अंडर-19 वर्ल्डकप : हे 'फाइव्ह स्टार' चमकले तर भारत सहाव्यांदा जिंकू शकतो विश्वचषक

    • Author, मनोज चतुर्वेदी
    • Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसीसाठी

अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये नेहमीचं भारताचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. त्यामुळं आज (11 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाच्या विरोधात होणाऱ्या फायनलमध्ये विजय मिळवण्यात तरुण भारतीय संघ काहीही कसर ठेवणार नाही.

उदय प्रताप सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघानं आतापर्यंत ज्या प्रकारचा दबदबा संपूर्ण स्पर्धेत दाखवला आहे, त्यामुळं संघ विजयी बनूनच परत येणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतानं ऑस्ट्रेलियाला 2012 आणि 2018 च्या फायनलमध्ये हरवलं होतं. त्याचा फायदा भारताला होऊ शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी सेमीफायनल सामने अत्यंत रोमांचकपणे पद्धतीनं जिंकून फायनल खेळण्यासाठीचे खरे दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी अत्यंत तणावाच्या स्थितीतील सामने एक-एक गडी राखून जिंकले. त्यावरून हे स्पष्ट होतं की, रविवारी होणाऱ्या फायनलमध्येही दोन्ही संघांमध्ये चांगली लढाई पाहायला मिळू शकते.

भारतासाठी फायनलमध्ये धोकादायक ठरू शकतो तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार हग बेवगेन आणि वेगवान गोलंदाज टॉम स्ट्रेकर.

कर्णधारानं फलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तर स्ट्रेकरनं पाकिस्तानच्या विरोधाक सेमिफायनल सामन्यात 24 धावांवर 6 बळी घेत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरू शकतात 'हे' पाच

भारतानं सहाव्यांदा विक्रमी विजय मिळवला तर त्यात पाच खेळाडूंची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

ते पाच खेळाडू म्हणजे कर्णधार सहारन, सचिन धस, मुशीर खान, वेगवान गोलंदाज राज लिंबानी आणि डावखुरा फिरकीपटू सौम्य पांडे.

भारतानं प्रत्येक सामन्यात 250 पेक्षा जास्त धावा केल्या आणि विजय मिळवला.

या सर्व सामन्यांत या पाच खेळाडूंची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळं यावेळीही भारताला फायनलमध्ये बाजी मारता येण्यासाठी या पाच खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीची आशा व्यक्त केली जात आहे.

जबाबदारी पार पाडण्यात कर्णधार सक्षम

भारतीय कर्णधार उदय सहारन यांच्या नेतृत्वाचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात सेमीफायनलमध्ये मफाकासमोर भारतीय संघ पत्त्यासारखा कोसळला होता. पण सहारन मात्र नांगर टाकल्यासारखा मैदानात ठामपणे उभा होता.

आधी त्यानं सचिन धसबरोबर आधी डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि नंतर विकेटवर नजर चांगली खिळल्यानंतर विजयाकडं कसं आगेकूच करायचं असतं, तेही दाखवून दिलं.

सहारनच्या खेळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो धोका न पत्करता खेळतो. या स्पर्धेत त्यानं सर्वाधिक 389 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. पण एकाही सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळू शकला नाही.

त्याचं कारण म्हणजे तो कायम सहायकाच्या भूमिकेत असतो आणि समोर असलेल्या दुसऱ्या फलंदाजाला मोकळेपणानं खेळण्याची संधी देतो.

फलंदाजीमध्ये तर त्याची कामगिरी अत्यंत खास अशी आहेच, पण ज्याप्रकारे तो मैदानावर क्षेत्ररक्षणाचं जाळं विणतो त्याचंही प्रचंड कौतुक केलं जात आहे. गोलंदाजीतील त्याचे बदलही अत्यंत चतुरपणे केलेले असल्याचे जाणवतात.

मुशीर खानचा आदर्श आहे 'सचिन'

भाऊ सरफराज खानला पाहून क्रिकेटर बनलेल्या मुशीर खानला बालपणापासून आव्हानांचा सामना करायची आवड आहे.

तो सांगतो की,'मी सहा वर्षांचा होतो तेव्हापासूनच वडील आणि भावाबरोबर क्रिकेट शिकायला जात होतो. प्रत्येक ठिकाणी आव्हानं समोर येत होती. पण वडील म्हणाले एकदा यांचा सामना करायला शिकला तर आपोआप प्रगतीचा मार्ग दिसत जाईल,' ही शिकवण त्यानं कायम खुणगाठ बांधून सोबत ठेवली आहे.

फायनल पर्यंतच्या प्रवासात तो दोन शतकं आणि एका अर्धशतकासह 338 धावा करत दुसऱ्या स्थानी आहे. तो स्लो गोलंदाजीही करतो. या स्पर्धेत त्यानं सहा विकेट घेतल्या आहेत. मुशीरच्या कौशल्याचा चांगला वापर केला, तर तो चांगला ऑलराऊंडर बनू शकतो.

मुशीर खाननं मुंबईसाठी आतापर्यंत तीन प्रथम दर्जाचे सामने खेळले आहेत. त्यात त्यानं 96 धावा आणि दोन विकेट मिळवल्या आहेत. तो असाच खेळत राहिला तर आगामी काळ नक्कीच त्याचाच असेल.

सचिन धसमध्ये तेंडुलकरची झलक

भारतीय संघ फायनलमध्ये खेळत आहे, त्यात सचिन धसची अत्यंत मोलाची भूमिका राहिलेली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात भारतानं 32 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. त्यामुळं ड्रेसिंग रूमध्ये प्रचंड गदारोळ पाहायला झाला होता.

सचिन धसनं मैदानात उतरल्यानंतर कर्णधार सहारनबरोबर सुरुवातीला विकेट सांभाळत डाव सावरला. त्यांनंतर पाचव्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी करत संघाचा विजयाचा मार्क सुकर केला. त्यात त्यानं 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 96 धावांची खेळी केली. त्याचे फटके तेंडुलकरची आठवण देणारेच असतात.

सचिननं या स्पर्धेत सहा सामने खेळले असून 73 पेक्षा अधिकच्या सरासरीनं 294 धावा केल्या आहेत. त्यात एका शतकाचा समावेश आहे. सचिनच्या वडिलांनी सचिन तेंडुलकरच्या नावावरूनच त्याचं नाव ठेवलं आहे.

बीडच्या राहणाऱ्या सचिन धसला क्रिकेटर बनवण्याचा निर्णय त्याच्या वडिलांनी त्याच्या जन्माच्या आधीच घेतला होता.

सचिनबाबतचा एक किस्साही प्रसिद्ध आहे. एका स्थानिक सामन्यात तो एकापाठोपाठ षटकार खेचत होता. त्यावेळी रेफरींनी येऊन त्याची बॅटही तपासली होती.

राज लिंबानीची चर्चा

गोलंदाज राज लिंबानीचा वेग खूप जास्त नसला तरी विकेटमध्ये चेंडूला उंची मिळत असल्यानं तो अनेकदा अत्यंत घातक ठरत असतो.

सेमीफायनलमध्ये त्यानं तीन विकेट घेत गोलंदाजीची छाप सोडली होती. स्पर्धेत त्यानं आतापर्यंत 8 विकेट घेतल्या आहेत.

राज लिंबानी या वर्ल्डकपच्या संघासाठी पहिली पसंती नव्हता. त्याच्या आधी नमन तिवारी, आराध्य शुक्ला आणि धनुष गौडा यांना संधी मिळत होती. पण एका कामगिरीनं सगळं काही अचानक बदलून गेलं.

हा सामना आशिया कपमध्ये नेपाळच्या विरोधात होता. त्यात त्यानं 13 धावांवर सात विकेट घेतल्या आणि त्यानंतर तो भारतीय संघासाठी पहिली पसंती बनला.

सौम्य पांडेला म्हटले जात आहे पुढचा जडेजा

या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला पुढं पोहोचवण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज सौम्य पांडेनं मोलाची भूमिका निभावली. आतापर्यंत त्यानं 17 बळी घेतले आहेत.

त्याचा इकॉनमी रेट 2.44 आहे. अत्यंत माफक अशी गोलंदाजी तो करतो. भविष्यात तो जडेजाची जागा घेऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.

त्याचे वडील कृष्ण कुमार पांडे मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यातील सरकारी शाळेतील हिंदीचे शिक्षक आहेत.

ते मात्र अशी तुलना योग्य नसल्याचं म्हणतात. शाळेत गुण देतानाही ते अत्यंत कडक असतात. त्यामुळं अशी तुलना करण्यास त्यांचा विरोध आहे.

सौम्यच्या वडिलांच्या मते, 'त्यानं बहिणीप्रमाणं डॉक्टर बनावं अशी माझी इच्छा होती. पण त्याला युपीएससीची परीक्षा द्यायची होती आणि क्रिकेटची आवडही होती. त्यामुळं त्याला लहानपणीच ठरावीक गुण मिळवले तरच क्रिकेट अकॅडमीमध्ये टाकू असं सांगितलं होतं. '

तो आधी रिवा येथील अकॅडमीमध्ये खेळला. पण त्याच्या कौशल्यामुळं तो आज इथपर्यंत पोहोचला आहे.