एपस्टीन फाईल्स : वेबसाइटवरून 13 फोटो गायब; ट्रम्प यांचा कोणता फोटो हटवल्याचा आरोप होतोय?

फोटो स्रोत, US Department of Justice
- Author, अॅना फॅगुई
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एपस्टीन फाईल्समधील काही फोटो अमेरिकेच्या न्याय विभागानं (यूएस जस्टिस डिपार्टमेंट) आपल्या वेबसाइटवरून हटवले असल्याचं डेप्युटी अॅटर्नी जनरल यांनी रविवारी (23 डिसेंबर) सांगितलं.
पीडितांनी व्यक्त केलेल्या चिंतेमुळे हे फोटो हटवल्याचं त्यांनी सांगितलं. या फोटोंमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचा देखील समावेश आहे.
मात्र, नंतर ट्रम्प यांचा फोटो पूर्ववत करण्यात आला, असं डेप्युटी अॅटर्नी जनरल टॉड ब्लँच यांनी सांगितलं.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी याचा कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याचा आरोप टॉड ब्लँच यांनी फेटाळून लावला आहे.
तसेच त्यांचा समावेश असलेल्या फोटोंमधील महिलांची कोणतीही माहिती लपवण्यात आली नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
शुक्रवारी(19 डिसेंबर) जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित प्रसिद्ध करण्यात आलेल्या फाईल्सपैकी किमान 13 फाईल्स शनिवारी (20 डिसेंबर) कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय वेबसाइटवरून हटवण्यात आल्या.
हाऊस ओव्हरसाइट कमिटीमध्ये असलेल्या डेमोक्रॅट्सनी हे फोटो काढून टाकण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांना, "आणखी काय लपवलं जात आहे?" असं विचारलं.
अमेरिकेच्या न्याय विभागानं रविवारी (21 डिसेंबर) एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "पीडितांच्या संरक्षणासाठी पुढील कारवाई" करण्याच्या उद्देशानं न्यूयॉर्कच्या सदर्न डिस्ट्रिक्टनं ट्रम्प यांच्या फोटोंवर आक्षेप नोंदवला होतचा.
"अत्यंत खबरदारीचा उपाय म्हणून" हा फोटो तात्पुरत्या स्वरुपात काढून टाकण्यात आला होता, असंही त्यात म्हटलं आहे.
"याची चाचपणी केल्यानंतर या फोटोमध्ये एपस्टीनच्या कोणत्याही पीडितांचं चित्रण असल्याचा पुरावा आढळून आला नाही, मग पुन्हा तो फोटो कोणताही बदल किंवा दुरुस्ती न करता पोस्ट करण्यात आला," असंही पुढे न्याय विभागानं सांगितलं.
हा फोटो रविवारी (21 डिसेंबर) सकाळपर्यंत पूर्ववत करण्यात आला आणि वेबसाइटवरील एका लिंकद्वारे तो उपलब्धदेखील झाला. परंतु, त्या दिवशी संध्याकाळपर्यंत इतर फाईल्स मात्र साइटवर पूर्ववत झाल्या नव्हत्या.

ट्रम्प यांच्यामुळं हा फोटो हटवण्यात आल्याचा दावा 'हास्यास्पद' असल्याचं ब्लँच यांनी म्हटलं आहे. "याचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी काहीही संबंध नाही," असं त्यांनी एनबीसी न्यूजला सांगितलं.
"राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे डझनभर फोटो आधीच जनतेसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत, त्यात ते एपस्टीनसोबत दिसत आहेत."
"त्यामुळे, त्या फोटोमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प होते म्हणून आम्ही एक फोटो, फक्त एकच फोटो काढून टाकला ही गोष्ट हास्यास्पद आहे," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, US justice department
पूर्वी पोस्ट केलेल्या काही फाईल्स काढून टाकण्यामागचं कारण देत ब्लँच यांनी न्यूयॉर्कमधील एका न्यायाधीशांचा हवाला देत म्हटलं की, "त्यांनी आम्हाला कोणत्याही पीडित किंवा पीडितांच्या हक्कांसाठी असलेल्या गटांच्या चिंता असेल तर त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचे आदेश दिले आहेत."
"शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील अनेक फोटो काढून टाकण्यात आले होते," असं ते पुढे म्हणाले.
ट्रम्प यांनी एपस्टीनच्या संदर्भात कोणतंही गैरकृत्य केलं असल्याच्या आरोपांना सातत्यानं फेटाळून लावलं आहे.
तसेच एपस्टीनच्या पीडितांकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचा आरोप केला गेला नाही. या फोटोंमधून कोणत्याही प्रकारच्या गैरकृत्यांचा संकेत मिळतो, असं सुचवलं जात नाही.

कायद्यानुसार शुक्रवार (19 डिसेंबर) च्या अंतिम मुदतीपर्यंत सर्व फायल्स प्रसिद्ध न केल्याबद्दल न्याय विभागावर आधीच टीका होत होती.
न्याय विभागाच्या या दस्तऐवजांमध्ये एपस्टीनशी संबंधित फोटो, व्हिडिओ आणि इतर तपास सामग्रीचा समावेश आहे. तसंच काँग्रेसनं शुक्रवार (19 डिसेंबर) पर्यंत ही संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्याचा आदेश देणारा कायदा मंजूर केल्यानंतर त्याची आतुरतेनं वाट पाहिली जात होती.
हे दस्तऐवज प्रसिद्ध करण्यासाठी पुढाकार घेणारे केंटकी रिपब्लिकनचे काँग्रेस सदस्य थॉमस मॅसी म्हणाले की, ट्रम्प प्रशासनाच्या प्रतिसादामुळे ते निराश झाले आहेत आणि त्यांचं ध्येय पीडितांना न्याय मिळवून देण्याचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ॲटर्नी जनरल पाम बाँडी यांच्याविरोधात नैसर्गिक अवमानाच्या खटल्याचे आरोप तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
"ते कायद्याच्या भावनेचा आणि शब्दांचा भंग करत आहेत," असं त्यांनी रविवारी (21 डिसेंबर) सीबीएस न्यूजला सांगितलं.
"त्यांनी घेतलेली भूमिका अत्यंत चिंताजनक आहे. जोपर्यंत पीडितांचे समाधान होत नाही, तोपर्यंत माझंही समाधान होणार नाही," असंही त्यांनी म्हटलं आहे.

हटवण्यात आलेल्या फाईल्समधील फोटोंमध्ये एपस्टीनच्या घरातील एक क्रेडेंझा डेस्क दिसत आहे. त्याचा एक ड्रॉवर उघडा असून त्यात इतर फोटो ठेवलेले दिसत आहेत.
त्यापैकी एका फोटोत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, एपस्टीन, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि एपस्टीनची दोषी सहकारी गिलीन मॅक्सवेल दिसत आहेत. डेस्कच्या वरच्या बाजूला चौकटीत लावलेले फोटोही दिसत आहेत.
गायब झालेल्या दहा फाईल्समध्ये अशा फोटोंचा समावेश आहे, ज्यात वरवर पाहता एकच खोली दिसत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यात एक छोटं मसाज पार्लर आणि छतावर ढगांची चित्रं रंगवलेली आहेत आणि अनेक नग्नं चित्रं लावलेला तपकिरी रंगाचा नक्षीदार वॉलपेपर आहे. त्यापैकी काही फोटो दिसत आहेत, तर काही कलाकृती आहेत.
भिंतीवरील फोटोंमधील बहुतेक महिलांचे चेहरे अस्पष्ट करण्यात आले आहेत. एका महिलेचा चेहरा एका फाईलमध्ये अस्पष्ट केलेला आहे, परंतु इतर तीन फाईल्समध्ये तो स्पष्टपणे दिसतो आहे.
दुसऱ्या एका व्यक्तीचा चेहरा सर्व फाईल्समध्ये अस्पष्ट न करता तसाच ठेवण्यात आला आहे आणि त्याच व्यक्तीचा एक रंगवलेला फोटो देखील दिसत आहे.

शनिवारी (20 डिसेंबर) हाऊस ओव्हरसाइट कमिटीच्या डेमोक्रॅट सदस्यांनी, फाईल्समधून फोटो काढून टाकण्याबद्दल प्रश्न विचारत, ट्रम्प यांचा तो गायब झालेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि ॲटर्नी जनरल पाम बाँडी यांना विचारलं की, तो फोटो काढून टाकण्यात आला होता ही गोष्ट खरी आहे का.
"आणखी काय लवपलं जात आहे? अमेरिकन जनतेसाठी आम्हाला पारदर्शकता हवी आहे," असं समितीनं लिहिलं आहे.
अमेरिकन सरकार आणि कथित एपस्टीन फाईल्सभोवती वाढलेल्या संशयाच्या काळातच या फाईल्स हटवण्याचा प्रकार घडला आहे.
शुक्रवारी (19 डिसेंबर) प्रसिद्ध झालेली ही कागदपत्रं काँग्रेसच्या एका कायद्यामुळे समोर आली, ज्यानं न्याय विभागाला ती प्रसिद्ध करण्यास भाग पाडलं.

फोटो स्रोत, Getty Images
न्याय विभागानं काही अटींसह, ही कागदपत्रं जारी करण्याच्या काँग्रेसच्या विनंतीचं पालन करणार असल्याचं सांगितलेलं.
एपस्टीनच्या पीडितांची वैयक्तिक ओळख पटवणारी माहिती, बाल लैंगिक शोषणाचं चित्रण करणारा तपशील, शारीरिक अत्याचाराचं चित्रण करणारा तपशील, तसेच अशी कोणतीही कागदपत्रं जी "सक्रिय फेडरल तपासाला धोका निर्माण करतील" किंवा असे कोणतेही वर्गीकृत दस्तऐवज जे "राष्ट्रीय संरक्षण किंवा परराष्ट्र धोरणाचे" संरक्षण करण्यासाठी गुप्त ठेवणे आवश्यक आहे, यांचा त्यामध्ये समावेश आहे.
परंतु प्रसिद्ध केलेल्या अनेक दस्तऐवजांमध्ये मोठ्या प्रमाणावर माहिती वगळण्यात आली होती.
त्यात एपस्टीनच्या गुन्ह्यांबद्दल मर्यादितच नवीन माहिती होती आणि आरोप निश्चित करण्याच्या निर्णयांसंबंधीचे न्याय विभागाचे मेमो यांचा प्रसिद्ध केलेल्या फाईल्समध्ये समावेश नव्हता.
ॲलिसन बेंजामिन आणि बेनेडिक्ट गारमन यांचं अतिरिक्त वृत्तांकन.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











