'एपस्टीन फाइल्स': अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाशी संबंधित हे प्रकरण का ठरलं ट्रम्प सरकारसाठी डोकेदुखी?

 जेफ्री एपस्टीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2004 मध्ये केंब्रिज, मॅसेच्युसेट्स येथे जेफ्री एपस्टीन
    • Author, टॉम जिओेघेगन आणि जेम्स फिट्झजेराल्ड
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एपस्टीन फाईल्स खुल्या करण्यात याव्यात या बाबतच्या विधेयकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी स्वाक्षरी केली आहे. या विधेयकानुसार अमेरिकेच्या न्यायविभागाला 30 दिवसांच्या आत एपस्टीन चौकशीसंदर्भातील माहिती खुली करायची आहे. ही माहिती सर्चेबल आणि डाउनलोड करता येईल अशा फॉर्मॅटमध्ये असावी असं या विधेयकात म्हटले आहे.

एपस्टीन फाइल्स काय आहेत आणि त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात काय सुरू आहे याची माहिती या लेखातून आपण घेऊ.

'एपस्टीन फाईल्स' हे शब्द गेल्या अनेक महिन्यांपासून ट्रम्प सरकारसाठी डोकेदुखी ठरले आहेत.

जेफ्री एपस्टीन फायनान्सर आणि लैंगिक गुन्हेगाराला शिक्षा झाली होती. त्याचा पुढे तुरुंगात मृत्यू झाला.

या प्रकरणावरून ट्रम्प प्रशासनाला सर्वबाजूंनी घेरल्याचे गेल्या काही दिवसात पाहायला मिळाले.

एपस्टीन प्रकरणात फेडरल तपास यंत्रणांनी केलेल्या तपासातून काय उघड झालं, याबद्दल अधिक पारदर्शकता असावा यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि त्यांच्याच रिपब्लिकन पक्षातील लोकांकडून दबाव वाढत होता.

काही आठवडे या प्रकरणातील माहिती जारी करण्यास विरोध केल्यानंतर, ट्रम्प यांनी त्यांची भूमिका बदलली आहे.

त्यांनी प्रतिनिधी सभागृहातील (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज) रिपब्लिकन प्रतिनिधींना एपस्टीन फाईल्समधील माहिती जारी करण्याच्या बाजूनं मतदान करण्याचं आवाहन केलं.

त्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर झालं आणि त्यावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.

एपस्टीन फाईल्स काय आहेत?

2008 मध्ये एका 14 वर्षे वयाच्या मुलीच्या पालकांनी फ्लोरिडातील पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती की एपस्टीननं त्याच्या पाम बीचवरील घरात त्यांच्या मुलीबरोबर लैंगिक गैरवर्तन केलं.

त्यानंतर एपस्टीन आणि फिर्यादी पक्षात 'प्ली डील' म्हणजे एक करार झाला. प्ली डील म्हणजे, अमेरिकेत गुन्हेगाराने आपला गुन्हा कबूल केला आणि तपासात सहकार्य केले तर त्याला शिक्षेत थोडी सूट दिली जाते.

त्या पीडित मुलीचे फोटो एपस्टीनच्या घरात सर्वत्र आढळले. एका अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आलं.

त्यासाठी त्याच्यावर एक लैंगिक गुन्हेगार म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र प्ली डील झाली असल्यामुळे एपस्टीनला कठोर तुरुंगवास झाला नाही.

गिलीन मॅक्सवेल आणि एपस्टीन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, गिलीन मॅक्सवेल आणि एपस्टीन

त्यानंतर 11 वर्षांनी एपस्टीनवर लैंगिक संबंधांसाठी अल्पवयीन मुलींचं नेटवर्क चालवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला.

या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होण्याच्या प्रतीक्षेत असतानाच एपस्टीनचा तुरुंगातच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असल्याचं जाहीर करण्यात आलं.

या दोन गुन्ह्यांच्या तपासात मोठ्या प्रमाणात कागदपत्रं जमा झाली.

त्यात पीडित मुली आणि साक्षीदारांच्या मुलाखतींच्या प्रती, आणि एपस्टीनच्या विविध मालमत्तांवरील छाप्यांमधून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचाही समावेश होता.

एपस्टीनची ब्रिटिश सह-गुन्हेगार आणि एक्स गर्लफ्रेंड गिलीन मॅक्सवेलविरुद्ध स्वतंत्र तपास करण्यात आला.

लैंगिक संबंधांसाठी ठेवण्यासाठी तो मुलींची तस्करी करण्याचा कट रचल्याबद्दल 2021 मध्ये मॅक्सवेलला दोषी ठरवण्यात आलं होतं. एपस्टीन आणि मॅक्सवेल या दोघांवरही दिवाणी खटले होते.

एपस्टीनच्या बाबतीत आतापर्यंत काय माहिती जारी करण्यात आली आहे?

गेल्या काही वर्षांमध्ये विविध टप्प्यांवर, या प्रकरणातील काही माहिती लोकांसमोर आलेली आहे.

गेल्या आठवड्यात एपस्टीन इस्टेटची हजारो कागदपत्रं हाऊस ओव्हरसाईट कमिटीनं जारी केली. त्यातील बहुतांश ईमेल्सच्या स्वरूपात होती.

वर्षाच्या सुरूवातीला एपस्टीन फाइल्सचा काही भाग खुला करण्यात आला होता. त्याआधी, सप्टेंबरमध्ये जारी झालेल्या माहितीत, एका 'बर्थडे बुक'चा समावेश होता. त्यामध्ये एपस्टीनसाठी ट्रम्प यांच्या नावानं लिहिलेली एक नोटदेखील होती. मात्र त्यांनी हे लिहिलं असल्याचं नाकारलं होतं. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही आठवड्यांनी, फेब्रुवारीमध्ये न्याय विभाग आणि एफबीआयनं एक दस्तऐवज जारी केला.

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही आठवड्यांनी, फेब्रुवारीमध्ये न्याय विभाग आणि एफबीआयनं एपस्टीन फाईल्समधील गोपनीय माहिती उघड करण्यारा एक दस्तावेज जारी केला.

त्याचं वर्णन त्यांनी त्यावेळी, 'फर्स्ट फेज ऑफ द डीक्लासिफाईड एपस्टीन फाईल्स' असं केलं होतं. म्हणजेच एपस्टीन फाईल्समधील गोपनीय माहिती उघड करण्याचा पहिला टप्पा.

त्यावेळेस उजव्या विचारसरणीच्या प्रभावशाली लोकांच्या एका गटाला व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळेस त्यांना 341 पानांचा दस्तावेज देण्यात आला होता.

मात्र ती कागदपत्रं पाहून ते निराश झाले होते. कारण त्यातील बहुतांश माहिती आधीच बाहेर उपलब्ध होती.

त्यामध्ये एपस्टीनच्या विमानाचा फ्लाईट लॉग (उड्डाणांची माहिती) आणि त्याचं कॉन्टॅक्ट बूक होतं. ज्यात तो ओळखत असलेल्या किंवा त्याचा परिचय असलेल्या प्रसिद्ध लोकांची नावं होती.

मात्र या कॉन्टॅक्ट बूकमधील संवेदनशील किंवा गोपनीय माहिती आधीच काढून टाकण्यात आली होती. ती एक संपादित आवृत्ती होती.

जुलै महिन्यात न्याय विभाग आणि एफबीआयं एका मेमोद्वारे म्हटलं होतं की यापुढे या प्रकरणातील कोणतीही माहिती उघड केली जाणार नाही.

आता हे सर्व चित्र बदलू शकतं.

एपस्टीन फाईल्समध्ये कोणाकोणाची नावं आहेत?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या प्रकरणातील सार्वजनिकरीत्या समोर न आलेल्या कागदपत्रांमध्ये नेमका काय मजकूर आहे ते अज्ञात आहे.

'द वॉल स्ट्रीट जर्नल' या वृत्तपत्रानुसार, ॲटर्नी जनरल पाम बाँडी यांनी मे महिन्यात ट्रम्प यांना सांगितलं होतं की त्यांचं नाव एफबीआयच्या कागदपत्रांमध्ये आहे.

त्यांची एपस्टीनशी मैत्री होती आणि या वृत्तपत्रानं असंही नमूद केलं होतं की या फाईल्समध्ये नाव असणं म्हणजे काहीतरी चुकीची गोष्ट केल्याचा पुरावा नाही.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं ही कहाणी 'बनावट' असल्याचं म्हटलं आहे. रॉयटर्सशी बोलताना एका नाव न उघड केलेल्या अधिकाऱ्यानं सांगितलं होतं की ट्रम्प यांचं नाव त्यात असल्याचं सरकारनं नाकारलेलं नाही किंवा त्याला आव्हान दिलेलं नाही.

सार्वजनिकरीत्या समोर आलेल्या विद्यमान माहितीत, एपस्टीनशी संबंध असलेल्या अनेक उच्चपदस्थ किंवा बड्या लोकांचा उल्लेख आहे.

पुन्हा एकदा, या उल्लेखाचा अर्थ, त्या लोकांनी कोणतंही चुकीचं कृत्यं केलं आहे असा होत नाही.

2024 मध्ये न्यायालयीन कागदपत्रं सार्वजनिकरित्या जारी करण्यात आली होती. त्यात अनेक नावं समोर आली होती.

त्यात अँड्रूयू माऊंटबॅटन-विंडसर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मायकल जॅक्सन यांचा समावेश होता.

प्रिन्स अँड्र्यू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2024 मध्ये न्यायालयीन कागदपत्रं सार्वजनिकरित्या जारी करण्यात आली होती. त्यात अनेक नावं समोर आली होती, अँड्रूयू माऊंटबॅटन-विंडसर यांचंही नाव आहे.

बिल क्लिंटन आणि ब्रिटिश राजघराणं या दोघांनीही एपस्टीनच्या गुन्ह्यांबद्दल कोणतीही माहिती असल्याचं नाकारलं आहे. तर 2009 मध्ये मायकल जॅक्सनचा मृत्यू झाला होता.

एपस्टीनची माजी गर्लफ्रेंड गिलीन मॅक्सवेल, लहान मुलांची लैंगिक संबंधांसाठी तस्करी करण्याच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगते आहे.

तिच्याशी संबंधित प्रकरणाची कागदपत्रं जारी करण्यात आली होती.

सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या फ्लाईट लॉग्समध्ये अब्जाधीश इलॉन मस्क आणि माऊंटबॅटन-विंडसर यांची नावं होती.

माऊंटबॅटन-विंडसर यांनी यापूर्वीच ठामपणे, कोणतंही चुकीचं कृत्य केल्याचं नाकारलं आहे. तर इलॉन मस्क यांनी म्हटलं होतं की एपस्टीननं त्यांना बेटावर यायचं आमंत्रण दिलं होतं, मात्र त्यांनी ते नाकारलं होतं.

एपस्टी इस्टेटशी संबंधित ईमेल्सची ताजी माहिती 12 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली होती. त्यात क्लिंटन यांचे माजी ट्रेझरी सेक्रेटरी लॅरी समर्स आणि ट्रम्प यांचे माजी सहाय्यक स्टीव्ह बॅनन यांचीही नावं आहेत.

समर्स यांनी यासंदर्भात कोणतीही ताजी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र यापूर्वी त्यांनी म्हटलं आहे की एपस्टीनला शिक्षा झाल्यानंतर त्याच्या संपर्कात राहिल्याबद्दल त्यांना खूप खेद वाटतो.

बॅनन यांच्यावर कोणत्याही गैरकृत्याचा आरोप नाही. बीबीसीनं त्यांना त्यांच्या प्रतिक्रियेसाठी विनंती केली असता त्यांनी उत्तर दिलं नाही.

या प्रकरणाबाबत प्रसिद्ध झालेल्या ताज्या माहितीत ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेखदेखील अनेकवेळा करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी नेहमीच कोणतंही चुकीचं कृत्य केल्याचं नाकारलं आहे.

 जेफ्री एपस्टीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लैंगिक संबंधांसाठी एपस्टीनबरोबर मुलींची तस्करी करण्याचा कट रचल्याबद्दल 2021 मध्ये एपस्टीनची ब्रिटिश सह-गुन्हेगार आणि माजी गर्लफ्रेंड घिसलेन मॅक्सवेलला दोषी ठरवण्यात आलं होतं.

ट्रम्प आणि एपस्टीन यांच्यातील संबंधाबद्दल आपल्याला काय माहित आहे?

ट्रम्प आणि एपस्टीन यांची अनेक वर्षे मैत्री असल्याचं आणि त्यांचं सामाजिक वर्तुळ समान असल्याचं दिसतं.

आधी प्रकाशित झालेल्या फाईल्समध्ये असं दिसतं की एपस्टीनच्या तथाकथित 'ब्लॅक बूक ऑफ कॉन्टॅक्ट्स' ट्रम्प यांचे तपशील होते. फ्लाईट लॉग्समधूनही असं दिसून आलं की ट्रम्प यांनी अनेकदा एपस्टीनच्या विमानातून प्रवास केला होता.

1990 च्या दशकातील उच्चभ्रू कार्यक्रमांमध्ये ट्रम्प आणि एपस्टीन या दोघांचेही एकत्र फोटो होते.

सीएनएननं प्रकाशित केलेल्या फोटोंमधून असा दावा करण्यात आला होता की ट्रम्प यांच्या तत्कालीन पत्नी मार्ला मेपल्स यांच्याबरोबरच्या विवाहाला एपस्टीन उपस्थित होता.

2002 मध्ये ट्रम्प यांनी एपस्टीन यांचं वर्णन एक 'जबरदस्त प्रभावी माणूस' असं केलं होतं. नंतर एपस्टीन म्हणाला होता की, "मी 10 वर्षे, डोनाल्डचा सर्वात जवळचा मित्र होतो."

ट्रम्प यांच्यानुसार, 2000 च्या दशकाच्या सुरूवातीला, एपस्टीनला पहिल्यांदा अटक होण्याच्या दोन वर्षे आधी, त्या दोघांमध्येही मतभेद झाले होते. 2008 पर्यंत, ट्रम्प म्हणत होते की ते 'त्याचा चाहता' नव्हते.

व्हाईट हाऊसनं असं म्हटलं होतं की ट्रम्प आणि एपस्टीन यांच्यात मतभेद होण्यामागे एपस्टीनचं वर्तन हे कारण होतं.

तसंच त्यांनी म्हटलं होतं की, "तो अयोग्य, विचित्र असल्यामुळे राष्ट्राध्यक्षांनी त्याला त्यांच्या क्लबमधून बाहेर काढलं होतं."

दरम्यान द वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलं होतं की फ्लोरिडामधील काही रिअल इस्टेटसंदर्भात या दोघांमध्ये असलेल्या स्पर्धेमुळे या दोघांचे संबंध बिघडले होते.

लोकांना एपस्टीनमध्ये इतका रस का आहे?

ट्रम्प यांच्या MAGA (मेक अमेरिका ग्रेट अगेन) मोहिमेतील कट्टर समर्थकांना बऱ्याच काळापासून असं वाटतं आहे की एपस्टीनचं आयुष्य आणि त्याच्या मृत्यूबद्दलचं महत्त्वाचं सत्य अधिकारी लपवत आहेत.

एक विचार असा पण समोर आला आहे की लहान मुलांशी गैरवर्तन करण्याचे कृत्य हे अतिशय मोठ्या वर्तुळातील लोकांनी केले आहे, पण त्यांना सरकार पाठीशी घालत आहे. 'Q' असं टोपणनाव असलेल्या व्यक्तीच्या नावे सांकेतिक मेसेजद्वारे ही माहिती पसरवण्यात आली.

'MAGA' मोहिमेतील काही प्रभावशाली लोकांनी मांडलेल्या घातसूत्रांपैकी (Conspiracy Theory) एक म्हणजे एपस्टीन हा इस्रायली सरकारचा एजंट होता.

ट्रम्प यांच्या काही सहकाऱ्यांनी या प्रकरणात उमटलेल्या प्रतिक्रिया दाबण्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यात रिपब्लिकन हाऊसनं चेंबरसाठी लवकर सुट्टी जाहीर केली.

एपस्टीनशी संबंधित कागदपत्रं 30 दिवसांच्या आत जारी करण्यास भाग पाडणारे प्रयत्न रोखण्यासाठी असं करण्यात आलं होतं.

अनेक लोकांच्या मनातदेखील एपस्टीनबद्दल अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. विशेषकरून फ्लोरिडात त्याला इतकी सौम्य शिक्षा का सुनावण्यात आली. एपस्टीन आणि मॅक्सवेल हे खरंच स्वतंत्रपणे काम करत होते का आणि तुरुंगात त्याला आत्महत्या कशी करता आली?

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.