येमेनमध्ये बोट उलटल्यानं 68 स्थलांतरितांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, यांग तिआन
- Role, बीबीसी न्यूज
येमेनमध्ये एक बोट बुडाल्यामुळं किमान 68 स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. यावेळी बोटीत जवळपास 157 जण होते. येमेनच्या किनाऱ्याजवळ खराब हवामानामुळे बोट बुडाल्यानं ही दुर्घटना घडली आहे.
रविवारी (3 ऑगस्ट) येमेनच्या दक्षिणेकडील अब्यान प्रांतात ही बोट उलटल्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (आयओएम) येमेनमधील प्रमुखांनी बीबीसीला दिली. ते म्हणाले की 12 जणांना वाचवण्यात आलं असलं तरी अद्याप डझनभर लोक बेपत्ता आहेत.
मृत्यू झालेले बहुतांश जण इथियोपियाचे नागरिक असल्याचं मानलं जातं आहे, असं आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनं (आयओएम) म्हटलं आहे.
हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणजे आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडील भागातून कामाच्या शोधात आखाती देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्यांसाठी येमेन हा एक प्रमुख मार्ग आहे. हे लोक आफ्रिकेतून येमेनमार्गे आखाती देश प्रवेश करतात.
आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेचा (आयओएम) अंदाज आहे की, गेल्या काही महिन्यांमध्ये जहाज बुडाल्यामुळे शेकडो लोक मृत्यूमुखी पडले आहेत किंवा बेपत्ता झाले आहेत.
अब्यानमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही दुर्घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. किनाऱ्याच्या विस्तृत भागात अनेक मृतदेह सापडले आहेत.
येमेनमधील धोकादायक मार्गानं स्थलांतरितांचा प्रवास
अब्दुसत्तोर एसोएव्ह आयओएमचे येमेनमधील प्रमुख आहेत. ते म्हणाले की, ही बोट किनारपट्टीच्या मोठ्या भागातील धोकादायक मार्गावर होती. हा मार्ग अनेकदा मानवी तस्करी करणाऱ्यांकडून वापरला जातो.
अब्दुसत्तोर एसोएव्ह यांनी, स्थलांतर करणाऱ्यांचं तस्करांकडून शोषण होऊ नये यासाठी स्थलांतरितांसाठी कायदेशीर सुरक्षा धोरण किंवा व्यवस्था मजबूत करण्याच्या मुद्द्यावरदेखील भर दिला.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले की, "संघटनेचे सदस्य असलेल्या सर्व देशांसाठी आम्ही भूमिका मांडत आहोत. त्यांनी त्यांचे नियमित स्वरुपाचे मार्ग वाढवावे असं आम्ही सांगत आहोत. त्यामुळे लोकांना स्थलांतर करताना, मानवी तस्करांच्या जाळ्यात अडकण्याऐवजी किंवा फसवणूक होण्याऐवजी आणि या धोकादायक मार्गांनी प्रवास करण्याऐवजी कायदेशीर मार्गांचा अवलंब करता येईल."
सोमालिया, जिबूती, इथिओपिया आणि एरिट्रिया या देशांचा हॉर्न ऑफ आफ्रिका (आफ्रिका खंडाचा पूर्वेकडील भाग)मध्ये समावेश होता. या भागातून येमेनपर्यंतचा प्रवास, "सर्वात व्यस्त आणि सर्वात धोकादायक मिश्र स्वरुपाच्या स्थलांतराच्या मार्गांपैकी एक असल्याचं", आयओएमनं यापूर्वी म्हटलं आहे.
मार्च महिन्यात, 180 हून अधिक स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी येमेनच्या धुबाब जिल्ह्याच्या किनाऱ्याजवळ वादळी समुद्रामुळे बुडाल्या होत्या. या दुर्घटनेत फक्त दोन खलाशांना वाचवण्यात यश आलं होतं.
स्थलांतरित मृत्यूमुखी पडण्याचं वाढतं प्रमाण
आयओएमच्या अहवालानुसार, येमेनमधील मायग्रंट रिस्पॉन्स पॉईंट्सवर (स्थलांतर प्रतिसाद ठिकाणं) पोहोचलेल्या स्थलांतरितांनीददेखील ही बाब नोंदवली आहे की, समुद्रातील गस्त टाळण्यासाठी मानवी तस्कर बेपर्वा होत जाणूनबुजून धोकादायक परिस्थितीतून बोटी पाठवत आहेत.
या सागरी प्रवासात धोके असूनदेखील, अनेक स्थलांतरित याच मार्गांनी प्रवास करत आहेत. 2024 मध्येच 60,000 हून स्थलांतरित येमेनमध्ये आले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या दशकात, आयओएमच्या बेपत्ता स्थलांतरित प्रकल्पानं (मिसिंग मायग्रंट्स प्रोजेक्ट) याच सागरी मार्गावर 3,400 हून अधिक जण मृत्यूमुखी पडल्याचं आणि बेपत्ता झाल्याचं नोंदवलं आहे.
यातील 1,400 जणांचे मृत्यू बुडाल्यामुळे झाले आहेत. गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून येमेनमध्ये विनाशकारी यादवी युद्ध सुरू आहे. इराणचा पाठिंबा असलेला हुती गटाचं 2014 पासून वायव्य येमेनच्या बराचशा भागावर नियंत्रण आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेलं येमेनचं सरकार येमेनची राजधानी असलेल्या साना मधून उलथवून टाकल्यापासून तिथे हुतींचं वर्चस्व आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











