ती नदीकिनारी फिरायला गेली, अचानक गायब झाली आणि मग सापडला तो तिचा मृतदेह...

फोटो स्रोत, LANCASHIRE POLICE
एखादी चालतीबोलती व्यक्ती थोड्यावेळापूर्वी आपल्याला दिसली असेल आणि काही मिनिटांत ती हरवून तिची एक मोठी बातमीच झाली तर... परत ती बरेच दिवस बेपत्ताच राहून शेवटी तिचा मृतदेहच सापडला तर... हे असं घडलंय... या घटनेमुळे अख्खा देश चक्रावून गेला आणि वेड्यासारखा बातम्या पाहात हे गूढ उकलत राहिला.
ही घटना खरंच घडलीय ती ही इंग्लंडमध्ये. निकोला बुली हे त्या बाईंचं नाव. त्यांच्याच बाबतीत हे घडलं आहे.
27 जानेवारी 2023 हा शुक्रवारचा दिवस. तुमचा आमचा असतो तसाच एक साधासरळ सामान्य दिवस होता. निकोला बुली यांच्यासाठीही त्यादिवशी रोजचाच क्रम होता. 45 वर्षांच्या निकोला यांनी नेहमीप्रमाणे आपली गाडी काढली. आपल्या 6 आणि 9 वर्षांच्या मुली आणि विलो हा कुत्रा घेऊन त्या बाहेर पडल्या.
मुलांनी शाळेत सोडल्यावर वायर नदीच्या किनारी त्यांनी गाडी लावली आणि आपल्या विलो या कुत्र्याला घेऊन चालायला सुरुवात केली.
सकाळी 8.43 च्या सुमारास त्यांना आणखी एका फिरायला आलेल्या व्यक्तीनं पाहिलं. त्यांची आणि निकोला यांची ओळख होती.
काही अंतरावर 9.10 वाजताही त्यांना आणखी एका व्यक्तीनं त्यांना पाहिलं होतं. या काळात त्या फोनवर कामही करत होत्या. त्या मॉर्गेज अॅडव्हायजर म्हणून काम करायच्या. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर एक कॉन्फरन्स कॉलही केला. फोनवरही बोलत राहिल्या.
25 मिनिटांनी नदीच्या तीव्र उतारावर एका बाक़ड्यावर त्यांचा फोन पडलेला आढळला आणि जवळच जमिनीवर कुत्र्याची साखळी पडलेली.
निकोला हरवल्यानंतर शेकडो स्वयंसेवकांनी तिला शोधण्यासाठी मदत केली. तिच्या मित्र-मैत्रिणींनी त्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार केल्या आणि तिला पोलिसांबरोबर शोधायला सुरुवात केली.
ती सापडावी यासाठी हजारो लोकांनी ऑनलाइन कमेंट्स केल्या. ती सुखरुप सापडावी यासाठी तिच्या कुटुंबीयांच्या वतीने प्रार्थनाही केली.

फोटो स्रोत, PA Media
पोलीस, तपासनीस आणि लोकांनी तिच्या स्थितीबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले होते. नक्की काय झालं असावं याची कोणालाच माहिती नसल्यामुळे असे तर्क मांडले जात होते.
उत्साही लोकांमुळे या भागाचा अक्षरशः टुरिस्ट स्पॉट होऊन गेला. लोकांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी या घटनेचा वापर केला. त्यावर पोलीस आणि निकोला यांच्या मित्रमंडळींनी खंतही व्यक्त केली होती.
कसा घेतला शोध?
निकोलाला शोधण्यासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न केले त्याचप्रमाणे त्यासाठी पाणबुड्यांचीही मदत घेण्यात आली.
तिचा शोध घेण्यासाठी 40 डिटेक्टिव्ह फक्त सीसीटीव्हीचं चित्रण पाहाण्यासाठी नेमले गेले होते.
शेकडो तासांचं सीसीटीव्ही चित्रण, डॅशकॅमचं चित्रण तपासलं गेलं.
लोकांची चौकशी केली गेली. तसेच त्या परिसरातल्या 700 दुचाकीस्वारांचीही चौकशी करण्यात आली.
नदीमध्ये शोध घेण्यासाठी पाणबुड्यांनी प्रयत्न केले. तसेच ड्रोन आणि हेलिकॉप्टरनेही हा परिसर पिंजून काढला तरी तीन आठवड्यांहून अधिक काळ तिचा शोध लागला नाही.
ज्य़ा नदीच्या आसपास ती गायब झाली ती वायर नदी 52 किलोमीटर लांबीची आहे.
ती लँकशायरपासून वाहायला सुरू होते आणि फ्लिटवूड इथं आयरिश समुद्राला मिळते.
मृतदेह सापडला...

इतके सर्व प्रयत्न झाल्यावर 19 फेब्रुवारी रोजी निकोलाचा मृतदेह नदीच्या पात्रात मैलभर अंतरावर सापडला. इतके दिवस ती जिवंत असेल या एका आशेपोटी बसलेलं तिचं कुटुंब दुःखात बुडून गेलं.
तिच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह सापडल्यावर आपलं म्हणणं जाहीर केलं. तिच्या शेवटच्या क्षणांत नक्की काय झालं याची माहिती आम्हाला कधीच समजणार नाही याची खंत वाटत राहिल असं त्यांनी जाहीर केलं आहे.
तिचं कुटुंब म्हणतं, “आम्ही निक्कीला कधीच विसरणार नाही, तिच्याभोवती आमचं जग होतं. तिनंच आमच्या आय़ुष्याला अर्थ दिला होता.”
मृतदेह लगेच का सापडला नाही?
पाण्यात पडलेल्या मृतदेहांचा अभ्यास करता ते एका जागीच कधीच राहात नाहीत, ते शेवटी दिसलेल्या स्थानापासून थोड्या अंतरावर वाहून गेलेले दिसतात.
तज्ज्ञांच्या मते जर पाण्यात भरती असेल किंवा प्रवाह असतील तर मृतदेह लगेच सापडत नाही. असे मृतदेह अगदीच वेगळ्या जागी वाहून गेलेले असतात.
माजी डिटेक्टिन्ह ज्युली मॅके सांगतात, पाण्यामध्ये असा शोध घेणं अत्यंत गुंतागुंतीचं असतं.
“या नदीमध्ये भरपूर राडारोडा होता त्यामुळे तिथं लगेच शोध न लागणं हे काही असामान्य नाही. लोकांनी तिथून फक्त एक मैल अंतरावर का तपास केला नाही? अर्थात हे काही विचित्र नाही. पोलिसांनी नक्कीच सर्व गोष्टींचा आढावा घेतला असेल. या गोष्टीचा भविष्यात गोष्टी सुकर होण्यासाठी उपयोग होईल” असं त्यांनी सांगितलं.
या प्रकरणात पोलिसांनी निकोलाच्या काही आजारांची माहिती माध्यमांत बोलताना सांगितली होती. त्यावरुन पोलिसांवर टीकाही झाली.
तसेच माध्यमांनी या प्रकरणाचे वार्तांकन करताना अतिरेक केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी तसेच अनेक लोकांनी केला आहे.
या प्रकरणाची दखल युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनाही घ्यावी लागली.
तिचा मृतदेह सापडण्याला दिशा मिळत नव्हती म्हणून पाण्यात शोधण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.
ती नदीत नसेलच असं मत तिचे जोडीदार अन्सेल यांनी व्यक्त केले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








