लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर प्रिन्स अँड्र्यू यांची हकालपट्टी; 'प्रिन्स' उपाधीही गेली

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नूर नांजी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ब्रिटनचे राजकुमार अँड्र्यू यांना आता त्यांचा 'प्रिन्स' हा किताब गमवावा लागणार आहे. त्याचबरोबर विंडसरच्या रॉयल लॉज या महालातूनही त्यांना बाहेर पडावं लागणार आहे.
लैंगिक गुन्ह्यातील दोषी जेफ्री एप्स्टीनसोबतच्या त्यांच्या संबंधांबाबत गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या सखोल चौकशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गुरुवारी (30 ऑक्टोबर) रात्री बकिंघम पॅलेसकडून जारी केलेल्या निवेदनात सांगितलं आहे की, आता राजाच्या (किंग) भावाला 'अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर' या नावाने ओळखलं जाईल.
अँड्र्यू यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनावर उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे या महिन्याच्या सुरुवातीलाच इतर शाही पदव्या स्वतःहून सोडल्या होत्या. यात 'ड्यूक ऑफ यॉर्क' या पदवीचाही समावेश होता.
व्हर्जिनिया जियुफ्रे यांचे मरणोत्तर आत्मचरित्र या महिन्याच्या सुरुवातीला प्रकाशित झाले. या पुस्तकात अनेक ठिकाणी म्हटलं आहे की, व्हर्जिनिया किशोरवयीन असताना त्यांनी प्रिन्स अँड्र्यूसोबत तीन वेगवेगळ्या वेळी शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र, अँड्र्यू यांनी हे सर्व आरोप नेहमीच फेटाळले आहेत.
या ताज्या घडामोडींवर व्हर्जिनिया जियुफ्रे यांच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे. "व्हर्जिनियाने आपल्या सत्य आणि विलक्षण धैर्याच्या बळावर एका ब्रिटिश राजकुमारालाही नमवलं," असं त्यांनी म्हटलं आहे.
जियुफ्रे यांनी यावर्षाच्या सुरुवातीला आत्महत्या केली होती.
(आत्महत्या हा एक गंभीर मानसिक आणि सामाजिक प्रश्न आहे. जर तुम्हीही तणावातून जात असाल, तर भारत सरकारची 'जीवन आस्था' हेल्पलाइन 1800 233 3330 वर संपर्क करून मदत घ्या. तसेच, आपल्या मित्र-परिवाराशी बोलत राहा.)
दरम्यान, बकिंघम पॅलेसने आपल्या निवेदनात सांगितलं की, राजाने आज प्रिन्स अँड्र्यू यांच्या पदव्या, किताब आणि सन्मान अधिकृतपणे परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
"आता रॉयल लॉजची लीज सोडण्यासाठी अधिकृत नोटीस जारी करण्यात आली आहे," असं बकिंघम पॅलेसने सांगितलं.
आता अँड्र्यू यांची सँडरिंगहॅम इस्टेटमधील खासगी निवासात राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या निवासस्थानाचा खर्च स्वतः किंग चार्ल्स उचलतात, असं म्हटलं जातं.
निवेदनानुसार, "अँड्र्यू सतत आपल्यावरचे आरोप नाकारत असले तरीही, या कारवाया आवश्यक असल्याचं मानलं गेलं."
पॅलेसने असंही म्हटलं आहे की, ते "कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराच्या बळींबरोबर (शोषण पीडित) ठामपणे उभे आहेत".
मुलींच्या पदव्या मात्र कायम राहणार
अँड्र्यू यांच्या दोन मुली, यूजीन आणि बीएट्रिस यांना मिळालेल्या 'प्रिन्सेस' पदव्या कायम राहणार आहेत.
तसेच, अँड्र्यू हे अजूनही राजसिंहासनाच्या उत्तराधिकारी यादीत आठव्या क्रमांकावर आहेत.
असंही मानलं जातं की, अँड्र्यू यांच्या माजी पत्नी सारा फर्ग्युसन याही रॉयल लॉजमधून बाहेर जाणार असून त्यांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
या महिन्यापर्यंत सारा यांच्याकडे 'डचेस ऑफ यॉर्क' ही पदवी होती. पण अँड्र्यू यांनी 'ड्यूक ऑफ यॉर्क' ही पदवी स्वेच्छेने सोडल्यानंतर, सारा यांनी पुन्हा लग्नाआधीचं आपलं 'फर्ग्युसन' हे आडनाव वापरायला सुरुवात केली.
असं समजलं जातं की, अँड्र्यू यांच्याकडून 'प्रिन्स' हा किताब परत घेण्याच्या निर्णयाबाबत ब्रिटन सरकारशीही चर्चा करण्यात आली होती. सरकारने या निर्णयाला पाठिंबा दिला.
बीबीसीच्या 'क्वेश्चन टाइम' या कार्यक्रमात या बातमीवर प्रतिक्रिया देताना ब्रिटनच्या सांस्कृतिकमंत्री लिसा नंदी म्हणाल्या, "हा निर्णय ग्रूमिंग आणि लैंगिक अत्याचाराचे बळी ठरलेल्या लोकांसाठी एक सशक्त संदेश आहे."
त्या म्हणाल्या, "ही एक मोठी घटना आहे आणि किंग यांच्यासाठीही हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. माझ्या पहिल्या प्रतिक्रियेतच मी सांगू इच्छिते की, त्यांच्या या निर्णयाला मी पूर्णपणे पाठिंबा देते."

फोटो स्रोत, Getty Images
सतत वाढत चाललेल्या दबावाचा परिणाम
अँड्र्यू यांच्या शाही पदव्या परत घेण्याचा हा निर्णय म्हणजे गेल्या काही आठवड्यांपासून ब्रिटनच्या राजघराण्यावर वाढत असलेल्या दबावाचा परिणाम आहे.
व्हर्जिनिया जियुफ्रे यांच्या आत्मचरित्रात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या आरोपांचा उल्लेख करण्यात आला, तेव्हा अँड्र्यू आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीन यांच्या संबंधांवरील वाद पुन्हा भडकला.
जरी अँड्र्यू यांनी व्हर्जिनिया जियुफ्रे यांनी केलेले अत्याचाराचे आरोप नेहमीच नाकारले असले, तरी या महिन्याच्या सुरुवातीला 2011 मधील काही ई-मेल्स समोर आले.
त्यातून हे दिसून आलं की, अँड्र्यू आणि एप्स्टीन यांच्यातील 'मैत्री' संपल्याचा दावा केल्यानंतरही ते दोघे काही महिन्यांपर्यंत संपर्कात होते.

फोटो स्रोत, Getty Images
अलीकडच्या काळात अँड्र्यू यांच्या राहणीमानाने आणि खर्चांनीही सर्वांचं लक्ष वेधलं.
कोणतीही अधिकृत शाही जबाबदारी नसताना ते इतकं ऐशोआरामी जीवन कसं जगत आहेत? असा प्रश्नही उपस्थित झाला होता.
अँड्र्यू 2004 पासून रॉयल लॉजमध्ये राहत आहेत. त्यासाठी त्यांनी 2003 साली क्राउन इस्टेट नावाच्या स्वतंत्र मालमत्ता कंपनीसोबत 75 वर्षांच्या लीज करारावर सही केली होती.
विंडसर इस्टेटमधील हा ग्रेड-2 दर्जाचा रॉयल लॉज अतिशय भव्य आहे. यात गार्डनर्स कॉटेज, चॅपल लॉज, सहा बेडरूमचं कॉटेज आणि सुरक्षारक्षकांसाठी निवासस्थानंही आहेत.
लैंगिक शोषणाच्या गुन्हेगाराला पार्टीला बोलावलं
गेल्या आठवड्यात ही माहिती समोर आली की, अँड्र्यू या महालाचा खर्च कसा भागवत होते.
बीबीसीने लीजशी संबंधित कागदपत्रं पाहिली. त्यातून समजलं की, अँड्र्यू यांनी एक टोकन रक्कम वार्षिक भाडं म्हणून दिली होती आणि कदाचित ते देणं बंधनकारकही नव्हतं.
या करारानुसार, दरवर्षी भाडं देण्याऐवजी अँड्र्यू यांनी एकदाच मोठी रक्कम भरली होती. त्यात दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या खर्चाचाही समावेश होता.
खरं तर, हा भरणा 80 लाख पाउंडांपेक्षा (सुमारे 93 कोटी रुपयांपेक्षा) जास्त होता. नॅशनल ऑडिट ऑफिसच्या अहवालात याचा उल्लेख आहे.
त्यानुसार, या रकमेच्या माध्यमातून अँड्र्यू यांनी 75 वर्षांच्या लीजसाठी दरवर्षी भाडं भरण्यापासून सुटका करून घेतली होती.

फोटो स्रोत, Getty Images
एका वेगळ्या घडामोडीत हेही समोर आलं आहे की, 2006 साली जेव्हा अमेरिकेत अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात जेफ्री एप्स्टीनविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं.
त्यानंतर अवघ्या 2 महिन्यांनी अँड्र्यू यांनी त्याला आपली मुलगी बीएट्रिसच्या वाढदिवसाच्या पार्टीला रॉयल लॉजमध्ये पाहुणा म्हणून बोलावलं होतं.
मात्र, आता अँड्र्यू यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
बकिंघम पॅलेसकडून गुरुवारी (30 ऑक्टोबर) केलेली घोषणा ही प्रिन्स अँड्र्यू यांच्याभोवती सुरू असलेल्या वादांना थांबवण्याचा प्रयत्न मानला जात आहे. आता प्रिन्स अँड्र्यू फक्त अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर म्हणून ओळखले जातील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











