तीव्र उष्णतेमुळे आपला डीएनएही 'वितळत' चालला आहे का? वय लवकर वाढतं का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अँजेला हेन्शॉल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सुलेमान हम्मूदनला अतिशय उष्ण शहरात राहण्याची सवय झाली आहे.
तो दुबईमध्ये (संयुक्त अरब अमिराती) आयटी सेल्समध्ये काम करतो. तिथे जून ते सप्टेंबरदरम्यान तापमान नियमितपणे 45 डिग्री सेल्सियस (113F) पेक्षा जास्त असतं.
"दिवसा तुम्ही बाहेर गेलात की, असं वाटतं की तुम्ही वाळवंटात आहात. उष्णता आणि आर्द्रतेमुळे खूप त्रास होतो," असं तो सांगतो.
"मी अनेकदा घरातूनच काम (वर्क फ्रॉम होम) करतो. बाहेर जाणं झालंच तरी साधारण सायंकाळी 7 च्या सुमारास, सूर्य मावळल्यानंतरच जातो. त्यावेळी वातावरण अजूनही गरम असतं, पण ते सहन करण्याजोगं असतं."
उन्हाळ्यात रस्त्यावर फारच कमी लोक चालतात. "त्यामुळे कामासाठी मी घरातून कारमध्येच ऑफिसला जातो," असं तो पुढे सांगतो.
"सर्वत्र एअर कंडिशनिंग आहे, विशेषतः मॉलमध्ये, जिथे लोकांना दिवसभर राहायला आवडतं. मॉल म्हणजे तुमचं दुसरं घरच आहे!"
आपल्याप्रमाणेच, सुलेमानही त्याच्या दैनंदिन आयुष्याला इतक्या जास्त उष्णतेशी जुळवून घेत आहे, ज्याचा त्यानं पूर्वी कधी विचारही केला नसेल.
जर आपल्या शरीराला वारंवार इतक्या उष्णतेचा सामना करावा लागला, तर त्यात काय बदल घडू शकतात? याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत.
साउदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात, अनेक राज्यांमध्ये आणि हवामानात राहणाऱ्या हजारो अमेरिकन लोकांवर दैनंदिन तापमान 32 डिग्री सेल्सियस (90F) पेक्षा जास्त असताना काय परिणाम झाला? हे पाहण्यात आलं.
रक्त चाचण्यांचा वापर करून, संशोधकांनी 3600 सहभागींचं जीवशास्त्रीय (एपिडेमियोलॉजिकल) वय व त्यांच्या खऱ्या वयाशी तुलना केली आणि हे तापमानाच्या डेटाशी जोडलं.
अभ्यासाच्या लेखिका, पोस्ट-डॉक्टोरल सहयोगी युन्ग चोई यांनी सांगितलं की, शरीरावर होणारा परिणाम धक्कादायक होता. जास्त उष्णतेला सतत सामोरे जाणाऱ्या लोकांचं वय वेगानं वाढत होतं.
आपल्या शरीरावर याचा दीर्घकालीन परिणाम होतो का?
शास्त्रज्ञांना आधीच माहीत आहे की, उष्णतेमुळे मेंदूची कार्यक्षमता, हृदयाचं आरोग्य आणि मूत्रपिंडांची (किडनी) कामगिरी यात बदल होऊ शकतात.
परंतु, यूएससीच्या डेटानुसार, जास्त उष्णतेला सतत सामोरे जाण्यामुळे आपल्या डीएनएमध्ये रासायनिक बदल होतात, ज्याला 'मेथिलेशन' असं म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
"आपल्या शरीराचं तापमान वाढतं, तसं पेशींभोवती असलेले फॅट्स (लिपिड्स) थेट बदलू लागतात आणि नष्ट होऊ लागतात," असं 'द हीट विल किल यू फर्स्ट - लाइफ अँड डेथ ऑन अ स्कॉर्च्ड प्लॅनेट' या पुस्तकाचे लेखक जेफ गुडेल म्हणाले.
"पेशींची रचना तुटून जाते आणि हेच अंडं शिजवल्यावर घडतं! अंड्याचा बाहेरील थर (मेम्ब्रेन) बदलतो."
गरम हवामानात राहिल्याने आपल्याला वयाच्या लक्षणांशी संबंधित आजार जसं की, मधुमेह, स्मृतीभ्रंश (डिमेन्शिया), हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार लवकर होऊ शकतात.
एपिजेनेटिक वृद्धापकाळ म्हणजे काय
मग आपल्या पेशी किती वेगानं नष्ट होत आहेत?
आपल्याला माहिती आहेत की, काही लोक इतरांच्या तुलनेत लवकर वृद्ध होतात, आणि यूएससीमधील डॉ. चोई म्हणतात की, साध्या शब्दांत सांगायचं तर, एपिजेनेटिक वृद्धापकाळ हा डॉक्टरांना एखाद्याचं जैविक वय मोजण्याचा एक मार्ग आहे.
हे दाखवतं की, आपल्या शरीराच्या पेशी किती नीट काम करत आहेत.
"डीएनए जन्मावेळी ठरलेला असतो, तो कधीही बदलत नाही, परंतु मेथिलेशन हे जीनसाठी लाइट स्विचसारखं असतं आणि जीन कसं कार्य करेल हे नियंत्रित करतं," असं डॉ. चोई म्हणतात.
रक्ताच्या चाचण्यांचा वापर डीएनएमधील मेथिलेशन (डीएनएएम) बदल तपासण्यासाठी केला जातो.
"आपण डीएनएला आपल्या घराचा नकाशा किंवा ब्ल्यूप्रिंट समजू आणि मेथिलेशन हे स्विचबोर्ड आहे जे ठरवतं कोणते भाग कार्यरत होतील आणि कोणते नाहीत," असं डॉ. चोई म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
"या प्रक्रियेचा अर्थ समजून घेण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे, आपल्याला माहीत आहे की ताणतणाव, हवेतील प्रदूषण आणि आता उष्णतेसारखे पर्यावरणीय घटक देखील हे स्विच बदलू शकतात."
डॉ. चोई म्हणतात की, त्यांच्या अभ्यासातून दिसतं की सतत उष्णतेला सामोरं जाण्याचा परिणाम आपल्या शरीरावर तितकाच मोठा आहे, जितका महत्त्वाच्या जीवनशैलीच्या फरकांचा असतो. "हे धूम्रपान आणि जास्त मद्यपानाच्या परिणामासारखाच आहे."
जरी वय झपाट्यानं वाढण्याची ही गती लहान वाटत असेल, काही महिन्यांचा फरक तरी, वेळोवेळी ही जमा होत जाणारी गती समजून घेणं आवश्यक आहे. वर्षानुवर्षे थोडीफार वाढ झाली तरी ती अनेक वर्षांच्या वेगानं वृद्ध होण्यास कारणीभूत ठरू शकते.
याचा अर्थ असा होऊ शकतो की, आपल्याला मधुमेह, स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) आणि हृदयविकारसारख्ये वयाशी संबंधित आजार खूप लवकर होऊ शकतात.
पण डॉ. चोई म्हणतात की, हा अभ्यास आता एक संधी देखील देतो, "हे आपल्याला अशी माहिती देतं की डॉक्टरांना वेळेत हस्तक्षेप करण्याची सुवर्णसंधी मिळते."
पांढरे केस आणि सुरकुत्यांबद्दल काय?
मग, ज्या ठिकाणी तापमान खूप जास्त आहे तिथे राहिल्यामुळे आपल्या दिसण्यात फरक पडेल का?
सुलेमान सांगतात की, दुबईत राहिल्यामुळे त्यांच्या शरीरावर लवकर वृद्धापकाळाचे परिणाम दिसत आहेत, त्याच्या चेहऱ्यावर अधिक रेषा आणि सुरकुत्या दिसत आहेत.
"मागील उन्हाळ्यात मला डॉक्टरांकडे जावं लागलं, कारण मला उन्हाचे चटके खूप बसले होते. माझी त्वचा खूप खराब झाली होती आणि आजही त्याचे डाग किंवा चट्टे दिसत आहेत," असं तो सांगतो.
त्यानं पुढं असंही सांगितलं की, सनस्क्रीनबद्दल अभ्यास करावा लागला, ज्याचा त्याने लंडनमध्ये राहत असताना कधी विचारही केला नव्हता.
"मला आता समजलं की, लोक दिवसा छत्री घेऊन का फिरतात. घरी आल्यावर सतत उष्णतेला सामोरे जाण्यामुळे आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम जाणवतो."

फोटो स्रोत, Getty Images
सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांना सतत सामोरं गेल्यानं त्वचेवर सुरकुत्या वाढतात आणि आपण जास्त वृद्ध दिसतो.
पण हे अजून स्पष्ट नाही की, त्याचा परिणाम केस पांढरे होण्यावर होतो का?
केसांचा रंग मेलानोसाइट्स नावाच्या पेशींनी ठरतो आणि काही त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की, यूव्ही किरणांचा संपर्क या प्रक्रियेत अडथळा आणतो.
आपल्याला माहिती आहे की, वाढती उष्णता आणि दमट हवा मेंदूशी संबंधित काही आजारांना वाढवते जसं की, एपिलेप्सी, स्ट्रोक, मेंदूची सूज (एन्सेफॅलायटिस), मल्टिपल स्क्लेरोसिस आणि मायग्रेन. हे सर्व आजार व्यायामाद्वारे वजन नियंत्रित करणं खूप कठीण करू शकतात.
फक्त एका अत्यंत उष्णतेच्या घटनेमुळेच चयापचय (मेटाबॉलिजम) बदलतो का, हे अद्याप स्पष्ट नाही.
अति उष्णतेपासून संरक्षणाची सर्वाधिक गरज कोणाला?
जर्मनीमध्ये 2023 मध्ये झालेल्या एका छोट्या अभ्यासात, हार्वर्डच्या टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील पर्यावरणीय आरोग्य संशोधक डॉ. वेन्ली नी यांनीही उष्ण हवामान आणि पेशींचा झपाट्याने वृद्ध होण्याशी संबंध दाखवला.
त्यांच्या संशोधनाचा एक भाग म्हणजे वयाशी संबंधित आजारांच्या दृष्टीने डीएनए मेथिलेशनच्या नमुन्यांचा अर्थ लावणं होता.
त्यांच्या मते, "अभ्यासात दिसलं की, मधुमेह आणि जास्त वजन असलेले लोक जास्त वेगानं वृद्ध होत आहेत. आम्हाला नेहमी दिसलं की, मधुमेह असलेले लोक अति उष्णतेला जास्त संवेदनशील किंवा असुरक्षित असतात."

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. वेन्ली नी सांगतात की, जेव्हा रक्त तपासणीत पेशींमध्ये वेगाने वृद्धापकाळ दिसतो, तेव्हा हा मृत्यूचा आणि मधुमेह, हृदय, फुफ्फुस आणि मेंदूसंबंधी आजारांचे धोके वाढल्याचे महत्त्वाचे संकेत आहेत.
संशोधनात काही मर्यादा आहेत. त्यामुळे एपिजेनेटिक्स वेगाने वृद्ध होणं समजायला मदत करतात, पण ते सांगत नाहीत की, उष्णतेमुळे आपल्या शरीरातील कोणती प्रणाली सर्वात जास्त प्रभावित झाली आहे.
डॉ. चोई यांची टीम आता मूत्रपिंड, मेंदू किंवा हृदय यापैकी कोणती प्रणाली सर्वात जास्त प्रभावित झाली आहे, हे पाहणार आहे.
यूव्ही किरणं त्वचेच्या वृद्धापकाळात मोठी भूमिका बजावतात, ज्यामुळे सुरकुत्या आणि त्वचेतील सैलपणा वाढतो.
'त्यांना जीवनशैली बदलावी लागेल'
जेफ गुडेल फिनिक्समध्ये काम करत होते. ज्या दिवशी तापमान 46 डिग्री (115 F) वर पोहोचले त्या दिवशी हवामान बदलावर त्यांनी पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला.
ते मिटिंगला जाण्यासाठी रस्त्यावरून चालत निघाले होते, परंतु अति उष्णतेमुळे जवळजवळ ते कोसळलेच होते.
असा एकदाच आलेला अनुभव शरीरातील चयापचयावर परिणाम करू शकतो का, हे गुडेल यांना समजून घ्यायचं होतं.
उंदरावर झालेल्या अलीकडील अभ्यासात दिसलं की, एका उंदराला एका अति उष्णतेच्या दिवशी सामोरे जाण्यामुळे त्याच्या चयापचयावर कायमचा परिणाम झाला.
हवामान बदल जसजसा वाढत आहे, तसतसं अमेरिकेतील अनेक भागात 21व्या शतकाच्या मध्यापर्यंत अति उष्ण दिवसांची संख्या 20 ते 30 दिवसांनी वाढू शकते, असं देशाच्या नॅशनल क्लायमेट असेसमेंटमध्ये सांगितलं आहे.
अमेरिकेच्या दक्षिण भागातील राज्यांमध्ये उष्णतेचा हंगाम आधीच लांबला आहे आणि तो प्रत्येक वर्षी लवकर सुरू होत आहे.
गुडेल म्हणतात, "टेक्सास सारख्या ठिकाणी लोक उष्णतेच्या हंगामाबद्दल सतत विचार करत असतात."
"मागील दोन उन्हाळ्यांपासून त्यांना माहीत आहे, की त्यांना आपलं जीवन बदलावं लागेल आणि काम करण्याचा आणि फिरण्याचा वेगळा विचार करावा लागेल."
त्याचा परिणाम असा झाला की, लोकांमध्ये अति उष्णतेचा धोका जाणून घेण्यामुळे भाषा बदलली आहे, असं गुडेल म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
उष्णतेच्या लाटा चक्रीवादळासारख्या संख्यांनी मोजण्याचा विचार केला जात आहे, पण आर्द्रता देखील लक्षात घेतली पाहिजे.
ते म्हणतात, "पूर्वी टीव्हीच्या बातम्यांमध्ये उष्णतेच्या लाटेत समुद्रकिनाऱ्याकडे जात असलेल्या कारच्या रांगा दाखवल्या जात असत."
त्यांनी सांगितलं की, "लोक आता उष्णतेच्या लाटांबद्दल असं विचार करतात की, ही एक धोकादायक शक्ती आहे. विशेषतः ज्यांना बाहेर काम करावं लागतं किंवा ज्यांची इमारत उष्णतेपासून सुरक्षित नाही."
गुडेल यांच्या मते, हवामान बदलामुळे आधीच मोठे मतभेद निर्माण झाले आहेत.
"आपण दोन गटांमध्ये विभागलो गेलो आहेत, थंड हवामानात राहणारे आणि उष्णतेने प्रभावित झालेले," असं ते म्हणाले.
"एका बाजूला पाणी, सावली आणि एअर कंडिशनिंग आहे. दुसऱ्या बाजूला घाम, त्रास आणि काही वाईट परिस्थितीत मृत्यूही आहे."
ते म्हणतात की, "टेक्सासमधील लोकांना उष्णतेबद्दल सर्वात महत्त्वाचं जे समजलं ते म्हणजे 'ही एक शिकारी शक्ती आहे आणि सर्वात आधी संवेदनशील किंवा असुरक्षित लोकांवर हल्ला करते."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.










