किष्टप्पा : 7 महिलांची हत्या, 6 वेळा पकडला गेला, 5 वेळा कोर्टानं सोडून दिलं, काय आहे प्रकरण?

तो दिवस होता 29 नोव्हेंबरचा. सर्वबी नावाची 42 वर्षीय महिला तेलंगणातील शांती मॉल चौकात मजुरांच्या घोळक्यात थांबली होती.
मजूर म्हणून काम करणारी सर्वबी रोज या चौकात येते. रोजंदारीवर काम करून पोट भरणारे सर्व मजूर इथेच जमा होतात. कोणी कामाला बोलावलं तर त्यांच्याकडे दिवसाचं काम करायला जातात. तंदूरच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटकातील गुलबर्गाजवळील मडकल हे सर्वबीचं मूळ गाव आहे. कामाच्या शोधात त्यांचं कुटुंब इथे आलं.
त्या दिवशी बुधवार होता. नेहमीप्रमाणेच सर्वबी त्या दिवशीही सकाळी लवकर आली होती. इतक्यात 55 वर्षीय किष्टप्पा शांतीमल चौकात आला. जवळच अंताराम नावाच्या गावात काम असल्याचं त्याने सर्वबीला सांगितलं. अंताराम गावाला जाण्यासाठी बस लागली होती, सर्वबीने आपल्या पतीला फोन करून कामाच्या ठिकाणाबद्दल माहिती दिली. कारण हे गाव नेहमी पेक्षा दूर होतं.
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दोघेही एकत्र झहीराबाद बसमध्ये चढले. वाटेत ते पेद्दमुल मंडल तत्तेपल्लीजवळ बसमधून उतरले आणि जंगलात गेले.
जंगलात लांब चालत चालत त्यांनी दोन टेकड्या पार केल्या. किष्टप्पाने सर्वबीला निर्मनुष्य ठिकाणी नेऊन ठार मारलं. त्याने तिच्या साडीच्या पदराने गळा आवळून तिचा खून केला.
सीसीटीव्ही फुटेज
संध्याकाळ झाली तरी पत्नी घरी आली नाही म्हणून सर्वबीच्या पतीने शोध घ्यायला सुरुवात केली. दुसरा दिवस उजाडला तरी तिचा पत्ता लागला नाही. शेवटी 1 डिसेंबर रोजी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
तिचे फोन लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण काहीच उपयोग झाला नाही. ज्या भागात सर्वबी रोजंदारीसाठी उभी राहायची तिथले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तंदूर पोलिसांनी तपासले. यात ती किष्टप्पासोबत जाताना दिसली.
व्हिडिओमध्ये दोघेही इंदिरा चौकाकडे चालत जाताना दिसत होते.
सीसीटीव्ही फुटेज मध्ये जो व्यक्ती दिसत होता त्याची पोलिस चौकशी सुरू झाली. त्यानंतर हा व्यक्ती अल्लीपूर गावातील माला किष्टप्पा आहे असं समजलं. पोलिसांनी त्याला 7 डिसेंबर रोजी ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सर्वबीची हत्या केल्यानंतर तिच्या पायातील पैंजण, एक हजार रुपये आणि मोबाइल फोन घेतल्याची कबुली दिली. त्याने ते आपल्या घरात लपवून ठेवल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या गोष्टी जप्त केल्या.
त्याची आणखीन चौकशी केली असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या. किष्टप्पाने केलेला हा सातवा खून होता. यापूर्वी त्याने सहा जणांची हत्या केली होती.
कामगार महिला ठरल्या होत्या बळी
किष्टप्पा याला दारूचं व्यसन आहे. तो महिला कामगारांना आपलं लक्ष्य बनवायचा. यासाठी तो त्यांच्याशी जाऊन बोलायचा. ज्या महिला कामगार कामाच्या प्रतीक्षेत उभ्या असतात त्यांच्याकडे जाऊन सांगायचा की, माझ्याकडे काम आहे. त्या यायला तयार होताच त्यांना निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जाऊन त्यांचे दागिने आणि पैसे घेऊन त्यांची हत्या करायचा.
पुढे तो अशा अविर्भावात निघून जायचा की जणू त्याने काही केलंच नाही. भीतीचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर नसायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किष्टप्पाविरुद्ध विकाराबाद पोलिस ठाण्यात 3, यलाल ठाण्यात 1 आणि तंदूरमध्ये एक गुन्हा दाखल आहे. आत्ताच प्रकरण हे सातवं आहे. यापूर्वी हत्या करण्यात आलेल्या सहाही महिला होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
पण किष्टप्पा इतके दिवस पोलिसांच्या हाती का लागला नाही? किष्टप्पा आत्तापर्यंत पाच वेळा जेलवारी करून आलाय. पण, प्रत्येक वेळी तो पुराव्याअभावी सुटला. यापूर्वी सहा खुनाच्या गुन्ह्यांपैकी पाच खटले न्यायालयात फेटाळण्यात आले होते. तर एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. शिवाय सातव्या हत्येपूर्वीही तो दोन वर्ष तुरुंगात होता आणि दोन महिन्यांपूर्वीच त्याची सुटका झाली होती.
या सात महिलांव्यतिरिक्त त्याने आणखी दोन-तीन हत्या केल्या असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
माध्यमांशी बोलताना पोलिसांनी म्हटलं की, "या हत्यांची नोंद झाली नसल्याची शक्यता आहे. यात तो सापडला तरी तो आपला गुन्हा कबूल करणार नाही. या प्रकरणात सीसीटीव्ही पुरावे सापडल्यामुळे त्याने कबुली दिली आहे."
किष्टप्पावर हत्येचा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच त्याची पत्नी घर सोडून निघून गेली. त्याच्या कुटुंबाबाबत इतर माहिती मिळालेली नाही.
मानसिक संतुलन ढासळलं असावं
तंदूरचे डीएसपी शेखर गौड म्हणाले की, "हत्या करण्याची कोणतीही ठोस कारणं सापडत नाही. त्याने ज्या महिलांना मारलं त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दागिने आणि पैसे असण्याची शक्यताही नव्हती. बलात्काराचीही काही शक्यता नाही. त्याचं मानसिक संतुलन ढासळलं असावं."
ते पुढे म्हणाले, "आतापर्यंत कोणत्याही हत्येबाबत पुरावे मिळालेले नाहीत. पण यावेळी सीसीटीव्ही फुटेजमुळे त्याला ताब्यात घेण्यात यश आलं. त्याने स्वतःहून आम्हाला घटनास्थळी नेलं. भूतकाळात त्याने केलेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता, आम्ही न्यायालयाला विनंती करणार आहोत की, हा खटला लवकर सुरू करून त्याला त्वरित शिक्षा द्यावी."
अशा हत्या का होतात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक परिस्थितीबद्दल बीबीसीशी बोलताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वेमन निशांत म्हणाले, "याची विविध कारणं असू शकतात. जसं की बालपणातील आघात, विरुद्ध लिंगाचा द्वेष. काही प्रकरणांमध्ये थरार अनुभवण्यासाठी देखील या गोष्टी केल्या जातात. तसेच आधीच्या प्रकरणातून सहीसलामत सुटल्याने अशा लोकांचं धैर्य वाढतं.
आपण काही केलं तरी आपण सापडणार नाही अशी त्यांची समजूत निर्माण होते. तसेच त्यांनी महिलांची हत्या का केली याची दोन कारणं असू शकतात. पहिली कारण म्हणजे म्हणजे स्त्रियांकडे त्याच्यापेक्षा कमी ताकद आहे. आणि दुसरं म्हणजे भूतकाळात घडलेल्या एखाद्या घटनेमुळे तो स्त्रियांचा द्वेष करत असेल किंवा स्त्रियांवर वर्चस्व गाजवण्याची त्याची इच्छा असू शकते."

असे प्रकार करणाऱ्यांना ओळखणं सोपं नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
डॉ. निशांत म्हणाले, "कोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये अशी लक्षणं आहेत हे ओळखणं फार कठीण असतं. यामागील कारणांमध्ये समवयस्कांबद्दल सहानुभूतीचा अभाव, सामाजिक नियमांबद्दल नापसंती, कौटुंबिक पार्श्वभूमी, बालपणातील वेदनादायक अनुभव, बालपणातील हिंसक प्रवृत्ती आणि पश्चात्तापाचा अभाव यांचा समावेश असतो."
अशा लोकांवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. तसेच ज्यांना धोका आहे त्यांच्यात जनजागृती केली पाहिजे. अशा प्रवृत्ती असलेल्या लोकांना पुनर्वसनाच्या माध्यमातून इतर समाजापासून थोडं विलग ठेवता येतं. अशा अनेक प्रकरणांचा मानसशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करण्यात आला आहे, परंतु त्या बदलण्यासाठी कोणत्याही पद्धती सापडल्या नाहीत असं डॉ. निशांत म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








