You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
512 किलो कांदा विकून मिळाले फक्त दोन रुपये; सूर्या ट्रेडर्सचा परवाना रद्द
- Author, सर्फराज सनदी, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
पाच क्विंटल कांदा विकून सोलापूरच्या राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याच्या हाती अवघ्या 2 रुपयांचा धनादेश पडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं होतं.
सध्या महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही त्याचा उल्लेख अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. राजेंद्र चव्हाण यांना दोन रुपयांचा धनादेश देणाऱ्या सूर्या ट्रेडर्सचा परवाना रद्द करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते पत्रकारांशी बोलत होते.
"राजेंद्र चव्हाण यांचं जे प्रकरण आहे 512 किलो कांदा विक्रीला आणला होता. भाव कमी अधिक होतो. 512 किलो रुपये त्यांचा कांद्याला विक्री मिळाली. त्यांना त्यावेळी रिसीट मिळाली तेव्हा 2 रुपये मिळाले. वाहतुकीचा खर्च कापण्यात आला. असं होता कामा नये. या प्रकरणी सूर्या ट्रेडर्सचा परवाना रद्द करण्यात आला", असं फडणवीस म्हणाले.
घाऊक बाजारात कांदा 6 ते 7 रुपये किलोने तर किरकोळ बाजारात 20 ते 30 रुपयांनी मिळत आहे.
फेब्रुवारी अखेरीसही पावसाळी कांद्याचीच आवक आहे. हा कांदा ओलसर असल्याने त्याची साठवणूक करता येत नाही. घरी वापरण्यासाठी साठवायला सुका कांदाच लागतो. मात्र तो सध्या बाजारात उपलब्ध नाही, त्यामुळे ओल्या कांद्याचे भाव प्रचंड घसरले आहेत. त्याचा फटका राजेंद्र चव्हाण यांना बसला.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बोरगाव गावचे राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी दहा पोती कांदा विकला. पण त्यांच्या हातात दोन रुपयांचा धनादेश पडल्याने सगळीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजेंद्र चव्हाण यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
चव्हाण यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली आहे. 17 फेब्रुवारीला राजेंद्र यांनी 10 पोती कांदा सोलापूरमधल्या सूर्या ट्रेडर्स यांच्याकडे नेला.
दहा पोती कांद्याचे वजन 512 किलो झालं. मात्र कांद्याचे दर घसरल्याने राजेंद्र यांना प्रतिकिलो 1 रुपयाप्रमाणे दर मिळाला. वाहनभाडे, हमाली, तोलाई यांचे पैसे वजा करुन चव्हाण यांच्या हाती दोन रुपये शिल्लक राहिले.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या सूर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने राजेंद्र यांना 2 रुपयांचा धनादेश दिला. या चेकवर 8 मार्च 2023 अशी तारीख आहे. दोन रुपयांच्या चेकसाठी त्यांना परत या केंद्रात यावे लागणार आहे.
एकरी 60-70 हजारचा खर्च
राजेंद्र चव्हाण यांना व्यापाऱ्याकडून केवळ 2 रुपयाचा चेक मिळाल्याची बातमी आणि त्यासंदर्भातील फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी बीबीसी मराठीने राजेंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.
राजेंद्र चव्हाण याबाबत म्हणाले, "मी पाठवलेला कांदा हा एक नंबर दर्जाचा होता. त्याला 8-10 रुपयांचा भाव मिळेल, अशी माझी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मला त्याचा 1 रुपये भाव मिळाला. यातून माझा खर्च तर निघालाच नाही. तर उलट मलाच अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागला आहे. या गोष्टीचा मला प्रचंड मनस्ताप होत आहे."
राजेंद्र चव्हाण यांचं संपूर्ण कुटुंब शेती व्यवसायातच आहे. त्यांच्या घरात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असं मोठा परिवार आहे. या घटनेमुळे आपल्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, असं चव्हाण यांनी म्हटलं.
कांद्यासाठी झालेल्या खर्चाचा तपशील सांगताना चव्हाण म्हणाले, "कांद्यासाठी लागणारे उच्च प्रतीचे बियाणेच 1800 रुपये किलोने मिळतात. एकूण अडीच किलोची बियाणे एकरी लागतात. त्याचा खर्च 4500 इतका आहे. त्यानंतर पेरणी, खुरपणी, कापणी, खते आणि मजुरी आदी कामांसाठीचा खर्च मिळून एकूण खर्च साठ-सत्तर हजारच्या घरात जातो. सुमारे चार महिने ही प्रक्रिया चालते."
यानंतर पीक काढल्यानंतर ते बाजार समितीत पाठवून देण्याचा खर्चही वेगळा असतो. त्याविषयी समजावून सांगताना चव्हाण म्हणाले, "एका एकरात मला 132 पोती उत्पादन मिळालं. एका पोत्यात साधारपणपणे 50 किलो कांदा बसतो. ही पोती 35 रुपयांना एक अशा दराने विकत मिळतात. ही पोती ट्रकमध्ये भरण्याची हमाली 10 रुपये, तर त्याचा वाहतूक खर्च प्रति पोती 40 रुपये इतका आहे.
माल व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवल्यानंतर मालाची तोलाई, हमाली आदी कामे त्यांच्यामार्फत केली जातात. संबंधित खर्च वजा करून उर्वरित पैसे शेतकऱ्यांना देण्यात येतात. ते म्हणाले, आम्ही इतर माल 6-7 रुपये किलोने विकला. पण हा माल आम्ही दुसऱ्या एका वाहनातून पाठवून दिला होता. हा माल एक नंबर क्वालिटीचा असल्याने त्यालाही चांगला दर मिळेल, असं आम्हाला वाटलं होतं.
पण, आम्हाला अपेक्षित दर मिळाला नाही. उलट, आमच्यासाठी नुकसानीचा सौदा ठरला. हा दर मिळणार असं माहीत असतं तर आमचा माल आम्ही शेतातच सडू दिला असता. यामुळे आमचं प्रचंड नुकसान झालं आहे. केवळ मीच नाही, तर माझ्यासारख्या इतर अनेक शेतकऱ्यांना हे नुकसान सोसावं लागलं आहे. त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी अनुदान देऊन त्यांची मदत करावी, अशी मागणी राजेंद्र चव्हाण यांनी केली आहे.
अन्य कांदा उत्पादकांचीही अशीच व्यथा
कांदा विक्रीतून उत्पादन खर्च तर सोडाच पण वाहतूक भाडे ट्रॅक्टर भरण्यासाठी येणार खर्च सुद्धा निघत नसल्याने नैताळे येथील शेतकरी सुनील रतन बोरगुडे यांनी काढणीस आलेल्या दोन एकर कांद्यावर रोटावेटर फिरवून कांदा मातीत मिसळून दिला. तसेच शासन राज्यकर्ते कोणीही या विषयाकडे लक्ष देत नसल्याने धिक्कार करीत शेतकऱ्यांनी निषेध केला.
'राज्यकर्त्यांनो लाज बाळगा'
'राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये 10 पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले, ते बघा निर्लज्ज व्यापार्याला दोन रूपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला.
त्यामुळे या कांद्याला चांगला भाव मिळत नाही. बाजारात कांद्याचे दर घसरलेले असल्याने गृहिणींसाठी चांगली बातमी आहे पण शेतकऱ्याच्या डोळ्यात मात्र या कांद्याने पाणीच आणलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)