वेदना म्हणजे काय? आपल्याला रात्री जास्त वेदना का होतात?

वेदना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रॅसिओ दे ला वेगा कॅरान्झा
    • Role, मानसशास्त्राचे अभ्यासक

हा अनुभव आपल्यापैकी सगळ्यांना कधीकधी आला असेल. रात्री तळमळत एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर होणं... अचानक पाठदुखी, डोकेदुखी, कान किंवा गुडघेदुखी उफाळून येणं... दिवसा वेदना सह्य असतात पण रात्री मात्र आराम करायच्यावेळा त्या असह्य वाटू लागतात.

मग या वेदना रात्री इतक्या तीव्र का होतात? विज्ञान याबद्दल काय सांगतं?

या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवू.

वेदना म्हणजे काय?

आपण सगळ्यांनी कधीनाकधी वेदनांचा (Pain/Pains) अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे ही संकल्पना काही नवी नाही.

पण वेदनेची व्याख्या करायला गेलं तर ती थोडी गुंतागुंतीची स्थिती असल्याचं दिसतं.

अनेक वर्ष शब्दांमध्ये बदल करुन करुन इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ पेन(आयएएसपी) ने 2020 साली एका व्याख्येवर एकमत बनवलं.

त्यानुसार, ‘एखादी जखम किंवा उतींच्या क्षतीशी संबंधित असणारी नकोशी संवेदना आणि त्याच्याशी जोडलेला भावनिक अनुभव’ अशी काहीशी ही व्याख्या करण्यात आली.

वेदनेला एखाद्या शारीरिक क्षतीची आठवण करुन देणारी नकोशी वाटणारी भावना असं म्हणता येईल.

वेदनेमुळे काहीतरी बिघडलंय याची जाणीव होते. आपलं शरीर धोकामुक्त ठेवण्यासाठी ती एक यंत्रणा असते.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या शारीर व्यवस्थेवर संकट आलं आहे आणि संरक्षणाची व्यवस्था सज्ज केली पाहिजे असा संदेश मेंदूला पोहोचवण्याची ती यंत्रणा आहे. तसेच ही स्थिती नकोशी वाटणारी आणि ती दूर केली पाहिजे असं वेदनेतून सांगितलं जातं.

मात्र पूर्वी मानलं जायचं तशी ती उत्तेजनाला दिलेली प्रतिक्रिया नाही.

वेदना

फोटो स्रोत, Getty Images

म्हणजे गरम भांड्याला हात लागला की तो मागे घ्यायला लावून हात पोळू नये म्हणून वेदना आपलं रक्षण करतात असं मानलं जायचं. पण आधुनिक संकल्पनेत वेदना या मेंदूशी संबंधित असून त्या कोठे, कधी, कितीप्रमाणात, कशा होतील हे त्यावर ठरतं.

हे खरं आहे की उत्तेजना (जसं की गरम भांड्याला हात लागणं) मेंदूशी जोडलेल्या नसांना संदेश पाठवतात.

त्यानंतर मेंदू त्या संदेशावर प्रक्रिया करतो आणि एक विशिष्ट संवेदना तयार करतो त्याला नॉइसेप्शन असं म्हटलं जातं.

हा भाग फक्त अनुभवाचा झाला, वेदनेमध्ये नॉइसेप्शनचं आकलन आणि भावनिक अर्थ लावला जातो.

त्यामुळे उत्तेजनेद्वारे मिळणाऱ्या संदेशालाच वेदना म्हणता येत नाही, अशा कोणत्याही संदेशाविनाही वेदना जाणवू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर फँटम लिंब स्थितीचं देता येईल. काही कारणांनी अनेक लोकांचे हात पायासारखे अवयव काढून टाकले जातात किंवा त्या लोकांनी अवयव गमावलेले असतात.

तरीही अशा लोकांचे मेंदू या नसलेल्या अवयवांमधील वेदना तयार करतात. त्यांना हे अवयव नसले तरी त्यांच्यासंदर्भातील वेदना त्यांना जाणवतात.

रात्रीच्या वेदना

मग रात्री या वेदना तीव्र का होतात? या आपल्या संरक्षणाशी, आपल्या जिवंत राहाण्याशी कशा निगडीत आहेत? ही स्थिती मेंदूच्या प्रक्रिया करण्याच्या व्यवस्थेशी आणि आकलनाच्या विज्ञानाशी संबंधित आहे.

1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात मानसोपचारतज्ज्ञ रोनाल्ड मेलझॅक आणि मेंदूतज्ज्ञ पॅट्रिक वॉल यांनी पेन गेट थिअरी मांडली. त्यांच्या थिअरीनुसार आपल्या मणक्यातील मज्जारज्जूत एक दार असतं.

वेदना

फोटो स्रोत, Getty Images

ते दार उघडझाप करुन वेदनेच्या संदेशांचं नियमन करत असतं.

दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर काही गोष्टींमुळे ते दार बंद होतं आणि आपल्याला कमी वेदना जाणवतात. आणि काही गोष्टींमुळे ते दार उघडतं आणि जास्त वेदना जाणवतात.

उदाहरण द्यायचं झालं तर एखादा ठोसा शरीराला लागला तर घर्षणाने वेदना होते आणि मग त्याची तीव्रता कमी होऊ लागते व ती प्रक्रिया संपते.

रात्री ही स्थिती बदलते. रात्री अंधारात ते मणक्यातलं दार बंद होईल असं लक्ष विचलित करणारं काही नसतं. कोणतीही प्रतिमा, आवाज किंवा इतरांशी संवाद नसतो त्यामुळे त्या दिवसापेक्षा जास्त तीव्र एकाग्र असतात.

सर्वात वाईट वेळ पहाटे 4

1960 च्या दशकापासून वेदनेवर अभ्यास सुरू आहे. अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत.

ब्रेन या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार सर्कडियन सायकल हे रात्रीच्या वेदनेसाठी कारणीभूत असतं.

इनेस डागेट यांनी केलेल्या संशोधनानुसार पहाटे 4 वाजता वेदना सर्वात तीव्र असतात असं ते सांगतात.

हे बदल आपल्या शरीरातील संप्रेरकांच्या बदलांनुसार होत असावेत. कार्टिसोल (ताण आल्यावर प्रसवणारं संप्रेरक) हे आपल्या रोगप्रतिकारकक्षमतेशी संबंधित असतं तसेच झोपेसाठी कारणीभूत असलेल्या मेलाटोनिनशी संबंधित असतं.

अर्थात हा एक प्रयोगावर आधारित असलेला अभ्यास आहे विसरू नये. तो प्रयोगशाळेत केलेला आहे.

वेदना

फोटो स्रोत, Getty Images

यात सहभागी झालेले लोक त्यांच्या नेहमीच्या बिछान्यात झोपलेले नव्हते आणि त्यांना वेदना होतील अशा गोष्टी जाणीवपुर्वक कृत्रिमरित्या करण्यात आल्या होत्या.

रात्रीच्या वेदनांबद्दल हदस नाहमन आणि ख्रिस्तोफर डी. किंग हे संशोधक एक वेगळं मत मांडतात ते म्हणतात यामागे एक उत्क्रातींचाही दृष्टिकोन आहे.

लाखोवर्षांपूर्वीपासून मनुष्य रात्री झोपलेला असताना त्याच्यावर हिंसक प्राण्यांचा हल्ला होण्याची शक्यता जास्त असते.

त्यामुळे रात्री लहानशी उत्तेजक गोष्टही आपल्याला संभाव्य धोक्याची जाणीव करुन देण्यासाठी पुरेशी असते.

अर्थात रात्री आपल्याला वेदना जास्त का होतात यावर अधिक अभ्यास होणं आवश्यक आहे.

परंतु रात्री आपला मेंदू अधिक सतर्कतेने काम करतो जेणेकरुन वाघसिंहासारखे

हिंस्र पशू आपल्याला झोपेतच खाणार नाहीत. (म्हणजेच मेंदू आताच्या काळात कोणत्याही धोक्यापासून आपल्याला तात्काळ जागं करतो.

रेसियो दे ला वेगा दे करान्झा हे स्पेनमधील मालागा विद्यापीठात मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)