You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दूध प्यायल्यानंतर काही लोकांना पोटदुखी का होते?
काही लोकांना दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुगणे, गॅस आणि अतिसार यासारख्या पचनाच्या समस्या जाणवतात. याचं कारण त्यांना 'लॅक्टोज इनटॉलरन्स' ही समस्या असते.
लॅक्टोज (दुधातील साखर किंवा दुग्धशर्करा) ही प्राण्यांच्या दुधात आणि त्याच्यापासून बनवल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये आढळणारी एक प्रकारची साखर आहे.
जेव्हा तुमचं शरीर या लॅक्टोजचं (दुधातील साखरेचं) विघटन करू शकत नाही किंवा ते पचवू शकत नाही तेव्हा 'लॅक्टोज इनटॉलरन्स'ची समस्या उद्भवते.
ते आणखी विघटित करण्यासाठी, लहान आतड्यात (जे आपल्या पचनसंस्थेतील पातळ नळीसारखं असतं) लॅक्टोज नावाचं एन्झाइम असतं.
दुधात असलेली साखर आणि लॅक्टोजचं विघटन करणं आणि ते पचविणं हे या एन्झाइमचं काम आहे.
लॅक्टोज इनटॉलरन्सची समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा लहान आतडं पुरेशा प्रमाणात लॅक्टोज तयार करण्यास सक्षम नसतं.
दुध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर केल्यानं लॅक्टोज इनटॉलरन्सची समस्या असलेल्या लोकांच्या शरीरात बरेच बदल दिसू शकतात.
आशियाई, आफ्रिकन, मेक्सिकन आणि मूळ अमेरिकन लोकांमध्ये लॅक्टोज इनटॉलरन्स ही सर्वात सामान्य बाब आहे.
लॅक्टोज इनटॉलरन्सची लक्षणं
जर आपल्या शरीरात खालील लक्षणं दिसत असतील तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला लॅक्टोज इनटॉलरन्सची समस्या असू शकते.
लॅक्टोज इनटॉलरन्सची लक्षणं दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत किंवा तासांतच दिसू लागतात. ज्यामध्ये -
- पोट फुगणं किंवा गॅस होणं.
- वारंवार ढेकर येणं.
- ओटीपोटात दुखणं किंवा अस्वस्थ वाटणं.
- अतिसार किंवा बद्धकोष्ठता होणं.
- बऱ्याच लोकांना शरीरावर पुरळ येणं, डोकेदुखी, सांधेदुखी, थकवा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येण्यासारख्या समस्या देखील होऊ शकतात.
मात्र, जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ अतिसार, बद्धकोष्ठता, शौचात रक्त, पोटात जास्त सूज किंवा वेगानं वजन कमी होत असेल तर त्यानं त्वरित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टकडे जाऊन सल्ला घ्यावा.
अॅलर्जी
लॅक्टोज इनटॉलरन्सपेक्षा अन्नाची अॅलर्जी अधिक गंभीर समस्या असते. जर एखाद्याला लॅक्टोजयुक्त पदार्थांपासून अॅलर्जी असेल तर त्याची लक्षणं गंभीर असू शकतात.
ही लक्षणं आहेत -
- दूध प्यायल्यानंतर लगेचच ओठ, चेहरा, घसा किंवा जीभेला अचानक सूज येते.
- सुजलेल्या भागात खाज सुटते आणि फोड येतात.
- श्वास घेणं कठीण होऊन जातं, म्हणून तुम्हाला खूप वेगानं श्वास घ्यावा लागतो.
- घसा कडक होतो किंवा गिळण्यास त्रास होतो.
- त्वचा, जीभ किंवा ओठ निळे, तपकिरी किंवा पिवळे होतात. (जर त्वचेचा रंग गडद किंवा तपकिरी असेल तर हा बदल हाताच्या तळव्यावर किंवा पायांच्या तळव्यावर दिसून येतो.)
- अचानक गोंधळून जाणं, झोप येणं किंवा चक्कर येणं.
- लहान मुलांमध्ये शरीर सुन्न होतं, डोकं खाली झुकतं आणि ते कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत.
आपल्याला अन्नामुळे होणाऱ्या अॅलर्जीची गंभीर लक्षणं आढळून आल्यास आपण त्वरित रुग्णालयात जायला हवं.
लॅक्टोज इनटॉलरन्स आणि अन्नामुळे होणाऱ्या अॅलर्जी या समान गोष्टी नाहीत. अन्नाच्या अॅलर्जीमुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
लॅक्टोज कशात आढळतं?
लॅक्टोज म्हणजेच दुग्धशर्करा प्राण्यांच्या दुधात आढळते.
यामध्ये गाय, म्हैस, बकरी आणि मेंढीच्या दुधाचा समावेश होतो. अशा दुधापासून पासून बनवलेल्या खाद्यपदार्थांमध्येही लॅक्टोज आढळून येते.
दुग्धजन्य पदार्थांमध्ये दूध, लोणी, चीज, मलई, दही, आईस्क्रीम यांचा समावेश होतो.
काही प्रक्रिया केलेल्या खाद्य उत्पादनांमध्ये देखील लॅक्टोज असू शकते.
- गहू, ओट्स, तांदूळ, बार्ली, मका यासारख्या धान्यांपासून बनविलेले पदार्थ
- ब्रेड, क्रॅकर्स, केक, बिस्किटं आणि पेस्ट्री, सॉस, सॅलड ड्रेसिंग, मिल्क शेक, प्रोटीन शेक
लॅक्टोज इनटॉलरन्स तपासणी
तपासणी करून घेणं ही लॅक्टोज इनटॉलरन्स शोधण्याची सर्वात सोपी पद्धत आहे.
लॅक्टोज इनटॉलरन्सचं निदान करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे काय खाल्यानंतर तुम्हाला पोटफुगी, अतिसार किंवा बद्धकोष्ठता होते का हे पाहणं.
जर आपण लॅक्टोज असलेल्या अन्नाचं सेवन करणं थांबवलं तर ही समस्या आपोआपच बरी होईल.
लॅक्टोज इनटॉलरन्स टेस्ट आणि हाइड्रोजन ब्रेथ टेस्टद्वारे याचं निदान होऊ शकतं.
लॅक्टोज इनटॉलरन्स टेस्ट:
ही चाचणी तुमची पचनसंस्था लॅक्टोज किती चांगल्या प्रकारे पचवू शकते हे पाहते.
चाचणीपूर्वी तुम्हाला सुमारे चार तास काहीही न खाण्यास सांगितलं जातं.
त्यानंतर तुम्हाला लॅक्टोजयुक्त पेय दिलं जातं आणि पुढील दोन तासांत तुमच्या रक्ताचे नमुने घेतले जातात.
हायड्रोजन ब्रेथ टेस्ट:
हायड्रोजन ब्रेथ टेस्ट म्हणजे हायड्रोजन श्वास चाचणीमध्ये, तुम्हाला लॅक्टोजचं प्रमाण जास्त असलेला द्रव पदार्थ पिण्यास सांगितलं जातं.
त्यानंतर तुमच्या श्वासांची अनेक वेळा चाचणी केली जाते.
तुमच्या श्वासातील हायड्रोजनचं उच्च प्रमाण दर्शवतं की तुम्ही लॅक्टोज इनटॉलरन्ट आहात.
स्टूल अॅसिड टेस्ट :
ही चाचणी लहान मुलांसाठी केली जाते. ती विष्ठेमध्ये किती अॅसिड आहे याचं मोजमाप करते.
जर एखादी व्यक्ती लॅक्टोज पचवू शकत नसेल, तर त्यांच्या विष्ठेमध्ये लॅक्टिक अॅसिड, ग्लुकोज आणि इतर फॅटी अॅसिड मिळतील.
बायोप्सी:
जर लक्षणं गंभीर असतील आणि दीर्घकाळापर्यंत त्यात सुधारत होत नसेल तर, गॅस्ट्रोस्कोपीची आवश्यकता असू शकते.
यामध्ये तुमच्या तोंडातून पोटात एक लांब, पातळ नळी घातली जाते.
नंतर तुमच्या लहान आतड्यातील पेशींचा एक छोटासा नमुना घेतला जातो आणि त्याची तपासणी केली जाते.
यावर उपचार काय आहेत?
लॅक्टोज इनटॉलरन्सवर कायमस्वरुपीसाठी उपचार होत नाही. कारण अशी कोणतीही उपचार पद्धती सध्या उपलब्ध नाही जी आपल्या शरीराला अधिक लॅक्टोज एन्झाइम तयार करण्यास मदत करू शकेल.
परंतु, तुम्ही तुमचा आहार बदलून किंवा लॅक्टोज सप्लिमेंट्सचा म्हणजे लॅक्टोज पूरक आहार घेऊन लक्षणं नियंत्रित करू शकता.
लॅक्टोज इनटॉलरन्सवर एकमेव मूलभूत उपचार म्हणजे लॅक्टोजयुक्त पदार्थ टाळणं किंवा ते अगदी कमी प्रमाणात खाणं.
शिवाय, लॅक्टोजयुक्त पदार्थ खाण्यापूर्वी लॅक्टोज सप्लिमेंट्स घेतल्यानं ही लक्षणं टाळता येतात.
अनेक लोकांमध्ये लॅक्टोज इनटॉलरन्सचं प्रमुख कारण म्हणजे सेलिआक हा रोग आहे.
हा एक स्व-प्रतिरोधक रोग आहे, जो लहान आतड्याचे अस्तर कमकुवत करतो.
जर सेलिआक रोगावर उपचार करता आले तर लॅक्टोज इनटॉलरन्सची समस्या देखील बरी होऊ शकते.
दूध हे एक आदर्श अन्न मानलं जातं, जे कॅल्शियम, प्रथिनं आणि व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्रोत आहे.
अशा वेळी, कोणते दूध किंवा कोणत्या दुग्धजन्य पदार्थांमुळे सर्वात कमी लॅक्टोज इनटॉलरन्सची समस्या उद्भवते ते पहा. आणि ते कमी प्रमाणात खा.
आपण बाजारातून लॅक्टोज-फ्री दूध आणि लॅक्टोज-फ्री पदार्थ देखील निवडू शकता, ज्यात लॅक्टोज एन्झाइम असते.
हार्ड चीज आणि दह्यामध्ये लॅक्टोज हे खूप कमी प्रमाणात असते, म्हणून तुम्ही ते निवडू शकता.
(सर्व माहिती डब्ल्यूएचओ, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसकडून घेतली गेली आहे.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.