वजन कमी करणं काही जणांना इतकं अवघड का जातं? लठ्ठपणा अनुवांशिक असतो?

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, निक ट्रिगल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"फक्त कमी खा. स्वत:वर ताबा ठेवा. एवढं केलं तर लठ्ठपणा कमी होईल. लठ्ठ लोकांनी एवढंच करावं. आणि सोपं आहे, शिवाय वैयक्तिक जबाबदारी आहे."

गेल्या वर्षी मी लिहिलेल्या एका लेखाच्या खाली वाचकांनी पोस्ट केलेल्या शेकडो कमेंट्सपैकी ही एक. वजन कमी करण्याच्या इंजेक्शन्सबद्दलचा तो लेख होता.

बऱ्याच लोकांना असं वाटतं की, वजन कमी करणं ही केवळ इच्छाशक्तीची बाब आहे. असं मत असणाऱ्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातीलही काही लोकांचा समावेश आहे.

ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिकेतील लोकांशी याबाबत बोलून एक अभ्यास केला गेला. हा अभ्यास 'द लॅन्सेट' या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये प्रकाशित झालाय. त्यानुसार, 10 पैकी 8 जणांनी असं म्हटलं की, लठ्ठपणा केवळ जीवनशैलीमुळे पूर्णपणे रोखला जाऊ शकतो.

मात्र, लठ्ठपणाशी झगडणाऱ्या लोकांसोबत सुमारे 20 वर्षांपासून काम करणाऱ्या आहारतज्ज्ञ बिनी सुरेश या मताशी सहमत नाहीत. त्यांना वाटतं की, हे फक्त अर्धवट चित्र आहे.

बिनी सुरेश म्हणतात की, "मी अनेकदा असे रुग्ण पाहते, जे लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेहनत करतात, या समस्येबद्दल बरीचशी त्यांना माहितीही आहे आणि त्याआधारे ते सतत प्रयत्न करत असतात. पण त्यांचं वजन काही केल्या कमी होत नाही."

'वेटवॉचर्स'च्या वैद्यकीय संचालिक डॉ. किम बॉयड या मताशी सहमत आहेत. त्या म्हणतात, "इच्छाशक्ती आणि स्व-नियंत्रण हे शब्द चुकीचे आहेत. कित्येक दशकांपासून लोकांना कमी खा आणि जास्त व्यायाम करा, जेणेकरून वजन कमी होईल, असे उपदेश दिले जात आहेत. पण तसं झालेलं काही दिसत नाही. एकूणच लठ्ठपणा ही एक खूपच गुंतागुंतीची समस्या आहे."

त्या आणि ज्या इतर तज्ज्ञांशी मी बोललो ते सांगतात की एखाद्या व्यक्तीचं वजन जास्त असण्याची अनेक कारणं असू शकतात, यापैकी काही अजूनही पूर्णपणे समजू शकलेली नाहीत, परंतु हे स्पष्ट आहे की ही परिस्थिती प्रत्येकासाठी सारखी नाही.

ब्रिटनमध्ये तिथल्या सरकारनं या समस्येला तोंड देण्यासाठी नियमनाचा आधार घेतला आहे. उदाहरणार्थ, रात्री 9 वाजण्याआधी टेलिव्हिजनवर जंक फूडच्या जाहिराती आणि ऑनलाइन जाहिरातींवर पूर्ण बंदी घालणं.

तरीही अनेकांचं असं म्हणणं आहे की, ब्रिटनमध्ये वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी हा उपाय देखील प्रभावी ठरणार नाही.

ब्रिटनमध्ये सरासरी प्रत्येक चार प्रौढांपैकी एकापेक्षा जास्त व्यक्ती या समस्येनं ग्रस्त आहेत.

असं आहे जनुकांचं कनेक्शन

अति लठ्ठपणा आणि त्यासंबंधी आजारांशी सामना करणाऱ्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या एंडोक्राइनोलॉजिस्ट प्राध्यापक सदाफ फारुकी सांगतात, "एखाद्या व्यक्तीचं वजन किती वाढतं, हे बऱ्याचदा त्याच्या जनुकांवर अवलंबून असतं."

सदाफ फारुकी पुढे म्हणतात की, "काही जनुकं मेंदूच्या अशा भागावर परिणाम करतात, जो भाग पोटाकडून मेंदूला पाठवल्या जाणाऱ्या सिग्नलला प्रतिसाद म्हणून भूक आणि खाण्याचं नियमन करतो.

"लठ्ठपणा असलेल्या लोकांच्या या जनुकांमध्ये बदल किंवा विविधता आढळून येते, याचा अर्थ त्यांना जास्त भूक लागते आणि खाल्ल्यानंतरही त्यांना पोट भरल्यासारखं वाटत नाही."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

आतापर्यंत शोध लागलेल्या जनुकांपैकी MC4R हे जनुक सर्वात महत्वाचं आहे. या जनुकात म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन आहे, जे जास्त खाण्यास प्रोत्साहित करतं. याचा अर्थ असा होतो की, आपल्याला पोट भरल्यासारखं वाटण्याची शक्यता कमी होते. हे जनुक जगभरातील अंदाजे पाचपैकी एका व्यक्तीमध्ये आढळून येतं.

प्राध्यापक फारुकी म्हणतात, "इतर जनुकं चयापचयावर परिणाम करतात, म्हणजेच आपण किती लवकर ऊर्जा बर्न करतो. याचा अर्थ असा की काही लोकांचं वजन तेवढ्याच प्रमाणात अन्न खाल्ल्यानं इतरांच्या तुलनेत जास्त वाढेल, तसेच त्यांची चरबी जास्त वाढेल किंवा व्यायामादरम्यान ते कमी कॅलरी बर्न करतील."

फारुकींच्या अंदाजानुसार, वजनावर परिणाम करणारी हजारो जनुकं असू शकतात आणि आपल्याला त्यापैकी फक्त 30 ते 40 जनुकांबद्दलच तपशीलवार माहिती आहे.

यो-यो डाएटिंगमागील विज्ञान

बॅरिएट्रिक सर्जन आणि 'व्हाय वी इट टू मच'चे लेखक अँड्र्यू जेनकिन्सन सांगतात की, प्रत्येक व्यक्तीचं वजन तेवढंच असतं, जेवढं तिच्या मेंदूला त्या व्यक्तीसाठी योग्य वाटतं. मग ते वजन जास्त असो वा नसो. याला 'सेट वेट पॉइंट थिअरी' नावानं ओळखलं जातं.

जेनकिन्सन म्हणतात, "हे (सेट वेट म्हणजे निश्चित वजन) अनुवांशिकतेद्वारे निश्चित केलं जातं. परंतु, त्यात इतर घटकांचा देखील समावेश असतो. जसं की, जेवण करत असतानाचं तुमचं वातावरण, तुमच्या ताण-तणावाची पातळी आणि तुमची झोप."

याचा अर्थ असा की, शरीराचं वजन थर्मोस्टॅटसारखं आहे. तुमचं शरीर ती आवडीची रेंज म्हणजेच श्रेणी राखण्याचा प्रयत्न करत असतं.

त्या सिद्धांतानुसार, जर वजन या 'सेट पॉइंट'पेक्षा कमी झालं तर भूक वाढते आणि चयापचय क्रिया मंदावते, जसं थर्मोस्टॅट खूप थंड झाल्यावर उष्णता वाढवतो.

डॉ. जेनकिन्सन म्हणतात की, एकदा का तुमचा सेट पॉइंट निश्चित झाला की, इच्छाशक्तीनं त्याला बदलणं खूप कठीण असतं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लठ्ठपणामुळे हृदयरोग, स्ट्रोक, टाइप 2 मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग देखील होऊ शकतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'सेट वेट पॉइंट थिअरी' यो-यो डाएटिंगला देखील समजावू शकते.

जेनकिन्सन सांगतात, "उदाहरणार्थ, जर तुमचं वजन सुमारे 127 किलो असेल आणि तुमचं वजन तितकंच राहावं, असं तुमच्या मेंदूला वाटत असेल; मग तुम्ही कमी कॅलरीयुक्त आहार घेतला आणि वजन कमी केलं तर तुमचं शरीर तुम्हाला उपाशी असल्यासारखी प्रतिक्रिया देईल. परिणामी तुम्हाला खूप भूक लागेल. तुमचं वर्तन अधिक अन्न शोधण्यावर भर देईल आणि तुमची चयापचय क्रिया मंदावेल. हे भूकेचे संकेत खूप शक्तिशाली असतात. हे तहान लागण्याच्या संकेतांइतकेच तीव्र असतात."

ते पुढे म्हणतात, "खूप जास्त भूक लागणं ही अशी गोष्ट आहे, जिला दुर्लक्षित करणं खरोखर खूप कठीण आहे."

डॉ. जेनकिन्सन यामागील विज्ञान समजावून सांगतात आणि त्याचसोबत लेप्टिनच्या भूमिकेबद्दलही सविस्तर सांगतात.

ते म्हणतात, "चरबीच्या पेशींद्वारे तयार होणारं हे एक संप्रेरक आहे. ते हायपोथॅलेमसला सिग्नल देण्याचं काम करतं. हा मेंदूचा असा भाग आहे, जो मूलतः तुमच्या वजनाचा सेट पॉइंट नियंत्रित करतो, जेणेकरून त्याला हे सांगता येईल की शरीरात किती ऊर्जा साठवली आहे."

"हायपोथॅलेमस लेप्टिनच्या पातळीचं निरीक्षण करेल आणि जर त्याला असं जाणवलं की, आपण खूप जास्त ऊर्जा किंवा जास्त चरबी साठवत आहोत, तर ते आपोआप आपलं वर्तन बदलवेल, आपली भूक कमी करेल आणि आपली चयापचय क्रिया सुधारेल."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केंब्रिज विद्यापीठातील जेनेटिक्स ऑफ ओबेसिटी स्टडीचे प्रमुख प्रोफेसर फारुकी यांच्या मते, तेवढेच अन्न खाल्ल्यानंतरही काही लोकांचे वजन जास्त वाढते, तर काहींचे वजन कमी होते.

डॉ. जेनकिन्सन सांगतात की, लेप्टिननं कमीत कमी अशा प्रकारे काम केलं पाहिजे, परंतु बहुतेकदा ते अपयशी ठरतं, विशेषतः पाश्चात्य आहाराच्याबाबतीत. असं घडतं कारण लेप्टिन सिग्नल इन्सुलिनसोबत एकच सिग्नलिंग मार्ग वापरत असतो.

डॉ. जेनकिन्सन यांच्या मते, "जर इन्सुलिनची पातळी खूप जास्त असेल तर ती लेप्टिन सिग्नलला कमकुवत करते आणि त्यामुळे मेंदूला किती चरबी साठली आहे हे समजत नाही."

चांगली गोष्ट अशी आहे की, हा सेट पॉईंट निश्चित नसतो. हा जीवनशैलीतील बदल, चांगली झोप, कमी ताण आणि दीर्घकालीन चांगल्या सवयींद्वारे बदलला जाऊ शकतो.

हे थर्मोस्टॅट रीसेट करण्यासारखं आहे. कालांतरानं, हळूहळू आणि सातत्यपूर्ण बदलांमुळे शरीराला एका नवीन, अधिक आरोग्यदायी स्थितीशी जुळवून घेण्यास मदत होते.

लठ्ठपणाची धोकादायक स्थिती

यापैकी कोणीही लठ्ठपणा वाढण्याचे कारण स्पष्ट करत नाही. शेवटी, आपली जनुके आणि आपल्या शरीराची जैविक रचना बदललेली नाही.

गेल्या दशकात, जास्त वजन किंवा लठ्ठपणाच्या श्रेणीत येणाऱ्या प्रौढांचं प्रमाण सातत्यानं वाढलं आहे. हेल्थ फाउंडेशनच्या 2025 च्या विश्लेषणावरून असं दिसून आलं की, यूकेमधील 60% पेक्षा जास्त प्रौढ आता या श्रेणीमध्ये येतात, ज्यात सुमारे 28% लठ्ठ लोकांचा समावेश आहे.

याचं एक कारण म्हणजे निकृष्ट दर्जाचं आहार हेही आहे. विशेषतः अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाचं जास्त प्रमाण आणि त्याची कमी किंमत हे याचं महत्त्वाचं कारण आहे.

यामध्ये फास्ट फूड आणि साखरयुक्त पेयांचं आक्रमक मार्केटिंग आणि जाहिरातबाजी, आहारात त्यांचा वाढता वापर आणि शहरी जीवनशैली किंवा वेळेच्या अभावामुळे शारीरिक हालचालींवर आलेल्या मर्यादा, यामुळे अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण होते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फूड फाउंडेशननं गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या एका अहवालातून हे देखील समोर आले आहे की, कमी पौष्टिक अन्नाच्या तुलनेत पौष्टिक अन्न प्रति कॅलरी दुप्पटपेक्षा जास्त महाग असते.

प्रा. फारुकी म्हणतात, "याचा परिणाम असा झाला आहे की, लोकसंख्या म्हणून आपण अधिक लठ्ठ झालो आहोत, आणि अर्थातच, ज्यांच्यात अनुवांशिकतेमुळे वजन वाढण्याची शक्यता होती, त्यांचं वजन वाढलेलं आहे."

सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ याला 'ओबेसोजेनिक' म्हणजेच स्थूलता वाढवणारं वातावरण म्हणतात.

1990 च्या दशकात जेव्हा संशोधकांनी वाढत्या लठ्ठपणाच्या दराचा संबंध अन्नाची उपलब्धता, मार्केटिंगं आणि शहरी जीवनशैली यांसारख्या बाह्य घटकांशी जोडण्यास सुरुवात केली तेव्हा हा शब्द प्रथम वापरण्यात आला होता.

अनेक तज्ज्ञांचा असा युक्तिवाद आहे की, हे घटक एकत्रितपणे जास्त खाणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण करतात. याचा अर्थ असा की अत्यंत मोटीव्हेटेड म्हणजे प्रेरित लोकांना देखील वजन संतुलित राखणं कठीण जातं.

पण यामुळे इच्छाशक्ती हा शब्द कठीण का झाला आहे हे देखील स्पष्ट होतं.

लठ्ठपणाबद्दल तज्ज्ञांना काय वाटतं?

सार्वजनिक आरोग्यविषयी काम करणाऱ्या संचालक अ‍ॅलिस वाईजमन सांगतात, "जर तुम्ही कामावर जाताना बऱ्याच टेकअवे जवळून गेलात तर तुम्ही काहीतरी खरेदी करण्याची शक्यता जास्त असते. तुमचं शरीर तुमच्या सभोवतालच्या अन्नाकडं पाहून प्रतिक्रिया देत असतं."

वाईजमन या गेट्सहेडमधील सार्वजनिक आरोग्य संचालक आहेत, जिथं 2015 पासून कोणत्याही नवीन टेकअवेला परवानगी दिलेली नाही.

मात्र, देशभरात फास्ट-फूड आणि टेकअवे उद्योग सतत वाढत आहे, दरवर्षी त्याची उलाढाल 30 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

ऑफकॉम कम्युनिकेशन्स मार्केट्सच्या सर्वात अलीकडील अहवालानुसार, यूकेमध्ये अन्नाच्या जाहिरातींवर होणाऱ्या खर्चात फॅट म्हणजे चरबी, मीठ आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेल्या उत्पादनांचा दबदबा आहे, जसं की मिठाई, गोड पेये, फास्ट फूड आणि स्नॅक्स.

परंतु, वाईजमन सांगतात की, जंक फूड किंवा अधिकृतपणे "कमी पौष्टिक पदार्थ" असं लेबल लावलेल्या टीव्ही आणि ऑनलाइन जाहिरातींना आळा घालण्यासाठी लागू केलेल्या नवीन उपाययोजना केवळ काही प्रमाणातच उपयोगी ठरू शकतात.

फूड फाउंडेशननं गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या एका अहवालातून हे देखील समोर आले आहे की, कमी पौष्टिक अन्नाच्या तुलनेत पौष्टिक अन्न प्रति कॅलरी दुप्पटपेक्षा जास्त महाग असते.

वाईजमन सांगतात, "मर्यादित आर्थिक संसाधनं असलेल्या कुटुंबांसाठी पौष्टिक अन्न मिळवणं कठीण असतं. मी असं म्हणत नाही की वैयक्तिक जबाबदारीची कोणती भूमिका नसते. पण जेव्हा तुम्ही त्याबद्दल विचार करता, तेव्हा तुम्हाला विचारावं लागेल की, काय बदललं आहे? आपली इच्छाशक्ती अचानकच कमी झालेली नाही."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रिटनमध्ये, सरकारनं रात्री 9 वाजण्याआधी टेलिव्हिजनवर जंक फूडच्या जाहिराती आणि ऑनलाइन जाहिरातींवर पूर्ण बंदी घालण्याचा नियम केला आहे.

बिनी सुरेश सुद्धा याच्याशी सहमत आहेत. त्या म्हणतात, "आपण अशा वातावरणात राहतो जे जास्त खाण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बनवलं आहे. लठ्ठपणा हा चारित्र्याचा दोष नाही. ही एक जटील, जुनाट स्थिती आहे, जी बायोलॉजिकल आहे आणि लठ्ठपणा वाढवणाऱ्या वातावरणामुळे उद्भवली आहे."

"केवळ इच्छाशक्ती पुरेशी नाही, तसेच वजन कमी करणं केवळ शिस्तीचा विषय आहे असं मानणं हानिकारक ठरू शकतं."

मात्र, इच्छाशक्तीबाबत लोकांमध्ये मतभेद आहेत.

'अ कॅलरी इज अ कॅलरी' चे लेखक प्रोफेसर कीथ फ्रेन यांच्यामते, "40 वर्षांपूर्वी कदाचित इतकं जास्त वजन असलेले लोक नव्हते. वातावरण बदललं आहे, लोकांची इच्छाशक्ती किंवा इतर काहीही नाही. मला काळजी वाटते की 'इच्छाशक्ती'कडे दुर्लक्ष करून लोक सहजपणे असं वजन स्वीकारतात, जे कदाचित त्यांना हवं तसं नसतं किंवा ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं."

यशस्वीरित्या वजन कमी केलेल्या आणि ते तसंच ठेवणाऱ्या लोकांच्या मोठ्या डेटाबेसकडे ते लक्ष वेधतात.

उदाहरणार्थ, अमेरिकेतील नॅशनल वेट कंट्रोल रजिस्टी (राष्ट्रीय वजन नियंत्रण नोंदणी) मध्ये 10 हजारांहून अधिक लोकांचा समावेश आहे.

कीथ फ्रेन यांच्या मते, "ते लोक वजन कमी करणं आणि ते तसं राखणं या दोन्हीला 'कठीण' असल्याचं सांगतात. यात कमी झालेलं वजन राखणं हे अधिक कठीण आहे. मी म्हणेन की जर तुम्ही त्यांना सांगितलं की 'इच्छाशक्ती'चा त्याच्याशी काहीही संबंध नाही, तर त्यांना खूप वाईट वाटेल."

कायद्याद्वारे यात हस्तक्षेप आवश्यक आहे?

या प्रकरणात सरकारनं किती जबाबदारी घ्यावी, हा मोठा वादाचा विषय आहे.

वाईजमन यांच्यामते, लठ्ठपणाशी लढण्यासाठी नियमन हे एक आवश्यक साधन आहे. बाय वन गेट वन (एकावर एक मोफत मिळवा) सारख्या जाहिराती लोकांना विचार न करता खरेदी करण्यास प्रोत्साहित करतात.

पण उजव्या विचारसरणीच्या थिंक टँक पॉलिसी एक्सचेंजमधील हेल्थ अँड सोशल केअरचे प्रमुख गॅरेथ लायन्स यांचं म्हणणं आहे की, "अधिक कायदे करणं हा पुढे जाण्याचा योग्य मार्ग नाही. "कायदे करून तुम्ही लोकांना तंदुरुस्त बनवू शकत नाही. लोकांना आवडणाऱ्या अन्नपदार्थांवर बंदी घालणं आणि त्यावर कर लावणं यामुळे लोकांच्या जीवनातील अडचणी वाढतील, जीवनातील आनंद कमी होईल आणि गोष्टी महाग होतील. तेही अशा वेळी जेव्हा ब्रिटन आधीच महागाईशी लढत आहे."

उजव्या विचारसरणीचा थिंक टँक, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक अफेयर्समधील जीवनशैली अर्थशास्त्राचे प्रमुख क्रिस्टोफर स्नोडेन यांचंही असं म्हणणं आहे की, "लठ्ठपणा ही एक "वैयक्तिक समस्या" आहे, सार्वजनिक आरोग्याची समस्या नाही."

ते म्हणतात, "लठ्ठपणा वैयक्तिक निवडींमुळे होतो. म्हणून तुम्ही वैयक्तिक निवडींपलीकडं जाऊ शकत नाही. लोकांना बारीक करणं ही सरकारची जबाबदारी आहे ही कल्पना मला खूप विचित्र वाटते. मला या (नवीन) धोरणांचं एक गंभीर, स्वतंत्र मूल्यांकन पाहायला आवडेल, आणि जर ती यशस्वी झाली नाहीत, तर ती रद्द केली पाहिजेत."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

जेव्हा इच्छाशक्तीचा प्रश्न येतो, तेव्हा ती नेहमीच काही ना काही भूमिका बजावेल. फरक फक्त इतकाच आहे की, ती कोणत्या मर्यादेपर्यंत भूमिका बजावू शकते, याबद्दल तज्ज्ञांची मतं वेगवेगळी आहेत.

बिनी सुरेश यांच्यामते, मोठ्या चित्राचा हा फक्त एक भाग आहे. या परिस्थितीत कार्यरत असलेल्या इतर घटकांविषयी लोकांना माहिती देणं हे पहिलं पाऊल आहे.

त्या म्हणतात, "हा दृष्टिकोन इच्छाशक्तीबद्दलच्या नैतिक निर्णयांवरून लक्ष विचलित करतो. तो करुणा आणि विज्ञान-आधारित सहाय्य करणाऱ्या प्रणालीकडे लक्ष वळवतो, जी अखेरीस दीर्घकालीन यशाची उत्तम संधी देते."

ब्रॅडफोर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॉ. एलेनॉर ब्रायंट म्हणतात की, इच्छाशक्ती मजबूत करण्याचेही काही मार्ग आहेत.

"हे नेहमीच एकसारखं नसतं. ते तुमच्या मनःस्थितीवर, तुम्ही किती थकलेले आहात आणि तुम्ही किती भुकेलेले आहात यावर अवलंबून असतं. तुम्ही त्याबद्दल कसा विचार करता हे देखील महत्त्वाचं असतं."

डॉ. एलेनॉर ब्रायंट यांच्या मते, "जर तुम्ही प्रलोभनाला बळी पडलात तर तुम्ही हार मानता. तुम्ही ते बिस्किट खाता आणि नंतर खातच राहता."

मानसशास्त्रीय भाषेत, याला 'डिसइनहेबिटेड इटिंग' म्हणतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

ब्रायंट म्हणतात, "याउलट, लवचिक व्यक्ती म्हणते, 'ठीक आहे, मी एक बिस्किट खाल्लं आहे. पण मी इथंच थांबेन.' हे वेगळं सांगायला नको की, लवचिक असणं अधिक यशस्वी ठरतं."

ब्रायंट पुढे म्हणतात, "अन्नाबाबतीत इच्छाशक्तीचा वापर करणं हे कदाचित जीवनातील इतर बाबींपेक्षा अधिक कठीण आहे."

बिनी सुरेश या मताशी सहमत आहेत, मात्र, त्या म्हणतात की, एकदा लोकांना इच्छाशक्तीच्या मर्यादा समजल्या की, ती वापरण्याची त्यांची क्षमता खरंतर मजबूत होते.

त्यांच्या मते, "जेव्हा या रुग्णांना हे समजते की त्यांची समस्या शिस्तीच्या अभावाशी संबंधित नसून बायोलॉजीशी संबंधित आहे, आणि त्यांना सुनियोजित पोषण, नियमित खाण्याच्या सवयी, मानसिक रणनीती आणि व्यवहारिक उद्दिष्टांच्या माध्यमातून आधार दिला जातो, तेव्हा अन्नासोबतचं त्यांचं नातं लक्षणीयरीत्या सुधारू लागतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)