इराणमधील 1953 चा सत्तापालट: जेव्हा अमेरिका आणि ब्रिटनने उलथवलं होतं इथलं सरकार

इराणमधील 1953 चा सत्तापालट

फोटो स्रोत, INTERCONTINENTALE/AFP via Getty Images

    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि संशोधक

इराणची राजधानी तेहरानमध्ये त्या रात्री फारच तणावपूर्ण वातावरण होतं. काहीतरी मोठं घडणार आहे, अशी भीती आणि अस्वस्थता सगळीकडे जाणवत होती.

मध्यरात्री सैनिकांनी भरलेला एक ट्रक पंतप्रधानांना अटक करण्यासाठी निघाला होता. पण आधीच खबर मिळाल्यामुळे पंतप्रधानांचे निष्ठावान अधिकारी सतर्क झाले आणि त्या सैनिकांनाच अटक केली.

मात्र ही परिस्थिती फार काळ टिकणारी नव्हती. कारण सत्तापालटाच्या कटाची मुळे खूप खोलवर होती.

ही गोष्ट इराणमधील अलीकडच्या आंदोलनांची नाही, तर 15 ऑगस्ट 1953 च्या रात्रीची आहे.

त्या रात्री इराणचे पंतप्रधान मोहम्मद मुसद्दिक यांना सत्तेवरून हटवण्यासाठी एक मोठा कट रचला गेला होता. या कटात अमेरिका, ब्रिटन आणि स्वतः इराणचे शाह देखील सामील होते.

चार दिवसांतच मोहम्मद मुसद्दिक या कटाचे बळी ठरले. अखेर त्यांचं सरकार उलथवून लावण्यात आलं आणि सत्तापालट झाला.

अलीकडच्या आंदोलनांदरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांमुळे पुन्हा एकदा त्या सत्तापालटाची आठवण ताजी झाली आहे.

इराणनेही अमेरिकेला देशाच्या अंतर्गत बाबींतील हस्तक्षेपापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

महत्त्वाचं म्हणजे, 1953 मध्ये मुसद्दिक सरकारचा सत्तापालट करण्यात सीआयएने मुख्य भूमिका बजावली होती, हे 2013 मध्ये सीआयएने जाहीर केलेल्या दस्तऐवजांमध्ये पहिल्यांदाच अधिकृतपणे मान्य केलं गेलं होतं.

या दस्तऐवजांच्या एका भागात असं लिहिलं होतं की, इराणमध्ये झालेला सैन्य सत्तापालट सीआयएच्या आदेशावर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग म्हणून रचण्यात आला होता.

73 वर्षांपूर्वी अमेरिका आणि ब्रिटनने इराणचं सरकार उलथवलं होतं. बीबीसीने या लेखात त्यावेळेस घडलेल्या घटनांचा आढावा घेतला आहे. पण मुख्य प्रश्न असा आहे की, ही घटना का घडली होती?

'संघर्षाची मुळं- ब्रिटन आणि इराणी तेलाचा वाद'

याची सुरुवात 1908 मधील इराणमध्ये तेलाच्या शोधापासून झाली.

ब्रिटनने इराणच्या काजार राजवटीशी करार करून 'अँग्लो-पर्शियन ऑइल कंपनी'च्या माध्यमातून तेलातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा 80 टक्क्यांहून अधिक हिस्सा स्वतःकडे ठेवला होता. तर इराणला आपल्या स्वतःच्या नैसर्गिक संपत्तीमधून केवळ 10 ते 12 टक्केच वाटा मिळत होता.

1925 मध्ये काजार घराण्याचे बादशाह अहमद शाह यांना हटवून रझा शाह पहलवी यांनी पहलवी राजवंशाची स्थापना केली. ते 1941 पर्यंत इराणचे शाह होते. त्यानंतर त्यांना सत्तेतून हटवण्यात आलं आणि त्यांचा मुलगा मोहम्मद रझा पहलवीला सत्ता देण्यात आली.

वुल्फगँग के. क्रॅसिन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्साससाठी एक संशोधन केलं होतं. या संशोधनानुसार 1940 च्या दशकाच्या शेवटी ब्रिटिश तेल कंपनीविरोधात सामान्य लोकांमध्ये असंतोष वाढू लागला होता.

रझा शाह पहलवी यांच्या तरुणपणातील फोटो (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रझा शाह पहलवी यांच्या तरुणपणातील फोटो (फाइल फोटो)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकन पत्रकार स्टीफन किंझर यांनी त्यांच्या 'ऑल द शाह्स मेन' या पुस्तकात लिहिले आहे की, परकीय नियंत्रण कमी करण्यासाठी इराणने त्या कंपनीचे ऑडिट करण्याचा प्रयत्न केला होता.

पण जेव्हा त्या कंपनीने इराणी सरकारला सहकार्य करण्यास नकार दिला, तेव्हा 1951 मध्ये इराणच्या संसदेनं तेल उद्योगाच्या राष्ट्रीयीकरणाला मंजुरी दिली. या कायद्याचे मुख्य समर्थक डॉ. मोहम्मद मुसद्दिक यांचीच पंतप्रधानपदी निवड करण्यात आली.

एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिकानुसार, जेव्हा ब्रिटनला आपले हित धोक्यात असल्याचे दिसू लागले, तेव्हा मोहम्मद मुसद्दिक यांच्या सरकारला कमकुवत आणि अस्थिर करण्यासाठी एक गुप्त मोहीम सुरू केली.

एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिकानुसार, "सुरुवातीला ब्रिटिश सरकारने संसदीय आदेशाच्या माध्यमातून शाह यांना मुसद्दिक यांना पदावरून हटवण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा डाव फसला आणि उलट मुसद्दिक यांची लोकप्रियता वाढली, तर शाहचे स्थान कमकुवत झाले."

सरकार उलथवून टाकण्यासाठी ब्रिटनने एकट्याने पुढाकार न घेता अमेरिकेलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी शीतयुद्धाच्या भीतीचा वापर करण्यात आला. मुसद्दिक हे इराणी कम्युनिस्ट पक्षाच्या जवळ जात आहेत, असा प्रचार केला गेला, पण प्रत्यक्षात ते कम्युनिझमचे खुले विरोधक होते.

'मोहम्मद मुसद्दिक विरोधात ब्रिटन आणि अमेरिकेची युती'

अमेरिकन मासिक 'टाइम' ने 1951 मध्ये मोहम्मद मुसद्दिक यांना 'मॅन ऑफ द इयर' घोषित केलं होतं. या मासिकानुसार, "त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी सक्रिय धोरणे राबवली की, हजारो मैल दूर असलेल्या देशांच्या मंत्रालयांत उशिरापर्यंत दिवे पेटलेले असायचे. लोक त्यांच्यावर खूप प्रेम करत होते."

पण किंझर यांच्या मते, मुसद्दिक हे तडजोड करणारे नेते नाहीत, असं मानून ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांच्या सरकारांनी 1953 च्या सुरुवातीला त्यांचं सरकार पाडण्याचा निर्णय घेतला.

या कारवाईला अमेरिकेने 'ऑपरेशन अजॅक्स', तर ब्रिटनने 'ऑपरेशन बूट' असं नाव दिलं.

न्यूयॉर्क टाइम्सचे लेखक जेम्स राइझन यांनी लिहिले आहे की, सत्तापालटाचे प्रमुख नियोजक असलेल्या डॉ. डोनाल्ड एन. विल्बर यांच्या माहितीनुसार, मार्च 1953 मध्ये सीआयएच्या तेहरान कार्यालयाने कळवलं होतं की, एका इराणी जनरलने सैन्याच्या मदतीने सत्तापालटाला पाठिंबा मिळावा म्हणून अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधला होता.

मोहम्मद मुसद्दिक 1950 च्या दशकात इराणचे पंतप्रधान झाले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहम्मद मुसद्दिक 1950 च्या दशकात इराणचे पंतप्रधान झाले.

ज्युलियन बोर्गर यांनी गार्डियनमध्ये लिहिले आहे की, ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआय-6च्या इराणी कार्यालयाचे प्रमुख नॉर्मन डर्बीशायर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी शाह समर्थक जनरल फझलुल्लाह जाहिदी यांना क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी समोर आणले, जेणेकरून ते कसं तरी मुसद्दिक यांची जागा घेऊन पंतप्रधान होऊ शकतील.

विल्बर यांनी लिहिलेल्या 'क्लँडेस्टाइन सर्व्हिस हिस्ट्री: ओव्हरथ्रो ऑफ प्रीमियर मुसद्दिक - नोव्हेंबर 1952 ते ऑगस्ट 1953' या पुस्तकानुसार, 4 एप्रिल रोजी सीआयएचे संचालक अ‍ॅलन डब्ल्यू. ड्यूलेस यांनी 10 लाख डॉलर्स मंजूर केले. ही रक्कम मुसद्दिक यांना सत्तेतून हटवण्यासाठी कोणत्याही मार्गाने वापरता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

विल्बर यांनी लिहिलं आहे की, या योजनेनुसार शाह मुख्य भूमिका बजावणार होते. परंतु, एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी तरुण शाहबद्दल लिहिलं की, ते 'संभ्रम, अनिश्चित आशंका आणि भीतीने वेढलेले' होते.

ते बर्‍याच वेळा आपल्या कुटुंबाशी, विशेषतः त्यांची 'शक्तिशाली आणि कटकारस्थानी जुळी बहीण' राजकुमारी अश्रफशी मतभेद होते.

याशिवाय, सीआयएच्या मते, शाहंना ब्रिटिश कटकारस्थानाची 'पॅथॉलॉजिकल भीती' (अत्यंत भीती) होती, जी संपूर्ण संयुक्त मोहिमेसाठी संभाव्य अडथळा ठरू शकत होती.

ऑक्टोबर 1952 मध्ये मुसद्दिक यांनी ब्रिटनशी संबंध तोडले आणि त्याचे राजदूत व गुप्तहेर देशातून काढले. यामुळे डर्बीशायरच्या हालचाली तात्पुरत्या थांबल्या. त्यांनी आपली क्रांतीची योजना बेरूतमध्ये सीआयएकडे सोपवली.

'शाहंचं मन वळवण्याचे प्रयत्न'

योजना पुढे जात होती, पण शाहांना अजूनही शंका होती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांनी अद्याप अंतिम मान्यताही दिलेली नव्हती.

जूनमध्ये अमेरिकन आणि ब्रिटिश गुप्तहेरांनी बेरूतमध्ये रणनीतीला अंतिम रूप दिलं. तत्पूर्वीच सीआयएच्या नियर ईस्ट आणि आफ्रिका विभागाचे प्रमुख केर्मित रुझवेल्ट (थिओडोर रुझवेल्ट यांचे नातू) कारवाईचे नेतृत्व करण्यासाठी तेहरानला आले.

11 जुलैला राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांनी अखेर या योजनेला मान्यता दिली. योजनेनुसार, सीआयएने जनतेत अशांतता पसरवायची होती, आणि जेव्हा देश अराजकतेकडे जाईल, तेव्हा शाह ठाम राहून 'डॉ. मुसद्दिक यांना हटवून जनरल जाहिदी यांना पंतप्रधान करण्याचा' शाही आदेश जारी करतील.

स्टीफन किंजर यांच्या 'ऑल द शाहज मेन' या पुस्तकाचे मुखपृष्ठ.

फोटो स्रोत, ECHO

फोटो कॅप्शन, स्टीफन किंजर यांच्या 'ऑल द शाहज मेन' या पुस्तकाचे मुखपृष्ठ.

साधारण त्याच वेळी, सीआयएचे अधिकारी स्टीफन मीड आणि ब्रिटिश गुप्तहेर डर्बीशायर यांनी फ्रेंच रिव्हेरा येथे राजकुमारी अश्रफ पहलवींची भेट घेतली. त्यांनी त्यांना इराणला परत जाऊन आपल्या भावाला ठरवलेल्या योजनेनुसार काम करायला राजी करण्यासाठी प्रवृत्त करण्यास सांगितलं.

डर्बीशायरने सांगितलं की, "आम्ही त्यांना समजावलं सर्व खर्च आम्ही करणार आहोत, आणि जेव्हा मी एक मोठी रक्कम दाखवली, तेव्हा त्यांचे डोळे आनंदाने चमकू लागले."

विल्बर यांच्या मते, नापसंत असलेली राजकुमारी परत आल्याने मुसद्दिक समर्थक लोकांमध्ये विरोधाची जोरदार लाट उभा राहिली.

आपली परवानगी न घेता राजकुमारी परत आल्याने शाह खूप रागावले होते. सुरुवातीला त्यांनी आपल्या बहिणीला भेटण्यासही नकार दिला होता.

पण 29 जुलैला, महालातील एका कर्मचारी, जो गुप्तचर इतिहासानुसार दुसरा ब्रिटिश एजंट होता, त्याने अश्रफ यांना शाहपर्यंत पोहोचवले. दोघा भावा-बहिणींमध्ये काय संभाषण झालं, याची इतिहासात नोंद नाही.

इराणच्या शाहची पत्नी (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणच्या शाहची पत्नी (फाइल फोटो)

एजन्सीने आपली प्रचार मोहीमही जोरदार सुरू केली. एका मोठ्या वृत्तपत्राच्या मालकाला सुमारे 45 हजार डॉलर्सचं वैयक्तिक कर्ज देण्यात आलं. "त्याचं वृत्तपत्र आमच्या हेतूसाठी काम करेल या उद्देशाने त्याला ही मदत करण्यात आली."

पण शाह ठाम राहिले आणि सीआयएने तयार केलेल्या आदेशांवर सही करण्यास त्यांनी नकार दिला. या दस्तऐवजानुसार मुसद्दिक यांना हटवून जनरल जाहिदी यांची नेमणूक होणं अपेक्षित होतं.

दरम्यान, डॉ. मुसद्दिक यांना त्यांच्याविरोधात कट रचला जात असल्याचे आधीच लक्षात आलं होतं. त्यांनी संसद बरखास्त करून राष्ट्रीय सार्वमताची घोषणा केली आणि आपली सत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

10 ऑगस्टपर्यंत, शाह अखेर जनरल जाहिदी आणि कटात सामील असलेल्या काही सैनिक अधिकाऱ्यांना भेटायला तयार झाले, पण तरीही आदेशांवर सही करण्यास नकार देत राहिले.

यावर सीआयएने रशीदयानला पाठवले, जेणेकरून शाह यांना संदेश जाईल की काही दिवसांत पाऊल उचललं नाही तर रुझवेल्ट रागाने परत जातील.

शेवटी, शाहांनी 13 ऑगस्टला आदेशांवर सही केली. ते सैन्याच्या मदतीने सत्तापालटाला पाठिंबा देतील ही बातमी जनरल जाहिदीच्या समर्थक अधिकाऱ्यांमध्ये पटकन पसरली.

'सत्तापालट'

सत्तापालटाची सुरुवात 15 ऑगस्टच्या रात्री झाली, पण एका अति बडबड्या इराणी सैनिक अधिकाऱ्यामुळे हे रहस्य लगेच उघड झालं आणि या कटाची बातमी डॉ. मुसद्दिक यांच्यापर्यंत पोहोचली.

गुप्तचर इतिहासानुसार, डॉ. मुसद्दिक यांचे चीफ ऑफ स्टाफ जनरल तकी रियाही यांना सत्तापालट सुरू होण्यापूर्वी काही तास आधीच माहिती मिळाली, त्यांनी आपल्या डेप्युटीला शाही रक्षक दलाच्या बॅरेकमध्ये पाठवलं.

त्या डेप्युटीला तिथेच अटक करण्यात आले. हे अगदी त्याच वेळी घडले जेव्हा शाह समर्थक सैनिक शहरभर पसरून इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करत होते.

सैनिकांनी सैन्य आणि सरकारी कार्यालयांतील टेलिफोन लाइन्स कापल्या आणि टेलिफोन एक्सचेंजवर कब्जा केला.

पण आश्चर्याची गोष्ट अशी घडली की, फोन चालूच राहिले, ज्यामुळे डॉ. मुसद्दिक यांच्या सैन्याला मोठा फायदा मिळाला. जनरल रियाहीही शाह समर्थक सैनिकांच्या ताब्यातून वाचले आणि कमांडर्सना पंतप्रधानसोबत उभे राहण्यासाठी संघटित करू लागले.

डॉ. मुसद्दिक यांना त्यांच्या घरी अटक करण्यासाठी पाठवलेल्या शाह समर्थक सैनिकांनाच पकडले गेले.

जनरल जाहिदीसोबत काम करणाऱ्या एका वरिष्ठ सैनिक अधिकाऱ्याने सैनिक मुख्यालयात टँक आणि निष्ठावान सरकारी सैनिक पाहिले, तेव्हा त्याने तिथून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी सकाळी, तेहरान रेडिओवर सरकारविरोधी सत्तापालट अयशस्वी झाल्याचे जाहीर केले गेले.

राजकुमारी अश्रफ पहलवी या इराणच्या शाहच्या जुळी बहीण होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजकुमारी अश्रफ पहलवी या इराणच्या शाहच्या जुळी बहीण होत्या.

अमेरिकन दूतावासातील सीआयएचे अधिकारी अंधारात होते. इतिहासाच्या या दस्तऐवजानुसार, काय घडत आहे, हे त्यांना कळायला मार्ग नव्हता.

केर्मिट रुझवेल्ट दूतावासातून बाहेर आले आणि जनरल जाहिदीला शोधून काढले, ते तेहरानच्या उत्तर भागात लपलेले होते. आश्चर्याची गोष्ट अशी होती की, जनरल कारवाई थांबवायला तयार नव्हते.

जर लोकांना हे पटवलं गेलं की, जनरल जाहिदी कायदेशीर पंतप्रधान आहेत, तर सत्तापालट अजूनही यशस्वी होऊ शकतं, यावर या दोघांनी सहमती दर्शवली.

या उद्देशासाठी, गुप्तचर इतिहासानुसार, योजना अंमलात आणणाऱ्यांनी शाहने दोन शाही आदेशांवर सही केली आहे ही बातमी सर्वत्र पसरवायची होती.

तेहरानमधील सीआयए स्टेशनने न्यूयॉर्कमधील असोसिएटेड प्रेसला संदेश पाठवला की, अनाधिकृत माहितीनुसार, कटाच्या नेत्यांकडे शाहचे दोन आदेश आहेत- एक मुसद्दिक यांना हटवण्याचा आणि दुसरा जनरल जाहिदींची नेमणूक करण्याचा.

सीआयए आणि त्यांच्या एजंटांनी या आदेशाची चर्चा काही तेहरानमधील वृत्तपत्रांमधूनही घडवून आणली.

पण प्रचार मोहिमेला (प्रोपगंडा) लवकरच अडचण आली. सीआयएच्या अनेक इराणी एजंटना अटक झाली होती किंवा ते लपून बसले होते. त्याच दुपारी एजन्सीने जनरल जाहिदी यांचं एक निवेदन तयार केलं, जे जनतेत वाटायचं होतं, परंतु पंतप्रधानांच्या निष्ठावान दलांच्या देखरेखीबाहेर असलेला एकही छापखाना मिळाला नाही.

16 ऑगस्टला, शाह बगदादला पळून गेल्याची बातमी समजताच, कारवाई पुन्हा सुरू होण्याच्या आशांना मोठा धक्का बसला. त्यानंतर सीआयए मुख्यालयाने तेहरानला तार पाठवून रुझवेल्ट यांना लगेच परत येण्याचा सल्ला दिला.

रुझवेल्ट यांनी याला असहमती दर्शवली. त्यांनी सांगितलं की, जर शाह बगदाद यांनी रेडिओवरून भाषण दिले आणि जनरल जाहिदी यांनी आक्रमक भूमिका घेतली, तर 'यशाची थोडीशी तरी आशा अजूनही आहे.'

विल्बर यांच्या मते, याच काळात डॉ. मुसद्दिक यांनी बंडानंतर संसद बरखास्त केली, आणि त्यामुळे ते अनाहूतपणे सीआयएच्या योजनेत अडकले.

17 ऑगस्टच्या सकाळी शाह यांनी अखेर बगदादहून आदेशांवर सही केल्याचे जाहीर केले. या नाजूक टप्प्यावर डॉ. मुसद्दिक सरकारने शाह हे देश सोडून गेल्याने आणि कटात सामील काही अधिकाऱ्यांच्या अटकेवर समाधान मानले. धोका टळला आहे, असं समजून शहरात तैनात केलेले बहुतेक सैन्य माघारी बोलावण्यात आले.

त्याच रात्री सीआयएने जनरल जाहिदी तसेच इतर प्रमुख इराणी एजंट आणि सैन्य अधिकाऱ्यांना 'गाड्यांच्या खालच्या भागात आणि बंद जीपमध्ये' लपवून दूतावासाच्या परिसरात आणले. तेथे अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

त्यांनी 19 ऑगस्टला प्रतिहल्ला सुरू करण्यास सहमती दर्शवली. कम्युनिझमच्या विरोधात संघटित जिहादसाठी तेहरानमधील एका प्रमुख धर्मगुरूला क्यूमला पाठवलं. इराणी इतिहासकार मायकेल ऑक्सवर्दी यांच्या मते, "मुसद्दिक यांच्या विरोधातील हे आंदोलनच त्यांच्या पतनात निर्णायक ठरले."

पण पुन्हा एकदा शाह यांनी सीआयएची निराशा केली. दुसऱ्या दिवशी ते बगदादहून रोमकडे रवाना झाले.

डॉ. मुसद्दिक समर्थक वृत्तपत्रांनी पहलवी साम्राज्याचा अंत झाल्याचे वृत्त दिले. तर कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीने या बंडखोरीच्या प्रयत्नाचे 'अँग्लो-अमेरिकन कट' असे वर्णन केले. यानंतर आंदोलकांनी शाह यांचा पुतळा पाडला.

सीआयएच्या तेहरान कार्यालयाने मुख्यालयाकडे 'ऑपरेशन अजॅक्स पुढे सुरू ठेवायचं की थांबवायचं?', याबाबत मार्गदर्शन मागितलं.

'अखेरीस यश'

ज्या क्षणी अमेरिकन माघार घ्यायला तयार होते, तेव्हाच तेहरानच्या रस्त्यांवरील वातावरण अचानक बदलले.

19 ऑगस्टच्या सकाळी तेहरानमधील काही वृत्तपत्रांनी शाह यांचे बहुप्रतिक्षित फर्मान प्रकाशित केले. त्यानंतर लगेचच शाह समर्थकांची गर्दी रस्त्यांवर जमू लागली.

विल्बर यांनी लिहिलेल्या इतिहासानुसार,'त्यांना फक्त नेतृत्वाची गरज होती', आणि ते नेतृत्व सीआयएच्या इराणी एजंटांनी पुरवले होते.

इराणचे माजी पंतप्रधान मोहम्मद मुसद्दिक. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणचे माजी पंतप्रधान मोहम्मद मुसद्दिक. (फाइल फोटो)

कोणत्याही स्पष्ट आदेशाशिवाय, एका पत्रकाराने (जो एजन्सीच्या महत्त्वाच्या इराणी एजंटपैकी एक होता) गर्दीला संसदेकडे नेले आणि लोकांना डॉ. मुसद्दिक यांच्या परराष्ट्र मंत्र्याच्या वृत्तपत्राचं कार्यालय पेटवून देण्यासाठी भडकवलं. आणखी एका इराणी सीआयए एजंटने गर्दीचे नेतृत्व करत इतर वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ला केला.

काही दिवसांपूर्वीच या योजनेत सामील असलेला एक इराणी सैन्य कर्नल अचानक संसदेजवळ एक टँक घेऊन समोर आला. गुप्तचर अहवालानुसार, 10.15 वाजेपर्यंत सर्व प्रमुख चौकांमध्ये शाह समर्थक सैनिकांनी भरलेले ट्रक पोहोचले होते.

दुपारपर्यंत जमावाला काही अधिकाऱ्यांचे थेट नेतृत्व मिळू लागले. एका तासात सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस ताब्यात घेण्यात आले. प्रांतांना तार पाठवून शाहच्या बाजूने सत्तापालटाचे आवाहन केले गेले. थोड्या वेळाने गोळीबारानंतर पोलीस मुख्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयावरी कब्जा मिळवण्यात आला.

तेहरान रेडिओ अनिश्चिततेमुळे कापसाच्या किमतींवर कार्यक्रम प्रसारित करत होते. पण दुपारी सुरुवातीला नागरिक, सैनिक अधिकारी आणि पोलिसांनी त्यावर हल्ला केला. शाह समर्थक वक्त्यांनी प्रसारणावर ताबा मिळवला, सत्तापालटाचे यश जाहीर केले आणि शाही आदेश वाचून दाखवले.

इराणच्या शाहचा निर्वासित मुलगा रझा पहलवीने लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, इराणच्या शाहचा निर्वासित मुलगा रझा पहलवीने लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. (फाइल फोटो)

दूतावासात सीआयएचे अधिकारी आनंदात होते, आणि केर्मिट रुझवेल्टने जनरल जाहिदींना भूमिगत अवस्थेतून बाहेर आणले.

एका सैनिक अधिकाऱ्याने टँकची सोय केली आणि त्यांना रेडिओ स्टेशनवर नेलं, जिथून जनरल जाहिदींनी राष्ट्राला संबोधित केलं.

डॉ. मुसद्दिक आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली, तर जनरल जाहिदीच्या समर्थक अधिकाऱ्यांनी तेहरान छावणीच्या सर्व युनिट्सची कमांड 'अजॅक्सच्या ओळखीच्या समर्थकां'कडे सोपवली.

सोव्हिएत संघ पूर्णपणे आश्चर्यचकित झाला. मुसद्दिक सरकार पडत असतानाही मॉस्को रेडिओवर 'इराणमधील अमेरिकच्या मोहिमेचं अपयश' या विषयावर बातमी प्रसारित होत होती.

पण सीआयए मुख्यालयही मॉस्कोसारखंच आश्चर्यचकित झालं. सत्तापालट यशस्वी झाल्याची बातमी ऐकून, गुप्तचर इतिहासकारांच्या मते, "त्यांना ही एक मस्करी वाटली. कारण आदल्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे त्यांच्यात नैराश्य पसरलेलं होतं. या विजयाच्या बातमीमुळे ते आश्चर्यचकित झाले होते."

सीआयएचे संचालक अ‍ॅलन डलेस यांनी शाहसोबत रोमहून तेहरानपर्यंत उड्डाण भरले, आणि जनरल जाहिदीने अधिकृतपणे मुसद्दिक यांची जागा घेतली. मुसद्दिक यांच्यावर खटला चालवला गेला. सुरुवातीला त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

पण शाहच्या वैयक्तिक आदेशानुसार त्यांना तीन वर्षांची एकांतवासाची शिक्षा झाली. यानंतर ते घरातच नजरकैदेत राहिले. 1967 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)