शेंगदाण्याची अॅलर्जी असलेल्या मुलीचा बिस्किट खाल्ल्यामुळे मृत्यू

फोटो स्रोत, INSTAGRAM
- Author, क्लो किम
- Role, बीबीसी न्यूज, न्यू यॉर्क
एका 25 वर्षाच्या तरुणीने बिस््किट खाल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. या मुलीला अॅलर्जीमुळे मोठा शॉक बसून मृत्यू ओढवला. तिने खाल्लेल्या बिस्किटाच्या पुड्यावर त्यामध्ये शेंगदाणे आहेत हे नमूद करण्यात आलेलं नव्हतं.
ओर्ला बॅक्सेंडेल असं या तरुणीचं नाव असून ती नर्तिका होती. तिनं अमेरिकेत स्ट्यू लिओनार्ड या दुकानाच्या एका शाखेतून ही बिस्किटं घेतली होती. त्यामुळे तिला अॅलर्जीची मोठी रिअॅक्शन आली.
तिच्यावर करण्यात आलेल्या उपचारांना यश आलं नाही.
यानंतर त्या दुकानाने आणि यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने व्हॅनिला फ्लोरेंटाइन कुकिजची सर्व बॅचची विक्री थांबवली आहे.
साधारणपणे या बिस्किटांची 500 पाकिटं विकली गेली होती असं स्ट्यू लिओनार्ड या दुकानांच्या साखळीने स्पष्ट केले. तसेच ग्राहकांनी खरेदी केलेली पाकिटं परत आणून द्यावीत असं आवाहनही एका व्हीडिओत त्यांनी केलं.
ओर्ला यांनी ही बिस्किटं कनेक्टिकटमध्ये आपल्या कार्यक्रमाआधी खाल्ली. त्यांचा अॅलिस इन वंडरलँडवर बेतलेल्या एका नाचाचा कार्यक्रम होता, असं तिच्या कुटुंबीयांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
आपल्याला असलेल्या शेंगदाण्याच्या अॅलर्जीबद्दल ती नेहमी जागरुक असायची आणि या अलर्जीसंदर्भातलं औषध घेतल्याशिवाय ती बाहेर पडत नसे असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
पण यावेळेस ते औषध घेऊनही उपयोग झाला नाही. 11 जानेवारी ओर्लाचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, GAIR, GAIR, CONASON, RUBINOWITZ, BLOOM, HERSHENHOR
ती मूळची पूर्व लँकशायरची होती. 2018 साली ती न्यू यॉर्क सिटीमध्ये आपलं नृत्यामधलं करिअर करण्यासाठी आली होती.
ती एक चांगली बॅले, कंटेंपररी आणि आयरिश स्टेप डान्सर होती तसं सतत उत्साही आणि सुंदर होती अशी ऑनलाइन श्रद्धांजली तिला वाहाण्यात आली आहे.
स्ट्यू लिओनार्डने या कुकिजमध्ये शेंगदाणे आणि अंडी असल्याचा उल्लेख पाकिटावर नसल्यामुळे ती मागे घेतली आहेत कारण यामुळे लोकांच्या जीवावर बेतू शकतं असं सांगितलं आहे.
हे उत्पादन कनेक्टिकटच्या दोन शहरांत 6 नोव्हेंबरपासून 2023 वर्षं संपेपर्यंत विकलं जात होतं.
कनेक्टिकटचचे ग्राहकहित संरक्षण आयुक्त ब्रायन कॅफेरॅली यांनी ही एक हृदयद्रावक शोकांतिका आहे असं या घटनेचं वर्णन केलं आहे.
अशी घटना भविष्यात होऊ नये यासाठी आपण काळजी घेत आहोत असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
'ही बिस्किटं उत्पादन करणाऱ्या कंपनीनं सोया नटसच्या जागी शेंगदाणे वापरल्याचं जाहीर केलं नाही आणि कंपनीच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवलं नाही', असा आरोप स्ट्यू लिओनार्डचे अध्यक्ष स्ट्यू लिओनार्ड ज्युनियर यांनी केला आहे.
मात्र हे उत्पादन करणारी कंपनी कुकिज युनायटेडने ते आरोप फेटाळले असून आपण जुलै 2023 मध्येच त्याची माहिती स्ट्यू लिओनार्डला दिली होती असं सांगितलं.
कंपनीच्या वकिलांनी स्ट्यूला पाठवलेल्या सर्व उत्पादनांवर तसं लेबल होतं मात्र ‘हे उत्पादन स्ट्यू लिओनार्ड ब्रँडच्या नावाखाली आणि त्यांच्याकडेच पाकिटबंद केले गेले होते असा युक्तिवाद केला आहे.
ओर्लाच्या वकिलांनी ऑनलाईन स्पष्टिकरणात प्राथमिक माहितीत तिचा मृत्यू उत्पादक किंवा विक्रेते यांच्या दुर्लक्षामुळे, निष्काळजी वर्तनाने झाला असं म्हटलं आहे.
आतापर्यंत कोणाहीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू झालेली नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








