यांच्या मते, "या आजारावर उपचार करण्यासाठी काही प्रकरणांमध्ये हेपॅरिनच्या डोसमध्ये बदल केले जाऊ शकतात. अॅंटीकॉग्युलंट औषध म्हणजे रक्ताच्या गाठी तयार होण्यास प्रतिबंध करणारं औषध दिलं जाऊ शकतं. किंवा इंट्राव्हिनस इम्युनोग्लोब्युलिन (आयव्हीआयजी) म्हणजे नसीतून अॅंटी बॉडीज दिल्या जाऊ शकतात. संसर्गाशी लढण्यास अँटीबॉडीज मदत करतात."

आता हा प्रश्न निर्माण होतो की लस घेतल्यानंतर एक किंवा दोन वर्षांनंतरदेखील घाबरण्याचं कारण आहे का?

2023 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोना प्रतिबंधक लसीशी निगडीत दुर्मिळ साईड इफेक्टबद्दल सांगितलं होतं. यामध्ये थ्रोम्बोटिक थ्रोम्बोसायटोपिनिया सिंड्रोमचा समावेश आहे. हा एक दुर्मिळ साईड इफेक्ट आहे.

जागतिक आरोग्य संघटनेसोबत काम केलेले सार्वजनिक आरोग्य आणि धोरण तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया सांगतात की, "लसीचा जो अंश आपल्या रक्तात जातो, तो आपल्या रोगप्रतिकार व्यवस्थेला (इम्यून सिस्टम) सक्रिय करून अॅंटीबॉडी तयार करून शरीराला रोगाशी लढण्यासाठी तयार करतो.

"ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक शरीर वेगळं असतं. त्यामुळे काही अॅलर्जी, रिअॅक्शन किंवा साईड इफेक्ट होऊ शकतात. शरीरात वेदना होऊ शकतात किंवा ताप येऊ शकतो. मात्र काही प्रकरणांमध्ये दुर्मिळातील दुर्मिळ गोष्टी घडू शकतात. मात्र आधीपासूनच हे ओळखणं कठीण आहे की कोणाला काय होईल. दुर्मिळ साईड इफेक्टदेखील बहुतांश वेळा सहा आठवड्यांच्या आतच दिसून येतात. सहा आठवड्यानंतर जर शरीरात काही बदल झाले तर ते औषध किंवा लसीमुळे झाले असण्याची शक्यता फारच कमी असते."

जर कोणी एक किंवा दोन वर्षांआधी लस घेतली असेल तर काळजी करण्याचं कारण नाही. मात्र जर तुमच्या शरीरात अचानक कोणताही बदल झाल्यास किंवा काही त्रास होऊ लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. लगेच डॉक्टरकडे गेलं पाहिजे.