आंध्र प्रदेशात सापडलेला दगड अवकाशातून आला होता का?

सुंदर राजू म्हणाले की आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील जोनागिरी भागात आढळलेला हा दगड म्हणजे अशनी असल्याची खात्री झाली आहे

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, सुंदर राजू म्हणाले की आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील जोनागिरी भागात आढळलेला हा दगड म्हणजे अशनी असल्याची खात्री झाली आहे
    • Author, अमरेंद्र यार्लागड्डा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नॅशनल जिऑफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NGRI)च्या वैज्ञानिकांनी आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील जोनागिरी परिसरातून एक दगड हस्तगत केला आहे.

त्यांचं म्हणणं आहे की या दगडावर विविध चाचण्या केल्यानंतर, हा दगड म्हणजे आकाशातून पडलेली अशनी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या दगडाबद्दल नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NGRI)चे मुख्य वैज्ञानिक पी व्ही सुंदर राजू यांनी बीबीसीला सांगितलं की, "आधी हा दगड म्हणजे अशनी आहे असं आम्हाला वाटलं नव्हतं. त्या परिसरातील दगडांपेक्षा हा दगड खूपच वेगळा दिसत होता. त्यामुळे आम्ही तो घेऊन आलो आणि त्याची चाचणी केली. चाचणी केल्यानंतर त्यात अशनीची सर्व वैशिष्ट्ये दिसून आली."

पृथ्वीवर अशनी कशा पडतात?

काही अशनी अवकाशातून वेगळ्या होतात आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे पृथ्वीच्या दिशेनं ओढल्या जाऊन नंतर पृथ्वीवर पडतात.

पृथ्वीच्या भोवती वातावरणाचा थर आहे. त्यामुळे अवकाशातून पृथ्वीवर येणारी कोणतीही गोष्ट किंवा वस्तू जेव्हा हा वातावरणातून पृथ्वीच्या दिशेनं झेपावते तेव्हा वातावरणाशी त्या गोष्टीचं घर्षण होतं. त्यामुळेच सहसा या अशनी जेव्हा पृथ्वीकडे खेचल्या जातात तेव्हा अनेकदा त्या पृथ्वी बाहेरच्या वातावरणातच जळून जातात. फक्त काही वेळा असं होतं की अशनी पृथ्वीवर पोचतात.

नॅशनल जिऑफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NGRI)चे मुख्य वैज्ञानिक सुंदर राजू म्हणाले की अवकाशातून पृथ्वीवर येण्याच्या प्रवासादरम्यान अशनीमध्ये अनेक बदल होतात.

पृथ्वीच्या वातावरणात शिरण्याआधी अशनी जळून जातात.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, पृथ्वीच्या वातावरणात शिरण्याआधी अशनी जळून जातात.

पृथ्वीच्या वातावरणात शिरताना अशनीचा आकार आणि रचना यात बदल होऊ शकतात. काहीवेळा मोठ्या आकाराच्या अशनींचे तुकडे होऊन त्याचं रूपांतर छोट्या खडकांमध्ये होतं. या अशनी पृथ्वीवर कुठेही पडू शकतात, त्यामुळे त्या कुठे पडतात यावर त्यांचा शोध घेणं किती कठीण आहे हे अवलंबून असतं."

सुंदर राजू पुढे म्हणाले की जर अशनी वाळवंटात किंवा बर्फाळ प्रदेशात पडल्या तर त्यांचा शोध घेणं सोपं असतं. मात्र जर त्या जमिनीवर इतरत्र पडल्या तर इतर दगड किंवा खडकांमध्ये त्या मिसळल्या जाऊन त्यांचा शोध लागणं खूपच कठीण असतं. कारण त्या जमिनीवरील इतर दगड, खडकांमध्ये त्यांचं वेगळेपणं सहजपणे लक्षात येत नाही.

'आम्ही काळ्या दगडाची ओळख पटवली आहे'

सुंदर राजू आणि त्यांचा विद्यार्थी लिंगाराजू यांना आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील जोनागिरी परिसरात एक काळा दगड सापडला आहे.

जुलै महिन्यात सुंदर राजू यांच्या टीम जोनागिरीला गेली होती. सोन्याच्या खाणींचं विश्लेषण करण्यासाठी ते तिथं गेले होते.

लिंगाराजू म्हणाले की त्यावेळेस स्थानिक लोक जोनागिरीच्या परिसरात हिरे शोधत होते.

आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील जोनागिरी भागात एक काळा दगड सापडला होता

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील जोनागिरी भागात एक काळा दगड सापडला होता

"सर्वसाधारणपणे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा स्थानिक लोक जोनागिरीच्या आसपासच्या भागात हिरे शोधतात. आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा काहीजण हिरे शोधत होते. तिथल्या एका जवळच्या शेतात आम्ही गेलो असता, आम्हाला एक काळा दगड दिसला. त्या दगडाचं वजन 73.36 ग्रॅम आहे," असं लिंगाराजू यांनी बीबीसीला सांगितलं.

तो दगड अशनी असल्याचं कसं लक्षात आलं?

पृथ्वीवरील दगड, खडकांमध्ये विविध प्रकारची खनिजं असतात. दगडांमध्ये खनिजांचं एक विशिष्ट प्रमाण असतं. मात्र अशनीमध्ये असणाऱ्या खनिजांचं प्रमाण सर्वसाधारण दगडापेक्षा वेगळं असतं. काही विशिष्ट वैशिष्ट्यांवरून अशनीची ओळख पटते.

सुंदर राजू पुढे म्हणाले की जोनागिरीच्या परिसरात सापडलेल्या दगडाचा अभ्यास केल्यानंतर आणि त्याचं विश्लेषण केल्यानंतर असं आढळून आलं की तो दगड म्हणजे एक अशनी आहे.

विडमॅनस्टेटन पॅटर्न (Widmanstätten Pattern) सारखा पॅटर्न त्या दगडात दिसून आला

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, विडमॅनस्टेटन पॅटर्न (Widmanstätten Pattern) सारखा पॅटर्न त्या दगडात दिसून आला

सुंदर राजू यांनी सांगितलं की, "आधी आम्हाला त्या दगडात चुंबकीय गुणधर्म सापडला. आम्ही त्याची घनता मोजली. त्या अशनीच्या पातळ भाग घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं विश्लेषण करण्यात आलं. त्यात एक विडमॅनस्टेटन पॅटर्न (Widmanstätten Pattern) दिसून आला."

"अशनीच्या रचनेमध्ये दिसून येणारा विशिष्ट रेषांचा हा पॅटर्न असतो. त्यातील खनिजांमुळे तो तयार झालेला असतो. हा पटर्न म्हणजे अशनींचं प्रमुख वैशिष्ट्यं असतं. Exa-D च्या विश्लेषणातून फायलाईट (phyllite)हे खनिज त्या दगडामध्ये असल्याचं स्पष्ट झालं."

"त्याशिवाय या दगडाच्या विश्लेषणातून समोर आलेल्या माहितीची आधीच उपलब्ध असलेल्या अशनीच्या माहिती किंवा डेटाशी तुलना करण्यात आली."

"आम्ही सर्व घटकांचं विश्लेषण आणि अभ्यास केला आहे. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे की आम्हाला सापडलेला हा दगड एक अशनी आहे," सुंदर राजू यांनी सांगितले.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सुंदर राजू म्हणाले की त्या दगडावर संशोधन करत असताना आम्हाला त्यात कार्बन, नायट्रोजन, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, टिटॅनिअम, वॅनाडिअम, क्रोमिअम, मॅंगेनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक ही मूलद्रव्ये आढळली.

ते म्हणाले की हे सर्व खनिज किंवा मूलद्रव्ये त्या अशनीमध्ये आहेत. अशनीमध्ये लोहाचं (आयर्न) प्रमाण जास्त आहे.

"कर्नूलमध्ये आम्हाला सापडलेली अशनी तिथे नेमकी कधी पडली हे सांगणं कठीण आहे. मात्र हे लक्षात आलं आहे की ती खूप काळापूर्वी पडली आहे. अशनी किती जुनी आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचं रासायनिक विश्लेषण (Chemical analysis) करावं लागेल. मात्र जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI)च्या कार्यकक्षेत ती अशनी येते. त्यामुळे आम्ही ती त्यांच्याकडे सुपूर्त केली आहे," असं सुंदर राजू म्हणाले.

जर तुम्हाला अशनी सापडली तर ती जीएसआयच्या ताब्यात द्यावी लागते

नॅशनल जिऑफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NGRI)चे मुख्य वैज्ञानिक पी व्ही सुंदर राजू यांनी जो अशनी असल्याचं स्पष्ट झालेला तो दगड कोलकात्यातील जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI)च्या ताब्यात दिला आहे.

2018 मध्ये केंद्र सरकारनं अधिसूचना काढली होती की जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI)ही संस्था भारतातील अशनींसाठी मुख्य संस्था असेल.

त्यासाठी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून नॅशनल मीटीओराईट रेपोझिटरी ऑफ इंडिया ही संस्था चालवली जाते. इथे अशनींचा संग्रह केला जातो.

एनजीआरआयचे मुख्य वैज्ञानिक पी व्ही सुंदर राजू

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, एनजीआरआयचे मुख्य वैज्ञानिक पी व्ही सुंदर राजू

"आम्ही जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र लिहून कळवलं की आमच्या संशोधनातून हा दगड म्हणजे एक अशनी असल्याची खात्री झाली आहे. त्यांनी एक सॅम्पल फॉर्म पाठवला आणि मला तो फॉर्म भरून त्याच्यासोबत नमुना पाठवण्यास सांगितलं. त्यानुसार मी त्यांना नमुना पाठवला," असं सुंदर राजू यांनी सांगितलं.

जुलै महिन्यात सुंदर राजू यांची टीम जोनागिरीला गेली होती

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, जुलै महिन्यात सुंदर राजू यांची टीम जोनागिरीला गेली होती

जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया नुसार या संस्थेची सुरूवात झाल्यापासून भारतात अशनीच्या जवळपास 700 विविध प्रकारांची ओळख पटवण्यात आली आहे.

जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं म्हणणं आहे की देशात 105 प्रकारच्या अशनी सापडल्या आहेत. तर जगभरातील विविध भागांमध्ये सापडलेल्या 384 अशनी गोळा करून त्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.