कंडोम वापरायला पॉर्नोग्राफी आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तरुणांचा नकार?

    • Author, जेनी रीझ
    • Role, आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी वेल्स न्यूज

पॉर्नोग्राफी, त्यासाठी प्रसिद्ध असलेला 'ओन्लीफॅन्स' हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि कुटुंब नियोजनांच्या तथाकथित नैसर्गिक पद्धतींच्या अपप्रचारामुळे किशोरवयीन मुलामुलींमध्ये कंडोमचा वापर कमी केला जातोय का?

व्हायएमसीए या तरुणांसाठी काम करणाऱ्या जगप्रसिद्ध संस्थेत सारा पीअर्ट लैंगिक आरोग्य प्रशिक्षक म्हणून काम करतात. पॉर्नोग्राफीत दिसत नाही म्हणून त्यांच्याकडे येणारी अनेक मुलं कंडोम घालायला नकार देत असल्याचं त्यांच्या निरीक्षणात आलं आहे.

कंडोमशिवाय लैंगिक संबंध ठेवून गर्भधारणा टाळण्यासाठी संप्रेरकं बदलणारी औषधं, गोळ्या, इंजेक्शनं वापरण्याऐवजी मासिक पाळीच्या तारखेवरून सुरक्षित दिवस कोणता हे सांगणारी काही ॲप्स असतात. मुलींना भुलवण्यासाठी या ॲप्सची जाहिरात सतत त्यांच्या सोशल मीडियावर दिसत राहते, असंही सारा पीअर्ट पुढे सांगतात.

शिवाय, ओन्लीफॅन्स या वादग्रस्त प्लॅटफॉर्मवर व्हीडिओ तयार करणारे या किशोरवयीन मुलामुलींसमोर चुकीची उदाहरणं ठेवतात. हे व्हीडिओ तयार करणारे एका दिवसांत किती जणांसोबत लैंगिक संबंध ठेवले याच्या फुशारक्या मारताना दिसतात. त्याच्या अनेकदा बातम्याही होतात.

ओन्लीफॅन्सवरच्या अशाच एका महिलेनं मौखिक संभोग करत असताना कंडोम वापरत नसल्याचं सांगितलं. खरंतर, यामुळे एचआयव्हीसारख्या लैंगिक संसर्गाचा धोका असतो.

चांगली उदाहरणं आणि इन्फ्लुएन्सर्स नसल्यानं मुलांना लैंगिक शिक्षण देणं फार आव्हानात्मक होऊन जातं, असं पीअर्ट सांगतात.

"गर्भनिरोधनासाठी नैसर्गिक पद्धतींचा वापर करत असल्याचं आम्हाला अनेक मुलंमुली सांगत असतात," असंही त्या नमूद करतात.

व्हायएससीएच्या शाळा, कॉलेजमध्ये होणाऱ्या सत्रांतून आणि तरुणांसाठी पुरवल्या जाणाऱ्या सेवांमधून किशोरवयीन मुलामुलींना लैंगिक शिक्षण दिलं जातं.

शिवाय, लैंगिक संंबंधांबद्दल समाजात असणाऱ्या गैरसमजाबद्दल बोललं जातं आणि चांगले नातेसंबंध कसे असतात याबद्दल चर्चा केली जाते.

महत्त्वाचं म्हणजे, असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे फक्त गरोदर राहण्याचाच धोका असतो असं नाही, हेही मुलांच्या मनावर बिंबवलं जातं.

"फक्त गर्भनिरोधनाची साधनं वापरणं पुरेसं नाही; तर लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांपासून स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे हे तरुणांना सांगणं फार अवघड आहे," असं पीअर्ट यांनी सांगितलं.

कुटुंब नियोजनाच्या नैसर्गिक पद्धती नेहमीच विश्वासार्ह असतात असं नाही, हेही पौडांगवस्थेतल्या या मुलांना सांगावं लागतं, असंही त्या पुढे म्हणतात.

विशेषतः ज्या वयात मासिक पाळी नियमित झालेली नसते आणि त्याची नेमकी तारीख लक्षात ठेवण्याइतकी समज मुलामुलींमध्ये आलेली नसते, तेव्हा तर या पद्धतींवर अवलंबून राहणं फार धोक्याचं असतं.

"आमच्या सत्रात पॉर्नोग्राफीवरही बोललं जातं. त्यातूनच चर्चा पुढे अनेक वेळा ओन्लीफॅन्सकडे वळते," त्या सांगतात.

त्यांचा भर मुलांना लैंगिक शिक्षण देऊन योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणं यावर असतो. ओन्लीफॅन्सवर अकाऊंट काढू नका, असा सल्ला ते नक्की देतात. पण अर्थात, ते मुलांवर दबाव टाकू शकत नाहीत.

बीबीसी वेल्सने काही तरुण मुलांशी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. त्यातले अनेकजण सार्वजनिकरित्या अशा विषयावर बोलायला कचरत होते. मात्र काहींनी, कंडोम विकत घ्यायची लाज वाटत असल्याचं सांगितलं.

तरुणांमध्ये कंडोमचा वापर कमी झाल्याची धक्कादायक आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केली आहे. मात्र, 20 वर्षांच्या लँडीसूलच्या लीझ वीईरा हिला त्याचं काहीही आश्चर्य वाटत नाही.

लैंगिक संबंधांवर व्हीडिओ तयार करणाऱ्यांचा तरुणांवर पडणारा प्रभाव आणि त्यांचा यातल्या धोक्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन याचा विचार करता हे साहजिकच आहे असं तिला वाटतं.

"जोपर्यंत अशा नातेसंबंधातून महिलेला त्रास होत नाही, तोपर्यंत हा त्या जोडप्याचा निर्णय आहे असं म्हणून सोडून देता येऊ शकतो. मात्र या व्हीडिओमधून महिलेला आपल्याला हवं तसं वापरता येऊ शकतं असा संदेश दिला जातो. ते बरोबर नाही असं मला वाटतं," लीझ म्हणते.

शाळांमध्ये मिळणाऱ्या लैंगिक शिक्षणाचं स्वरूप फारच मर्यादीत असतं असं कार्डिफमध्ये राहणारे मॅसोन डाऊन आणि डायलन स्टेगल्स हे दोन तरूण सांगतात.

"शाळेत फक्त दोनच दिवस त्याबद्दल बोललं गेलं. तेही फक्त एक किंवा दोनच तास," 18 वर्षांचा डायलन सांगतो.

"पोर्नोग्राफी आता ऑनलाईन सहज उपलब्ध होते. तरुण मुलं कंडोमकडे कसं पाहतात याचा त्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो," मॅसोन म्हणाला.

व्हायएमसीएकडून तरुण मुलांसाठी घेतल्या जाणाऱ्या सत्रात सी-कार्ड योजनेबद्दलही सांगितलं जातं.

या योजनेतंर्गत ब्रिटनमधे राहणाऱ्या सगळ्या तरुणांना लैंगिक आरोग्याबद्दल मोफत माहिती दिली जाते. शिवाय, कंडोम, लैंगिक संबंधांवेळी वापरले जाणारे वंगण आणि डेंटल डॅम्स (तोंडाचे कंडोम) मोफत वाटले जातात.

"कंडोम खरोखर महागडे असतात. त्यामुळे ते सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सी-कार्ड सेवा खरोखर उपयुक्त ठरते. शिवाय, क्लब किंवा पबच्या शौचालयात एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात कंडोम ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीने तरुणांपर्यंत पोहोचवल्यानं त्याबद्दल सकारात्मक भावना तयार होते," पीअर्ट सांगतात.

या सेवांमुळे सज्ञान होण्याच्या कायदेशीर वयाआधीच मुलं लैंगिक संबंध ठेवतील, अशी शंका नेहमी उपस्थित केली जाते. मात्र, किशोरवयापासूनच लैंगिक आरोग्याबद्दलची शास्त्रीय माहिती मुलांना मिळत असेल, तर मुलं स्वतः लैंगिक संबंध उशिरा आणि विचारपूर्वक ठेवतात, असं संशोधनात समोर आलं असल्याचं पीअर्ट लक्षात आणून देतात.

"माहिती देताना आम्ही मुलांना निदान वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत थांबण्याचा सल्ला देतो. पण त्याआधीही ते लैंगिक संबंध ठेवणारंच असतील, तर निदान सुरक्षितरित्या ठेवले जावेत याची काळजी आम्ही घेतो," त्या सांगतात.

जागतिक आरोग्य संघटनेनं अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, वेल्समधल्या 15 वर्ष वयाच्या 56 टक्के मुलींनी आणि 49 टक्के मुलांनी मागच्या वेळी ठेवलेल्या लैंगिक संबंधात कंडोमचा वापर केला नव्हता.

गेल्या वर्षभरात लैंगिक संबंधातून पसणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाली असताना ही आकडेवारी चिंताजनक आहे. लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांमधली वाढही काळजीत टाकणारी आहे. क्लॅमिडियाच्या संसर्गात 22 टक्के, गोनोरियामध्ये 127 टक्के आणि सिफिलीसमध्ये 14 टक्के वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे.

ईली व्हेनल आणि मेगन ग्रीमले, या दोघी 21 वर्षांच्या कार्डिफमधल्या तरुणी. त्यांच्या मित्रमंडळींमधले बहुतेक जण गर्भनिरोधक गोळ्यांपासून आणि तांबीसारख्या साधनांपासून लांब पळतायत असं त्यांना दिसतं. असं असतानाही कंडोमचा वापर कमी होतो आहे हे कळल्यावर त्यांना धक्का बसला.

तांबी किंवा हार्मोनल इंप्लांटसारखी उपकरणं दीर्घकाळही चालतात आणि तरीही हवं तेव्हा काढून टाकून पुन्हा गर्भधारणेसाठी शरीराला तयार करता येतं. इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सिस्टमनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, अशा साधनांचा वापर गेल्या 5 वर्षांत 22 टक्क्यांनी कमी झालाय. दुसरीकडे गर्भपाताचं प्रमाण एक तृतीयांश टक्क्यांनी वाढलं आहे.

"खोटी माहिती किंवा वाईट अनुभवांमुळे असं होत असावं असं मला वाटतं. याबद्दल बोलण्यासाठी आणि त्याची माहिती मिळवण्यासाठी लोकं अजूनही लाजतात," मेगन सांगतात.

लैंगिक संबंधातून पसणाऱ्या आजाराची लागण झाल्याचं कसं ओळखायचं?

लैंगिक संबंधातून पसणाऱ्या आजाराची लागण झाल्याचं ओळखण्यासाठी अशा आजाराची तपासणी करणं हा सर्वोत्तम उपाय आहे. वेल्समधे सरकारच्या लैंगिक आरोग्य सेवा विभागाकडून 16 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी एक तपासणी कीट मोफत वाटलं जातं.

जवळच्या केंद्रातून ते घेता येतं किंवा अगदी पोस्टानेही मागवून तपासणी करून परत पाठवता येतं.

वेल्समध्ये ठिकठिकाणी असलेल्या लैंगिक आरोग्य केंद्रातही लैंगिक आजाराची तपासणी केली जाते आणि योग्य मार्गदर्शनही केलं जातं.

पण असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यानंतर संसर्ग दिसायला काही आठवडे जातात हे लक्षात ठेवायला हवं.

तपासणीतून एचआयव्हीचं निदान होण्यासाठी सात आठवड्यांचा, तर हिपाटायटीस 'बी' आणि 'सी'साठी 12 किंवा त्यापेक्षा जास्त आठवड्यांचा वेळ लागतो. क्लॅमिडिया आणि गोनोरियाचं निदान 15 दिवसात करता येतं.

ही फक्त किशोरवयीन, तरुण मुलांमध्येच दिसणारी समस्या आहे, असं नाही. पीअर्ट सांगतात की, शाळांमध्ये व्हायएमसीएच्या सत्रात वेगवेगळ्या गर्भनिरोधक साधनांबद्दल माहिती दिली जाते. पण बहुतेक वेळा मागे बसलेले शिक्षकही त्याची नोंद करून घेताना दिसतात.

लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांबद्दलची माहिती समाजात किती कमी आहे हेच यावरून अधोरेखित होतं.

वेल्सच्या सार्वजनिक आरोग्य विभागात काम करणाऱ्या झोई कुझन्स सांगतात की, घटस्फोट झाल्यावर किंवा जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर चाळीशीतले अनेकजण नवे नातेसंबंध तयार करतात. त्यामुळे 40 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांनाही लैंगिक संबंधातून पसरणारे आजार होताना दिसत आहेत.

"त्याला वयाची मर्यादा नसते. एका 72 वर्षांच्या व्यक्तीलाही क्लॅमिडिया झाल्याचं आम्ही पाहिलं आहे," झोई म्हणतात.

त्यामुळे लैंगिक आरोग्याबद्दलची माहिती प्रत्येक वयाच्या माणसांना मिळत आहे याची खात्री केली पाहिजे, असं त्यांना वाटतं.

"प्रौढ वयातल्या महिलांना लैंगिक आजार होण्याचा धोका जास्त असतो. रजोनिवृत्ती आल्यामुळं गरोदरपणाचा धोका कमी होतो आणि काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या वयातल्या लोकांनाही लैंगिक शिक्षण देणं फार महत्त्वाचं आहे," झोई सांगतात.

वेल्सच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं घरी तपासणी करून ते कीट पोस्टानं पाठवण्याची सोय केली आहे. तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढल्यानं लैंगिक आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ दिसत असल्याचा युक्तीवाद केला जातो आहे.

"वेल्समध्ये क्लॅमिडियाचे रुग्ण सगळ्यात जास्त दिसतात. त्यानंतर गोनोरियाचे. हे सगळे आजार प्रतिजैविकांनी बरे होतात. पण अलिकडेच गोनोरियाचा विषाणू या औषधांना प्रतिरोध करत असल्याचं समोर आलं आहे," झोई पुढे सांगतात.

"20 वर्षांपूर्वी वेल्समध्ये सिफिलीसचे फक्त दोन रुग्ण होते. मागच्या वर्षी 507 रुग्णांची नोंद झाली. हा संसर्ग झाल्याचं अनेकदा लक्षात येत नाही. पण त्याने चेतासंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि अनेकदा हृदयासंबंधी समस्याही दिसू लागतात."

इतर लैंगिक आजारांमुळे वंधत्व, वेदना आणि ओटीपोटाचा दाह असे आजारही होऊ शकतात. या आजारांवर सहज उपचार करता येऊ शकतो हा गैरसमज लोकांमधून काढून टाकण्यासाठी अनेक तज्ज्ञ झटत आहेत.

लैंगिक संसर्ग कसे होतात?

असुरक्षितपणे मौखिक, योनीमार्गे किंवा गुदद्वारातून संभोग केला तर, एकमेकांचे सेक्स टॉईज वापरले तर आणि दोन जननेंद्रियांचा एकमेकांशी संबंध आला तर क्लॅमिडियाचा संसर्ग पसरतो.

कंडोम न वापरता मौखिक, योनीमार्गे किंवा गुदद्वारातून संभोग केला तर किंवा एकमेकांचे सेक्स टॉईज वापरले तर गोनोरियाची लागण होऊ शकते.

संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या वीर्यातून, योनीमार्गातील किंवा गुदद्वारातील स्रावात एचआयव्हीचा विषाणू असतो. त्यामुळे कंडोम न घालता लैंगिक संबंध ठेवल्यानं एचआयव्ही पसरतो. हा एचआयव्ही संक्रमणाचा सर्वात सामान्य मार्ग आहे.

याशिवाय, जन्माच्या वेळीही आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते. तसेच, संसर्ग झालेल्या आईच्या दुधातूनही एचआयव्ही पसरतो. संसर्गित माणसाच्या रक्ताशी निरोगी माणसाच्या रक्ताचा थेट संबंध आला तर एचआयव्हीची लागण होते. त्यामुळे संसर्गित माणसासाठी वापरलेली सुई निरोगी माणसाला लागली तर एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो.

असुरक्षितपणे मौखिक, योनीमार्गे किंवा गुदद्वारातून संभोग केल्यानं आणि एकमेकांचे सेक्स टॉईज वापरल्यानं सिफिलिसचा संसर्ग पसरतो. तसेच, आईकडून बाळालाही लागण होऊ शकते.

जननेंद्रियांची नागिण या आजाराचा संसर्ग पटकन होतो. त्वचेचा त्वचेशी संपर्क आल्यानं म्हणजे मौखिक, योनीमार्गे किंवा गुदद्वारातून संभोग केल्यानं, एकमेकांचे सेक्स टॉईज वापरल्यानं किंवा तोंडात अल्सर झालेल्या व्यक्तीशी मौखिक संभोग केल्यानं या आजाराची लागण होते.

जेनेटिअल वार्ट्स हाही त्वचेचा त्वचेशी संपर्क आल्यानं पसरणारा आजार आहे. संसर्गित व्यक्तीशी योनीमार्गे किंवा गुदद्वारातून संभोग केल्यानं आणि एकमेकांचे सेक्स टॉईज वापरल्यानं याची लागण होते.

लैंगिक आजारांची लक्षणं काय असतात?

क्लॅमिडिया या आजाराला मूक संसर्ग म्हटलं जातं. अनेकांना आजाराची लक्षणं दिसतच नाहीत. मात्र, लघवी करताना वेदना होणं, योनीमार्गातून, लिंगातून किंवा गुदद्वारातून नेहमीपेक्षा वेगळा स्राव येणं अशी काही लक्षणं या आजारात दिसतात. महिलांना पोटदुखी, लैंगिक संबंध ठेवल्यानंतर किंवा ठेवताना आणि दोन मासिक पाळींच्या मध्ये रक्तस्राव होणं असे त्रास होऊ शकतात. पुरुषांमध्ये वृषणग्रंथींमध्ये वेदना आणि सूज येऊ शकते.

गोनोरिया आजाराची लागण झाली, तर पिवळसर किंवा हिरवट रंगाचा स्राव, लघवी करताना जळजळ आणि वेदना किंवा पोट मऊ पडणं अशी लक्षणं दिसू शकतात.

सिफिलीस आजारात काहींना तोंडात किंवा जननेंद्रियांवर एक छोटा, वेदनारहीत अल्सर येतो आणि पुढे पुरळ येते. उपचार घेतले नाहीत, तर संसर्गानं दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. डिमेन्शिया आणि मृत्यूही होऊ शकतो. संसर्ग झाला असताना महिला गरोदर राहिली, तर गर्भपात होण्याचा, मृत बाळ जन्माला येण्याचा किंवा जन्मल्यानंतर बाळाचा मृत्यू होण्याचाही धोका असतो.

जननेंद्रियांची नागीण झाली, तर जननेंद्रियांवर, गुदद्वाराजवळ, मांड्यांवर आणि नितंबावर छोटे लाल फोड आणि अल्सर येतात. असे फोड योनीच्या आतल्या भागावर आले, तर त्यानं योनीतून स्राव येणं, लघवी करताना वेदना होणं आणि ताप, सर्दी खोकला अशी फ्लूची लक्षणं दिसतात.

जेनिटल वार्ट्समध्ये सुरुवातीला महिलांना छोटे, रखरखीत फोड येतात. हळूहळू ते मोठे होत जातात. पुरुषांमध्ये हे फोड टणक असतात आणि त्याचा पृष्ठभाग रखरखीत लागतो. अनेकदा एकच फोडही येऊ शकतो.

जनेटिल वार्ट्स आजार सोडला, तर अनेकदा काही लोकांध्ये लैंगिक संसर्गाची लक्षणं दिसतच नाहीत, असंही तज्ज्ञ सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)