गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क, केंद्राच्या राज्यांना सूचना

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क, केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना
चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
चीनमध्ये करोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी बुधवारी तज्ज्ञांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
‘‘करोनासाथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी करोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याबरोबरच वर्धक मात्रेसह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्नशील राहावे’’, असे मांडविय यांनी सांगितलं.
2.महिला चालक असलेल्या वाहनांना सार्वजनिक पार्किंगमध्ये 20 टक्के आरक्षण
राज्यातील सार्वजनिक वाहन पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांसाठी 20 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेवर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. महाराष्ट्र टाइम्स ने ही बातमी दिली आहे.
लोढा म्हणाले की, राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी महिला आता वाहने चालविताना दिसत आहेत. कॅबचालक म्हणूनही महिला काम करत आहेत.
सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी त्यांची होणारी कुचंबणा, गैरसोय पाहता आता अशा सार्वजनिक पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांना 20 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.
3. जुनी पेन्शन योजना नाहीच- देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Devendra Fadnavis
महाराष्ट्रात 2005 मध्येच पेन्शन योजना बंद झाली असून ती कदापि लागू केली जाणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करायची झाल्यास राज्यावर 1 लाख 10 हजार कोटी रुपयांचा ताण येईल आणि राज्य दिवाळखोरीत जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. लोकमतने ही बातमी दिली आहे.
त्याचबरोबर राज्यातील विनअनुदान तसंच अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान सूत्र लागू करण्याबाबत प्रश्नोत्तराच्या तासात लेखी प्रश्न उपस्थित केला होता.
त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की जेव्हा विनाअनुदानित शाळांना दिलेले अनुदान 20 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा राज्यात 350 शाळा होत्या. आता त्यांची संख्या 3900 इतकी झाली आहे. त्यामुळे आता शाळांना अनुदान देता येणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
4. आम्ही चीन सारखंच कर्नाटकात जाऊ- संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वारंवार शाब्दिक हल्ले करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणतीही भूमिका घेत नसल्याची टीका शिवसेना (ठाकरे गट) चे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
ज्याप्रमाणे चीन भारतात घुसू पाहत आहेत त्याचप्रमाणे विरोधी पक्षाचे नेते कर्नाटकात जायला कमी करणार नाही असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. द हिंदू ने ही बातमी दिली आहे.
“केंद्रातील भाजप सरकार नेहमी म्हणतं की ते चीनला भारताचा एक इंचही तुकडा देणार नाही. तरीही चीन भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असतो. चीन सारखंच आम्हीही कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात जाऊ. आम्हाला कोणाच्याच परवानगीची गरज नाही. हा एकसंध देश आहे आणि आम्हाला शांतता हवी आहे. महाराष्ट्रातलं सरकार दुर्बळ असल्यानेच कर्नाटक सरकार वारंवार वाद वाढवण्याचं काम करत असतं,” असंही ते पुढे म्हणाले.
5. चार्ल्स शोभराजची नेपाळ सुप्रीम कोर्टाने केली सुटका
नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने बुधवारी (21 डिसेंबरला) सिरीयल किलर चार्ल्स शोभराजला सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याला फ्रेंच पर्यटकांना विष देऊन मारल्याच्या आरोपाखाली भारतातही अटक झाली होती.
नेपाळ कोर्टाने येत्या पंधरा दिवसात त्याला सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याला त्याच्या देशात फ्रान्समध्ये पाठवण्याचा आदेशही दिला आहे.
शोभराज आता 78 वर्षांचा आहे. तब्येतीच्या कारणावरून त्याने सुटकेची मागणी केली होती. बीबीसी हिंदींने ही बातमी दिली आहे.
चार्ल्स शोभराज बिकिनी किलर म्हणूनही ओळखला जातो. कारण त्याने हत्या केलेल्या बहुतांश बायका बिकिनी घातलेल्या अवस्थेत सापडल्या होत्या. तसंच त्याने पोलिसांना अनेकदा गुंगारा दिला होता. 1976 मध्ये भारतात त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








