आरोग्य: एक असं जिम जिथं आई आपल्या बाळालाही घेऊन जाऊ शकते

वेस्ट एंड स्टार सोफी इव्हान्स
फोटो कॅप्शन, वेस्ट एंड स्टार सोफी इव्हान्स

बाळाला जन्म देऊन काहीच महिने झाले आहेत, तर अशा मातांना जिमला जाता येऊ शकेल का? याचे उत्तर कदाचित 'नाही' असे येईल. कारण बाळाला घरी कुणाजवळ तरी सोडून जावे लागेल. आणि समजा एखादी आई बाळाला घेऊनच जिमला गेली तर तिथे सगळे जण त्यांच्याकडेच पाहात बसतील.

पण आता लंडनमध्ये अशा जिमचा ट्रेण्ड निघाला आहे जिथं नवीन मातांना आपल्या बाळाला सोबत घेऊन जाता येतं.

या अशा जिम आहेत, जिथं या माता आपल्या लहान मुलांना घेऊन येतात आणि चक्क ट्रेडमिलवर चालता चालता बाळाला स्तनपानदेखील देतात. या जिमला 'मम फिट जिम' म्हटलं जातं.

पण असं जिम कुणाला का सुरू करावं वाटलं असेल?

नव्या मातांमध्ये एकटेपणाची भावना वाढीस लागते. ही एकटेपणाची भावना थांबवणे, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणे, व्यायाम करताना महिलांसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे या कल्पनेतून ही जिम तयार झाली आहे.

नाट्य अभिनेत्री सोफी इव्हान्स आपल्या 13 महिन्यांच्या जॅकला घेऊन अशा जिम मध्ये जाते. इथे गेल्यावर तिला सतत जॅककडे पाहावं लागत नाही.

सोफी सांगते, "जेव्हा तुम्हाला मूल होतं तेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं."

"कारण जेव्हा आई स्वतःला प्राधान्य द्यायला लागते तेव्हा तिच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून येते. तिला वाटतं की, आता आपण आपला सगळा वेळ आपल्या बाळाला द्यायला हवा. पण माझ्या मते, आई शारीरिकदृष्ट्या निरोगी असेल तर ती मानसिकदृष्ट्या ही निरोगी राहते."

लंडनमधील वेस्ट एंड या भागात अनेक थिएटर्स आहेत. या थिएटर्समध्ये काम करणाऱ्या अभिनेता आणि अभिनेत्रींना वेस्ट एंड स्टार म्हटलं जातं. सोफी देखील एक वेस्ट एंड स्टार आहे.

सोफीने 'विक्ड अँड द विझार्ड ऑफ ओएझ' या मालिकेतही भूमिका साकारली होती. पण आता बाळाची चिंता न करता ती तिच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकते.

सोफी इव्हान्स

सोफी सांगते, "मी कितीतरी स्त्रियांना ट्रेडमिलवर स्तनपान करताना पाहिलंय. ते बघून मला अगदीच अविश्वसनीय असं वाटतं."

सोफी पुढे म्हणाली की, "इथे जिमपेक्षा वेगळी आणि सहकार्याची भावना जाणवते."

मातांसाठी 'मम फिट जिम' चालवणाऱ्या आणि जिमच्या मालक रॅचेल सोडेन-टेलर म्हणाल्या, "तुम्ही संपूर्ण गर्भधारणेदरम्यान मानसिकदृष्ट्या संघर्ष करता. कारण यावेळी तुमच्या शरीरात बदल होत असतात."

"आईने पुन्हा एकदा सदृढ व्हावं अशा पद्धतीने आम्ही व्यायामाची रचना करतो."

रॅचेल सोडेन-टेलर
फोटो कॅप्शन, रॅचेल सोडेन-टेलर

रॅचेल सोडेन-टेलर पहिल्यांदा आई झाल्या तेव्हा त्यांना ज्या काही अडचणी आल्या, आई म्हणून ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या त्या या जिममध्ये समाविष्ट केल्या.

त्या सांगतात, "आई झाल्यावर व्यायामासाठी वेळ काढणं कठीण असतं. पण आईला अशा ठिकाणी बाळाला आणता आलं तर? या विचारातून मी ही जिम तयार केली."

"आई आजूबाजूलाच कुठे तरी आहे आणि तिचं आपल्यावर लक्ष आहे या भावनेनी बाळ देखील आनंदी राहतं."

"आम्ही अशा स्त्रियांचा एक ग्रुप तयार करतोय."

हार्ले एडवर्ड्स
फोटो कॅप्शन, हार्ले एडवर्ड्स

27 वर्षांची हार्ले एडवर्ड्स देखील अशीच एक जिम चालवते. तिला 19 महिन्यांची मुलगी आहे.

ती सांगते, "प्रसूतीनंतर एका महिन्यातच तुमच्यात भावनिक द्वंद सुरू होतं."

"मला वाटतं बहुतेक स्त्रिया घरातून बाहेर पडायला कचरतात. व्यायाम करणं सोडून देतात. अशावेळी तुम्ही एखाद्या सुरक्षित ठिकाणी आहात, तिथे तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन जाऊ शकता हा विश्वास देणं खूप गरजेचं असतं."

ती सांगते, "बाळ झाल्यानंतर मानसिक संतुलन बिघडतं हे अगदी खरं आहे. पण हे आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम करणं फायदेशीर ठरू शकतं."

या दोन्ही जिम मध्ये सुमारे डझनभर माता व्यायाम करायला येतात आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलं देखील असतात.

एम्मा क्लेटन
फोटो कॅप्शन, एम्मा क्लेटन

एम्मा क्लेटन या जिममध्ये त्यांची मुलगी ऑलिव्हसह येतात. त्या सांगतात, "ही माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी सुरक्षित जागा आहे."

"मी व्यायाम करत असताना, ऑलिव्ह माझी नक्कल करायचा प्रयत्न करत असते. मला व्यायाम करताना पाहून तिला आनंद होतो."

एइमायर ही नर्स आहे. ती जिमला येताना तिचा मुलगा ब्यूडेनला सोबत घेऊन येते. आता घरातून बाहेर पडताना तिला काळजी राहत नाही.

रॉबिन हनी टुटिएट आपली मुलगी एलेहसह येते. ती सांगते, "आम्ही मुलांना त्यांचा खाऊ भरवत व्यायाम करू शकतो."

"ही खरंच खूप सुंदर जागा आहे."