You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विमानसेवा, सीमा वाद आणि 'ट्रम्प टॅरिफ'वर चीनसोबत काय चर्चा झाली? परराष्ट्र सचिवांनी दिली माहिती
चीनमधील तियानजिन इथे होत असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची (एससीओ) शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाने या भेटीबाबत एक विशेष पत्रकार परिषद घेतली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री या पत्रकार परिषदेत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा दिवस अनेक महत्त्वाच्या बैठकांनी व्यापलेला राहिला आहे.
विक्रम मिस्री म्हणाले की, "उद्या पंतप्रधान शिखर परिषदेच्या पूर्ण सेशनला संबोधित करणार आहेत. या परिषदेत ते शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन अंतर्गत प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारताचा दृष्टिकोन मांडतील. यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय बैठक करतील आणि त्यानंतर ते भारतात परततील.
भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरु करण्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "लवकरच आपल्याला भारत आणि चीन या उभय देशांदरम्यान पुन्हा थेट विमानसेवा सुरू होताना दिसेल."
मिस्री म्हणाले की, "गेल्या काही आठवड्यात आणि महिन्यांत, दोन्ही देशांमध्ये या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, वरिष्ठ पातळीवर एक समजूत तयार झाली होती की आपण या दिशेनं पुढं जावं. तेव्हापासून, तांत्रिक स्तरावर अनेक बैठका झाल्या आहेत. अलीकडेच भारतीय नागरी विमान वाहतूक विभागाचे एक शिष्टमंडळ बीजिंगला गेले होते. त्यामुळे, या मुद्द्यावर व्यापक सहमती तयार झाली आहे.
"आता हवाई सेवा करार आणि वेळापत्रक यासारख्या काही कामकाजाच्या गोष्टीं सुस्पष्ट व्हायच्या शिल्लक आहेत. येत्या काही आठवड्यात हे मुद्देदेखील सोडवले जातील आणि दोन्ही देशांमधील उड्डाणे पुन्हा सुरू होतील, असं मला वाटतं.
सीमेसंबंधित चर्चेबद्दल परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, "ही चर्चा पुढे नेण्यासाठी समर्पित यंत्रणा तयार करण्यात आल्या आहेत. आम्हाला आशा आहे की, भारत आणि चीनमधील सीमावर्ती भागात सहकार्य आणि समन्वयासाठी विद्यमान यंत्रणा येत्या काही दिवसांत आणि आठवड्यात भेट घेतील. सीमारेषेशी संबंधित चर्चा कशी पुढे न्यायची हे दोन्ही बाजूंचे नेते आपापसात चर्चा करुन ठरवतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील द्विपक्षीय बैठकीत अमेरिकेच्या टॅरिफवर चर्चा झाली की नाही?
या महत्त्वाच्या प्रश्नावर बोलताना परराष्ट्र सचिव म्हणाले की, "दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीवर चर्चा केली. त्यांनी मान्य केलं की सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक आव्हानं निर्माण झालेली आहेत. मात्र, चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू उभय देशांतील द्विपक्षीय संबंध हाच राहिला. दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडत आहे आणि त्यातून जी आव्हाने तयार झालेली आहेत, त्यांचाही स्वीकार केला. पण त्यांनी या परिस्थितींचा वापर परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि भारत-चीन व्यावसायिक संबंध पुढे नेण्यासाठी कसा करता येईल, हे पाहण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान मोदींनी घेतली अनेक नेत्यांची भेट
चीनमधील तियानजिन इथे सुरू असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेतली.
त्यांनी बैठकांचे फोटो आणि त्यांचे अनुभव 'एक्स'वर शेअर केले. पंतप्रधान मोदींनी लिहिलंय की, या बैठकांमध्ये व्यापार, ऊर्जा, सुरक्षा आणि परस्पर सहकार्य यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
पंतप्रधान मोदींनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू, नेपाळचे पंतप्रधान केपी ओली, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मादबोली, बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को, ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमोन, कझाकस्तानचे राष्ट्रपती टोकायेव, म्यानमारचे वरिष्ठ जनरल मिन आंग हलाईंग यांचीही भेट घेतली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)