'बीबीसीविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार'; पॅनोरामा एडिट प्रकरणात ट्रम्प यांचा इशारा, जाणून घ्या नेमकं प्रकरण

फोटो स्रोत, Reuters / AFP via Getty Images
- Author, नूर नांजी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 जानेवारी 2021 रोजी केलेल्या भाषणातील दोन वेगळे भाग एकत्र करून दाखवलेल्या पॅनोरमा एपिसोडबद्दल बीबीसीने दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु, ट्रम्प यांनी मागितलेली नुकसानभरपाई देण्यास बीबीसीने नकार दिला आहे.
तर दुसरीकडे, ट्रम्प यांनी बीबीसीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
14 नोव्हेंबरला सायंकाळी 'एअर फोर्स वन'मध्ये उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, "पुढच्या आठवड्यात आम्ही त्यांच्यावर 1 अब्ज ते 5 अब्ज डॉलर्सपर्यंतचा नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार आहोत."
त्यांनी सांगितलं की, या मुद्द्यावर ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
बीबीसीने 14 नोव्हेंबरला एक निवेदन जारी करत म्हटलं होतं की, 6 जानेवारी 2021 च्या भाषणातील एडिटमुळे 'ट्रम्प यांनी थेट हिंसाचारासाठी आवाहन केलं' असा चुकीचा अर्थ लागला."
बीबीसीने या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली, पण कोणत्याही प्रकारची आर्थिक नुकसानभरपाई देणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
मात्र, ट्रम्प यांच्या वकिलांनी बीबीसीला इशारा दिला होता की, जर बीबीसीने आपली चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली नाही आणि नुकसानभरपाई दिली नाही, तर ते बीबीसीवर 1 अब्ज डॉलर्सच्या नुकसानीचा दावा दाखल करतील.
या वादानंतर रविवारी (9 नोव्हेंबर) बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेव्ही आणि न्यूज सीईओ डेबोरा टर्नेस यांनी राजीनामा दिला होता.
बीबीसी न्यूजने या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी व्हाइट हाऊसशी संपर्क साधला आहे.
दिलगिरी जाहीर करण्याच्या काही तास आधीच, डेली टेलिग्राफने 2022 मध्ये न्यूजनाइटवर दाखवलेला असाच संपादित केलेला दुसरा व्हीडिओ समोर आणला होता.
गुरुवारी (13 नोव्हेंबर) सायंकाळी प्रसिद्ध झालेल्या करेक्शन्स अँड क्लॅरिफिकेशन्स विभागात बीबीसीने सांगितलं की, ट्रम्प यांच्या भाषणाचे एडिटिंग चुकीचं झाल्याच्या टीकेनंतर पॅनोरमा कार्यक्रमाची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली.
बीबीसीने म्हटलं, "आमच्या एडिटमुळे (संपादन) असं वाटलं की, आम्ही ट्रम्प यांचं भाषण एकाच सलग भागात दाखवत आहोत. प्रत्यक्षात ते वेगवेगळ्या ठिकाणचे तुकडे होते. यामुळे चुकीचा संदेश गेला की, ट्रम्प यांनी थेट हिंसाचाराचं आवाहन केलं."
बीबीसीच्या वकिलांनी रविवारी (9 नोव्हेंबर) आलेल्या पत्राला उत्तर देत ट्रम्प यांच्या कायदेशीर टीमला पत्र पाठवलं आहे, असं बीबीसीच्या प्रवक्त्याने सांगितलं.
"बीबीसीचे अध्यक्ष समीर शाह यांनी व्हाइट हाऊसला स्वतंत्रपणे एक वैयक्तिक पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी ट्रम्प यांना 6 जानेवारी 2021 च्या भाषणाचे चुकीचे एडिटिंग झाल्याबद्दल स्वतः आणि कॉर्पोरेशनकडून दिलगिरी व्यक्त केली आहे," असं त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "व्हीडिओ क्लिप चुकीच्या पद्धतीने एडिट झाल्याचा बीबीसीला मनापासून खेद आहे. परंतु, बदनामीचा खटला चालवण्याइतका आधार इथे नाही, यावर आमचा ठाम विश्वास आहे."
ट्रम्प त्यांच्या भाषणात म्हणाले होते, "आपण कॅपिटलकडे जाऊ आणि आपल्या धाडसी सिनेटर्स, काँग्रेस सदस्य आणि महिलांना उत्साहाने समर्थन देऊ."
भाषणात सुमारे 50 मिनिटांनंतर, ट्रम्प म्हणाले, "आणि आपण लढू. आपण प्रचंड ताकदीनं लढू."
पॅनोरमा कार्यक्रमात दाखवलेल्या क्लिपमध्ये ट्रम्प हे, "आपण कॅपिटलकडे जाऊ… आणि मी तुमच्यासोबत असेन. आणि आपण लढू. आपण प्रचंड ताकदीनं लढू," असं म्हणत असल्याचं दाखवण्यात आलं.
फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांचं भाषण 'चुकीच्या' पद्धतीने दाखवलं गेलं. त्यामुळे प्रेक्षकांची 'फसवणूक' झाली.
बीबीसीचे 5 महत्त्वाचे युक्तिवाद
बीबीसीला ट्रम्प यांच्या वकिलांकडून रविवारी (9 नोव्हेंबर) पत्र मिळालं. यात त्यांनी या कार्यक्रमासाठी दिलगिरी व्यक्त करणं, 'चुकीची माहिती दूर करणं' आणि ट्रम्प यांना झालेल्या 'नुकसानाची योग्य भरपाई' करणं अशी मागणी केली आहे.
ट्रम्प यांनी बीबीसीला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी (14 नोव्हेंबर) यूकेच्या प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजेपर्यंत (अमेरिकन प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत) अंतिम मुदत दिली आहे.
बीबीसीने ट्रम्प यांच्या वकिलांना पाठवलेल्या पत्रात 5 मुख्य युक्तिवाद केले आहेत. तसेच या 5 कारणांमुळे त्यांच्यावर खटला चालवता येईल, असं बीबीसीला वाटत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
1. पहिलं कारण असं सांगितलं आहे की, बीबीसीकडे अमेरिकेत त्यांच्या चॅनेलवर पॅनोरमा एपिसोड दाखवण्याचा अधिकार नव्हता आणि त्यांनी ते केलंही नाही.
जेव्हा हा कार्यक्रम बीबीसी आयप्लेअरवर उपलब्ध होती, तेव्हा ती फक्त यूकेमधील प्रेक्षकांपुरतीच मर्यादित होती.
2. दुसरं कारण म्हणजे, या कार्यक्रमामुळे ट्रम्प यांचं काहीही नुकसान झालं नाही, कारण त्यानंतर ते लगेचच पुन्हा निवडून आले.
3. तिसरं म्हणजे, क्लिपचा हेतू चुकीचा संदेश देण्याचा नव्हता, तर फक्त मोठं भाषण थोडक्यात दाखवायचं होतं आणि त्याचं एडिट द्वेष भावनेनं केलं नव्हतं.
4. चौथं कारण, क्लिप ही वेगळी किंवा स्वतंत्र पाहिली जाऊ नये. हा फक्त एका तासाच्या कार्यक्रमातील 12 सेकंदांचा भाग होता, ज्यात ट्रम्प यांना समर्थन देणारी अनेक मतंही होती.
5. शेवटी, सार्वजनिक आणि राजकीय विषयावर मतं व्यक्त करणे अमेरिकेतील मानहानी किंवा बदनामी कायद्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात सुरक्षित आहे.
बीबीसीतील एका व्यक्तीने सांगितलं की, कॉर्पोरेशनला त्यांच्या युक्तिवादावर आणि बचावावर दृढ विश्वास आहे.
बीबीसी न्यूजने या प्रकरणावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कल्चर, मीडिया आणि स्पोर्ट विभागाशी संपर्क साधला, परंतु त्यांनी कोणतंही विधान जारी करणार नसल्याचं सांगितलं.
लिबरल डेमोक्रॅट्सचे नेते सर एड डेव्ही यांनी पंतप्रधानांनी 'ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलून', त्यांच्या खटल्याची धमकी थांबवावी आणि 'बीबीसीची निष्पक्षता व स्वायत्तता जपावी', अशी विनंती केली आहे.
दिशाभूल करणाऱ्या एडिटचा नवीन दावा
याआधी गुरुवारी (13 नोव्हेंबर) बीबीसीवर ट्रम्प यांच्या 6 जानेवारी 2021 च्या भाषणाचा आणखी एक चुकीचा एडिट (संपादन) केल्याचा आरोप करण्यात आला. तो पॅनोरमा एपिसोड येण्यापूर्वी 2 वर्षांपूर्वीचा होता.
2022 मधील न्यूजनाईट कार्यक्रमातील हा एडिट पॅनोरमापेक्षा थोडा वेगळा आहे.
क्लिपमध्ये ट्रम्प म्हणत आहेत, "आपण कॅपिटलकडे जाऊ. आपल्या धाडसी सिनेटर्स, काँग्रेस सदस्य आणि महिलांना समर्थन देऊ आणि आपण लढू. प्रचंड ताकदीनं लढू. जर तुम्ही प्रचंड ताकदीनं लढलं नाही, तर तुमच्याकडे देश राहणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर प्रेझेंटर कर्स्टी वर्क यांच्या व्हॉइसओव्हरमध्ये, 'आणि ते खऱ्या अर्थानं लढले' असं सांगण्यात आलं आणि त्यावेळी कॅपिटल दंगलींचे व्हीडिओ दाखवले गेले.
त्याच कार्यक्रमात क्लिपला उत्तर देताना, माजी व्हाइट हाऊस चिफ ऑफ स्टाफ मिक मुलवेनी यांनी 6 जानेवारीच्या दंगलींचं वर्णन सत्तेवर 'जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न' असं केलं. व्हीडिओमध्ये ट्रम्प यांच्या भाषणाचे तुकडे 'एकत्र करून दाखवल्याचे' त्यांनी म्हटलं.
ते म्हणाले, "भाषणात 'आपण लढू आणि प्रचंड ताकदीनं लढू' हा भाग नंतरचा आहे, पण तुमच्या व्हीडिओमुळे असं वाटतं की हे दोन्ही एकत्र झालं आहे."
डेली टेलिग्राफमध्ये गुरुवारी आलेल्या बातमीनंतर, बीबीसीच्या प्रवक्त्याने सांगितलं की, बीबीसी स्वतःला 'सर्वोच्च संपादकीय मानकांवर' ठेवते आणि या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
ट्रम्प यांच्या कायदेशीर टीमच्या प्रवक्त्याने टेलिग्राफला सांगितलं, "आता स्पष्ट झालं आहे की, बीबीसी ट्रम्प यांची बदनामी करण्याच्या पद्धतीत गुंतली आहे."
टेलिग्राफने बीबीसीच्या संपादकीय मानक समितीतील माजी स्वतंत्र बाह्य सल्लागाराचा लीक मेमो प्रकाशित केल्यानंतर ट्रम्प यांच्यावरील पॅनोरमा कार्यक्रमाबाबत चिंता निर्माण झाली.
इतर गोष्टींबरोबरच, दस्तऐवजात बीबीसीच्या ट्रान्स समस्यांच्या अहवालावर आणि इस्रायल-गाझा युद्धाच्या बीबीसी अरेबिकच्या कव्हरेजवरही टीका करण्यात आली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












