You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकच जागा जिंकलेल्या अजित पवारांचं राजकीय भवितव्य काय?
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
बारामतीच्या अंगणात 'नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी' अशी लढाई आहे, असा दावा भाजपनं केला होता.
पण प्रत्यक्षात हे युद्ध 'पवार विरुद्ध पवार' असंच होतं. ते पक्ष तसंच कुटुंबावर वर्चस्व कुणाचं यासाठी खेळलं गेलं. ज्याचं नेपथ्य गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होतं आणि आज त्यावर कळस चढला आहे.
याबाबतचं सखोल विश्लेषण तुम्ही इथं वाचू शकता. पण आता सध्या आधी चर्चा आजच्या घडामोडीची आणि अजित पवार पुढे काय करणार याची.
ते सगळं जाणून घेण्याआधी थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल.
पवार कुटुंबात आधी फूट पडली, मनभेद झाले आणि मग त्याचं प्रतिबिंब पक्षातही उमटलं. ज्याला सुरुवात 2004 आणि 2006 मध्येच खऱ्या अर्थानं झाली होती. 2004 ला काँग्रेस पेक्षा जास्त आमदार येऊनही शरद पवार यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं नाही. त्याच्या पुढच्या दोन वर्षांमध्येच शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणून अजित पवार यांच्यासाठी कुटुंबातूनच स्पर्धा निर्माण केली.
त्यातच संधी मिळेल त्यावेळी ‘माझा उत्तराधिकारी माझ्या विचारांचा असेल’, असं म्हणायला शरद पवार यांनी सुरूवात केली.
अशात सर्वोच्च संधी मिळत नसल्यामुळे अजित पवार यांनी वेळेवेळी त्यांची नाराजी व्यक्त केली. वेळोवेळी नॉटरिचेबल राहून त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. पण प्रत्येक वेळी परत येताना त्यांनी वेगवेगळी कारणं दिली, पण त्यामागचं खरं कारण मात्र अजिबात लपून राहिलेलं नव्हतं.
त्याची सर्वोच्च नाराजी पुढे आली ती 2014 च्या निवडणुकांच्या काळात. सर्वांत आधी त्यांनी निवडणुका जाहीर होण्याआधीच त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि ते नॉटरिचेबल झाले.
मग अज्ञातवासातून परत येताना अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. रडत रडत सांगितलं होतं की – ईडीनं शरद पवार यांचं नाव त्यांच्या आरोपपत्रात आणल्यामुळे दुःख झालं.
पुढे लगेचच 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला आणि अजित पवार यांनी पक्षातले हेवेदावे पुढे आणून राळ उडवून दिली.
छगन भुजबळांसारख्या नेत्यांवर त्यांनी थेट आरोप केले. अशात निवडणुका होऊन त्यांचे निकाल लागले आणि सत्ता स्थापनेच्या चर्चेच्या फेऱ्या सुरूच होत्या की अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांबरोबर पहाटेचा शपथविधी उरकून घेतला.
शरद पवार यांनी त्यावेळी त्यांचं बंड मोडून काढलं. पण तरीही स्वगृही (?) परत आलेल्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं. त्यानंतर त्यांना विरोधीपक्ष नेतासुद्धा केलं.
पण शरद पवार यांनी मात्र अजित पवार यांच्याकडे कधीच गृहसारखं महत्त्वाचं खातं दिलं नाही. महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पक्ष महाराष्ट्रात सलग तीन वेळा सत्तेत होता.
दरम्यानच्या काळात ‘वरिष्ठांनी आशिर्वाद द्यावा,’ असं बोलून अजित पवार यांनी आडूनआडून अनेकदा पक्ष आता माझ्या ताब्यात द्या, असं शरद पवार यांना सुचवलं होतं. पण शरद पवार यांनी शेवटपर्यंत तसं केलं नाही.
प्रत्यक्षात पक्षाचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा जेव्हा त्यांनी केली तेव्हा सुद्धा त्यांनी त्यांचा थेट उत्तराधिकारी निवडण्याऐवजी त्यासाठी समिती नेमण्याची शिफारस केली.
पक्ष आणि सर्वोच्च पद हातात येत नसल्याचं लक्षात येताच अजित पवार यांनी त्याचं फायनल बंड केलं. भाजपच्या मदतीने त्यांनी राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष फोडला आणि थेट भाजपबरोबर सत्तेत गेले.
ही निवडणूक अजित पवारांसाठी एक प्रकारे लिटमस टेस्ट होती. पण त्यात ते नापास झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याच्या त्यांच्या हालचालींना आता खीळ बसली आहे.
भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर आघाडी करून अजित पवार यांच्या पदरात लोकसभेला लढण्यासाठी फक्त 5 जागा पडल्या. त्यांना त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनासुद्धा बारामतीमधून निवडून आणता आलेलं नाही.
बारामतीमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री मोठ्या प्रमाणावर पैसा वाटप झाल्याचा आरोप अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी केला होता.
बारामती सहकारी बँकेचं कार्यालय रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याचे व्हीडिओसुद्धा त्यांनी टाकले होते. निवडणूक आयोगानंदेखिल याची दखल घेतली आहे.
अजित पवार यांनी केलेलं हे दुसरं बंड काका शरद पवार यांना मोडून काढण्यात यश आल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात आहे. 2019च्या निवडणुकीत अजित पवार यांना त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनासुद्धा निवडून आणण्यात यश आलं नव्हतं.
आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे अजित पवार आता पुढे काय करणार? तर त्याचं उत्तर आहे अजून विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत. एकाच निवडणुकीत कुठल्याही पक्षाचं राजकीय भवितव्य ठरत नसतं.
बीबीसी न्यूज प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांच्याशी बोलताना राजकीय विश्लेषक प्रशांत अहिर म्हणाले, “यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी शरद पवार यांना पसंती दिली आहे. पण विधानसभेला मात्र ते अजित पवार यांचा विचार करू शकतात.”
अजित पवार यांचं राजकारण जवळून पाहणारे वरिष्ठ पत्रकार आणि मॅक्स महाराष्ट्रचे संचालक रवींद्र आंबेकर यांच्या मते अजित पवार यांना त्यांच्या रणनितीमध्ये मोठा बदल करावा लागेत. तसंच सध्याच्या ट्रेंड विधानसभेच्या निवडणुकीतदेखील कायम राहील असं त्यांना वाटतं.
बीबीसी मराठीशी बोलताना आंबेकर म्हणाले, “महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणात राजकीयदृष्ट्या सर्वांत जास्त नुकसान अजित पवार यांचं झालेलं दिसतंय. एकतर त्यांना जागावाटपामध्येच जागा कमी मिळाल्या, ज्या मिळाल्या त्यातील दोन जागाच स्पर्धेत राहिल्या. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरचा विश्वास कमी झालेला दिसतोय, कमी जागा मिळताना दिसतायत. अशा वेळी अजित पवारांना दिल्लीतून फार रसद मिळेल असं वाटत नाही.
"रणनीतीच्या दृष्टीकोनातून अजित पवारांसाठी ही फसलेली निवडणूक आहे. त्यांना मुख्य प्रवाहातील राजकारणात कमबॅक करायचं असेल तर रणनीतीवर काम करावं लागेल, केवळ संघटन वाढवून उपयोग नाही. शरद पवारांना सहानुभूतीचा फायदा मिळाला आहे, विधानसभेतही हा ट्रेंड कायम राहिल असं दिसतंय,” आंबेकर म्हणाले.
रविंद्र आंबेकर यांच्या मताशी ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहतादेखील सहमत आहेत. त्यांनासुद्धा वाटतं की अजित पवार यांच्यासाठी विधानसभा निवडणूक तितकीशी सोपी नसेल.
त्यांच्यामते अजित पवार यांची 'बार्गेनिंग पॉवर; आता कमी होईल तसंच मुख्यमंत्रिपदापासूनसुद्धा ते आता आणखी दूर होतील.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, “या निवडणुकीमुळे सुप्रिया सुळेंच्या नेतृत्ववर शिक्कामोर्तब होईल तसंच जागावाटपात भाजपबरोबर नमतं घेतलं तर आमदारांमध्ये चलबिचल वाढेल आणि तेशरद पवार गटाकडे जाऊ शकतात. शिवाय एकनाथ शिंदे आणि भाजपला आपली उपयुक्तता पटवून देणं आता अजित पवारांसाठी मोठं आव्हान असेल. त्याच्यापेक्षा मोठं आव्हान विधानसभेला जर बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध रोहित किंवा युगंधर पवार असा परत सामना झाला तर असेल.
अजित पवारांसमोर आता फार पर्याय नाहीत. तसंच त्यांची परत घरवापसी कठीण आहे. त्यामुळे त्यांना विधानसभेलादेखील फटका बसेल.”
अर्थात अजित पवार यांच्यावर होणाऱ्या प्रत्येक परिणामाचा परिणाम त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांवर होणार आहे.
लोकसभेचे निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी पत्रकारांनी जयंत पाटलांना छगन भुजबळ यांच्याबाबत प्रश्न विचारला होता. “छगन भुजबळ महायुतीबरोबर आहेत की महाविकास आघाडीबरोबर, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. तुम्ही याबद्दल काय सांगाल?” यावर जयंत पाटील म्हणाले, “तुम्ही मला उद्या संध्याकाळी (लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर) भेटा, तेव्हा मी यावर उत्तर देईन.”
'कुठलंही अपयश अंतिम नसतं'- अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात,
"लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो.
‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. देशात लवकरंच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारं ‘एनडीए’चं सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, याची खात्री आहे.
प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं पुन:श्च अभिनंदन!
पुनश्च धन्यवाद!"