एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न, जेव्हा स्वामीनाथन विदर्भातील शेतकऱ्यांना पाहून रडले होते

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मुरलीधरन काशीविश्वनाथन
- Role, बीबीसी तमिळ प्रतिनिधी
भारतीय हरितक्रांतीचे जनक कृषी शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
स्वामीनाथन यांचं वृद्धापकाळामुळे वयाच्या 98 व्या वर्षी 29 सप्टेंबर 2023 रोजी निधन झालं होतं.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर कृषी क्षेत्रात सातत्याने संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी मानकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांचं महत्त्वाचं स्थान आहे.
1960 आणि 70 च्या दशकात भारतीयांची उपासमार कमी करण्यासाठी स्वामीनाथन यांचं मोलाचं योगदान आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 1943 च्या बंगालच्या दुष्काळाच्या जखमा ताज्या होत्या.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी शेतीला महत्त्व देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या.
भारतीय कृषी संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ उच्च उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करण्यावर काम करत होते.
याच काळात डॉ. मानकोंबू सांबशिवम स्वामीनाथन उर्फ एम.एस. स्वामिनाथन यांचे संशोधन कार्य फुलू लागलं होतं.
तिरुवनंतपुरम महाराजा कॉलेज आणि मद्रास विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, स्वामिनाथन 1947 मध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेत अनुवंशिकता आणि वनस्पती प्रजननाचा अभ्यास करत होते.
1949 मध्ये त्यांनी सायटोजेनेटिक्समध्ये (Cytogenetics) पदव्युत्तर पदवीदेखील प्राप्त केली.
स्वामीनाथन भारतीय पोलीस सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. पण त्यांनी तो पर्याय निवडला नाही, ते नेदरलँडसमध्ये अनुवंशशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी गेले.
यानंतर त्यांनी केंब्रिजमधून PhD केली.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते 1954 मध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेत कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले.
या काळात भारताची वाटचाल मोठ्या अन्नसंकटाकडे सुरू होती.
भारताने अमेरिकेकडून PL-480 करारांतर्गत मोठ्या प्रमाणात गहू आयात केला होता.
नॉर्मन बोरलॉग या अमेरिकन कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाची एक छोटी प्रजाती विकसित केली होती.
एम.एस. स्वामीनाथन यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि बोरलॉग यांच्याकडून नमुने मागवले.
नॉर्मन बोरलॉग यांनी 1963 मध्ये भारताला भेट दिली तेव्हा त्यांना वाटले की लहान जातीच्या गव्हाचा भारताला फायदा होईल. त्यानुसार त्यांनी ते नमुने स्वामीनाथन यांना देण्याचे मान्य केले.
नेहरूंच्या मृत्यूनंतर लगेचच लालबहादूर शास्त्री यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सी. सुब्रमण्यम यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. याच काळात ‘जय जवान, जय किसान’ नारा देत भारताच्या हरितक्रांतीचे पहिले बिजं पेरली गेली.
“एकेकाळी भारताला ‘जगातील भिकेचा कटोरा’ म्हटले जायचे. स्वामीनाथन यांनी मात्र अगदी काही दशकांत भारताला जगाचं धान्याचं कोठार बनवून टाकलं,” असं स्वामीनाथन यांचे विद्यार्थी आणि सहकारी शास्त्रज्ञ सी.आर.केसवन सांगतात.
स्वामीनाथन यांना एकदा परदेशी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीची ऑफर देण्यात आली होती. तरीही त्यांनी ती नाकारली आणि भारतात आले.
भारतीय कृषी संशोधन संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी बरेच संशोधन केले. विशेषत: सायटोजेनेटिक्स आणि रेडिओबायोलॉजीमध्ये त्यांनी भरपूर अभ्यास केला.

फोटो स्रोत, Getty Images
1960 च्या दशकात भारताला अन्नधान्याची नितांत गरज होती. बर्याच अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी लिहिलं आहे की भारताची लोकसंख्या अक्षरशः किड्यांप्रमाणे वाढत होती आणि त्यांना आमचे धान्य देऊन आम्ही त्यांना वाचवू शकत नव्हतो.
उपाशी भारताचा जगभर अपमान झाला. जगाचा भीकेचा कटोरा म्हणून भारताचे वर्णन केलं जातं.
पण भारतात हरित क्रांती घडली आणि देशांचं चित्र झपाट्यानं बदललं.
1967 मध्ये जनुकीय बदल घडवलेला गहू पिकवायला सुरुवात झाली.

फोटो स्रोत, MSSF
"काही वर्षांतच देशातली परिस्थिती बदलली. एकेकाळी जगातील भीक मागणारा भारत आता जगाचा धान्याचं कोठार बनला आहे," सी.आर. केसवन म्हणतात.
यामध्ये स्वामीनाथन यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली.
पण सरकारच्या या निर्णयाला सर्व बाजूंनी जोरदार राजकीय विरोध झाला.
गव्हाची नवीन जात भारतीय परिस्थितीत तग धरेल का आणि मोठ्या प्रमाणात खत आयात करावे लागेल का, असे प्रश्न उपस्थित केले गेले.
गव्हाचं नवीन बियाणं घेण्यासही शेतकरी कचरत होते.
त्यानंतर स्वामीनाथन यांनी स्वत: बांधावर जायचं ठरवलं. त्यांनी कमी क्षेत्रात अधिक गहू पिकवून दाखवला. यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी पुढे आले.
हरितक्रांतीची सुरुवात पंजाब आणि हरियाणामध्ये झाली.
अपेक्षेप्रमाणे त्याचा चांगला परिणाम झाला. पंजाबमधील गव्हाचे उत्पादन 1965-66 मधील 33.89 लाख टनांवरून 1985-86 पर्यंत 172.21 लाख टनांपर्यंत वाढले.
हरितक्रांतीमुळे गोदामांमध्ये धान्याचे ढीग लागले.
पण सामान्य लोकांकडे ते विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. उत्पन्न वाढल्यानंतरही लोक उपासमारीने मरत होते.

फोटो स्रोत, Getty Images
भारताची भुकेची समस्या सोडवण्यासाठी केवळ हरितक्रांती पुरेशी नाही हे त्यांच्या लक्षात आले. शिवाय, हरित क्रांती हे दीर्घकाळ टिकणारे मॉडेल नाही असे भाकीत त्यांनी केले.
जुलै 1966 मध्ये, M.S. स्वामीनाथन भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (ICAR) संचालक बनले.
स्वामिनाथन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या ICARचा झपाट्याने विस्तार झाला.
एकेकाळी संस्थेचे 6 विभाग होते. पण स्वामीनाथन यांच्या आगमनानंतर 23 विभागांमध्ये काम सुरू झालं.
संस्थेच्या संशोधनात तांदूळ, गहू, तृणधान्ये, शेतीतील जल संशोधन आणि पाण्याशी संबंधित तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला.
त्यानंतर 1972 मध्ये, एमएस स्वामीनाथन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक आणि केंद्र सरकारचे कृषी सचिव बनले.
1979 मध्ये स्वामीनाथन केंद्र सरकारचे मुख्य सचिव बनले. पुढील वर्षी त्यांची केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
स्वामिनाथन यांना TIME मासिकाने 20 व्या शतकातील 20 सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांपैकी एक म्हणून गौरवलं.
या यादीत आजवर भारतातील फक्त तीन लोकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याआधी महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांचा समावेश करण्यात आले आहे.
पुढे त्यांनी फिलीपिन्स (1982-88) आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे महासंचालक म्हणूनही कार्य केलं.
1987 मध्ये त्यांना World Food Prize या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्या बक्षीसातून मिळालेल्या निधीतून त्यांनी एमएस स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनची (MSSRF) स्थापना केली.
"अन्न उत्पादनात वाढ झाल्यानंतर, लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी काहीतरी केले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. या उद्देशासाठी MSSRF स्थापना त्यांच्याद्वारे करण्यात आली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांना बचत गटाद्वारे शेतीतील पिकांचे मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. " असं केसवन सांगतात.
‘फक्त कृषीशास्त्रज्ञ नाही तर एक महान मानव’
"एमएस स्वामीनाथन हे केवळ भारतातील महान कृषीशास्त्रज्ञ नाहीत. ते एक महान मानवदेखील आहेत." असे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ सांगतात.
राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी दिलेले अहवाल अतिशय महत्त्वाचे असल्याचे ते म्हणतात.
2004 मध्ये, त्यांची भारतीय कृषी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आयोगाने पाच अहवाल सादर केले.
शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या अहवालाला त्यांच्या नावावरूनच 'स्वामीनाथन अहवाल' असे संबोधण्यात आले.
विविध पिकांसाठी किमान आधार किंमत म्हणजे एमएसएपी निश्चित करण्यात या अहवालाने महत्त्वाची भूमिका बजावली. उत्पादन खर्चाच्या 50% पेक्षा जास्त दर देण्याची शिफारस त्यांनी केली.
हा अहवाल डिसेंबर 2004 मध्ये सादर करण्यात आला. शेवटचा अहवाल ऑक्टोबर 2006 मध्ये सादर करण्यात आला होता. पण दुर्दैवाने एकापाठोपाठ आलेल्या सरकारांनी या आयोगाच्या अहवालावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

फोटो स्रोत, MS Swaminathan
“स्वामीनाथन यांनी मोठ्या बांधिलकीने अहवालाचा मसुदा तयार केला तरी कोणत्याही सरकारने या अहवालावर चर्चा करण्यासाठी संसदेत तासभरही वेळ दिला नाही,” असं साईनाथ सांगतात.
मोदी सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या अहवालातील प्रमुख बाबी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.
‘उलट मोदी सरकारने या अहवालाची अंमलबजावणी होऊ शकत नाही. ते सध्याच्या बाजारभावावर परिणाम करेल’, असं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.
‘विदर्भातील पीडित शेतकऱ्यांना पाहून स्वामीनाथन रडले’
महाराष्ट्रातील विदर्भातील पीडित शेतकऱ्यांना पाहून स्वामीनाथन रडले, असं साईनाथ यांनी सांगितलं.
"मी एकदा त्यांना चेन्नईत भेटायला गेलो होतो तेव्हा ते म्हणाले, 'तुम्ही विदर्भाविषयी जे लिहिता ते धक्कादायक आहे'. मी त्यांना त्या ठिकाणी भेट देण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी त्यांच्या आयोगाच्या इतर दोन सदस्यांसह विदर्भाचा दौरा केला.
तेव्हा विलासराव देशमुख सरकार स्वामीनाथन यांनी विदर्भला भेट देऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले. पण MSS माझ्यासोबत 2 दिवस राहिले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 3-4 कुटुंबांना त्यांनी भेट दिली. एका घराकडून दुसऱ्या घराकडे जाताना ते अक्षरश: रडू लागले. तेव्हा त्यांनी त्यांचा चेहरा झाकून घेतला. मी हे विसरू शकत नाही," असं पी. साईनाथ सांगतात.
2007 मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती केली.
हरितक्रांतीवर टीका
एम. एस. स्वामीनाथन यांच्या हरितक्रांतीवर नंतर अनेक टीका झाल्या.
पर्यावरणवाद्यांनी हरित क्रांतीवर खते टाकून जमीन प्रदूषित केल्याचा आरोप केला.
“स्वामीनाथन यांच्या मते हरितक्रांतीचा श्रीमंत शेतकऱ्यांनी जास्त फायदा करून घेतला. त्यांचा खते आणि कीटकनाशके वापरण्याबाबतचा दृष्टिकोनही बदलला होता. त्यांनी आपली भूमिका बदलण्यास कधीच मागेपुढे पाहिले नाही,” असं साईनाथ सांगतात.
त्याचप्रमाणे, त्यांनी नंतर GM पिकांबद्दलचे त्यांचं मत पूर्ण बदलल्याचंही साईनाथ सांगतात.
स्वामीनाथन यांच्या पत्नी मीना स्वामीनाथन यांचे मार्च 2022 मध्ये निधन झाले. त्यांना सौम्या स्वामीनाथन, मथुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन अशा तीन मुली आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








