You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंधश्रद्धेच्या आगीत होरपळले पाच जीव, नेमकं काय घडलं होतं या गावात?
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, दिल्ली
- Author, मोहम्मद सरताज आलम
- Role, टेटगामा, बिहार
सूचना : (या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतो.)
भारतामधील एका गावात तीन आठवड्यांपूर्वी एका कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. गावातील लोकांनी त्यांच्यावर जादूटोणा करत असल्याचा आरोप करत त्यांना मारहाण करून जिवंत जाळल्याचं सांगितलं जातं.
या घटनेत कुटुंबातील वाचलेले काही लोक अजूनही त्या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत.
बिहार राज्यातील टेटगामा गावात राहणाऱ्या मनीषादेवी (नाव बदललेलं आहे) यांच्यासाठी 6 जुलैची ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र ठरली.
रात्री साधारण दहाच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांच्या घराबाहेर संतप्त लोकांचा जमाव जमा झाला होता. दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय होईपर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यात 71 वर्षीय विधवा आजी, काटो ओराव यांचाही समावेश होता.
बिहारमधली ही घटना काही वेगळी किंवा अपवाद असलेली नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार, 2000 ते 2016 या काळात भारतात जादूटोण्याच्या किंवा चेटूक केल्याच्या संशयावरून 2,500 हून अधिक लोकांची हत्या झाली होती, आणि त्यात बहुतांश महिलाच होत्या.
पण टेटगामामधील हत्याकांड वेगळे आहे, कारण एकाच कुटुंबातील पाच जणांची एकाचवेळी हत्या करण्यात आली आहे.
अंधश्रद्धा आणि जादूटोण्यावरील विश्वास भारतातील अनेक गरीब आणि आदिवासी समुदायांमध्ये अजूनही खूप मोठ्याप्र माणात आहे, असं कार्यकर्ते सांगतात. बिहारमधील घटनेतही अशाच लोकांचा सहभाग होता.
ज्यांच्यावर खूनाचा आरोप आहे आणि ज्यांची हत्या झाली, ते सगळेच ओराव आदिवासी समाजाचे होते आणि ते अनेक पिढ्यांपासून एकत्र राहत होते. परंतु, 6 जुलैच्या रात्री जे घडलं, त्याने त्यांच्या नात्यात मोठी फूट पाडली, जी लवकर भरून निघणं अशक्य वाटतं.
त्या रात्री नेमकं काय घडलं?
टेटगामाच्या रस्त्यांवर आता शांततेचं भीषण वातावरण आहे. काटोदेवींची चारही मुलं आणि त्यांचं कुटुंब सोडलं, तर सगळे गावकरी गाव सोडून गेले आहेत. काही घरांना कुलूपं आहेत, तर काही घरं अशीच घाईघाईत सोडून गेल्यासारखी दिसतात.
'बीबीसी'ने त्या रात्री नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांशी, पोलिसांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मनीषादेवी म्हणाल्या की, त्यांनी बाहेर गोंधळ ऐकला आणि बाबूलाल ओराव यांच्या घराबाहेर मोठा जमाव उभा असल्याचं पाहिलं. बाबूलाल हे काटोदेवींच्या पाच मुलांपैकी सर्वात मोठे असून ते जवळच राहतात.
बाबूलाल ओराव, त्यांची पत्नी सीता देवी, त्यांचा मुलगा मनजीत आणि सून राणीदेवी हे सगळे मारले गेले. त्यांचा धाकटा मुलगा, जो अजून लहान आहे, तोच एकटा या हल्ल्यात बचावला आहे.
पोलिसांनी त्यांच्या ऑनलाइन उपलब्ध असलेल्या प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) गावातील रामदेव ओराव या गावकऱ्याचं मुख्य आरोपी म्हणून नाव दिलं आहे.
रामदेवचा मुलगा साधारण दहा दिवसांपूर्वी आजारी पडून मरण पावला होता, असं सांगितलं जातं. परंतु, रामदेवने काटोदेवी आणि त्यांच्या कुटुंबावर जादूटोण्याद्वारे मुलाचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप केला होता. हे आरोप नेमके कुठल्या आधारावर होते, हे मात्र स्पष्ट नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदेव सध्या फरार आहे आणि त्याचा शोध घेतला जात आहे.
हत्येच्या रात्री रामदेवने आपल्या खूप आजारी असलेल्या पुतण्याला त्या पीडितांच्या घरी घेऊन गेला होता, असं सांगितलं जातं.
मनीषादेवी म्हणाल्या की, त्यांनी त्या मुलाला जमिनीवर पडलेलं पाहिलं आणि गावातील तांत्रिक काही विधी करत होता आणि मंत्र म्हणत होता.
मनीषादेवी, एक नातेवाईक आणि वाचलेल्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, तांत्रिकानं काटोदेवी आणि बाबूलाल यांच्या पत्नी सीतादेवी या दोघींना जादूटोणा, चेटूक करणाऱ्या बायका (डायन) असल्याचं घोषित केलं आणि रामदेवच्या कुटुंबातील आजारपणं आणि मृत्यूला त्यांना जबाबदार धरलं.
"काटोदेवींना ओढून बाहेर आणलं आणि त्या आजारी मुलाला बरा करण्यासाठी त्यांना अर्धा तास वेळ दिला. सीतादेवी त्या वेळी शेजारच्या गावात आपल्या आईकडे गेल्या होत्या. त्यांना तिथून बोलावून सांगितलं की, 'तुला कुटुंबाला जिवंत पाहायचं असेल, तर ताबडतोब परत ये,' " असं त्यांनी सांगितलं.
दुसरे एक नातेवाईक, ज्यांनीही हे हत्याकांड पाहिलं, त्यांनी सांगितलं की काटोदेवी गावकऱ्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत होत्या. परंतु, जमाव अधिकच संतप्त होत गेला.
ते म्हणाले, "बाबूलाल आणि मनजीत यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जमावाने त्यांच्यावरही हल्ला केला. राणीदेवीनं आपल्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिलाही मारहाण करण्यात आली. सीतादेवी जेव्हा आपल्या मुलासोबत (जो एकटाच वाचला) परत आल्या, तेव्हा त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला."
बचावलेल्या त्या किशोरवयीन मुलानं नंतर पोलिसांना सांगितलं की, तो कसंबसं पळून गेला, अंधारात लपला आणि त्याच्यासमोरच जमावानं त्याच्या कुटुंबाला मारहाण केली आणि जाळलं.
'केवळ 7 किमी अंतरावर पोलीस ठाणं पण त्यांना माहितीच नाही'
पोलीस तक्रारीत गावातील 23 पुरुष आणि महिलांची नावं दिली आहेत, आणि सोबतच त्या जमावातील 150 ते 200 अज्ञात लोकांचाही समावेश करण्यात आला आहे.
"त्या जमावाकडे काठ्या, लोखंडी सळया आणि धारदार शस्त्रं होती. त्यांनी पाचही जणांना दोरीने बांधलं आणि मारहाण, शिवीगाळ करत गावाच्या तलावाकडे ओढत नेलं," असं तक्रारीत म्हटलं आहे.
तक्रारीत असंही म्हटलं आहे की, पीडित 'अर्धमेले' असतानाच त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवण्यात आलं. त्यांचे मृतदेह पोत्यांत भरून ट्रॅक्टरवरून कुठेतरी नेण्यात आले.
दुसऱ्या दिवशी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितलं की, पीडितांना जिवंत जाळण्यात आलं आणि त्यांचे जळालेले मृतदेह गावाजवळच्या तलावात सापडले.
जिल्हाधिकारी अंशुल कुमार यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की, त्या पाच जणांना जिवंत जाळण्यात आलं. पण अलीकडे त्यांनी 'बीबीसी'ला सांगितलं की पोस्टमॉर्टेम अहवालातून हे स्पष्टपणे सिद्ध झालेलं नाही.
"अहवालात जळाल्याच्या जखमा आणि मारहाणीच्या खुणा दिसतात, परंतु मृत्यू नेमका जळल्यामुळे झाला की आधीच मारून मग जाळलं गेलं हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही."
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा रात्रभर चाललेली हिंसाचार मुफस्सिल पोलीस ठाण्यापासून फार लांब नव्हता, ते ठिकाण फक्त 7 किमी अंतरावर होतं.
कुमार यांनी सांगितलं की, पोलिसांना या घटनेची माहिती जमाव जमा झाल्यानंतर तब्बल 11 तासांनी मिळाली. त्यांनी मान्य केलं की, यामध्ये कुठेतरी चूक झाली आणि हे आमचंच अपयश होतं. पण त्यांनी असंही म्हटलं की, याला उशीर झाला कारण या प्रकारात संपूर्ण गाव सामील होतं.
घटनेनंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं. त्याच्या जागी आलेले अधिकारी सूदिन राम यांनी 'बीबीसी'ला सांगितलं की, चार जणांना अटक झाली आहे, त्यात तांत्रिक सुद्धा आहे. उर्वरित लोक फरार आहेत.
राम यांनी सांगितलं की, "बेकायदा जमाव, दंगल घडवणं, धोकादायक शस्त्रांनी जखमी करणं, जबरदस्तीने अडवणं, जमावाकडून हत्या (मॉब लिचिंग) आणि गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणं यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे." त्यांनी असंही सांगितलं की, दोषींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते.
'बीबीसी'ला अजून तांत्रिक किंवा रामदेव यांच्याशी बोलता आलेलं नाही. तांत्रिक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि रामदेव कुठे आहे हे अजून माहीत नाही. पोलीस अधिकारी कुमार यांनी सांगितलं की, एकमेव वाचलेला मुलगा सध्या सुरक्षित ठिकाणी पोलिसांच्या संरक्षणात आहे आणि त्याचं समुपदेशन सुरू आहे. तो हळूहळू बरा होत आहे.
त्या वेळी कामासाठी बाहेर गेलेले पीडितांचे भाऊ आता त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीने जवळच्या गावात राहतात, असं कुमार यांनी सांगितलं. त्यांना मोफत अन्न आणि इतर मदतही दिली जात आहे.
या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक नेमलं आहे. पण कुमार म्हणाले की, अंधश्रद्धेमुळे गावकऱ्यांमध्ये भीती पसरली आणि त्यामुळेच ही हिंसक घटना घडली.
शिक्षणाचा अभाव अन् डॉक्टरांपेक्षा तांत्रिकावर भरवसा
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या भागात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. याआधी कधीही जादूटोणा संबंधित प्रकरणांची नोंद झालेली नव्हती.
मीरादेवी नावाच्या एका स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या यांनी 'बीबीसी'ला सांगितलं की, आदिवासी खेड्यांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे, म्हणून लोक डॉक्टरांपेक्षा तांत्रिक, भूत घालवणाऱ्यांवर जास्त विश्वास ठेवतात.
ग्रामपंचायत सदस्य संतोष सिंह म्हणाले की, बहुतांश मुलं शाळेला न जाता आई-वडिलांसोबत वीटभट्टीवर कामाला जातात. स्थानिक शिक्षक इंद्रानंद चौधरी यांनी सांगितलं की, फक्त तीन मुलांची शाळेत नोंद आहे, परंतु त्यातील एकही शाळेला जात नाही.
पूर्णिया शहरापासून 11 किमी अंतरावर असलेलं आदिवासी गाव टेटगामा गावात 22 कुटुंबं राहतात.
शेतामधून जात असताना एक गावकरी जळालेल्या मका पिकांकडे बोट दाखवत म्हणाला, या ठिकाणीच ६ जुलैला ती दुर्दैवी घटना घडली होती.
बाबूलाल ओराव यांचं घर गाठायला अरुंद मातीच्या वाटा जातात. मका, बांबू आणि मातीने बांधलेल्या त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात वेळ गोठल्यासारखी वाटते.
जिथे मनजीत आणि त्याची नवीन लग्न झालेली बायको राणीदेवी झोपायचे, त्या खोलीत अजूनही पलंग नीट लागलेला आहे, स्वच्छ चादर घातलेली आहे आणि मच्छरदाणी टाकून बेड नीटनेटका केला आहे.
मनीषादेवी आपल्या घराबाहेर बसली आहे. त्या रात्री घडलेल्या अमानवी हत्यांचा विचार करून अजूनही ती हादरलेली दिसते.
"आम्ही काहीच करू शकलो नाही. ते सर्वजण स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होते, आणि आम्ही फक्त बघत होतो. तो क्षण अजूनही डोळ्यासमोरून जात नाही," असं एका व्यक्ती सांगत होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.