'हरभऱ्यावाणी गारा पडल्या, गहू सारा झोपला खाली; फाशी घ्यायची बारी आहे ही...'

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

“या गव्हाला इतकं जपलं की टाकल्यापासून रातंदिवस याच्यात उभा होतो मी. शेवटी पावसानं एवढं नुकसान झालंय. काय करायचं आता? लोकाचे पैसे कसे द्यायचे? फाशी घ्यायची बारी आहे आता ही.”

70 वर्षांचे शेतकरी फकिरराव मोरे शेतातील गव्हाचं नुकसान दाखवतात, तेव्हा त्यांच्या डोळे पाणावतात.

फकिरराव मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या भिवधानोरा गावात राहतात. अवकाळी पावसामुळे त्यांच्या 3 एकर शेतातील गव्हाचं नुकसान झालंय.

“पाऊस शिमग्याच्या दिवशी आला, सोमवारी रात्री. खूप नुकसान झालं. वारं, वावधन समदं संगच होतं. हरभऱ्यावाणी गारी पडल्या. गहू सारा झोपला खाली. तीन एकरच्या तीन एकर झोपला खाली.”

रात्रभर झालेला पाऊस पाहून फकिरराव सकाळीच शेतात आले. शेतातील गव्हाची अवस्था पाहून काय वाटलं होतं, असं विचारल्यावर ते सांगतात, “आम्ही शेतात आलो तर सारा गहू खाली झोपेल होता. तो पाहून मी तोंड झोडायला लागलो, दुसरं काय करणार होतो?”

फकिरराव यांनी डिसेंबर महिन्यात गव्हाची लागवड केली होती. तेही सावकाराकडून व्याजानं पैसे घेऊन.

सावकाराचं कर्ज कसं फेडणार?

“गहू पेरण्यासाठी व्याजानं लोकाकडून पैसे आणले होते. 7 टक्क्यानं 70 हजार रुपये घेतले होते. आता हे कसे फेडायचे? आणि खायचं काय?” फकिरराव विचारतात.

फकिरराव यांना या तीन एकरात शेतात 45 क्विंटल इतका गहू झाला असता. पण, गहू काढणीला आला आणि नेमका त्याचवेळी पावसानं घात केला. गव्हाला इथपर्यंत वाढवण्यासाठी घेतलेले कष्ट मात्र फकिरराव यांना लख्ख आठवतात.

ते सांगतात, “6 गोण्या 10:26:26 खताच्या आणल्या. युरियाच्या आणल्या 4, त्याचा खर्च झाला. दोन फवारण्या हाणल्या, पंधरा-पंधराशेच्या. मधे झाडपाला, खुरपणी-टुरपणी. 10 बाया होत्या 7-8 दिवस कामाला. तोही खर्च झाला.”

“अजून पाणी भरलं रातंदिवस. राती गॅप यायचे, काही दिवसा यायचे. तेव्हा पाणी द्यावचं लागायचं. गव्हाला पाच पाणी दिले.”

भिवधानोरा गावात जवळपास 90 % शेतकरी गव्हाची लागवड करतात. कुणी एक एकरावर तर कुणी दोन-तीन एकरावर. यापैकी आलेल्या गव्हाच्या उत्पादनातून काही गहू खाण्यासाठी ठेवला जातो, तर काही गव्हाची विक्री होते. पण, यंदा पावसामुळे जे नुकसान झालंय, त्यामुळे मात्र इथल्या रहिवाशांनी गहू विकत आणून खावा लागणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पण, फकिरराव अद्याप पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

ते सांगतात, “आमच्या गव्हाचा कुणी पंचनामा करून गेलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश दिलेत, ते मी टीव्हीवर पाहिलंय. पण त्यासाठी अजून तर कुणी आमच्या वावर शिवारात आलं नाही.”

फकिरराव यांनी त्यांच्या गव्हाच्या पीकाचा विमा उतरवलेला नाहीये. कारण विचारल्यावर ते सांगतात, “विम्याबाबत आमचा अनुभव वाईट आहे. मागच्या वर्षी सोयाबीन, कापसाचा विमा आम्ही काढलेला आहे, पण तोच अजून आला नाही.”

भिवधानोरा येथील गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचं पीक आणि शेतच्या शेत अख्खीच्या अख्खी झोपली आहेत.

पावसामुळे गव्हाची जी अवस्था झालीय, त्यामुळे तो काहीच कामाचा राहिलेला नाहीये. या गव्हाला काही चव नसणार आहे, आणि तो मार्केटलासुद्धा नेता येणार नाहीये, असं इथले शेतकरी सांगतात.

त्यामुळे या गव्हाच्या शेतात शेतकऱ्यांना नांगरणी करावी लागणार आहे.

कांदा उत्पादकही धास्तावले

गावातील गहू उत्पादक शेतकऱ्यांची जी अवस्था आहे आहे, तशीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

पुढच्या काही दिवसांत पाऊस आल्यास कांदा हातातून जाईल, अशी चिंता त्यांना सतावत आहे.

शेतकरी गणेश शिंदे यांनी दोन-तीन एकरावर कांद्याची लागवड केली आहे.

ते सांगतात, “सध्याच्या पावसामुळे कांद्याची अशी परिस्थिती आहे की, कांद्याच्या पोंग्यात पाणी गेलेलं आहे. पोंग्यात पाणी गेल्यामुळे आताच हा कांदा सडतोय. खालून देठापासूनच सडत जातोय. हा कांदा महिना-पंधरा दिवसात काढणीसाठी येणार आहे. अजून जर पाऊस झाला तर या कांद्यात काहीच राहणार नाही.”

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावर विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आहेत. अवकाळीग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. शेतकरीही या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

फकिरराव सांगतात, “सरकारनं नुकसान पाहून काहीतरी मदत द्यायला पाहिजे. त्यातून आम्ही गहू आणू खायला. लोकाचं द्यायचं ते देऊ.”

पण, सरकारची ही मदत फकिरराव यांच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्षात कधी पोहचणार, हा प्रश्न मात्र कायम आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)