You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिंदू मुलाचं पालनपोषण करणाऱ्या मुस्लीम आई थेननदन सुबैदा यांची गोष्ट
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदी डॉट कॉमसाठी
आपल्या आईवर तयार झालेला चित्रपट बघताना जफर खान यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. पण त्यांच्या बाजूला बसलेले श्रीधरन मात्र सतत रडत होते.
हा चित्रपट मुस्लिम असलेल्या थेननदन सुबैदा यांच्यावर आधारित आहे. त्यांनी श्रीधरन आणि त्यांच्या दोन बहिणी रमाणी आणि लीला यांना आपल्या पोटच्या पोरांप्रमाणे वाढवलं. इस्लाम स्वीकारावा म्हणून सुबैदाने कधीच या तिघांवर जबरदस्ती केली नाही.
ओमानमध्ये काम करत असलेल्या श्रीधरनने 17 जून 2019 मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. याच काळात मल्याळम चित्रपट 'एन्नु स्वाथम श्रीधरन' म्हणजेच 'मेरा अपना श्रीधरन' या चित्रपटावर काम सुरू झालं होतं.
श्रीधरनने या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "माझी उम्मा अल्लाहला प्रिय झाली आहे. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा जेणेकरून तिचं स्वर्गात स्वागत होईल." केरळमध्ये मुस्लिम आईसाठी अम्मा किंवा उम्मा हा शब्द वापरतात.
श्रीधरनच्या या पोस्टमुळे एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे, "श्रीधरन त्याच्या आईला उम्मा का म्हणतो?"
कोझिकोडपासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या कालिकावूमध्ये राहणारे श्रीधरन बीबीसीशी बोलताना सांगतात, "ही पोस्ट केल्यानंतर लोकांनी मला विचारायला सुरुवात केली. त्यांनी असं विचारलं असेल कारण माझं नाव श्रीधरन आहे. त्यामुळे त्यांना शंका आली असावी आणि ही खूप सामान्य गोष्ट होती."
'धर्मांतर करण्याबाबत कधीच विचारलं नाही'
उम्माने श्रीधरन यांना कसं वाढवलं याविषयी त्यांनी माहिती दिली.
"माझी खरी आई, उम्मा आणि उप्पाच्या (वडिलांच्या) घरी काम करायची. माझी आई (चक्की) आणि उम्मा यांचे आपुलकीचे संबंध होते. गरोदर असताना माझी आई वारली."
आपल्या पोस्टच्या शेवटी श्रीधरनने लिहिलंय की, त्यांना दत्तक घेतलेल्या उम्मा आणि उप्पाने धर्मांतर करण्याबाबत त्यांना कधीच विचारलं नाही.
ते सांगतात, "या गोष्टी माझ्यासाठी फार वेदनादायी होत्या कारण आमचं पालनपोषण करणाऱ्या आई आणि वडिलांनी आम्हाला धर्म आणि जात याबद्दल काहीच सांगितलं नाही. आम्हाला केवळ आपुलकीची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं होतं."
अनुसूचित जातीतून येणारे श्रीधरन सांगतात की, "आमचं इस्लाम मध्ये धर्मपरिवर्तन का केलं नाही? असं मी उम्माला विचारलं होतं. यावर उम्मा म्हणाली होती की, इस्लाम असो, ख्रिश्चन असो किंवा हिंदू.. सर्व धर्म एकच शिकवण देतात ती म्हणजे, सर्वांवर प्रेम करा आणि प्रत्येकाचा आदर करा."
श्रीधरनची बहीण लीला सांगते, "उम्मा मला मंदिरात जायला, देवाची पूजा करायला सांगायची. जेव्हा आमच्या मनात यायचं तेव्हा आम्ही मंदिरात जायचो. पण त्याकाळी वाहतुकीची सोय तितकीशी चांगली नव्हती, त्यामुळे आम्हाला एकटं जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे आम्ही सणासुदीला मंदिरात जायचो आणि उम्मा आम्हाला घेऊन जायची."
श्रीधरन आणि त्याच्या बहिणी सुबैदाच्या घरी आल्यानंतर काय झालं?
अब्दुल अजीज हाजी आणि सुबैदा यांचा मोठा मुलगा शाहनवाज सांगतात, "त्यावेळी मी सात वर्षांचा होतो. श्रीधरनची आई वारली होती म्हणून उम्मा तिकडे गेली होती. संध्याकाळी जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिच्या काखेत श्रीधरन होता."
तो साधारण दोन वर्षांचा असेल. लीला आणि मी समवयस्क होतो तर रमाणी 12 वर्षांची होती. लीला आणि रमाणी उम्माच्या मागोमाग येत होत्या. उम्माने त्यावेळी फक्त एकच सांगितलं की, या मुलांचा कोणीच वाली नाहीये, त्यामुळे आजपासून ते इथेच राहतील.
शाहनवाज सांगतात, "उम्मा घराच्या आत आली तेव्हा लीलाही तिच्या मागोमाग आली, पण रमाणी बाहेरच उभी होती. ती आमच्यापेक्षा थोडी मोठी असल्याने तिला संकोच वाटला असेल. त्यावेळी माझ्या आजीने मला तिला घेऊन यायला सांगितलं."
मी बाहेर गेलो आणि तिचा हात धरून तिला घरात आणलं. त्यानंतर आम्ही एकत्रच वाढलो. आम्ही सगळे जण खाली जमिनीवर झोपायचो. जफर खान आणि श्रीधरन उम्मा आणि उप्पासोबत झोपायचे, कारण ते दोघेही खूप लहान होते. आजी बेडवर झोपायची आणि आम्ही तिघेही खाली झोपायचो. आमची धाकटी बहीण जोशीनाचा जन्म चार वर्षांनंतर झाला.
आम्ही सर्व मुलं एकत्र वाढत असताना श्रीधरन आणि जफर खान अगदी जुळ्या भावंडांसारखे दिसायचे. आज दोघेही 49 वयाचे आहेत. शाळेत जाताना असो की खेळताना, ते दोघेही नेहमी सोबत असायचे. पण जफर शाळेत ज्या खोड्या करतो त्या उम्माला श्रीधरनमार्फत कळू नयेत यासाठी त्याने वेगळे विषय घेतले, त्यामुळे दोघांचे वर्ग वेगळे झाले.
जफर खान सांगतात, "उम्मा श्रीधरनच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायची, तो तिच्या खूप जवळचा होता. माझी आई जे काही सांगायची, श्रीधरन ते ते सगळं ऐकायचा. त्यामुळे माझी कामातून सुटका व्हायची."
"शाळेला जाताना रमाणी आम्हाला सोडून मग स्वतःच्या शाळेला जायची. आम्ही शाळेतून आल्यावर जर उम्मा घरी नसेल तर लीला आम्हाला खाऊ घालायची."
शाहनवाज आणि जफर श्रीधरनचा हेवा करायचे का?
तर श्रीधरन उम्माचा लाडका होता या विषयी शाहनवाज आणि जफर दोघेही सहमत आहेत.
शाहनवाजला कधी हेवा वाटला होता का?
यावर शाहनवाजला नाही असं उत्तर देतात. ते पुढे सांगतात की, "मला एक गोष्ट चांगलीच आठवते ती म्हणजे, उम्मा जेव्हा त्या तिघांना घरी घेऊन आली होती तेव्हा मी माझ्या आजीला विचारलं होतं की, उम्मा गोर्या मुलांना घरी घेऊन का आली नाही? यावर माझ्या आजीने माझ्या ओठांवर बोट ठेवत सांगितलं की, असं बोलू नये, आपल्याला रंग देव देतो. आता जेव्हा मी आखाती देशांमध्ये काम करून घरी येतो तेव्हा माझ्या रंगावरून माझी आजी म्हणते की, तू परदेशात राहून गोरा झाला आहेस, पण मी घरी राहून काळी पडले आहे."
जफर खान सांगतात की, शुक्रवारच्या नमाजानंतर ते जेव्हा आपल्या आई-वडिलांच्या आणि आजीच्या कबरींना भेट देतात तेव्हा त्या जागा नेहमी स्वच्छ दिसतात. कारण श्रीधरन त्या कबरी नेहमीच स्वच्छ ठेवतात.
श्रीधरन तुमच्यासाठी कोणत्या ठिकाणी आहे? यावर जफर खान सांगतात, "तसं तर तो माझ्या भावाच्या ठिकाणी आहे. पण तो माझ्यासाठी त्याहूनही जास्त आहे, कारण आम्ही दोघेही सोबत राहिलोय. तो माझा मित्र आहे."
श्रीधरनचे सर्वात जास्त लाड व्हायचे...
अशरफ हे जफरच्या कुटुंबीयांचे मित्र आहेत. ते सांगतात, "सगळ्या मुलांपैकी श्रीधरन उम्माचा सर्वात लाडका होता. त्यामुळे त्याचा फायदा कसा घ्यायचा हे त्याला चांगलंच माहीत होतं. आणि मी हे माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. शाळेला जाण्यापूर्वी उम्मा सगळ्या मुलांना दहा दहा रुपये द्यायची. एकदा श्रीधरन पुन्हा आला आणि म्हणाला की, मला आणखी दहा रुपये हवेत. आणि उम्माने त्याला पैसे दिले."
लीलाच्या उम्माविषयीच्या काय आठवणी आहेत?
डोळ्यात आलेलं पाणी पुसत लीला सांगते की, "तिने कोणत्याही त्रासाशिवाय आम्हाला वाढवलं. माझेच आई वडील मानत मी या घरात वाढले. उम्माविषयी सांगण्यासाठी माझ्याकडे असंख्य चांगल्या आठवणी आहेत. ती गेल्यावर मला कसं वाटतंय हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. उम्माची आठवण आली की माझं मन उदास होतं."
श्रीधरन देखील उम्माची आठवण काढून रडू लागतात. ते सांगतात, "प्रत्येकाकडे त्यांच्या आईबद्दल सांगण्यासाठी फक्त चांगल्या आठवणी असतात, माझ्याकडेही फक्त चांगल्या आठवणी आहेत."
शाहनवाजने सांगितलेली गोष्ट..
शाहनवाज देखील उम्माविषयीच्या आठवणी सांगतात.
ते सांगतात की, "उम्माच्या मृत्यूनंतरच आम्हाला कळलं की तिने खूप लोकांना कुवतीपलीकडे जाऊन मदत केली होती. मी सुरुवातीला आखाती देशात काम करायला गेलो आणि नंतर तिथे माझा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी मला समजलं होतं की, उम्माने तिची 12 एकर जमीन विकायला सुरुवात केली होती. ही जमीन तिला तिच्या वडिलांकडून वारसाहक्काने मिळाली होती. कर्जदारांची कर्ज फेडण्यासाठी ती जमीन विकत होती."
बरेच जण सुबैदाकडे येऊन शिक्षण, लग्न, उपचारासाठी पैसे मागायचे. ती तिच्या ओळखीतल्या व्यावसायिकांना फोन करून त्यांना मदत करण्यास सांगायची. ही मदत करताना व्यावसायिकही आपलं काम साधून घ्यायचे आणि सुबैदा त्यांचे पैसे फेडत बसायची. कधी कधी तर ती उधारीवर पैसे घेऊन लोकांना मदत करायची आणि नंतर कर्ज फेडण्यासाठी काही जमीन विकायची.
एक वेळ तर अशी आली स्थानिक मंदिर समितीने अब्दुल अजीज यांना सांगितलं की, त्यांच्या पत्नीने वर्षभर देणगी देऊ नये. कारण त्यांना समजलं होतं की, आता सुबैदाकडे पैसे नाहीयेत.
शाहनवाज सांगतात, "ती मंदिर, मशीद आणि चर्चला समसमान देणगी द्यायची. घराजवळ तिची एक जमीनही होती, जी तिला विकायची होती. मी तिला विचारलं की त्याची किंमत किती आहे? त्यावर तिने 12 लाख किंमत सांगितली. मी तिला म्हटलो, मी तुला पंधरा लाख देतो, तू जमीन मला दे. पण तिने ती जमीन दिली नाही, कारण तिने आधीच एका खरेदीदाराला 12 लाख रुपयांना जमीन देण्याचा शब्द दिला होता."
शाहनवाज सांगतात, "आमच्या आईने आम्हा भावंडांना जमिनीत कोणताही वाटा दिला नाही. ज्या जमिनीवर आमचं घर बांधलंय ती जमीन आमच्या वडिलांची आहे."
2018 मध्ये शाहनवाज आखाती देशातून परतले तेव्हा सुबैदा आजारी होत्या. लवकरच शाहनवाजने जफर खान यांना बोलावून घेतलं. त्यावेळी सुबैदाने आपल्या मुलांना सांगितलं होतं की, माझ्या आजारपणाविषयी श्रीधरनला काही सांगू नका, नाहीतर तो त्याची ओमानमधील नोकरी सोडून घरी येईल.
शाहनवाज सांगतात, "उम्मा वारल्यावर आम्ही श्रीधरनची फेसबुक पोस्ट पाहिली. त्याखाली आलेल्या कमेंट बघून आम्हाला जाणवलं की, लोक आमच्यात फरक करतात, पण प्रत्यक्षात मात्र आम्ही आजही एकत्रच आहोत."
चित्रपट कसा तयार झाला?
या चित्रपटाची निर्मिती सिद्दिक परवूर यांनी केली आहे. त्यांचा मागील चित्रपट 'थाहिरा' गोव्यातील 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.
सिद्दीकीला जेव्हा श्रीधरनच्या पोस्टबद्दल कळलं त्याचवेळी त्यांनी 'एन्नू स्वाथम श्रीधरन' बनवण्याचा निर्णय घेतला.
बीबीसीशी बोलताना ते सांगतात की, "या गोष्टीत मी माणुसकी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या समाजाला याबद्दल कळण्याची खूप गरज आहे."
ते सांगतात की, ज्या देशात मानवतेला महत्त्व दिलं जातं त्याचं देशाचा विकास होऊ शकतो.
या चित्रपटाला निर्माता शोधण्यासाठी सिद्दीक यांचा बराचसा वेळ गेला. पण आज या चित्रपटाचं खूप कौतुक होतंय. त्यांना अशा व्यक्तीची गरज आहे, जो हा चित्रपट थिएटरपर्यंत घेऊन जाऊ शकेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)