ट्रम्प की जिनपिंग? व्यापारयुद्धातल्या या दोन नेत्यांपैकी कोण नमतं घेईल?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग या महिन्याच्या अखेरीस दक्षिण कोरियामध्ये भेटणार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images / BBC

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग या महिन्याच्या अखेरीस दक्षिण कोरियामध्ये भेटणार आहेत.
    • Author, बेनी लु
    • Role, बीबीसी न्यूज, चीन
    • Author, द ग्लोबल जर्नलिज्म टीम
    • Role, वर्ल्ड सर्विस

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या बहुप्रतिक्षित भेटीवर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

ट्रम्प आणि शी जिनपिंग 30 ऑक्टोबरला दक्षिण कोरियात आयोजित एशिया-पॅसिफिक इकोनॉमिक्स को-ऑपरेशन संमेलनादरम्यान भेटणार आहेत. व्हाईट हाऊसने याबाबत माहिती दिली आहे.

या भेटीचं नियोजन आधीचं ठरलं होतं. मात्र, जगातील या दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे ती जवळजवळ रद्द होण्याच्या स्थितीत पोहोचली होती.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला चीनने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत रेअर अर्थ खनिजांच्या निर्यातीवर नवीन निर्बंध लागू करण्याची घोषणा केली होती.

चीनचे 'रेअर अर्थ' खनिजांच्या पुरवठ्यावर निर्विवाद वर्चस्व आहे. याचा अनेक हायटेक प्रोडक्ट्स निर्मितीसाठी वापर अत्यावश्यक आहे.

याच कारणामुळे चीनने रेअर अर्थच्या निर्यातीवर कडक नियंत्रण ठेवण्याचा जो निर्णय घेतला, त्याला ट्रम्प यांनी, 'हा जगाला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न' असल्याचे म्हटलं होतं. तसेच नोव्हेंबरपासून सर्व चिनी वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली.

मात्र, त्यानंतर दोन्ही देशांनी आपली भूमिका मवाळ करत चर्चेची तयारी दर्शवली.

मात्र, हे दोन्हीं देश एकमेकांवर बाजारात अस्थिरता निर्माण करण्याच्या आणि तणाव वाढवण्याच्या मुद्यावरून दोषारोप करत आले आहेत.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, ट्रम्प म्हणाले की, ते चीनसोबत टॅरिफपासून रेअर अर्थपर्यंत प्रत्येक गोष्टीची डील करणार आहेत. मात्र त्यांनी चीनच्या हेतूंचं पूर्ण मुल्यांकन न केल्याचं दिसलं. कारण चीन ट्रम्प यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या टॅरिफ वॉरला जशास तसं उत्तर देत आहे.

अमेरिकेच्या थिंक टँक अटलांटिक कौन्सिलचे चिनी तज्ज्ञ वें-टी सुंग यांच्या मते, "दोन्हीं पक्षांकडून खूप काही पणाला लावून मोठी खेळी खेळली जात आहे."

सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटीतील राज्यशास्त्राच्या असोसिएट प्रोफेसर चोंज जा इयान म्हणतात, "दोन्ही देशांना वाटतं की, त्यांच्याकडे एकमेकांपेक्षा जास्त नुकसान सहन करण्याची क्षमता आहे आणि हाच मुद्दा त्यांच्या चर्चेचा एक भाग असल्याचं लक्षात येतं."

सुंग यांच्यानुसार ट्रम्प यांच्या धोरणांतील एक प्रमुख रणनीती म्हणजे 'वर्चस्वाची परीक्षा' आहे. जर चीन वाढत्या दबावापुढे नमला, तर येत्या काही महिन्यांत अमेरिका-चीनच्या संबंधांची दिशा ठरू शकते.

मात्र, चीन अमेरिकेसमोर झुकण्याची शक्यता कमी आहे.

ते सांगतात, "चीनमध्ये सत्तेत असलेले शी जिनपिंग यांचं हे सलग 13 वं वर्ष आहे. त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी ट्रम्पसोबत द्विपक्षीय शिखर परिषदेची काहीच गरज नाही."

रेअर अर्थ व्यतिरिक्त चीनने अमेरिकेच्या सोयाबीन क्षेत्रालाही लक्ष्य केले आहे. जरी अमेरिकन शेतकरी ट्रम्पच्या प्रमुख समर्थकांपैकी एक आहेत.

नोव्हेंबर 2018 नंतर पहिल्यांदाच यावर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेकडून चीनला होणारी सोयाबीनची निर्यात पूर्णपणे थांबली, तर ब्राझील आणि अर्जेंटिनामधून होणारी आयात वाढली.

अमेरिकन शेतकरी ट्रम्प यांच्या प्रमुख समर्थकांपैकी एक आहेत. दुसरीकडे चीनने रेअर अर्थशिवाय अमेरिकेच्या सोयाबीन क्षेत्रालाही लक्ष्य केले आहे.

अ‍ॅनालिलिस फर्म कॅपिटल इकॉनॉमिक्समधील चिनी अर्थशास्त्राचे प्रमुख ज्युलियन इव्हान्स-प्रिचर्ड लिहितात की, अमेरिकेने लादलेल्या शुल्कानंतरही, चीनची निर्यात 'अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत' राहिली आहे. असं असलं तरी यामुळे सप्टेंबरमध्ये त्यांच्या जीडीपीमध्ये 0.3 टक्के घट झाली.

चीन अमेरिकेच्या प्रत्युत्तराचा सामना करू शकेल का?

अमेरिकेसोबत दीर्घ काळापासून सुरू असलेल्या ट्रेड वॉरमुळे चीनची स्थिती कमकुवत होऊ शकते.

कारण अमेरिकन आयातदार पर्यायी पुरवठादार आणि सप्लाय चेन शोधण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करतील.

उदाहरणार्थ, ॲपलने या वर्षाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की, ते अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनचे बहुतेक उत्पादन चीनमधून भारतात हलवतील.

जूनमध्ये, नाईकीने त्यांची काही उत्पादन केंद्रे चीनबाहेर हलवण्याची योजना आखली.

इव्हान्स-प्रिचर्ड यांच्या मते, चीनने अमेरिकेच्या शुल्काविरुद्ध 'कायमस्वरूपी प्रतिकारशक्ती' विकसित केली आहे असे गृहीत धरणे 'मूर्खपणाचे' ठरेल. कारण, रॅनमिन्बी (युआन) अमेरिकन डॉलरव्यतिरिक्त इतर चलनांच्या तुलनेत कमकुवत झाला आहे. यामुळे चीन निर्यातीच्या बाबतीत अजूनही स्पर्धात्मक दिसून येतो.

चीनच्या अर्थव्यवस्थेत निर्यात हे अजूनही वाढीचं मुख्य इंजिन आहे. कारण चीन सध्या देशांतर्गत खप वाढवण्यासाठी आणि रिअल इस्टेट संकटातून सावरण्यासाठी झगडतो आहे.

चीन आणि अमेरिकेतील वादाचा एक प्रमुख मुद्दा म्हणजे रेअर अर्थ मिनेरल्स.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, चीन आणि अमेरिकेतील वादाचा एक प्रमुख मुद्दा म्हणजे रेअर अर्थ मिनेरल्स.

काही तज्ज्ञांच्या मते चीन ट्रम्प यांचा अंदाज घेण्यात चूक करू शकतो.

अमेरिकन थिंक टँक स्टिम्सन सेंटरच्या सुन युक यांच्या मते, "चीनने अमेरिकेच्या प्रत्युत्तर देण्याच्या क्षमतेला कमी लेखण्याची 'धोकादायक सवय' लावून घेतली आहे."

ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवान विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक नॉईड मॅकडोनाघ यांच्या मते अमेरिका चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्राला लक्ष्य करून त्यावर नवीन व्यापार निर्बंध लावू शकतो.

उदाहरणार्थ, अमेरिकेने आधीच चीनला एनव्हिडीयाच्या सर्वात प्रगत चिप्स खरेदी करण्यापासून रोखलं आहे.

मात्र, प्राध्यापक मॅकडोनाघ म्हणतात की, तंत्रज्ञान क्षेत्राला अशाप्रकारे लक्ष्य केल्याने चीनचा विकास मंदावू शकतो, परंतु त्याला 'पूर्णपणे थांबवणं' शक्य होणार नाही.

कोण आधी नमतं घेईल?

काही विश्लेषकांच्या मते, सध्या बाजार ज्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहे, त्यामुळे ट्रम्प यांना आपला दृष्टिकोन मवाळ करावा लागला आहे.

10 ऑक्टोबरला चीनच्या 'रेअर अर्थ' संदर्भातील घोषणेनंतर ट्रम्प यांनी दिलेल्या कठोर प्रतिक्रियेचा परिणाम असा झाला की, अमेरिकन शेअर बाजाराला तब्बल 2 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले.

त्याउलट, चीनच्या धोरणांवर बाजाराच्या भावनांचा फारसा परिणाम होत नाही. देशातील निर्णयप्रक्रिया अत्यंत केंद्रीत आहे. शी जिनपिंग यांना अलीकडच्या दशकांतील सर्वात शक्तिशाली चिनी नेता मानले जाते.

चीनचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष सरकारच्या नियंत्रणाखालील उद्योगांवर कडक नियंत्रण ठेवतो. हे उद्योग केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करतात.

काही विश्लेषकांचे मत आहे की, चीन ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी पूर्णपणे तयार आहे. ट्रम्प यांची शैली आणि धोरणं जसे की टॅरिफ युद्ध, टेक वॉर आणि कोविड-19 साथीचा सामना यांचा सखोल अभ्यास करून चीन आता एक 'हार्ड गेम' खेळत आहे.

अमेरिकन थिंक टँक ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनचे वरिष्ठ संशोधक रायन हास यांच्या मते, चीन आता 'विद्यार्थी कक्षेतून बाहेर पडत प्राध्यापक' झाला आहे.

त्यांच्या मते, शी जिनपिंग सत्तेत आल्यापासून चीन 'प्रतिकारात्मक हल्ल्यांपासून (फक्त प्रतिसाद देण्यापुरते मर्यादित राहणे) 'संधीसाधू कृतीकडे' वळला आहे."

म्हणजेच संधी पाहून स्वतःहून पुढाकार घेण्याची रणनीती.

सोयाबीन आयातीसाठी चीन आता ब्राझील आणि अर्जेंटिनाकडे वळत आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सोयाबीन आयातीसाठी चीन आता ब्राझील आणि अर्जेंटिनाकडे वळत आहे.

हा बदल चीनच्या वाढत्या सामर्थ्याशी निगडित आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू झालेल्या अमेरिका–चीन व्यापार युद्धाने शी जिनपिंग यांच्या 'आत्मनिर्भर चीन' या अजेंड्याला अधिक बळकटी दिली.

तेव्हापासून, चीनच्या नेतृत्वाने या व्यापार युद्धाचा वापर देशांतर्गत राष्ट्रवाद मजबूत करण्यासाठी आणि अमेरिकन बाजारपेठेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठीची संधी म्हणून पाहिलं आहे.

यामुळे बीजिंगला आपल्या पुरवठा साखळीला (सप्लाय चेन) एक धोरणात्मक शस्त्र म्हणून वापरण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. रेअर अर्थच्या पुरवठ्यावर निर्बंध आणणं हे याचंच एक उदाहरण आहे.

तर दुसरीकडे, अमेरिकन थिंक टँक पॅसिफिक फोरमच्या प्राध्यापिका एलिझाबेथ लारस यांनी इशारा दिला आहे की, चिनी नेत्यांना ट्रम्प यांचा अहंकार आणि कमकुवत बाजू लक्षात आली आहे.

त्या म्हणतात, "ट्रम्प सशक्त पुरुष नेत्यांबरोबर तोपर्यंत चांगले राहतात, जोपर्यंत असे नेते त्यांच्या संयमाची परीक्षा घेत नाही. मात्र, जेव्हा कोणी त्यांच्या संयमाची परीक्षा घेतो, तेव्हा ट्रम्प प्रत्युत्तर देतात. चीनच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या या स्वभावाबाबत सावध राहिलं पाहिजे ."

लारस असंही म्हणतात की, चीनने ट्रम्प यांच्या "अचानक निर्णय घेण्याच्या प्रवृत्ती"बाबतही जागरूक राहायला हवं. तसेच व्हाइट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर आणि उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या लॉरा लूमर यांसारख्या ट्रम्प यांच्या प्रभावशाली सल्लागारांच्या प्रभावापासूनही सावध असलं पाहिजे.

एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन (APEC) परिषदेदरम्यान ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात तडजोड होण्याची शक्यता आहे. पण दोन्ही देश त्यांचे मूलभूत मतभेद लवकर मिटवतील, याची शक्यता कमी आहे.

(ग्रेस सोई आणि अलेक्झांड्रा फॉसे यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.