आतिशी यांनाच अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री पदासाठी का निवडलं? 'ही' आहेत कारणं

अरविंद केजरीवाल, आतिशी

फोटो स्रोत, ANI

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जेव्हा 2014 च्या मे महिन्यात राजीनामा दिला, तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी जीतनराम मांझी यांच्यावर विश्वास ठेवला.

झारखंडमध्ये जानेवारी 2024 मध्ये हेमंत सोरेन जेव्हा तुरुंगात गेले, तेव्हा त्यांनी चंपाई सोरेन यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना मुख्यमंत्री केलं.

मात्र, जेव्हा नितीश कुमार आणि हेमंत सोरेन सत्तेत परत आले, तेव्हा जीतन राम मांझी, चंपाई सोरेन यांनी वेगळी वाट निवडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

आता दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला आहे आणि आतिशी यांच्यावर विश्वास ठेवला आहे. त्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होतील.

नितीश कुमार आणि हेमंत सोरेन यांच्याबरोबर झालेल्या अशा प्रकारानंतरही अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्यावर विश्वास का ठेवला असेल?

अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर त्यांची पत्नी सुनीता केजरीवालसुद्धा सक्रिय झाल्या होत्या. त्याच मुख्यमंत्री होतील अशाही चर्चा प्रसारमाध्यमात झाल्या. प्रत्यक्षात मात्र असं झालं नाही.

आतिशी यांच्यावर विश्वास ठेवण्यामागे काय कारणं आहेत?

आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती ‘द हिंदू’ या वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले, “जेव्हा अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया तुरुंगात होते, तेव्हा त्या काळात पक्षाशी निगडीत बाबी सांभाळून आतिशी यांनी त्यांची पात्रता सिद्ध केली आहे. सिसोदिया यांच्या आदेशांना आतिशी आमदार आणि नगरसेवकांपर्यंत पोहोचवत असत. त्याशिवाय, आतिशी पक्षाचा महिला चेहरा सुद्धा आहेत.”

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि बुराडीचे नगरसेवक संजीव झा म्हणाले, “विधानसभा निवडणुकांसाठी अगदी थोडाच काळ शिल्लक आहे. आता पक्षात फारसे बदल करण्याची आमची इच्छा नव्हती. आतिशी यांची निवड झाली कारण त्यांच्याकडे सद्यस्थितीत सर्वांत जास्त विभागांची जबाबदारी आहे. प्रशासनाची त्यांना उत्तम जाण आहे.”

आम आदमी पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘द हिंदू’ ला सांगितलं, “आतिशी यांची निवड स्वाभाविक आहे. कारण त्या विश्वासार्ह आहेत आणि आजवर त्या कधीही पक्षाच्या विरोधात गेल्या नाहीत.”

आतिशी यांच्याकडे सध्या 14 विभागांची जबाबदारी आहे. त्यात वित्त, शिक्षण, आणि ऊर्जा अशा महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे.

आतिशी यांना आता ही जबाबदारी दिली आहे, तेव्हा पक्षाच्या अनेक नेत्यांना मागे सारून त्या समोर आल्या आहेत. आतिशी या पक्षाचे सह-संस्थापक आणि दोनदा मंत्रिपद भूषवलेले गोपाल राय, सौरभ भारद्वाज आणि राखी बिर्ला यांना मागे सारत पुढे आल्या आहेत.

17 सप्टेंबरला दिल्लीतील उपराज्यपालांच्या घरी आतिशी आणि अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 17 सप्टेंबरला दिल्लीतील उपराज्यपालांच्या घरी आतिशी आणि अरविंद केजरीवाल

आम आदमी पक्षाचे एक नेते टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, “केजरीवाल स्वत: आयआयटीचे पदवीधर आहेत. त्यांना कायमच उच्चशिक्षित लोकांबरोबर काम करायचं असतं. केजरीवाल यांचे अनेक सल्लागार आयआयटीचे पदवीधर आहेत. अशा परिस्थितीत आतिशी यांचं पुढे जाणं स्वाभाविकच होतं.”

आतिशी यांचा आम आदमी पक्षात चढता आलेख

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यावर्षी स्वातंत्र्यदिनी अरविंद केजरीवाल तुरुंगात होते. त्या दिवशी दिल्ली सरकारच्या कार्यक्रमांमध्ये झेंडा फडकावण्याची जबाबदारी आतिशी यांना दिली होती.

मात्र, नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दिल्ली सरकारचे मंत्री कैलाश गहलोत यांना झेंडा फडकावण्यासाठी नामनिर्देशित केलं होतं.

आतिशी या मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून काम करत होत्या. दिल्लीमध्ये शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात येतो. त्यात आतिशी यांचा वाटा मोठा आहे.

आतिशी यांचे आई-वडील दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते. आपल्या विचारसरणीबद्दल प्राध्यापक विजय कुमार सिंह आणि तृप्ता वाही खुलेपणाने बोलतात.

आतिशी यांच्या आईवडिलांनी कार्ल मार्क्स आणि लेनिन यांच्या आद्याक्षरांवरून आतिशी यांना ‘मार्लेना’ हे आडनाव दिलं होतं. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपलं आडनाव काढून टाकलं होतं.

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार आतिशी यांच्या बहिणीचं नाव रोझा बसंती आहे. पोलंडमध्ये जन्मलेल्या मार्क्सवादी विचारांच्या रोझा लक्झमबर्ग यांच्या नावावरून हे नाव ठेवलं होतं.

आतिशी

फोटो स्रोत, ANI

2019 च्या निवडणुकीत त्यांच्या जातीचा मुद्दा भाजपने उपस्थित केल्यावर मनीष सिसोदिया म्हणाले होते, “त्यांचं पूर्ण नाव आतिशी सिंह असं आहे. त्या राजपूत आहेत. पक्क्या क्षत्रिय आहेत. सावध रहा, त्या जिंकतील आणि इतिहास घडवतील.”

आतिशी यांचं लग्न प्रवीण सिंह यांच्याशी झालं होतं. ते आयआयटी दिल्ली आणि आयआयएम अहमदाबाद येथून ते शिकले आहेत.

दोघांनी मिळून 2007 मध्ये एक संस्था उभारली होती. त्याअंतर्गत शिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केलं. तेव्हा आतिशी भोपाळमध्ये होत्या.

तेव्हा त्या प्रशांत भूषण यांच्या संपर्कात आल्या. त्यानंतर आतिशी यांचा आम आदमी पक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला.

आम आदमी पक्षाशी निगडीत एका व्यक्तीने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं, की एका कार्यशाळेत त्यांची आणि मनीष सिसोदिया यांची भेट झाली होती. तेव्हा सिसोदियाही पक्षाचे नेते नव्हते.

त्यानंतर आतिशी आणि सिसोदिया यांनी एकत्र काम केलं.

राजकारणात येण्यापूर्वीच्या आतिशी

आतिशी यांनी दिल्लीच्या स्प्रिंगडेल शाळेतून शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर त्यांना अत्यंत प्रतिष्ठेची शिवनिंग शिष्यवृत्ती मिळाली.

आतिशी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातूनही शिक्षण घेतलं आहे.

भारतात आल्यावर आतिशी आंध्र प्रदेशच्या एका शाळेत शिक्षिका होत्या. त्यानंतर शिक्षणासाठी आतिशी पुन्हा परदेशात गेल्या.

आम आदमी पक्षातले काही लोक त्यांचा उल्लेख ‘ऑक्सफर्ड रिटर्न’ असा करतात, असंही सांगण्यात येतं. आतिशी यांना मुख्यमंत्री करणार अशी घोषणा झाली तेव्हा सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख केला.

योगेंद्र यादव आणि आतिशी. हा फोटो नोव्हेंबर 2014 चा आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, योगेंद्र यादव आणि आतिशी. हा फोटो नोव्हेंबर 2014 चा आहे.

2013 मध्ये आपच्या पहिल्यावहिला जाहीरनामा तयार करण्याच्या समितीत त्यांचा समावेश होता असं सांगण्यात येतं.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार, आतिशी यांना पुन्हा एकदा विकसन क्षेत्रात परतायचं होतं. मात्र, केजरीवाल यांनी असं होऊ दिलं नाही आणि पक्षातच राहायला सांगितलं.

आतिशी

प्रशांत भूषण, योगेंद्र यादव आणि आतिशी

एकेकाळी आतिशी आम आदमी पक्षाचे संस्थापक असलेल्या प्रशांत भूषण आणि योगेंद यादव यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जायच्या.

योंगेद्र यादव यांना नंतर पक्षातून काढून टाकण्यात आलं. प्रशांत भूषणही पक्षापासून वेगळे झाले.

मात्र, आतिशी पक्षातच राहिल्या. पक्षाबरोबर त्यांचीही प्रगती होत राहिली.

प्रशांत भूषण पक्षातून वेगळे झाल्यावर 2015 मध्ये त्यांनी आतिशी यांनी लिहिलेल्या एका इमेलची चर्चा काही बातम्यांच्या माध्यमातून झाली होती.

तेव्हा आलेल्या बातम्यांनुसार आतिशी यांनी लिहिलं होतं की, शांती भूषण यांच्यामुळे प्रशांत भूषण आणि केजरीवाल यांच्यात तडजोड झाली नाही.

दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना, आतिशी आणि केजरीवाल. हा फोटो 2023 मधील आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना, आतिशी आणि केजरीवाल. हा फोटो 2023 मधील आहे.

2012 मध्ये ‘आप’ची स्थापना झाल्यावर सुरुवातीच्या काळात शांतिभूषण (प्रशांत भूषण यांचे वडील) यांनीच पक्षाला एक कोटी रुपयाचा धनादेश दिला होता.

त्यावेळी लिहिलेल्या इमेलमध्ये आतिशी म्हणतात, “प्रशांत भूषण यांनी माझ्यावर नैतिकता गमावण्याचा आरोप लावला. शांतिभूषणजी यांनी माझ्यावर विश्वासार्हता गमावण्याचा आरोप केला. अरविंद (केजरीवाल) यांच्या निकटवर्तीयांनी माझ्यावर प्रशांत-योगेंद्र कँपची असल्याचा आरोप लावला.”

मात्र, कालानुरूप आतिशी प्रशांत-योगेंद्र गटाच्या ऐवजी अरविंद गटात गेल्या.

अरविंद केजरीवाल जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांना नियमित भेटायला जाणाऱ्या लोकांमध्ये आतिशी यांचा समावेश होता.

आतिशी यांच्या माध्यमातूनच केजरीवाल तुरुंगातून दिल्ली सरकार चालवत असत असं सांगण्यात येतं.

दिल्ली सरकारमध्ये आतिशी

अण्णा हजारे आंदोलनाच्या काळापासूनच आतिशी संघटनेत सक्रिय होत्या.

आतिशी 2013 मध्ये पक्षात आल्या.

2015 ते 2018 या काळात त्या मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून काम करत होत्या.

आम आदमी पार्टीच्या वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार असताना त्यांनी दिल्लीच्या शाळांची परिस्थिती सुधारणं, शाळेत व्यवस्थापन समितीची स्थापना आणि खासगी शाळांची अमर्याद फीवाढ थांबवण्यासाठी कडक नियम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आतिशी पक्षाच्या राजकीय प्रकरणाच्या समितीच्या सदस्य आहेत.

आतिशी यांनी पहिल्यांदा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीतून उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

2020 मध्ये आतिशी यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही तेव्हा पक्षातून या निर्णयावर टीका झाली होती.

आतिशी

'संकटमोचक' आतिशी

आम आदमी पक्षावर गेल्या काही दिवसांमध्ये संकटं आली तेव्हा आतिशी त्यांचा सामना करण्यासाठी समोर आल्या.

गोपाल राय यांनी 17 सप्टेंबरला आतिशी यांच्या मुख्यमंत्रीपदावर झालेल्या निवडीची माहिती दिली तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं, की आतिशी अतिशय कठीण काळात मुख्यमंत्री होत आहेत.

भ्रष्टाचाराविरोधात लढा हा पक्षाच्या स्थापनेचा पाया होता. मात्र आता त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.

दिल्लीच्या मद्य धोरणात झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात अनेक मोठ्या नेत्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. काही नेते जामिनावर बाहेर आहेत.

आम आदमी पार्टीच्या इतर नेत्यांसमवेत आतिशी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आम आदमी पार्टीच्या इतर नेत्यांसमवेत आतिशी

जेव्हा हे नेते तुरुंगात गेले तेव्हा आतिशी पक्षाचा चेहरा म्हणून प्रसारमाध्यमांसमोर आल्या. केजरीवाल, सिसोदिया यांच्या अनुपस्थितीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांना दिल्या.

दिल्लीमध्ये नायब राज्यपाल आणि आम आदमी पक्षात काही वाद झाला तर आतिशी समोर येतात.

दिल्लीमध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी पाण्याची समस्या उद्भवली तेव्हा त्यांनी उपोषणही केलं होतं.

जेव्हा पक्षाकडून राज्यसभा खासदार झालेल्या स्वाती मालीवाल यांनी ‘आप’ च्या नेत्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला. तेव्हा त्याचं उत्तर देण्यासाठी आतिशी समोर आल्या.

आता जेव्हा त्यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली तेव्हा त्या म्हणाल्या, “जेव्हापर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री करणं हाच माझा उद्देश आहे. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन. मी आज दिल्लीच्या दोन कोटी जनतेला एकच सांगू इच्छिते की दिल्लीचा एकच मुख्यमंत्री आहे आणि त्याचं नाव अरविंद केजरीवाल आहे.”

मनीष सिसोदिया यांनी आतिशी यांच्याबद्दल सोशल मीडियावर लिहिलं, “भाजपपासून जनतेचं रक्षण करणं ही आतिशी यांची मुख्य जबाबदारी आहे. हे आव्हान आतिशी उत्तम पद्धतीने पेलतील असा मला विश्वास आहे. माझ्या शुभेच्छा त्यांच्याबरोबर आहेत.

केजरीवाल यांनी हे ट्विट शेअर केलं आणि लिहिलं, “आतिशी यांना खूप खूप शुभेच्छा.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)