चपाती, भाकरी, भात तुमच्या आरोग्याचा धोका कसा वाढवतात?

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भात, चपाती, रोटी, भाकरी, बटाटा, रताळी यापैकी आपल्या रोजच्या जेवणात एक किंवा कधीकधी दोन पदार्थ असतातच आणि आपल्याला ते प्रचंड आवडतात.

यामुळेच जगात भारतीय डाएटमध्ये सर्वाधिक कार्बोहायड्रेट्स आढळत असल्याचं एक अभ्यासात समोर आलंय. आणि हेच भारतीयांमधल्या वाढत्या डायबिटीस, लठ्ठपणामागचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि इंडिया डायबिटीस (आयसीएमआर-इंडियाबी) ने केलेल्या या अभ्यासातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

भारतीयांना सर्वाधिक कॅलरीज कुठून मिळत आहेत आणि आपल्या आहारात काय बदल करण्याची गरज आहे?

भारतीयांच्या आहाराबद्दल इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि इंडिया डायबिटीस यांनी एक संशोधन केलं आहे.

डायटरी प्रोफाईल अँड असोसिएटेड मेटाबॉलिक रिस्क फॅक्टर्स इन इंडिया फ्रॉम द आयसीएमआर-इंडियाबी सर्वे-21 नावाचं हे संशोधन नेचर नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलंय.

डायबिटीस, लठ्ठपणाच्या प्रमाणात वाढ

देशभरातली राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि राजधानी दिल्लीमधल्या एकूण 1,21,077 व्यक्तींचा अभ्यास यासाठी करण्यात आला.

भारतीयांना लागणाऱ्या एकूण कॅलरीजपैकी 62% या कर्बोदकं म्हणजेच कार्बोहायड्रेट्सद्वारे मिळत असल्याचं या अभ्यासात सांगितलं आहे.

त्यातही कमी दर्जाचे कर्बोदक स्रोत म्हणजे पांढरा तांदूळ, दळलेली पूर्ण धान्यं, अ‍ॅडेड शुगर म्हणजे साखर, मध, गूळ, पाम शुगर यांच्या सेवनाचं प्रमाण अधिक आहे.

भारतीयांच्या आहारात अर्थातच प्रादेशिक कल दिसत आहेत. भारताच्या दक्षिण, पूर्व आणि ईशान्येकडच्या भागांमध्ये आहारात भाताचं प्रमाण अधिक आहे.

तर उत्तर आणि मध्य भारतात गव्हाचा दबदबा आहे. मिलेट्स म्हणजे भरड धान्यं ही सर्वात पोषक असतात पण कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र या तीनच राज्यांमध्ये रोजच्या आहारात भरड धान्यांचा समावेश आहे.

देशभरात साखर खाण्याचं प्रमाण अधिक आहे. आपल्याला रोज लागणाऱ्या कॅलरीजपैकी जास्तीत जास्त 5% साखरेपासून मिळाव्यात असं सुचवलं जातं. पण देशातल्या 21 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे प्रमाण 5% पेक्षा जास्त आहे.

यामुळे डायबिटीस किंवा डायबिटीस पूर्व स्थिती असणं, वजन वाढणं त्यामुळे लठ्ठपणा येणं यांचं प्रमाण वाढत आहे.

भारतीयांच्या आहारातलं फॅट म्हणजे चरबीचं प्रमाण मर्यादेत असलं तरी सॅच्युरेटेड फॅट्सच्या सेवनाचं प्रमाण झारखंड, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर वगळता इतर सगळीकडंच जास्त आहे.

प्रथिनांच्या सेवनाचं प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी

गंभीर बाब म्हणजे देशभरातलं प्रथिनांच्या सेवनाचं प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे.

रोजच्या कॅलरीजपैकी सरासरी फक्त 12% कॅलरीज या प्रथिनांमधून मिळतायत. बहुतेक प्रथिन मिळतंय ते धान्यं, डाळी आणि कडधान्यांमधून. तर दुग्धजन्य पदार्थांपासूनच्या प्रथिनांचं प्रमाण 2% आणि प्राणीजन्य प्रथिनांच्या सेवनाचं प्रमाण 1% इतकंच आहे.

ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आहारात प्रथिनांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

मग या सगळ्यामुळे काय होतं, तर असंतुलित आहारामुळे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच संसर्गजन्य नसणारे आजार होण्याचं प्रमाण वाढलंय.

यात हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यांचं प्रमाण अधिक आहे. कर्बोदकांच्या अधिक सेवनामुळे डायबिटीस, प्री-डायबिटीस, लठ्ठपणा यांचा धोका 15-30% वाढतो.

मग यावर करायचं काय?

मग यावर काय पावलं उचलायला हवीत? तर आहार सुधारणं आणि शारीरिक हालचाली वाढवणं हे करून जवळपास 50% नॉन कम्युनिकेबल डिसीज रोखता येतील, असं संशोधक म्हणतात.

आता कर्बोदकांपासून मिळणाऱ्या 5% कॅलरीज कमी करून त्याऐवजी भाज्या-दुग्धजन्य प्रथिन घटकांचं प्रमाण 5% वाढवलं तर त्यामुळे डायबिटीस वा प्री-डायबिटीसचा धोका बऱ्यापैकी कमी होऊ शकतो, असं संशोधकांनी म्हटलंय. म्हणजे डाळी, कडधान्यं, सुकामेवा आणि दूध, दही, पनीर यांचं सेवन वाढवायला हवं.

कर्बोदकांचं सेवन कमी करून त्याऐवजी अंडी, मासे खाण्यानेही या विकारांचा धोका कमी करता येऊ शकतो.

तुम्ही पांढरा भात खाणं कमी करून त्याऐवजी पूर्णपणे गव्हाची कणिक किंवा भरड धान्यं खायला सुरुवात केलीत, पण एकूण कर्बोदक सेवन जास्तच ठेवलंत, तर त्याचा फायदा होणार नाही.

कर्बोदकांचं प्रमाण कमी करत त्याऐवजी रेड मीट म्हणजेच लाल मांस आणि फॅट्सचं सेवन वाढवणंही फायद्याचं ठरणार नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)