चीनमधून भारतात स्थलांतरित झालेल्या हक्का समुदायाची लोकसंख्या कमी का होतेय?

    • Author, चारूकेसी रामादुराई
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एक शतकाहून अधिक काळ लोटला असेल..चीनमधील हक्का समुदायाचे लोक पश्चिम बंगालमध्ये गुण्यागोविंदाने राहत आले आहेत.

याच समुदायाच्या जेनिस ली एकदा सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी चीनला गेल्या होत्या. पण मध्येच त्यांना कोलकात्याची आठवण येऊ लागली.

जेनिस त्या दिवसांच्या आठवणींविषयी सांगतात, "मला हक्का बोलता येत नव्हतं, मला तिथलं जेवणही आवडलं नाही आणि मी एकटी पडल्याचं मला सतत जाणवत होतं."

एखाद्या दुसऱ्या संस्कृतीच्या व्यक्तीने परदेशात जाऊन तिथल्या संस्कृतीशी जुळवून घेणं थोडं अवघड असू शकतं. पण जेनिस ली तर स्वतः चिनी वंशाच्या आहेत.

त्या म्हणाल्या, "मी आता तिथून परत येणार हे ऐकताच मला चैन पडला."

त्या परतणार होत्या त्यांच्या कोलकात्याच्या घरी. जेनिस ली या चिनी हक्का समुदायातील असून भारतात राहणारी ही त्यांची पाचवी पिढी आहे.

त्या पो-चॉन्ग फूड्समध्ये काम करतात. त्यांच्या आजोबांनी 1958 पो-चॉन्ग फूड्सची सुरुवात केली. या फूड्सच्या माध्यमातून ते भारतात राहणाऱ्या चिनी रहिवाशांना चायनीज सॉस आणि नूडल्स पुरवत असतात.

स्थानिक संस्कृतीमध्ये मिसळले

टोंग आह च्यू (ब्रिटिश नोंदीनुसार अचेव) भारतात आलेला पहिला चिनी स्थलांतरित होता. 1778 मध्ये कोलकात्यात येताना तो आपल्या सोबत चहाची रोपं घेऊन आला आणि नंतर शहराजवळ साखर कारखाना सुरू केला.

भारताच्या पूर्वेकडील बंदर असलेलं कोलकाता शहर चीन आणि पूर्व आशियासाठी भारताचं प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या शहरात भारतातील एकमेव चिनी समुदाय राहू लागला.

20 व्या शतकाच्या सुरुवातीला कोलकात्यातील चिनी लोकसंख्या 20 हजारांहून जास्त वाढली. यामागे दोन कारणं होती, एक म्हणजे चिनी गृहयुद्ध आणि दुसरं जपानशी संघर्ष, यापासून स्वतःला सुरक्षित ठेवणं. हे लोक चर्मोद्योगात काम शोधण्यासाठी कोलकात्यात आले.

त्यांनी इथे आंतरजातीय विवाह केले, स्थानिक लोकांमध्ये मिसळले आणि बंगाली, हिंदी अस्खलितपणे बोलू लगले.

जेनिस ली सांगतात की, "खाद्यपदार्थ म्हणून वापरात आलेल्या 'चीनी' (साखर) मुळे आणि चीनमधून स्थलांतरित झालेल्या टोंग आ चूमुळे चीनमधून आलेल्या लोकांना भारतात चिनी म्हटलं जाऊ लागलं."

1950 च्या दशकातील 'हिंदी चीनी भाई भाई' ही घोषणा देखील याचंच एक उदाहरण आहे. कोलकात्यात वसलेल्या चायना टाऊनला आजही चीनापारा म्हटलं जातं.

कोलकात्यामधील चायना टाऊन

आज कोलकात्यात चिनी वंशाचे केवळ 2,000 लोक उरलेत. पण टायरेटा बाजार आणि टांगरामध्ये त्यांची संस्कृती अबाधित राहिल्याचं दिसून येतं.

रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांपासून ताओवादी मंदिरे, सामुदायिक क्लब, चंद्र नववर्षासाठी लायन नृत्य अशा सर्वच ठिकाणी त्यांची संस्कृती दिसून येते.

सॅन फ्रान्सिस्को आणि लंडनमधील चायना टाऊन प्रसिद्ध आहेत. मात्र कोलकात्यामधील चायना टाऊनला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. कोलकाता सोडलं तर भारतात इतरत्र कुठेच चायना टाऊन नाहीये.

कोलकात्यामध्ये दोन चायना टाऊन आहेत. 1800 च्या दशकापासून अस्तित्वात असलेलं टायरेटा बाजारातील चायना टाऊन कोलकात्यातील मूळ चायना टाऊन आहे. यानंतर 1900 च्या सुरुवातीला टांगरामध्ये चिनी लोकांनी वस्ती केली.

अनेक वर्षांपासून कोलकात्यामधील स्थानिक वारशाचं दस्तऐवजीकरण करणारे ब्लॉगर रंगन दत्ता सांगतात की, "खूप लोकांना दलदलीच्या परिसरात जाण्यास भाग पाडलं गेलं. हा परिसर मुख्य शहराच्या बाहेरचा होता. चर्मोद्योगातून पसरणाऱ्या घाणीमुळे त्यांना टायरेटातून हाकलून लावण्यात आलं."

रंगन दत्ता सांगतात, "सुरुवातीच्या काळात हे चीनी लोक बंगाली वस्ती आणि युरोपियन वस्तीच्या मध्यभागी राहत असत. याच भागात आर्मेनियन, ग्रीक, मारवाडी, पारशी यांसारखे लोक राहायचे. हे लोक व्यापारासाठी कोलकात्यात आले होते."

पाककृतींच्या माध्यमातून स्थानिकांशी सलोखा

कोलकात्यातील तिसर्‍या पिढीतील चायनीज शेफ, पीटर सेंग हे आपल्या चुलत भावांना भेटण्यासाठी या भागात जायचे.

तो सांगतात, "अँग्लो-इंडियन समुदाय राहत असलेल्या या भागात (बो बॅरॅक्समध्ये) आर्मेनियन चर्च, पारशी मंदिरे होती. पण सर्वच समुदायांमधील लोक टायरेटा बाजारात राहत नव्हते."

चिनी जागांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी स्थानिक सहभाग वाढवण्याचं काम करणाऱ्या स्वाती मिश्रा कोलकात्यात राहतात. मिश्रांनी टायरेटा बाजारातील कम्युनिटी आर्ट प्रोजेक्टचं नेतृत्व केलं होतं.

त्या सांगतात, "ज्या पद्धतीने एक चायना टाऊन असायला हवं, त्यापेक्षा वेगळं चायना टाऊन तुम्हाला टायरेटा बाजारात बघायला मिळेल. चिनी लोक सुरुवातीपासूनच इतर समुदायांशी मिळून मिसळून राहिलेत. त्यांच्यापैकी काहीजण तर अस्खलित बंगाली बोलतात."

टांगरा परिसर नंतर अस्तित्वात आला. पण इथे जगातील इतर चायना टाऊनसारखे सजवलेले प्रवेशद्वार दिसतील.

स्थानिक लोकांच्या जवळ जाण्यासाठी चिनी समुदायाने खाण्यापिण्याच्या वस्तूंचा आधार घेतला.

भारतातील पहिल्या चायनीज रेस्टॉरंटची स्थापना कोलकात्यातील हक्कानी समुदायाने केली होती. पुढे ही इंडो-चायनीज पाककृती देशाच्या इतर भागातही पसरली.

भारतात चायनीज पदार्थ आवडीने खाल्ले जातात आणि ही भारतासाठी त्यांची आजपर्यंतची सर्वांत मोठी भेट आहे. रस्त्यावरील फूड स्टॉल ते आलिशान रेस्टॉरंटपर्यंत सगळीकडे हे पदार्थ उपलब्ध आहेत.

घरात बनवलेल्या पारंपारिक हक्का नूडल्सचा आस्वाद घेत मोठे झालेले पीटर सेंग म्हणतात की, या पदार्थांमध्ये भारतीय चवीप्रमाणे सुधारणा करावी लागली.

ते सांगतात, "प्रत्येकाने यात आपापल्या पद्धतीने हिरवी मिरची, कांदे, धनेपूड आणि अगदी गरम मसालेही घातले."

स्थानिक मसाले आणि सॉस वापरून नवे पदार्थ अस्तित्वात आले. जसं की डार्क सोया सॉस वापरून चिली चिकन, कॉर्न स्टार्च आणि मसाल्यांमध्ये तळलेले गोबी मंचुरियन. तुम्हाला हे पदार्थ चीनमध्ये सापडणार नाहीत.

पो-चॉन्ग फूड्सने पुदिना, कासुंदी (बंगाली मोहरी) आणि चिली चिकन सॉस यांसारखे भारतीय सॉस देखील बनवायला सुरुवात केली. हे सॉस भारतीय तसेच भारतीय चिनी लोकांच्या पसंतीस उतरलेत.

रविवारी सकाळी टायरेटा बाजारातील सन यत सेन रस्त्यावर सकाळच्या चायनीज नाश्त्यासाठी जाणं कोलकात्याच्या स्थानिकांची आवडती प्रथा आहे. रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात लावलेल्या स्टॉलवरील ताजे डंपलिंग्ज, वोंटन्स आणि नूडल्ससाठी झुंबड उडालेली असते.

विक्रेते पहाटे 5.30 वाजल्यापासून अॅल्युमिनियम स्टीमरमध्ये ठेवलेले चिकन मोमोज, पोर्क बन्स आणि फिशबॉल सूप घेऊन तयार असतात.

टांगरा परिसरात आह लेउंग, बीजिंग, किम लिंग आणि गोल्डन जॉय यांसारखे प्रसिद्ध चिनी रेस्टॉरंट आहेत.

जेनिस ली सांगतात, "कोलकात्यातील चायनीज फूड जगभर प्रसिद्ध आहे, अगदी न्यूयॉर्कमध्ये देखील एक रेस्टॉरंट आहे."

जेनिस ली यांना खरं तर न्यूयॉर्कच्या 'टांगरा मसाला' रेस्टॉरंटविषयी सांगायचं आहे. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय शैलीतील चायनीज पदार्थ मिळतात.

चिनी समुदायाची लोकसंख्या कमी होण्यामागची कारणं

जागतिक स्मारक कोशानुसार, मागील एक शतकापासून भारतात राहूनही कोलकात्यातील चिनी समुदायाची लोकसंख्या कमी होत चाललीय. येत्या काळात ही लोकसंख्या पूर्णपणे नाहीशी होण्याचा धोका आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या जेनिस ली सांगतात की, "इथे सर्रासपणे जमीन बळकावली जाते, मालमत्तेच्या हक्कासाठी भांडणं होतात."

1962 च्या भारत-चीन युद्धानंतर ही लोकसंख्या कमी व्हायला सुरुवात झाली. पिढ्यानपिढ्या इथे राहणाऱ्या लोकांकडे संशयाने आणि शत्रुत्वाच्या नजरेने पाहिले जायचे.

शेकडो चिनी स्थलांतरितांना कोणत्याही कारणाशिवाय ताब्यात घेण्यात आलं. त्यांना देशाच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या राजस्थानमधील डिटेंशन कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं. या कॅम्पमध्ये त्यांचा छळ करण्यात आला.

पुढे जेव्हा हे लोक कोलकात्यात आले तेव्हा त्यांनी आपले नातेवाईक आणि मित्र राहत असलेल्या इतर देशांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर सरकारी आदेशावरून शेकडो चमड्याचे कारखाने बंद करण्यात आले. उपजीविकाचं बंद झाल्यामुळे अनेकांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडामध्ये स्थलांतरित व्हायला सुरुवात केली. मागील काही दशकांमध्ये भारतातील इतर समुदायांप्रमाणे चांगलं शिक्षण घेऊन भारतीय चिनी तरुण रोजगाराच्या संधीसाठी परदेशात स्थलांतरित झाले.

रंगन दत्ता सांगतात की, "त्यांचे शाळेतील बहुतेक चिनी मित्र आता टोरंटोमध्ये राहतात." तर सेंग सांगतात की, "फक्त प्रस्थापित व्यवसाय करणारे लोकच कोलकात्यात राहतात. पण त्यांच्यावरही मुलांसह परदेशात जाण्यासाठी दबाव आहे."

जेनिस ली यांना अशा अडचणी आल्या नाहीत. त्यांनी इथेच आपलं जीवनमान सुधारण्याचा निर्णय घेतला.

त्या सांगतात, "आम्ही एक छोटासाच पण घट्ट बांधून ठेवलेला समुदाय आहोत. आम्ही आजही आमच्या चालीरीती पाळतो, चीनी नववर्षासारखे सण एकत्र साजरे करतो."

सेंग आता चेन्नईमध्ये काम करतात. चिनी नववर्ष आलं की ते त्यांच्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोलकात्याला येतात.

ते म्हणतात, "जोपर्यंत आमचं कुटुंब आहे, तोपर्यंत आम्ही आमच्या संस्कृतीचं पालन करत राहू."

जेनिस ली यांच्या म्हणण्यानुसार, एकता रहावी यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले आहेत. बंगाली विक्रेते हक्का बोलायला शिकलेत. ते बोक चोय, कैलान सारख्या चायनीज भाज्या विकू लागलेत.

त्या हसत हसत सांगतात, "बंगाली मिठाई माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि मी रसगुल्ला, मिष्टी डोई (गोड दही) शिवाय जगूच शकत नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)