You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्हॉट्सअॅप आपल्याकडून पैसे आकारत नाही, मग कमाई कशी करतं?
- Author, जोई क्लाइनमन
- Role, टेक्नॉलॉजी एडिटर
'गेल्या 24 तासांमध्ये मी 100 हून अधिक व्हॉट्सअॅप मेसेज केले आहेत. बहुतांश मेसेज म्हणजे रोजचेच विषय होते. मी कुटुंबाबरोबर काही गोष्टी आखल्या, काही नियोजन केलं, सहकाऱ्यांबरोबर कामासंदर्भात बोललो, काही लोकांना बातम्या पाठवल्या आणि मित्रांशी गप्पा मारल्या.'
व्हॉट्सअॅपवर सर्वसामान्यपणे पाठवले जाणारे मेसेज एनक्रिप्टेड असतात. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी व्हॉट्सअॅपकडे शक्तिशाली सर्व्हर आहेत. हे सर्व्हर जगभरातील अनेक डेटा सेंटरमध्ये लावण्यात आले आहेत.
हे काही लहान-सहान काम नाही. यासाठी मोठ्या कार्यप्रणालीची आवश्यकता असते. व्हॉट्सअॅपवर जवळपास तीन अब्ज युजर्स आहेत.
मात्र, मी किंवा माझ्यासोबत बोलणारी कोणतीही व्यक्ती कधीही व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी पैसे खर्च करत नाही किंवा कोणतंही शुल्कदेखील देत नाही.
मग व्हॉट्सअॅप कमाई कसं करतं?
पहिली बाब म्हणजे 'मेटा' ही व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मालकी देखील 'मेटा'कडेच आहे. साहजिकच व्हॉट्सअॅपला 'मेटा'चा आधार आहे.
व्हॉट्सअॅपच्या कमाईचे मार्ग कोणते?
माझ्या सारख्या व्हॉट्सअॅपच्या असंख्य युजर्सचे अकाउंट मोफत आहेत. कारण माझ्यासारख्या युजर्स किंवा ग्राहकांना संपर्क करू इच्छिणाऱ्या कॉर्पोरेट कस्टमरद्वारे व्हॉट्सअॅप कमाई करतं.
मागील वर्षापासून कंपन्या व्हॉट्सअॅपवर मोफत चॅनल बनवत आहेत. त्याचबरोबर हे चॅनल सब्सक्राईब करणाऱ्या सर्व युजर्सना देखील कंपन्या मेसेज पाठवू शकतात.
मात्र, या कंपन्या आपल्यासारख्या ग्राहकांशी बोलण्यासाठी प्रीमियम किंवा शुल्क भरतात.
ब्रिटनमध्ये तर या सर्व गोष्टी नवीन आहेत, आताच आल्या आहेत. मात्र बंगळूरू सारख्या शहरात व्हॉट्सअॅपच्या मदतीनं तुम्ही बसचं तिकिट देखील ऑनलाइन स्वरुपात बुक करू शकता. तुम्हाला हवं ते सीट निवडू शकता.
निकिला श्रीनिवासन 'मेटा'च्या एक वरिष्ठ अधिकारी आहेत. त्या म्हणाल्या, "व्यवसाय किंवा कंपन्या आणि ग्राहक या दोघांनाही चॅट थ्रेडच्या माध्यमातून त्यांचं काम सहजपणे करता यावं हे आमचं उद्दिष्ट आहे."
त्या म्हणाल्या, "याचा अर्थ जर तुम्हाला एक तिकिट बुक करायचं असेल किंवा एखादी वस्तू परत करायची असेल, पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला हे सर्व चॅट थ्रेडच्या बाहेर न निघता करता आलं पाहिजे. या क्रिया करून तुम्हाला थेट चॅटमधील तुमचे कुटुंबीय किंवा मित्र यांच्याशी बोलता आलं पाहिजे, चॅटिंग करता आली पाहिजे."
तुम्ही तुमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवरील ऑनलाइन जाहिरातींच्या लिंकवर क्लिक करून थेट व्हॉट्सअॅप चॅटशी जोडले जाऊ शकता आणि पेमेंट करू शकता.
श्रीनिवासन म्हणतात की, ही एकच गोष्ट तंत्रज्ञान क्षेत्रातील या दिग्गज कंपनीसाठी 'कित्येक अब्ज डॉलर' मूल्याची आहे.
इतर मेसेजिंग अॅप्सचं महसूल मॉडेल
इतर मेसेजिंग अॅप देखील वेगवेगळ्या रेव्हेन्यू मॉडेलवर काम करतात. उदाहरणार्थ सिग्नल हे एक आघाडीचं मेसेजिंग अॅप आहे. सिग्नल हे अॅप त्यांच्या सिक्युरिटी प्रोटोकॉलसाठी ओळखलं जातं. ही एक नफा न कमावणारी संस्था किंवा कंपनी (Non Profit Organization)आहे.
सिग्नलचं म्हणणं आहे की, त्यांनी कधीही गुंतवणुकदारांकडून पैसे घेतले नाहीत. त्याउलट टेलीग्रामसारखे अॅप मात्र असं करतात.
सिग्नल हे व्यासपीठ देणगी, वर्गणीवर चालतं. यामध्ये ब्रायन अॅक्टन यांनी दिलेल्या 5 कोटी डॉलरच्या देणगीचाही समावेश आहे.
2018 मध्ये यांनी सिग्नल फाउंडेशनला हा निधी दिला होता. ब्रायन हे सिग्नलच्या सह-संस्थापकांपैकी एक होते.
सिग्नलच्या अध्यक्ष मेरेडिथ व्हिटेकर यांनी मागील वर्षी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत छोट्या देणग्या देणाऱ्यांच्या मदतीनं काम पुढे नेण्याचं आमचं ध्येय आहे. आम्हाला त्याच लोकांवर विसंबून राहायचं आहे, जे खरोखरंच सिग्नलबद्दल विचार करतात."
तर डिस्कॉर्ड नावाच्या एका मेसेजिंग अॅपचा वापर बहुतांश तरुण गेमर्स करतात. हे अॅप फ्रीमियम मॉडेल वर आधारित आहे. म्हणजेच तुम्ही या अॅपमध्ये मोफत साइन अप करू शकता किंवा त्याचा वापर करू शकता. मात्र अतिरिक्त फीचर्सचा वापर करण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावं लागतं.
स्नॅप (स्नॅपचॅटची कंपनी) ही कंपनी अनेक मॉडेलचा वापर करते. या अॅपवर जाहिराती असतात. त्याचबरोबर या अॅपवर 1 कोटी 10 लाख सब्सक्राईबर (ऑगस्ट 2024 च्या माहितीनुसार) असे आहेत जे शुल्क भरतात. याशिवाय हे अॅप ऑगमेंटेड रिअॅलिटी ग्लासेस स्नॅपचॅट स्पेक्टेकल्स देखील विकतं.
जाहिरात हे स्नॅप कंपनीच्या उत्पन्नाचं मुख्य साधन आहे. जाहिरातींद्वारे ही कंपनी दरवर्षी जवळपास 4 अब्ज डॉलर हून अधिक कमाई करते.
सर्वात लोकप्रिय बिझनेस मॉडेल
'एलिमेंट' ही ब्रिटिश कंपनी सरकार आणि इतर मोठ्या संघटना, संस्था यांना सुरक्षित मेसेजिंग सिस्टम वापरासाठी उपलब्ध करून देते. त्याबदल्यात कंपनी त्यांच्याकडून शुल्क घेते.
या कंपनीचे ग्राहक, कंपनीच्या तंत्रज्ञानाचा वापर करतात, मात्र ती सेवा स्वत:च्याच खासगी सर्व्हरवरूनच चालवतात.
कंपनीचे सह-संस्थापक मॅथ्यू होजसन म्हणतात की ही 10 वर्ष जुनी कंपनी 'डबल डिजिट मिलियन रेव्हेन्यू कमावते' आहे आणि लवकरच 'नफा कमावणार' आहे.
त्यांना वाटतं की मेसेजिंग अॅप्सचं सर्वात लोकप्रिय मॉडेल 'जाहिराती' हेच आहे. जाहिरातींमधून पैसा कमावणं हे सर्वात जुनं बिझनेस मॉडेल आहे.
ते म्हणाले, "प्रत्यक्षात (अनेक मेसेजिंग अॅप्स) जाहिराती या गोष्टीवर लक्ष ठेवतात की लोक काय करत आहेत, ते कोणाशी बोलत आहेत. त्याच्या आधारेच हे अॅप ग्राहकांना किंवा युजर्सना जाहिराती दाखवतात. या अॅप्सना ग्राहकांची किंवा युजर्सची ही माहिती मिळवण्यासाठी संपूर्ण मेसेज वाचण्याची आवश्यकता नसते. एकंदरीतच यामागची कल्पना अशी आहे की भलेही एन्क्रिप्शन नसलं तरी गोपनियतेची काळजी घेतली जाते. मात्र हे अॅप्स जाहिराती विकण्यासाठी युजर्सच्या माहितीचा वापर करतात."
होजसन म्हणतात, "याप्रकारचं मॉडेल जुनच आहे, पैसे कमावण्याचा हा तोच जुना मार्ग आहे - म्हणजेच जर तुम्ही युजर आहात आणि एखाद्या विशिष्ट सेवेसाठी शुल्क भरत नाहीत किंवा ती सेवा मोफत वापरत आहात. तर असं असण्याची अधिक शक्यता आहे की तुम्हीच एखादं प्रॉडक्ट किंवा उत्पादन आहात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)