You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंतराळात असताना महिला अंतराळवीर मासिक पाळीचं नियोजन कशाप्रकारे करतात?
मासिक पाळी ही प्रत्येक महिलेसाठी एक आव्हान असतं. पण अंतराळवीर महिलांच्या बाबतीत विचार केल्यास एखाद्या महिला अंतराळवीराला अंतराळ प्रवासादरम्यान मासिक पाळी आल्यास काय होईल?
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असताना मासिक पाळीचा कालावधी कसा व्यवस्थापित करतात? जर सुनीता विल्यम्सप्रमाणे त्यांनाही अनपेक्षितपणे बराच काळ अंतराळात राहावे लागले तर काय होईल?
शौचालयापासून मासिक पाळीपर्यंत अंतराळात महिलेला येणाऱ्या विविध समस्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
महिला प्रवास करताना सहसा मासिक पाळीबाबत सावध असतात.
केवळ आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्सना नऊ महिने अंतराळात राहावं लागलं. सुनीता विल्यम्स यांना या समस्येचा सामना करावा लागला की नाही, हे आपल्याला सांगता येणार नाही. कारण वयावरही हे अवलंबून असतं.
मात्र, सुनीता विल्यम्स प्रमाणेच, मासिक पाळी येणाऱ्या इतर महिला अंतराळवीर त्यांच्या मासिक पाळीचे व्यवस्थापन कसं करत असतील?
हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने डॉ. वर्षा जैन यांच्याशी चर्चा केली. डॉ. वर्षा जैन या 'स्पेस गायनॅकॉलॉजिस्ट' आहेत. त्यांनी अंतराळातील महिलांच्या आरोग्यावर संशोधन करण्यासाठी नासासोबत काम केले आहे.
2019 साली, बीबीसी पत्रकार एम्मा बार्नेट यांनी या विषयावर डॉ. जैन यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी त्या काय म्हणाल्या, जाणून घेऊया.
अंतराळात मासिक पाळी येते तेव्हा महिला काय करतात?
नासाने पहिली महिला अंतराळवीर सॅली राईड यांना अंतराळात पाठवलं तेव्हा महिला अंतराळवीरांच्या मासिक पाळीबाबत चर्चा करण्यात आली.
त्यावेळी, महिला अंतराळवीरांना सांगण्यात आलं होतं की, मासिक पाळीकडे समस्या म्हणून पाहू नका, परंतु अंतराळवीरांना सर्व प्रकारचं नियोजन करावं लागत होतं.
एका महिला अंतराळवीराला किती स्वच्छता उत्पादनं लागतील याचा अंदाज घेण्यात आला. त्यावेळी असा अंदाज होता की एका महिला अंतराळवीराला दर आठवड्याला 100 ते 200 सॅनिटरी पॅडची आवश्यकता असेल.
नंतर असं समजलं की एवढ्या सॅनिटरी पॅटची गरज नाही. सध्या, महिला अंतराळवीर मासिक पाळी थांबवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या वापरतात. जोपर्यंत त्या निरोगी आहेत तोपर्यंत त्यांना सॅनिटरी पॅड वापरण्यास कोणतीही अडचण येत नाही.
वर्षा सांगतात की, महिला अंतराळात मासिक पाळीपासून कशाप्रकारे मुक्त राहू शकतील यावर त्यांचं संशोधन सुरू आहे.
अंतराळात जाणारी पहिली महिला सोव्हिएत संघाची वॅलेंटिना तेरेश्कोव्हा या होत्या. त्यांनी हे यश 1963 मध्ये मिळवलं.
याच्या 20 वर्षांनंतर, अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने त्यांची पहिली महिला अंतराळवीर सैली राइड यांना अंतराळात पाठवलं.
अंतराळ प्रवासाचा महिला आणि पुरुषांवरील परिणाम
अंतराळातील वातावरणाशी जुळवून घेणं हे थोडा फरक सोडला तर पुरुष आणि महिला दोघांसाठीही जवळजवळ सारखंच आहे, असं वर्षा जैन म्हणाल्या.
अंतराळात गेल्यानंतर महिलांना काही प्रमाणात थकवा किंवा सुस्ती जाणवते. तर, पुरुषांना हा थकवा तेव्हा जाणवतो, जेव्हा ते पुन्हा पृथ्वीवर परततात.
अंतराळातून परतल्यानंतर पुरुषांना पाहण्यात आणि ऐकण्यात अडचण येऊ शकते, तर महिलांना रक्तदाबाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
पुरुष आणि महिलांच्या या समस्या हार्मोन्समुळे उद्भवतात, की यामागे इतर काही कारणे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या प्रश्नांचा सखोल अभ्यास केल्यास दीर्घकाळ अंतराळात राहिल्यानं आरोग्यात कोणते बदल होतात हे स्पष्ट होईल.
शौचालयाबाबतही काही अडचण येते का?
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दोन शौचालये असतात, परंतु ती मासिक पाळी दरम्यान महिलांना होणाऱ्या रक्तस्त्रावाला लक्षात घेऊन डिझाइन केलेली नाहीत. मूत्रदेखील अवकाशात टाकलं जात नाही तर रिसायकलिंग प्रक्रियेद्वारे स्वच्छ पाणी वेगळं करून पुनर्वापर करतात.
मासिक पाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव हा एक घन पदार्थ मानला जातो. त्यामुळे अंतराळ स्थानकावरील शौचालये त्यांच्यापासून द्रव वेगळं करू शकत नाहीत. त्यामुळेच त्यातील पाण्याचा पुनर्वापर करता येत नाही.
याशिवाय, पाण्याच्या वापरावर काही निर्बंध आहेत. त्यामुळे अंतराळात मासिक पाळी दरम्यान व्यक्तिगत स्वच्छता राखणं थोडं कठीण होतं.
प्रजनन क्षमतेवर परिणाम
डॉ. वर्षा जैन याबाबत बोलताना म्हणाल्या, अंतराळ प्रवासाचा प्रजनन क्षमतेवर काही परिणाम होतो की नाही, याचा कोणताही ठोस पुरावा नाही.
अनेक महिला आणि पुरुष अंतराळ प्रवास करून परत आले आहेत आणि त्यानंतर ते पालक बनलेले नाहीत. मात्र, आपण हे देखील लक्षात घ्यायला हवं की अंतराळात पहिल्यांदा जाणाऱ्या महिलांचं सरासरी वय 38 वर्ष आहे.
भविष्यात गर्भधारणेसाठी महिला त्यांचे अंडाणू आणि पुरुष त्यांचे शुक्राणू संरक्षित करून ठेवू शकतात. मात्र, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. यासंदर्भात नासाकडे कोणतेही नियम नाहीत.
अंतराळवीरांना अंतराळात किरणोत्सर्गाचा धोका असतो. मात्र, याचा प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो, याबद्दल कोणतीही निश्चित माहिती नाही.
अंतराळ प्रवासादरम्यान पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते, परंतु पृथ्वीवर परतल्यावर ती पूर्ववत होते. या दीर्घकालीन परिणामांवर अद्याप कोणताही सखोल अभ्यास झालेला नाही.
अंतराळ प्रवासाचे आरोग्यावर होणारे परिणाम
डॉ. वर्षा यांच्या मते, मानवी शरीर अंतराळात अधिक जलद वृद्ध होते. अंतराळात असताना त्यांच्या हाडांची घनता कमी होते. पृथ्वीवर परतल्यानंतर, तुम्ही कितीही चांगल्या सवयी अंगीकारल्या किंवा उपाययोजना केल्या, तरीदेखील काही परिणाम तुमच्या शरीरावर जाणवतातच.
डॉ. वर्षा जैन पुढे म्हणाल्या, "मलाही अंतराळातून पृथ्वी पाहायची आहे. मात्र, मी याकडे दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणून पाहते. सध्या, मी पृथ्वीवरच माझे सर्वोत्तम कार्य करत आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.