You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सीरियन लष्कराने शेकडो नागरिकांची हत्या केल्याचा आरोप, याचं असदशी काय कनेक्शन?
सीरियामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर नजर ठेवून असलेल्या एका गटानं, सीरियातील सुरक्षा दलावर गंभीर आरोप केले आहेत. सुरक्षा दलांनी अलावी या अल्पसंख्याक समुदायातील शेकडो लोकांची हत्या केल्याचा हा आरोप आहे.
ब्रिटनमधील सीरियन ऑब्झरवेटरी फॉर ह्युमन राइट्स (एसओएचआर) नं सीरियामध्ये शुक्रवारी आणि शनिवारी अलावी समुदायाला लक्ष्य करण्यात आल्याचं सांगितलं. तसंच अशा 30 हल्ल्यांमध्ये सुमारे 745 सामान्य नागिरांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.
मात्र, मारल्या गेलेल्या लोकांच्या नेमक्या आकड्याबाबत बीबीसीनं स्वतंत्ररीत्या पडताळणी केली नाही.
सीरियात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बशर अल-असदची सत्ता गेल्यानंतर झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत.
यादरम्यान सीरियाच्या हंगामी सरकारनं शनिवारी देशाच्या लताकिया आणि टार्ट्स या किनारी भागात मोठ्या संख्येनं सैनिक तैनात केले आहेत. त्यांना माजी राष्ट्राध्यक्ष असद यांच्या समर्थकांशी लढण्यासाठी पाठवण्यात आलं आहे.
सीरियातील ताज्या हिंसाचारावर तुर्कीच्या इस्तानबूलमध्ये असलेल्या सीरिया टिव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, 7 मार्चला सीरियाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शरा यांनी असद सरकारच्या 'उर्वरित' समर्थकांवर हिंसा भडकावल्याचा आरोप केला. तसंच त्या सशस्त्र गटांना 'खूप उशीर होण्याआधी आत्मसमर्पण करा'अशी विनंतीही केली.
बीबीसी मॉनिटरिंगनुसार अनेक अरब देश आणि प्रादेशिक संघटनांनी सीरियात 'बेकायदेशीर संघटना'च्या माध्यमातून करण्यात आलेल्या हिंसाचारावर टीका केली आहे. त्यात मोठ्या संख्येनं लोक मारले गेले आहेत.
अरब देशांनी सीरियामध्ये शांततता प्रस्थापित करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या सर्व पावलांमध्ये सीरियाच्या नव्या सरकारप्रती पाठिंबा असल्याचा पुन्हा उल्लेख केला आहे.
यापूर्वी सीरियाच्या लताकिया आणि टार्टसमध्ये सीरियाचे संरक्षण दल आणि माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या विश्वासू समर्थकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यानंतर सात मार्चला दोन्ही शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला.
7 आणि 8 मार्चला अरब मीडियामध्ये या हिंसाचाराच्या बातम्या प्रामुख्यानं चर्चेत होत्या. त्यात प्रादेशिक आणि जगभरातून येणाऱ्या प्रतिक्रिया आणि सीरियात वेगवेगळ्या संघटनांना संयम बाळगण्याच्या विनंतीला प्राधान्य देण्यात आलं होतं.
अरब देशांची भूमिका काय?
या मुद्द्यांवर आखाती सहकार्य परिषद (जीसीसी)चे सरचिटणीस जसम अल-बुदैवी यांनी सीरियातील सरकारला पाठिंबा दर्शवला आहे.
शुक्रवारी दिलेल्या एका वक्तव्यात ते म्हणाले की, "सीरिया अरब रिपब्लिक त्यांच्या नागरिकांची सुरक्षा आणि स्थैर्य यासाठी जे प्रयत्न आणि उपाययोजना करत आहेत, त्यात जीसीसी त्यांच्या पाठीशी आहे."
त्याचवेळी काही जीसीसी सदस्य देशांनी सीरियामध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत वेगवेगळी वक्तव्यं दिलं आहे.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सीरियामध्ये बेकायदेशीर संघटनांद्वारे करण्यात आलेले गुन्हे आणि सुरक्षा दलांनी केलेले हल्ले याचा निषेध केला आहे.
संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या परराष्ट्र मंत्रालयानंही सीरियाच्या सुरक्षा दलांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. सीरियातील स्थैर्य, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतासाठी यूएईचा पाठिंबा असल्याचं ते म्हणाले.
तर बहरीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं सीरियात 'बेकायदेशीर समुहांद्वारे करण्यात आलेले गुन्हे' आणि 'सुरक्षा तसंच सामाजिक शांतीला धक्का पोहोचवणाऱ्या त्यांच्या प्रयत्नांचा'निषेध केला.
अशाप्रकारे सौदी अरब आणि कुवैतनं बेकायदेशीर गटांद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयानं सीरियाच्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देण्याची विनंती केली.
तर जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री अयमान अल-सफादी यांनी एक्सवर एक पोस्ट करत, मित्र देश सीरियाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि शांततेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना पाठिंबा दिला असून विदेशी हस्तक्षेपाचा निषेध केला आहे.
इराकच्या विदेश मंत्रालयांनी सीरियातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
सीरियाच्या 'मुक्ती'साठी नवी संघटना
सीरियामध्ये अलीकडील काही दिवसांत नवीन सरकारचा विरोध करण्याच्या प्रयत्नासाठी एक नवीन गट स्थापन झाल्याचं सांगण्यात आलं. पण ही माहिती सीरियातील माध्यमांमध्ये व्यापक रूपानं बातम्या देण्यात आलेल्या एका अनिश्चित सुत्राकडून मिळालेली आहे.
हे वक्तव्य आधी माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे भाऊ माहेर अल-असद यांच्याशी संलग्न असलेल्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने करण्यात आलं होतं. सीरियाच्या किनारी भागातील संघर्षाच्या दरम्यान ही माहिती आली होती. देशातील अलावी अल्पसंख्याक समुदायातील अनेक जण या भागात राहतात.
सीरियात टेलिग्राम चॅनल आणि प्रादेशिक माध्यमांनी सहा मार्चला एक वक्तव्य केलं होतं. ते माजी राष्ट्राध्यक्ष असद यांच्या काळातील एक वरिष्ठ अधिकारी घियाथ सुलेमान दला यांचं वक्तव्य असल्याचं सांगण्यात आलं. त्यात 'सीरियाच्या मुक्तीसाठी लष्करी परिषद'म्हटल्या जाणाऱ्या एका समुहाच्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली.
पण हे वक्तव्य सर्वांत आधी कुठून समोर आलं होतं, याबाबत मात्र काहीही स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.
सारियामध्ये अलावी लोकसंख्येचं केंद्र असलेल्या लताकिया आणि टार्टसमध्ये नवीन सरकारच्या सुरक्षा दलांना आणि असदच्या समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक लोक मारले गेले आहेत, असं समोर येत आहे.
घियाथ सुलेमान दला यांच्या हवाल्यानं जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात असं म्हटलं आहे की, संघटनेचा उद्देश 'हल्लेखोर आणि दहशतवादी शक्तींपासून सीरियातील सर्व भागांना मुक्त करणं' आणि 'हुकूमशाही सरकार आणि त्यांच्या धार्मिक धोरणांना समूळ नष्ट करणं'हा आहे.
प्रादेशिक माध्यमांनुसार घियाथ सुलेमान दला चौथे डिव्हिजन कमांडर होते. त्याचं नेतृत्व आधी बशर अल-असद यांचे लहान भाऊ माहेर अल-असद यांनी केलं होतं. ते त्यांच्या 'क्रौर्यासाठी' ओळखले जात होते. तसंच असद यांच्या लष्कराचा ते प्रमुख भागही होते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.