दिल्लीत सत्ता कुणाची? 'या' 8 एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात?

फोटो स्रोत, Getty Images
दिल्लीत विधानसभा मतदारसंघातील 70 जागांसाठी आज मतदान पार पडलं आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 58 टक्के मतदान झालं होतं. दिल्लीच्या 70 जागांसाठी एकूण 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
या निवडणुकीचे निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. आणि अखेर देशाच्या राजधानीत नेमकी सत्ता कुणाची? या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर मिळेल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष जिंकला तर या पक्षासाठी दिल्लीच्या निवडणुकीतला हा सलग तिसरा विजय ठरेल. आणि भाजप जिंकला तर अनेकवर्षांनी भाजप दिल्लीच्या सत्तेवर विराजमान होईल.
मतदान आटोपल्यानंतर एकाच गोष्टीकडे सर्वांचं लक्ष असतं आणि ते म्हणजे वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल्स. बीबीसी स्वतः अशा पद्धतीचा कुठलाही एक्झिट पोल जाहीर करत नसलं तरी देशातील इतर संस्थांच्या एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात? हे आपण पाहूया.
एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
1) मॅट्रीझ या संस्थेने दिलेल्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला 32-37 जागा, भाजपला 35-40 जागा तर काँग्रेसला 0-1 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. मॅट्रीझने दिल्लीत अत्यंत अटीतटीचा सामना होण्याचं भाकीत केलं आहे.
2) चाणक्य स्ट्रॅटेजी या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला 25-28 जागा, भाजपला 39-44 जागा आणि काँग्रेसला 2-3 जागा दिलेल्या आहेत.
3) पी मार्क या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला 21-31, भारतीय जनता पक्षाला 39-49 आणि काँग्रेसला 1 जागा मिळेल असा अंदाज आहे.
4) पीपल्स इन्साईट या संस्थेने आम आदमी पक्षाला 25-29 , भाजपला 40-44 आणि काँग्रेसला 0-2 एवढ्या जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
5) पोल डायरी या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला 18-25, भाजपला 42- 50 आणि काँग्रेसला 0-2 एवढ्या जागा मिळतील. याही संस्थेने दिल्ली भाजपची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला आहे.
6) पीपल्स पल्सच्या अंदाजानुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे 10-19, भाजपचे 51-60 आणि काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही असा अंदाज वर्तवला आहे.
7) वी प्रिसाईड या एक्झिट पोलने मात्र वेगळा अंदाज वर्तवला असून त्यांच्या आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतो. या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला 46-52,भाजपला 18-23 आणि काँग्रेसला 0-1 जागा दिल्या आहेत.
8) जेव्हीसी पोलमध्ये भाजपला 39 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर आम आदमी पक्षाला 22 ते 31 जागा आणि काँग्रेसला 0-2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एक्झिट पोल्स कसे करतात आणि ते अचूक असतात का?
एक्झिट म्हणजे बाहेर पडणं. हा शब्दच या चाचण्या म्हणजे Polls बद्दल खूप काही सांगतो.
जेव्हा मतदार निवडणुकीसाठी मत देऊन केंद्रामधून बाहेर पडत असतो, तेव्हा त्यांना विचारलं जातं - तुम्ही कोणत्या पक्षाला वा उमेदवाराला मत दिलं, हे सांगाल का?
एक्झिट पोल्स करणाऱ्या संस्था त्यांच्या लोकांना मतदान केंद्राच्या बाहेर उभं करतात. जसजसे मतदार मतदान करून बाहेर येतात, त्यांना विचारलं जातं की त्यांनी कुणाला मत दिलं. इतरही काही प्रश्न त्यांना विचारले जातात. उदा. पंतप्रधान पदासाठी तुमचा आवडता उमेदवार कोण वगैरे.

फोटो स्रोत, ANI
सहसा प्रत्येक मतदान केंद्रावरील दर दहावा मतदार किंवा मग मतदान केंद्र मोठं असेल तर मग दर विसाव्या मतदाराला असे प्रश्न विचारले जातात. मतदारांकडून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून या निवडणुकीचे निकाल काय असतील याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला जातो.
एक्झिट पोलविषयी नियम-कायदे काय आहेत?
एक्झिट पोल्सना रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅक्ट 1951चा सेक्शन 126A लागू होतो.
भारतीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोल्ससाठी काही नियम आखले आहेत. निवडणुकीवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम वा प्रभाव पडू नये, यासाठी हे नियम असतात.
निवडणूक आयोग वेळोवेळी एक्झिट पोल्ससाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करतो. यामध्ये एक्झिट पोल कसे करावेत हे सांगितलं जातं. मतदानाच्या दिवशी एक्झिट पोलचे निकाल प्रसारित करू नयेत, असा नियम आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपल्याच्या अर्धा तास नंतर पर्यंत एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करता येत नाहीत. यासोबतच मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करण्यासाठी ही पाहणी करणाऱ्या संस्थेला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.

फोटो स्रोत, x/@ArvindKejriwal
दिल्लीतल्या सर्व मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडलं. तर, निवडणुकीचे निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्ली आणि हरियाणामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. आता निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
निवडणुकीत उभे असलेल्या 699 उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या 96 असून आम आदमी पक्षाकडून आतिशी या प्रमुख महिला चेहरा आहेत. गेल्या वेळी आतिशी यांनी दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून विजय मिळवला होता.
यावेळेस, काँग्रेसने कालकाजी मतदारसंघातून आतिशी यांच्या विरोधात अल्का लांबा यांना उमेदवारी दिली आहे. त्या अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. दुसरीकडे भाजपने ग्रेटर कैलाशमधून शिखा राय यांना सौरभ भारद्वाज यांच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे.
दिल्ली निवडणुकीची मतमोजणी 8 फेब्रुवारी रोजी होईल आणि त्याच दिवशी निकालही जाहीर होतील.

फोटो स्रोत, Getty Images/ANI
दरम्यान, दिल्लीतील 2015 आणि 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने बहुमत मिळवले होते. 2015 मध्ये आम आदमी पक्षाने 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या, तर 2020 मध्ये 62 जागांवर विजय मिळवला होता.


अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह मतदान केले
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या कुटुंबासमवेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यांनी आपल्यी एक्स अकाउंटवरून दिल्लीच्या जनतेला मतदान करण्याचं तसेच आवाहन केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"दिल्लीचा विकास थांबता कामा नये! मतदान करा आणि इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करा. गुंडगिरी हरेल, दिल्ली जिंकेल!" असं केजरीवाल म्हणाले.
दिल्ली निवडणूक म्हणजे धर्मयुद्ध आहे - आतिशी
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आतिशी म्हणाल्या, "ही फक्त निवडणूक नाही तर एक धर्मयुद्ध आहे. चांगलं-वाईट, सत्य-असत्य, काम विरुद्ध गुंडगिरी यांच्यातील लढाई आहे."

फोटो स्रोत, ANI
यावेळी आतिशी यांनी भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "एकीकडे सुशिक्षित आणि प्रामाणिक उमेदवार आहेत. दुसरीकडे, गैरवर्तन करणारे लोक आहेत. मला खात्री आहे की दिल्लीचे लोक कष्टाळू लोकांना, त्यांच्या प्रामाणिक कामासाठी मतदान करतील.
त्यांनी आरोप केला की, "दिल्ली पोलीस भाजपसाठी काम करत आहेत. भाजपचे लोक मतदारांना धमकावत आहेत आणि त्यांना प्रलोभनं देऊन मतदान करण्यास भाग पाडत आहेत."
आतिशी या कालकाजी मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या अल्का लांबा आणि भाजपचे रमेश बिधुरी यांच्याशी होत आहे.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचं दिल्लीतील मतदारांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून पोस्ट करत म्हणाले, "दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व जागांसाठी आज मतदान होत आहे. येथील मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी होऊन आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावण्याचं आवाहन करतो. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सर्व तरुण मित्रांना माझ्या विशेष शुभेच्छा. लक्षात ठेवा - आधी मतदान, मग नाश्ता !" अशा शब्दात मोदींनी दिल्लीतील जनतेला आवाहन करत शुभेच्छाही दिल्या.

फोटो स्रोत, Getty Images
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी एक्स अकाउंटवरुन पोस्ट करत लिहिले, "दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी खोट्या आश्वासनांविरुद्ध, प्रदूषित यमुना, दारूची दुकाने, खराब रस्ते आणि अस्वच्छ पाण्याविरुद्ध मतदान करावे."
ते पुढे म्हणाले, "आज अशा सरकारसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा, ज्याचा जनकल्याणाचा भक्कम ट्रॅक रेकॉर्ड आणि दिल्लीच्या विकासासाठी स्पष्ट दृष्टिकोन आहे. तुमचं एक मत दिल्लीला जगातील सर्वात विकसित राजधानी बनवू शकते. आधी मतदान करा, मग नाश्ता!"
2020 आणि त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काय घडलं होतं?
2020 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला निर्विवाद बहुमत मिळालं होतं. विशेष म्हणजे हे बहुमत प्रचंड म्हणावं असंच होतं कारण आम आदमी पार्टीने एकूण 70 जागांपैकी 62 जागांवर बाजी मारली होती.
उर्वरित 8 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या होत्या. एकेकाळी दिल्लीत सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नव्हती.
खरं तर काँग्रेसचा अस्त हाच आम आदमी पार्टीचा उदय होता. 2008 साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय झाला होता.

फोटो स्रोत, ArvindKejriwal/Facebook
त्यानंतर अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उदयास आलेल्या आम आदमी पार्टीला 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 28 जागांवर यश प्राप्त झालं होतं.
तेव्हा काँग्रेसच्या पाठिंब्यावर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते. मात्र, निव्वळ 49 दिवस सरकार चालवून भ्रष्टाचारविरोधी जन लोकपाल बिलावरुन त्यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये राजीनामा दिला होता.
त्यानंतर 2015 तसेच 2020 साली झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस अद्यापही चांगल्या नेतृत्वाच्या तसेच चेहऱ्याच्या शोधात आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











