'केस गळू लागले, हृदयाचे ठोके वाढले; बॉडीबिल्डिंगमुळे माझी पाळी वेळेआधीच थांबली का?'

फोटो स्रोत, ADELE JOHNSTON
- Author, एंजी ब्राऊन
- Role, बीबीसी स्कॉटलंड
अॅडले जॉन्स्टन या बॉडीबिल्डर होत्या त्यावेळी आहार आणि व्यायामाचं अत्यंत कठोर रुटीन पाळायच्या. त्यामुळं त्यांना कायम भूक लागल्यासारखं आणि थकल्यासारखं वाटायचं.
दोन वेळा बॉडीबिल्डींग चॅम्पियनशिपचं सुवर्णपदक पटकावलेल्या अॅडले यांचे केस गळू लागले होते. तसंच हिरड्यांमधून रक्त येणं हृदयाचे ठोके वाढणं, त्वचेला खाज येणं आणि गुप्तांगावर सूज येणं अशा प्रकारचा त्रासही त्यांना होऊ लागला होता.
अनेक वर्षं विविध प्रकारच्या चाचण्या आणि उपचारानंतर त्यांना हा प्रकार म्हणजे 'अर्ली पेरीमेनोपॉज'ची लक्षणं असल्याचं निदान झालं. पेरीमेनोपॉजचा टप्पा महिलांची मासिक पाळी बंद होण्याच्या आधीचा असतो.
साधारणपणे महिलांमध्ये वयाच्या 45 नंतर याची (पेरीमेनोपॉज) सुरुवात होते. पण दोन मुलांच्या आई असलेल्या अॅडले या तिशीमध्येच होत्या.
"अनेक वर्षं मी माझं शरीर मानसिक आणि शारीरिक क्षमतेपेक्षा खूप जास्त थकवत होते. बॉडीबिल्डिंग हा एक अत्यंत कठीण क्रीडाप्रकार असून, मी त्यासाठी पुरेशी निरोगी नव्हते," असं त्यांनी बीबीसी स्कॉटलंड न्यूजशी बोलताना सांगितलं.
"तुम्ही माझ्या फासळ्या आणि हाडांची रचना पाहू शकता. मी अगदीच क्षीण झाले होते. माझं शरीर ज्याप्रकारचं दिसत होतं ते सुंदर किंवा निरोगी नव्हतं. मी माझ्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या विरुद्ध निर्णय घेतला आणि स्वतःला अत्यंत कठीण डायटचा पाळायला भाग पाडलं.
"मी कायम उपाशी असायचे आणि मला कधीही पोट भरल्याचा अनुभव मिळाला नाही."
5 फूट 8 इंच उंची असलेल्या अॅडले यांचं वजन बॉडीबिल्डर असताना केवळ 53 किलो होतं. आता तर त्यांचं वजन आणखी कमी झालं आहे.
"मला पेरीमेनोपॉजचा तुलनेनं लवकर सामना का करावा लागला? असा प्रश्न विचारायला मी सुरुवात केली. माझ्या बॉडीबिल्डींगमुळं तर हे घडलं नाही, असं मी डॉक्टरांना विचारलं. त्यावर डॉक्टरांनी असं होऊ शकतं, पण याबाबत आमच्याकडं कोणतंही संशोधन नसल्याचं सांगितलं," असं त्या म्हणाल्या.
NHS डंफ्राइज आणि गॅलोवेमध्ये गायनाकॉलॉजिस्ट असलेल्या डॉ. हीथर क्युरी यांच्या मते, प्रचंड किंवा अतिरेकी बॉडीबिल्डींग हे अॅडले यांच्या मासिक पाळीत अडथळा येण्याचं कारण असू शकतं.
"मी नेहमीच सांगत असते की कोणतीही गोष्ट नियंत्रणात किंवा ठराविक प्रमाणात असावी. कशाचाही अतिरेक केल्यानं त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात का? असा प्रश्न आपण कायम विचारायला हवा," असं त्यांनी म्हटलं.
"कोणतीही गोष्ट खूप जास्त किंवा एखाद्या गोष्टीची खूप जास्त कमतरता हे कधीही चांगलं असू शकत नाही.
"जर संपूर्ण चक्रच थांबत असेल तर, काही लोकांमध्ये पेरीमेनोपॉजची लक्षणं का आढळतात हे तुमच्या लक्षात येऊ शकतं."
डॉ. क्युरी या मनोपॉज आणि महिलांच्या आरोग्यासंबंधी स्कॉटिश सरकारच्या सल्लागारही आहेत. त्यांच्या मते, अॅडले यांनी बॉडीबिल्डिंग थांबवल्यानंतर कदाचित त्यांच्या ओव्हरीज पूर्वीप्रमाणे नॉर्मल होऊ शकतील.

फोटो स्रोत, Adele Johnston
"कदाचित बॉडीबिल्डींगमुळं त्यावर परिणाम झाला असेल, पण त्यांना कधी समजलंच नसेल," असंही त्यांनी म्हटलं.
अॅडले यांनी आता बॉडीबिल्डींग सोडलं आहे. पण त्याचबरोबर पेरीमेनोपॉजची लक्षणं कमी करण्यासाठी त्यांना HRT (हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी) आणि मिरेना कॉइल बसवण्यात आली आहे. त्यामुळं त्यांची मासिक पाळी पूर्णपणे थांबली आहे.
40 वर्षीय अॅडले यांना आता बरं वाटत आहे. पण तरीही त्यांचं मासिक पाळीचं चक्र पुन्हा नियमित झालं आहे का? हे जाणून घेण्यासाठी औषधं बंद करण्याची त्यांची तयारी नाही.
"मी पेरीमेनोपॉजच्या अत्यंत भयावह लक्षणांचा सामना केला आहे. माझ्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढायचा. मला वाटायचं मला हार्ट अटॅक येणार आहे. मला रात्रीची झोप येत नव्हती. त्यामुळं मी थकलेले असायचे. मला थंड घाम यायचा आणि माझ्या संपूर्ण शरीराला खाज येत होती.
"माझ्या योनीमध्ये एवढ्या वेदना व्हायच्या की, मला कामाच्या वेळी उभं राहावं लागायचं. माझ्या पोटावर सूज होती आणि हिरड्यांमधून रक्त येत होतं. माझे केसही गळत होते. सर्वकाही अत्यंत धक्कादायक होतं.
"मी मिरेना कॉइल लावलेलं असल्यानं माझी हार्मोन्सची स्थिती स्थिर आहे. मी ते हटवण्यासाठी तयार आहे की नाही किंवा रक्तस्राव होत आहे का, हे जाणून घेण्यासाठी मी तयार नव्हते."
पेरीमेनोपॉज म्हणजे काय?
महिलांची मासिक पाळी थांबते त्यावेळी महिलांची रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज होत असतो. साधारणपणे वयाच्या पन्नाशीच्या आसपास हे होते.
याची सुरुवात म्हणजे, महिलांच्या पाळीमध्ये अनियमितता होते तेव्हा होते. त्याला 'पेरीमेनोपॉज' म्हणतात. हे साधारणपणे वयाच्या 46 वर्षांच्या दरम्यान घडत असतं.
या दरम्यान अनेक महिलांच्या लक्षात येतं की, त्यांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता निर्माण झाली आहे. त्यांना अशा भावना किंवा शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो, जो त्यांनी यापूर्वी कधीही केलेला नसेल.
जेव्हा सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही, तेव्हा तुम्ही रजोनिवृत्तीपर्यंत पोहोचत असता.
ब्रिटिश नॅचरल बॉडीबिल्डींग फेडरेशनच्या चेअरवुमन विकी मॅककॅन यांनी, बॉडीबिल्डींग आणि पेरीमेनोपॉजच्या लवकर लक्षणं दिसण्यातील संभाव्य शक्यता हा रंजक विषय असल्याचं म्हटलं.
विकी यांचं वय 54 वर्षे आहे.
त्या म्हणाल्या की,"मी 30 वर्षांपासून स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. पण मला गेल्या तीन वर्षांपासून लक्षणं दिसायला सुरुवात झाली आहे.

फोटो स्रोत, ADELE JOHNSTON
मी संपूर्ण आयुष्यात डाएट आणि प्रचंड व्यायाम केला आहे. तरीही मला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही. तसंच मी माझ्या वयाच्या आणखी किमान तिघींबद्दल सांगू शकते, ज्यांना काहीही समस्या झाल्या नाहीत.
"पण तरीही प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. हा अत्यंत रंजक विषय आहे."
मेनोपॉज एज्युकेशन ऑर्गनायझेशन ग्लोरियाच्या सहसंस्थापक असलेल्या जेसिका वॅटसन सांगतात की, त्यांना अॅडले यांच्यासारख्या अनेक प्रकरणांची माहिती आहे.
"लवकर रजोनिवृत्ती येण्यासंदर्भातील कारणं किंवा इतर गोष्टींसाठी तत्काळ संशोधन होणं गरजेचं आहे. त्यासाठीच आम्ही सातत्यानं जनजागृती करत आहोत," असं त्या म्हणाल्या.
'मला कामही करता येत नव्हते'
अॅडले यांनी आता बँकेतील रेझिलन्स मॅनेजर पदावरील नोकरीचा राजीनामा दिला असून त्या मेनोपॉज कोच म्हणून काम करत आहेत.
"माझ्या आजारांच्या प्रचंड वेदनादायी लक्षणांमुळं मला शेवटी नोकरी सोडावीच लागली," असं त्यांनी म्हटलं.
"मी जेव्हा पेरीमेनोपॉजचा सामना करत होते तेव्हा मी काम करत असेल्या कंपनीनं मला कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. HRT वर असताना मी सहा महिने कामाचे तास कमी करण्याची विनंती केली होती. पण त्यांनी नकार दिला.
"मी एवढी आजारी होते की, मला कामही करता येत नव्हतं. त्यामुळं माझा नवरा सीन यानं म्हटलं की नोकरी सोडून टाक, आपण पाहू काय करायचं."
अॅडले म्हणाल्या की, नोकरी सोडल्यामुळं त्या प्रचंड घाबरलेल्या होत्या.
"माझा पगार, पेन्शन, इतर फायदे करिअर सोडून देणं हे अत्यंत भयावह होतं. पण मी याकडं मेनोपॉज कोचचं प्रशिक्षण घेण्याची एक संधी म्हणून पाहिलं. त्यामुळं मला इतरांची मदत करता येणार होती."
"बॉडीबिल्डींग हा ग्लॅमरस आणि झगमगाट असलेला क्रीडाप्रकार आहे. पण पडद्यामागे सर्वांनीच आरोग्याच्या दृष्टिकोनातून सतर्क राहणं गरजेचं आहे," असंही त्या म्हणाल्या.










