‘महिना झाला पाऊस नाही, पिकाकडे पाहून जीव खाली-वर होतो’

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“वावरात यायला बी इच्छा होत नाही आणि पिकाकडे पाहून जीव खाली-वर होतो.”

पावसाअभावी जमिनीला पडलेल्या भेगा दाखवताना शेतकरी उमेश थोरात यांच्या जीवाची घालमेल होत होती.

उमेश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या फकिराबादवाडी गावात राहतात.

यंदा त्यांना दुबार म्हणजेच दोनदा पेरणी करावी लागली.

उमेश सांगतात, “पहिली पेरणी 16 जूनला केली होती. सोयाबीन आणि मका लागवड केली होती. पण पाऊस झाल्यामुळं ती उतरलीच नाही. मग डबल पेरणी केली.”

उमेश यांच्याकडे 5 एकर शेती आहे. त्यात त्यांनी 2 एकर सोयाबीन, 2 एकर मका आणि 1 एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केलीय.

“आपल्याकडे पाऊस स्टार्टिंगला थोडा चांगला होता. पण नंतर झिमझिमच होता. झिमझिमवरच ही पिकं आली. नंतर 1 महिन्यापासून पाऊस नाही,” उमेश पुढे सांगतात.

'पाऊस 8 दिवसात नाही आला तर...'

पावसात महिन्याहून अधिकचा खंड पडल्यामुळे उमेश यांच्या शेतातील सोयाबीन, मका, कापूस या तिन्ही पिकांना चांगलाच फटका बसलाय.

“सोयाबीन पिकानं मान टाकलीय आणि फुलगळ होऊ राहिली. पाऊस 8 दिवस नाही आला तर सोयाबीनची ही सगळी फुलं गळून जाणार आहेत. कपाशी सुकायला लागलीय. पत्तीगळ झाल्यामुळे नुकसान होणार आहे,” शेतातील सोयाबीन दाखवताना उमेश सांगतात.

उमेश यांच्या मका पिकाच्या पानावर पांढरे डाग दिसून येतात. मक्यावर व्हायरस आल्याचं ते सांगतात.

यामुळे मका पिकावर अळ्या पडल्या असून त्यांनी पानं खायला सुरुवात केली आहे.

उमेश सांगतात, “मका पिकावर व्हायरस आल्यामुळे याची वाढ होईना. प्रत्येक ठिकाणी अळ्यांनी पानं खाल्लेत. आम्ही औषध आणून ठेवलंय, पण पाऊस नसल्यामुळे फवारणी करता येत नाही.”

उमेश आम्हाला मका पिकावरील अळ्या दाखवत असतानाच पाऊस सुरू झाला. पण तो अगदी काही क्षणापुरता.

पाऊस कधीमधी आला की असाच मिनिटभर येतो, असं उमेश आणि त्यांच्या गावातील तरुण शेतकरी सांगत होते.

दरम्यान, उमेश यांना या हंगामात आतापर्यंत लाखभर रुपये खर्च करावा लागलाय. यासाठी त्यांनी त्यांच्या नातेवाईंकाडून पैशांची जमवाजमव केलीय.

ते सांगतात, “मक्याला बियाणं आणण्यापासून खर्च आहे. पेरणीला आणि खताला पैसे लागले. सोयाबीनला बी-बियाणे आणायला, पेरायला, निंदायला फवारणीसाठी पैसे लागते. कपाशीला मजुरीनच पाणी मारुन घेणे, फवारणी याला खर्च लागतोच. आता मला एवढे पीकं वर आलेत त्याच्यासाठी 1 लाख रुपये खर्च लागला.”

विहिरीत 5 फूट इतकंच पाणी शिल्लक

उमेश यांच्याकडे विहीर आहे. पण विहिरीत 5 फूट इतकंच पाणी शिल्लक आहे आणि दिवसा पडणाऱ्या कडक उन्हामुळं तेही दोन-तीन दिवसांत आटून जाईन, अशी अवस्था आहे.

पावसाअभावी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

उमेश सांगतात, “पाऊस नसल्यामुळे सोयाबीनची फुलं गळ झाली. त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे आपल्याला. जिथं 8 क्विंटल सोयाबीन व्हायची तिथं चारच क्विंटल होणार आहे. पुढच्या आठ दिवसात पाऊस नाही आला तर ही पिकं आपल्या हातात येणार नाहीत.”

पाट, नदी, ओढे कोरडेठाण

फकिराबादवाडी गावाजवळून एक पाट वाहतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर आणि गंगापूर या तालुक्यांमधील अनेक गावांमधून हा पाट वाहत असल्याचं इथले स्थानिक शेतकरी सांगतात.

पण आता पावसाअभावी या पाटात थेंबभरही पाणी नाहीये. तो अगदी कोरडाठाण पडलाय. पण पाऊस चांगला पडला आणि पाट भरला, तर आसपासच्या शेतकऱ्यांच्या शेतीला 1 महिना पुरेल इतकं पाणी यातून उपलब्ध होतं.

गावातून वाहणारे ओढेही कोरडेच आहेत. त्यामुळे शेतकरी विहिरीत शिल्लक असलेल्या पाण्यावर अवलंबून आहेत.

याच गावातील शेतकरी सोपान थोरात यांच्याकडे 5 एकर शेती आहे. त्यांनी ऊसाला पाणी देण्यासाठी मोटार सुरू केली होती.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “एक, सव्वा महिना झाला तसा थेंब नाही पावसाचा. पिकं सगळी पाण्यावाचून भुकेले झालेत.

“आता थोडंफार विहिरीला पाणी आहे. चार-सहा दिवस पुरेल इतकं पाणी आहे. ते ऊसाला देऊन जनावराचा चारा तयार करण्याचं काम चालू आहे. जनावरायला तर पाहिजेच ना चारा. चारा नसतील तर जनावरं राहतील का?”

पिकांना आठवडाभर पुरेल इतकं पाणी विहिरींमध्ये असल्याचं फकिराबादवाडीचे नागरिक सांगतात.

पण लाईट वेळेवर येत नाही. आली की ती टिकत नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे.

मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा आढाव घेण्याचं काम शासन दरबारी सुरू आहे.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की,

“मराठवाड्याचे 2 जिल्हे (नांदेड, हिंगोली) वगळता उरलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये (छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव) फार मोठ्या दुष्काळाला येणाऱ्या काळात सामोरं जावं लागतंय, अशी परिस्थिती आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता आतापासूनच काही नियोजनाचे आराखडे तयार करणं आवश्यक आहे.

“आजच्या या जवळजवळ 25 दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय, त्याचा प्रॅक्टिकल रिपोर्ट स्वत: जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यात जाऊन शासनाला दिला पाहिजे.”

पीक कर्ज कसं फेडायचं?

उत्पादन व्यवस्थित नाही आलं, तर आधी घेतलेलं दीड लाख रुपये पीक कर्ज कसं फेडायचं? हा प्रश्न उमेश यांच्यासमोर आहे.

यंदा त्यांनी पीक विमा योजनेत सहभागही नोंदवलाय. त्यामुळे पिकांचे पंचनामे वेळेत व्हावेत आणि मदत मिळावी, अशी त्यांना अपेक्षा आहे.

या अपेक्षेसोबतच उमेश यांच्याप्रमाणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)