भगतसिंह कोश्यारी म्हणतात, 'राज्यपाल होण्यात दु:खच दु:ख, सुख काही नाही'

फोटो स्रोत, FACEBOOK
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा...
1) भगतसिंह कोश्यारी म्हणतात, 'राज्यपाल होण्यात दु:खच दु:ख, सुख काही नाही'
"राज्यपाल बनने से दुख ही दुख है, सुख तो कुछ भी नहीं है. मात्र असे लोक येतात तेव्हा कधी कधी बरं वाटतं. मी आता 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे मी तर काही आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. अशा लोकांजवळ येतो तेव्हा त्यांचा सुगंधही लागतो. जैन तीर्थ सर्कीट बनवलंय. सरकारला आवाहन आहे, पर्यटन मंत्रायलासोबतच तीर्थक्षेत्राचं मंत्रालयही व्हावं. सर्वच मुमूक्षू, मुनी राज्यपाल बनू शकत नाहीत," असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.
मुंबईतल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 'लोकमतन्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
गेले काही महिने राज्यपाल विविध वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात आहेत. राज्यपालांना हटवण्याची मागणी विरोधी पक्षाकडून होते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे हे उद्गार परतीचे संकेत तर नव्हे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, चंद्रशेखर, लोकमान्य व्हावेत अशी सगळ्यांची इच्छा असते, पण आपल्या नाही तर दुसऱ्यांच्या घरात जन्माला यावा, अशी भावना असते," असं कोश्यारी म्हणाले.
2) आगामी काळात राष्ट्रध्वजाची जागा भगवा घेईल- महबूबा मुफ्ती

फोटो स्रोत, EPA
“कोणताही देश कितीही शक्तीशाली झाला तरी तो आपल्याच लोकांविरोधात युद्ध जिंकू शकत नाही. भाजपाने आमचा झेंडा काढला आणि येणाऱ्या काळात ज्या राष्ट्रध्वजासाठी अनेकांनी बलिदान दिलं, त्या राष्ट्रध्वजाची जागा भगवा झेंडा घेईल.” असं पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील अप्पर डांगरी येथे नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यावरून त्यांनी, “काश्मीरसह भारत एक धर्मनिरपेक्ष ठिकाण आहे, मात्र ही गोष्ट वेगळी आहे की आता याला गोडसेचा देश बनवलं जात आहे. केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक नागरिकाची हत्या जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान आहे. अशाप्रकारच्या हल्ल्यांमुळे एक विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होत आहे.”, असं त्यांनी म्हटलं आहे.
3) राहुल गांधींची धोरणं विकासविरोधी नाहीत - अदानी

फोटो स्रोत, Getty Images
“मोदीजींकडून कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही. तुम्ही त्यांच्याशी धोरणाबद्दल बोलू शकता, देशहितासाठी चर्चा करू शकता, पण जे धोरण तयार केलं जातं ते प्रत्येकासाठी आहे, ते एकट्या अदानी समूहासाठी नाही”, असं उद्योगपती गौतम अदानी म्हणाले. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी क्रोनी कॅपिटलिझमबाबत केलेल्या आरोपावर अदानी म्हणाले की, “तो राजकारणाच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे असे मला वाटते”
काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानचे उदाहरण यावेळी अदानी यांनी दिले. काँग्रेसशासित राजस्थानमध्ये करण्यात आलेल्या 68 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा उल्लेख करून अदानी म्हणाले, ”गुंतवणूक करणे हे आमचे काम आहे. राहुल गांधीनींही राजस्थानमधील आमच्या गुंतवणुकीचे कौतुक केले. राहुल यांची धोरणेही विकासविरोधी नाहीत, हे मला माहिती आहे.”
4) समीर वानखेडे-क्रांती रेडकरच्या घरी चोरी
एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि अभिनेत्री दिग्दर्शिका क्रांती रेडकर यांच्या घरी चोरी झाली आहे. घरातील काम करणाऱ्या महिलेनेचं चोरी करुन पोबारा केल्याचा आरोप क्रांतीने केला आहे. याबाबत गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारीनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. 'मुंबई तक'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या घरातून जवळपास साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेचा यात समावेश आहे. चोरी झाल्याचं उघडकीस येताच घरातील काम करणारी महिला गायब आहे.
क्रांतीने काही दिवसांपूर्वीच एका एजन्सीच्या माध्यमातून घर कामासाठी एका महिलेला कामावर घेतलं होतं. क्रांतीच्या तक्रारीनंतर पोलीस सध्या याच एजन्सीमध्ये संबंधित महिलेबद्दल चौकशी करत आहेत. संबंधित महिला नेमकी कुठली, कामावर ठेवण्यापूर्वी तिची पोलीस चौकशी झाली होती का, एजन्सीला कायदेशीर मान्यता आहे का? यापूर्वी अशा काही तक्रारी आल्या आहेत का? अशा अॅन्गलने पोलीस सध्या तपास करत आहेत.
5) सूर्यकुमारचं तिसरं ट्वेन्टी20 शतक; भारताने श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली

फोटो स्रोत, Getty Images
सूर्यकुमार यादवच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर भारताने श्रीलंकेविरुद्धची तिसरी ट्वेन्टी20 लढत आणि मालिका जिंकली. राजकोट इथे झालेल्या तिसऱ्या लढतीत भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल (46) आणि राहुल त्रिपाठी (35) यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवत सूर्यकुमार यादवने ट्वेन्टी20 प्रकारातील तिसरं शतक झळकावलं. 7 चौकार आणि तब्बल 9 षटकारांसह सूर्यकुमारने 67 चेंडूत नाबाद 112 धावांची खेळी केली. श्रीलंकेच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेत सूर्यकुमारने वादळी खेळी केली.
अक्षर पटेलने 9 चेंडूत 21 धावा करत त्याला चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेचा डाव 137 धावातच आटोपला. भारतातर्फे अर्शदीप सिंगने 3 तर हार्दिक पंड्या, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. सूर्यकुमारला सामनावीर तर अक्षर पटेलला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
आता या दोन संघांदरम्यान एकदिवसीय मालिका होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 10 जानेवारीला गुवाहाटी इथे होणार आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








