बजरंग सोनवणे, निलेश लंके ते प्रतिभा धानोरकर; 'हे' आहेत महाराष्ट्रातले 7 जायंट किलर

फोटो स्रोत, FACEBOOK
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला. दोन आकड्यांवर असणाऱ्या भाजपला एक आकडी म्हणजे 9 जागा मिळाल्या.
तिकडे एकनाथ शिंदे यांना फक्त 7 जागांवर समाधान मानावं लागलं. तर अजित पवार एका जागेच्या पुढे जाऊ शकले नाहीत.
महाविकास आघाडीनं महायुतीला चांगलंच धोबीपछाड दिलं. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा, हेवीवेट नेत्यांचाही पराभव झाला आणि हा पराभव नवीन चेहऱ्यांनी केला. या निवडणुकीत कोण कोण जायंट किलर ठरले आहेत? हे आपण पाहू.
महाविकास आघाडीनं यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. अनेक ठिकाणी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवणारे उमेदवार चांगल्या मताधिक्क्यानं निवडून येऊन जायंट किलर ठरले. यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे कल्याण काळे यांचं.
जालन्यातील कल्याण काळे दानवेंना कसे भारी ठरले?
रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा खासदार झाले होते. त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळाले. आताही ते केंद्रीय राज्यमंत्री होते. इतके हेवीवेट मंत्री समोर असताना देखील काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवेंचा पराभव केला.
2019 ला जवळपास साडेतीन लाख मतांनी निवडून आलेल्या दानवेंचा तब्बल एक लाख मतांनी कल्याण काळे यांनी पराभव केला. या मतदारसंघात जरांगे फॅक्टर महत्वाचा ठरला. कारण, जालन्यातून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं.
याच ठिकाणी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा इतका पेटला होता की आंदोलनानं पार नवी मुंबईत धडक दिली होती.

फोटो स्रोत, ANI
मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे, लाठीचार्ज यावरून मराठा समाजाचा भाजपवर रोष होता. त्याचा फटका रावसाहेब दानवेंना बसल्याचं बोललं जातंय. पण, त्यांना हरवून जायंट किलर ठरलेले कल्याण काळे कोण आहेत? कल्याण काळे हे फुलंब्री मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.
त्यांनी 2009 मध्ये हरिभाऊ बागडे यांचा पराभव केला होता. 2014 आणि 2019 मध्येही पक्षानं त्यांना तिकीट दिलं होतं. पण, ते पराभूत झाले.
त्यानंतर त्यांनी मतदारसंघावर फोकस केलं. त्याचाच परिणाम म्हणून त्यांना आता रावसाहेब दानवे यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला पराभूत करता आल्याचं सांगितलं जातंय.
या निवडणुकीतले दुसरे जायंट किलर म्हणजे भाजपच्या केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भारती पवार यांना पराभूत करणारे शरद पवार गटाचे भास्कर भगरे.

फोटो स्रोत, FACEBOOK
भास्कर भगरे यांनी भारती पवारांचा पराभव कसा केला?
भाजपनं 2019 च्या उमेदवार भारती पवारांना पुन्हा एकदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून संधी दिली होती. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटानं भास्कर भगरे यांना पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. या मतदारसंघात गेली तीन टर्म भाजपचा खासदार आहे.
पण, भास्कर भगरे यांनी पहिल्यांदाच दिंडोरीचा गड शरद पवारांना मिळवून दिला. या मतदारसंघात कांद्याचा मुद्दा आणि पाणी टंचाईचा मुद्दा अधिक गाजला. कांदा निर्यातबंदीचा मुद्दा तर ऐन निवडणुकीच्या काळात गाजला.
त्यावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भारती पवारांबद्दल रोष होताच. हाच रोष मतांमध्ये एन्कॅश करण्याचा प्रयत्न शरद पवार गटानं केला. परिणामी भास्कर भगरे विजयी झाले. पण, केंद्रीय मंत्र्यांना हरवून विजयी झालेले भास्कर भगरे कोण आहेत? भास्कर भगरे मूळचे दिंडोरी तालुक्यातील गोंडेगावचे आहेत. ते पेशानं शिक्षक आहेत. तसेच ते वारकरी संप्रदायाला मानणारे आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK
त्यांनी या प्रचारात देखील रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी अशी घोषणाही दिली होती. त्यांची प्रतिमा स्वच्छ होती. पंचायत समितीच्या राजकारणात आल्यानंतर ते शरद पवारांच्या लक्षात आले आणि आता त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विजय मिळवून दिला.

फोटो स्रोत, ANI
प्रतिभा धानोरकर यांनी हरवले मुनगंटीवारांना
या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या तिसऱ्या उमेदवार म्हणजे प्रतिभा धानोरकर.

चंद्रपुरात 2019 ला बाळू धानोरकर केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना हरवून जायंट किलर ठरले होते.
तीच परंपरा कायम राखत राज्यातील कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करून प्रतिभा धानोरकर या देखील जायंट किलर ठरल्या आहेत. प्रतिभा धानोरकर यानी त्यांचे पती दिवंगत बाळू धानोरकर यांच्यापेक्षा देखील जास्त लीड घेतली.
प्रतिभा धानोरकर तब्बल 2 लाख 58 हजारांच्या मताधिक्क्यानं विजयी झाल्या आहेत. सुधीर मुनगंटीवार गेल्या 35 वर्षांपासून चंद्रपुरात राजकारण करत आहेत. ते सलग विधानसभेला आमदार म्हणून निवडून गेले. ते भाजपचे कॅबिनेट मंत्री सुद्धा आहे.
मुनगंटीवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला प्रतिभा धानोरकरांनी तब्बल अडीच लाख मतांनी पराभूत केलं. प्रतिभा धानोरकर यांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही म्हटलं तरी चालेल. त्यांचे पती बाळू धानोरकर राजकारणात सक्रीय होते.
पण, 2019 ला बाळू धानोरकर खासदार झाले आणि त्यांच्याजागी वरोरा विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसचं तिकीट मिळालं. त्यावेळीही ही महिला निवडून येईल का?
अशी चर्चा रंगली होती. पण, पहिल्याच झटक्यात प्रतिभा धानोरकर आमदार झाल्या. त्यानंतर आता पती बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीही मिळवली.
पंकजा मुंडेंचा पराभव करून बजरंग सोनवणे ठरले जायंट किलर?
पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यासाठी भाजपनं त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून संधी दिली. त्यांच्याविरोधात शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवलं होतं. धनंजय मुंडे यावेळी बहिणीच्या सोबत होते. पंकजाताईंना निवडून आणणार अशी घोषणाही त्यांनी केली होती. त्यामुळे पंकजा यांचा विजय सोपा मानला गेला.
पण, या निवडणूक निकालात अत्यंत रस्सीखेच झाली. शेवटपर्यंत कधी पंकजा मुंडे तर बजरंग सोनवणे आघाडी-पिछाडी सुरू होती. शेवटी रात्री उशिरा बजरंग सोनवणे यांनी 6 हजार 555 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आणि बीड लोकसभा मतदारसंघ भाजपकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे खेचून आणला. या मतदारसंघात खरा रोष होता तो मराठा समाजाचा.

फोटो स्रोत, ANI
मराठा आरक्षणाचा मुद्दा बीडमध्ये गाजला होता. बीडमध्ये आमदारांची घरं जाळण्यात आली होती. त्यानंतर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते.
त्यामुळे मराठा समाजात रोष होताच. त्याचा फटका पंकजांना बसल्याची चर्चा आहे. पण, पंकजांसारख्या दिग्गज उमेदवाराला पराभूत करणारे बजरंग सोनवणे कोण आहेत? बजरंग सोनवणे यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वतःची ओळख तयार केली. त्यानंतर ते धनंजय मुंडेंच्या माध्यमातून अजित पवारांच्या जवळ गेले.
राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली. पण, निवडणुका जाहीर होताच त्यांनी तुतारी हातात पकडली आणि लोकसभेचं तिकीट मिळवलं. आता ते बीड लोकसभेतून खासदारही झाले.

फोटो स्रोत, FACEBOOK
निलेश लंकेंनी सुजय विखेंचा कसा केला पराभव?
भाजपनं सुजय विखे यांना नगर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा संधी दिली होती. दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटली होती.
त्यामुळे राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवारांना साथ देणाऱ्या निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि शरद पवारांकडे घरवापसी केली. त्यामुळे या निवडणुकीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

फोटो स्रोत, FACEBOOK
नगरमधल्या तीन मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार होते. त्यामुळे त्यांची ताकद या मतदारसंघात होतीच. शिवाय रोहित पवारांनीही निलेश लंकेंसाठी जोर लावला होता. शेवटी निलेश लंके यांनी या मतदारसंघात पवारांना विजयश्री मिळवून दिला.
निलेश लंके यांनी अटीतटीच्या लढतीत 28 हजार मतांनी सुजय विखेंचा पराभव केला.
भाजपच्या स्टार उमेदवार नवनीत राणांना बळवंत वानखेडेंनी कसं पराभूत केलं?
नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार होत्या. पण, 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपनं त्यांना तिकीट दिलं.
अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपनं पहिल्यांदात लोकसभा निवडणूक लढवली. दुसरीकडे काँग्रेसनं या मतदारसंघात दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांना मैदानात उतरवलं.
पण, या निवडणुकीत रंगत आली जेव्हा बच्चू कडू यांनी महायुतीचा घटक असूनही नवनीत राणांविरोधात भूमिक घेतली. त्यांनी दिनेश बूब यांना त्यांच्या प्रहार पक्षाकडून निवडणुकीत उतरवलं होतं.
शिवाय नवनीत राणा यांचे सर्वपक्षीय संबंध बिघडलेले आहेत. त्यांचा आनंदराव अडसूळ यांच्यासोबतही वाद आहे. इकडे उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसैनिकांची नाराजी ओढवून घेतली.

फोटो स्रोत, ANI
दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून येऊन त्यांनी भाजपची साथ दिली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा त्यांच्यावर राग होताच. शिवाय यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला. बच्चू कडू यांच्या उमेदवारानं 85 हजार मतं घेतली. त्याचा फटका हा नवनीत राणा यांना बसला आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे 19 हजार मतांनी निवडून आले.
पण, भाजपच्या स्टार उमेदवार नवनीत राणा यांना पराभूत करणारे बळवंत वानखेडे आहेत तरी कोण? तर बळवंत वानखडे हे पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झाले. त्यानतंर ते गावचे सरपंच बनले. पुढे जिल्हा परिषद आणि त्यानंतर दोनदा विधानसभा निवडणूक लढले.
पण, त्यात अपयश आलं. पण, 2019 ला त्यांना काँग्रेसनं पुन्हा संधी दिली आणि ते दर्यापूरचे आमदार झाले. आता ते नवनीत राणा यांना हरवून लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरले आहेत.
राज्यमंत्री कपिल पाटील यांचा बाळ्यामामांनी कसा केला पराभव?
2021मध्ये केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री झालेल्या कपिल पाटील यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांची निवड करण्यात आली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी दिली आणि ही निवडणूक रंगतदार बनली.
बाळ्यामामा यांना मतमोजणीच्या सुरुवातीला आघाडी मिळाली होती. त्यांनी ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. अखेर बाळ्यामामांनी कपिल पाटील यांचा सुमारे 80 हजार मतांनी पराभव केला आहे आणि ते राज्यमंत्र्यांना पराभूत करून जायंट किलर ठरले.









