You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युगेंद्र पवार खरंच बारामतीत अजित पवारांना टक्कर देऊ शकतात? काका-पुतण्याची लढाई कशी असेल?
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे, राजकीय आखाड्यामध्ये गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाली आहे.
या निवडणुकीमध्ये सर्वांची नजर आहे ती बारामती मतदारसंघावर. पक्षात बंडखोरी करुन भाजपसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवारांसाठी ही सन्मानाची आणि अस्तित्वाचीही लढाई असणार आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात एक नवीन काका पुतण्याची जोडी एकमेकांना आव्हान देत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार आणि त्यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते. अखेर आज या लढाईत नेमकी कुणाची सरशी होणार हे अवघ्या काही तासांमध्ये कळणार आहे.
नेमकी ही लढाई कशी होईल आणि पवार विरुद्ध पवारच्या या पुढच्या अंकात काय चित्र दिसू शकेल, याचा राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीकोनातून घेतलेला हा आढावा!
युगेंद्र पवार कोण आहेत?
सर्वांत आधी पवार घराण्याच्या 'फॅमिली ट्री'मध्ये युगेंद्र पवार कुठे बसतात, ते पाहूयात.
शरद पवार यांना 10 भावंडं आहेत. त्यापैकी अनंतराव पवार यांची दोन मुले म्हणजेच अजित पवार आणि श्रीनिवास पवार होय. शरद पवारांच्या या दोन पुतण्यांपैकी अजित पवार हे सक्रिय राजकारणात आहेत तर श्रीनिवास पवार कधीच सक्रिय राजकारणात उतरलेले नाहीत.
ते कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजक आहेत. याच श्रीनिवास पवारांचे सुपुत्र आणि अजित पवारांचे पुतणे म्हणजेच युगेंद्र पवार होय.
युगेंद्र पवार बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत. यासोबतच ते बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचेही अध्यक्ष आहेत. युगेंद्र पवार यांनी आपलं शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केलं आहे.
त्यांनी अमेरिकेतील बोस्टनमधून 'वित्त आणि विमा' या विषयामध्ये पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते शरयू ग्रूप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
ही कंपनी लॉजिस्टिक्स, ऑटोमोबाईल डीलरशिप, कृषी-आधारित उद्योग, सुरक्षा सेवा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहे. युगेंद्र पवार हे 'शरयू फाऊंडेशन'च्या माध्यमातून बारामतीमध्ये सामाजिक कार्यातही आघाडीवर असतात.
'पवार विरुद्ध पवार' लढाईचा दुसरा अंक
गेल्या निवडणुकीपर्यंत केंद्रात 'ताई' (सुप्रिया सुळे) आणि राज्यात 'दादा' (अजित पवार) हे सुत्र बारामतीकरांसाठी ठरलेलं. याला ब्रेक लागला तो राष्ट्रवादीच्या फुटीनंतर.
अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाला आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीत नणंद-भावजय म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकींविरुद्ध उभ्या राहिल्या.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं 'पवार विरुद्ध पवार' या लढाईचा पहिला अंक संपूर्ण देशानं पाहिला. 'सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे' लढाईत सुप्रिया सुळे यांची सरशी झाली आहे. पण तरीही त्यावर मात करण्यासाठी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीला थेट राज्यसभेवर पाठवलं.
त्यानंतर अजित पवार यांनी केलेलं एक विधानही लक्षणीय ठरलं. ते म्हणाले की, "माझी थोडी चूकच झाली. मी माझी बहीण सुप्रियाविरोधात पत्नी सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळी उभं केलं गेलं. कारण तो पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय होता. एकदा बाण सुटला की सुटला. पण आज माझं मन मला सांगत आहे की, तसं घडायला नको होतं."
शिवाय, लोकसभा निडवणुकीत पत्नीच्या पराभवानंतर अजित पवारांनी आपण बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचीच घोषणा केली. त्यानंतर इथून अजित पवारांचा मुलगा जय पवार लढणार अशीही चर्चा सुरु झाली होती.
पण अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत या मतदारसंघातून अजित पवारच लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अजित पवारांनी याप्रकारे उलट सुलट भूमिका का घेतली असावी?
यासंदर्भात बीबीसी मराठीने 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मते, अजित पवारांचं न लढणं हा 'इमोशनल लेव्हल'वरचा मुद्दा होता. पक्ष टिकवायचा असेल तर न लढणं हा पर्याय नव्हता.
या बातम्याही वाचा:
एका बाजूला फडणीसांना हा मुद्दा इमोशनल लेव्हलवरचा वाटतो तर दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांना हा मुद्दा 'इमोशनल ब्लॅकमेल'चा वाटतो.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीतही अजित पवार इमोशनली ब्लॅकमेल करत होते. तेव्हाचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यातूनच ते अशा प्रकारची वक्तव्यं करत होते."
युगेंद्र पवार यांची पहिलीच निवडणूक
युगेंद्र पवार यांची ही पहिली निवडणूक असली तरी ते लोकसभेपासून राजकारणात सक्रीय झाले आहेत.
युगेंद्र पवारांनी त्यांच्या काकू सुनेत्रा पवार यांच्याविरोधात प्रचार करून तयार करून ठेवलीच आहे.
'पवार विरुद्ध पवार' संघर्षाच्या पहिल्या अंकात 'अजित पवार त्यांची पत्नी सुनेत्रा आणि दोन मुलं पार्थ आणि जय विरुद्ध उर्वरीत पवार कुटुंबीय' अशी लढत दिसली होती.
शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि त्यांचे कुटुंबीय, श्रीनिवास पवार आणि त्यांचे कुंटुंबीय अशी बरीच मंडळी लोकसभेला अजित पवार यांच्याविरोधातल्या प्रचारात उतरली होती.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी शर्मिला यांनी केलेला प्रचार निर्णायक ठरला होता. अजित पवार यांचा सख्खा भाऊसुद्धा त्यांच्याबरोबर नसल्याचा संदेश त्यातून मतदारांपर्यंत पोहोचला होता.
'परदेशात शिक्षण घेतलेला पवार घराण्यातला मुलगा' अशी त्यांची ओळख असली तरी 'विद्या प्रतिष्ठान'पासून विविध संस्थांची पदंही त्यांनी भुषवली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत ते काकांविरोधात लढत असले तरीही ते एकप्रकारे त्यांचे आजोबा शरद पवार यांचीच बाजू लढवत आहेत.
अर्थात बारामतीमधील बहुतांश पदाधिकारी अजित पवारांच्या सोबत असल्याचं चित्र दिसतं आहे. तसंच विकास हा मु्द्दा सुद्धा महत्वाचा राहणार आहे. आणि त्यासाठी अजित पवारांचं बारामती मध्ये असलेलं लक्ष हा मतदारांसाठी महत्वाचा मुद्दा राहील.
युगेंद्र पवारांसाठी पहिल्याच निवडणूकीत काका अजित पवारांच्या समोर उभं राहणं, हेच खरं तर मोठं आव्हान असणार आहे.
कशी होईल बारामतीची निवडणूक?
बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे. अजित पवारांनी 1991 पासून बारामती मतदार संघामधून निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघातून ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.
2019 च्या निवडणुकीत अजित पवार थेट सर्वाधिक म्हणजेच 1 लाख 65 हजार मताधिक्याने निवडून आले होते.
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी 'कुटुंबामध्ये लढाई करायला नको होती' अशी वक्तव्य करत 'कुटुंबातील फुटी'चा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला. आता विधानसभा निवडणुकीमध्ये 'बारामतीचा विकास' हा मुद्दाही महत्वाचा राहणार आहे.
याबाबतचं आपलं विश्लेषण मांडताना सम्राट फडणीस म्हणतात की, "या निवडणुकीत 'कुटुंब' हा मुद्दा मध्यवर्ती न राहता विकासाचा मुद्दा अधिक चर्चेत रहावा, हाच अजित पवारांचा प्रयत्न राहील. दुसऱ्या बाजूला शरद पवार मात्र याच मुद्द्याकडे प्रचार नेऊ शकतात.
अजित पवारांसमोर स्वत:च्या विजयाचं आव्हान असल्याने त्यांना बारामतीमध्ये लक्ष केंद्रीत करावं लागेल. शिवाय, लोकसभेत जे 'इमोशन' होते, ते आता तेवढं राहिलेलं नाहीये; त्यामुळे दोघांनाही या निवडणुकीमध्ये स्ट्रगल करावं लागणार आहे, हे नक्की."
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट हा मुद्दा तितकासा प्रभावी नसेल, असं अद्वैत मेहता यांना वाटतं. ते म्हणतात की, "युगेंद्र पवार निवडणुकीत उतरले नसते तर 'बाय दिला' असं उत्तर होतं. 'काका-पुतण्या' हा या निवडणूकीतला मुद्दाही पुतण्याला उमेदवारी देऊन नाहीसा करण्यात पवारांना यश आलंय.
पक्षाची फूट हा मुद्दा या निवडणुकीत नसेल, कारण त्यानंतर काही महिने उलटले आहेत. युगेंद्र पवारांची पाटी कोरी आहे. त्यामुळे, त्यांना गमावण्यासारखं काही नाही. अजित पवारांना मात्र ही निवडणूक सोपी राहणार नाही."
बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण 396 बूथ आहेत. त्यापैकी 98 बूथ शहरात आहेत. यापैकी शहरात अजित पवार तर ग्रामीण भागात युगेंद्र अर्थात शरद पवारांच्या बाजूने जास्त मतदान होईल असं चित्र आत्ता दिसतंय. त्यामुळे विकास का कुटुंब यात बारामतीकर कोणाच्या पारड्यात कौल टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.