You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणमध्ये सत्ता परिवर्तनाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य, म्हणाले 'मेक इराण ग्रेट अगेन'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणमध्ये सत्ता बदलाबाबतचं वक्तव्य केलं.
ट्रम्पयांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली. "सत्ता परिवर्तन म्हणणं राजकीय दृष्ट्या योग्य मानलं जात नाही. पण जर विद्यमान इराणी सरकार इराणला पुन्हा महान बनवण्यात अपयशी ठरत असेल, तर मग सत्ता परिवर्तन का होऊ नये? मेक इराण ग्रेट अगेन."
अशा प्रकारची पोस्ट ट्रम्प यांनी केली. पण रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी, इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ले सत्ता परिवर्तनासाठी नव्हते, असं स्पष्ट केलं.
"ही मोहीम सत्ता परिवर्तनासाठी नव्हती आणि आताही तसा काही उद्देश नाही," असं हेगसेथ म्हणाले.
त्याचबरोबर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स रविवारी एबीसी न्यूजशी बोलताना म्हणाले होते की, "सर्वात पहिली बाब म्हणजे, आम्हाला सत्ता परिवर्तन नको आहे. आम्हाला इराणचा अणुकार्यक्रम संपुष्टात आणायचा आहे."
अमेरिकेनं रविवारी इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर हल्ले केले होते.
त्यानंतर इराणच्या अधिकाऱ्यांनीही या अणुकेंद्रांवर हल्ले झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण त्यामुळं फार काही नुकसान झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
तेलाचे दर वाढले
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून होर्मुझचा जलमार्ग बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्यांना वेग आला. त्यामुळं जगभरात यावर चर्चा सुरू झाली.
जगभरात पुरवठा होणाऱ्या तेल वाहतुकीपैकी या मार्गाच्या माध्यमातून होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं हा विषय अनेक देशांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
दरम्यान, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर पहिल्या व्यापार सत्रासाठी ऊर्जा बाजार उघडले आहेत.
त्यात सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत 3% पेक्षा जास्त वाढली त्यामुळं त्याचे दर 79 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.
आठवड्याच्या शेवटी झालेल्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमती वाढण्याची अपेक्षा होती, त्यामुळं पुरवठा साखळीत संभाव्य व्यत्यय येण्याची चिंता व्यापाऱ्यांना होती.
आशियातील शेअर बाजार उघडल्यानंतर त्याठिकाणची परिस्थिती समोर येईल.
जलमार्ग बंद करणे ही 'आर्थिक आत्महत्या' - अमेरिका
चीनमधील तिआनजिन येथील बीबीसीच्या आशियातील व्यवसाय प्रतिनिधी सुरंजना तिवारी यांनी याबाबतचं विश्लेषण केलं आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी इराणला होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यापासून रोखण्यास मदत करावी असं आवाहन चीनला केलं आहे. हा एक प्रमुख व्यापार मार्ग असून, जगातील जवळजवळ एक चतुर्थांश तेल आणि वायूसाठी याची इथून वाहतूक होते.
इराणच्या सरकारी टीव्हीवर देशाच्या संसदेने पर्शियन आखातातील हा अरुंद जलमार्ग बंद करण्याच्या उपाययोजनांना मान्यता दिल्याच्या वृत्तानंतर रुबियो यांचं हे वक्तव्य आलं.
फॉक्स न्यूज या वाहिनीवर बोलताना रुबियो म्हणाले की, "हा जलमार्ग बंद करणे ही आणखी एक मोठी चूक असेल. त्यांनी तसं केलं तर ती 'आर्थिक आत्महत्या' आहे. तेल आणि वायू पुरवठ्यात अडथळा आल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील. परिणामी तेलाच्या किमती वाढून चीन, भारत आणि जपान सारख्या प्रमुख आयातदारांना मोठा फटका बसेल."
विश्लेषकांच्या मते, सामुद्रधुनी बंद करण्याचा अधिकार संसदेपेक्षा राजवटीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडे आहे. तसंच इराण स्वतःच्या निर्यात आणि अर्थव्यवस्थेसाठीही या मार्गावरील वाहतुकीवर अवलंबून असल्याने, हे पाऊल धोकादायक ठरू शकते.
सर्वात मोठा प्रश्न कायम
फ्रँक गार्डनर, सुरक्षा प्रतिनिधी
या संपूर्ण गोंधळाच्या परिस्थितीमध्ये 'इराण होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न करेल का?' यापेक्षाही एक गंभीर आणि मोठा प्रश्न आहे. कारण त्याचे गंभीर आर्थिक, राजकीय आणि लष्करी परिणाम होऊ शकतात.
हा प्रश्न म्हणजे, 'इराणकडे अजूनही पुरेसा समृद्ध युरेनियमचा साठा (HEU) आहे का?'
विशेष म्हणजे या सर्वाचे उत्तर आपल्या कोणाकडेही नाही. कारण ते गोपनीय पद्धतीने भूगर्भात लपवलेले आहे. शिवाय त्यापासून आण्विक अस्त्रं निर्मितीचे त्यांचे ज्ञान आणि यंत्रणा. कारण त्यावरूनच त्यांना अण्वस्त्राबाबतचा निर्णय घेता येईल.
सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या हल्ल्यांमुळं इराण अण्वस्त्रधारी राष्ट्र बनण्याचा धोका दूर झाला आहे का? की उलट त्याची शक्यता अधिक वाढली आहे?
मी याबाबत काही लष्करी तज्ज्ञांशी बोललो. त्यांच्या मते, इराणने पुरेसा युरेनियम साठा केला असेल तर आणि त्यांच्या शास्त्रज्ञांना काहीही अडचण येऊ न देता काम सुरू ठेवायचं असेल तर त्यांना न्यूट्रॉन इनिशिएटर वापरून एक साधं बंदुकीसारख्या उपकरणाद्वारे चाचणी घेता येऊ शकते.
हे स्फोटाच्या माध्यमातून चाचणी करण्यासाठीच्या उपकरणापेक्षा सोपं ठरतं, असंही ते म्हणाले.
या सर्वात असलेली एक शक्यता म्हणजे, जर इराणने अणुबॉम्ब मिळवला तर सौदी अरेबिया आणि मध्य पूर्वेतील इतर देशही तो मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळं अण्वस्त्रांची स्पर्धा सुरू होईल.
इराण-इस्रायलमध्ये हल्ल्यांचे सत्र
दरम्यान या प्रकारानंतर इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामध्ये पुन्हा दोन्ही बाजुंनी हल्ल्यांचे दावे प्रतिदावे करण्यात आले.
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) नं भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे X वर पोस्ट करत इराणकडून हल्ला झाल्याची माहिती दिली. क्षेपणास्त्र हल्ल्यामुळं मध्य इस्रायलमध्ये सायरन वाजत असल्याची माहिती या पोस्टद्वारे देण्यात आली.
घराबाहेर पडणं कधी सुरक्षित असेल याबाबत लष्कराकडून नागरिकांना माहिती दिली जाणार असल्याचं सांगत धोका कमी झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, त्याआधी रविवारी तेल अवीवमध्येही इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा झाला. त्यात निवासी इमारतींचे नुकसान झाले.
यात दोन टप्प्यांत किमान 27 इराणी क्षेपणास्त्रं डागण्यात आली. त्यापैकी काहींनी हैफा, नेस झिओना आणि रिशोन लेझिओनसह उत्तर आणि मध्य इस्रायलच्या भागात हल्ला केला.
दुसरीकडं, इस्रायलनं तेहरान, केरमानशाह आणि हमेदानमध्ये गुप्तचर माहितीवर आधारित हल्ले करण्यासाठी 20 लढाऊ विमानं पाठवली.
लक्ष्य केलेल्या ठिकाणी क्षेपणास्त्र साठा, रडार आणि उपग्रह प्रणाली आणि तेहरानजवळील जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र प्रक्षेपक असल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून, इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सुरू आहे. इराणच्या अणुकार्यक्रमामुळं धोका असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.
अमेरिकेने 'विचित्र' कारणं देऊन युद्ध पुकारले
संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत आणि कायमस्वरूपी प्रतिनिधी अमीर सईद इरावनी यांनी संयुक्त राष्ट्रांत अमेरिकेवर खोटी आणि हास्यास्पद कारणं देत इराण विरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप केला आहे.
इराणला अमेरिकेच्या या आक्रमक भूमिकेपासून स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. पण याला वेळेनुसार आणि योग्य प्रमाणात कसं प्रत्युत्तर द्यायचं याचा निर्णय इराणचं लष्कर घेईल, असंही त्यांनी सांगितलं.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेला आणखी एका खर्चिक युद्धात ओढल्याचा आरोपही इरावनी यांनी केला आहे. हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचं थेट उल्लंघन असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं.
इराण अण्वस्त्रं निर्माण करण्याच्या अगदी जवळ पोहोचला असल्याच्या खोट्या कथा इस्रायलनं पसरवल्या असल्याचंही यावेळी इराणच्या प्रतिनिधींनी म्हटलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.