You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण, सरकारने नेमकी काय कारवाई केली?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
कल्याण पश्चिमेतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका अमराठी कुटुंबाने काही लोकांच्या मार्फत मराठी कुटुंबातील लोकांना मारहाण केली. ही घटना 18 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान घडली आहे.
कल्याण पश्चिमेतील अजमेरा हाईटस इमारतीमध्ये अखिलेश शुक्ला आणि शेजारी असणाऱ्या कल्वीकट्टे कुटुंबात किरकोळ वाद झाला. त्यात शुक्ला यांनी 10 ते 15 जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना रॉडने मारहाण केली असून, यामध्ये 2 - 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
यात अभिजीत देशमुख यांना बेदम मारहाण झाली असून त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार चालू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, मात्र आरोपी अद्याप सापडलेला नाही.
या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य मारहाण करणाऱ्या लोकांनी आणि शुक्ला यांनी वापरल्याचा आरोप सोसायटीतील सदस्यांनी केलाय.
कल्याणमधील नागरिक 19 डिसेंबर रोजी रात्री एकत्र जमले आणि शुक्ला यांच्यावर कारवाई करत मराठी कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीसाठी अजमेर हाइट्स परिसरात ठिय्या दिला होता.
याबाबत विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिलेशला तत्काळ निलंबित करत आहोत असं सांगितलं.
फडणवीस म्हणाले, "अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्यांच्या पत्नीने मराठी माणसाचा अपमान होईल असे उद्गार काढले. शुक्ला हा एमटीडीसी विभागाचा असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला तात्काळ निलंबित करण्यात येत आहे."
काय आहे प्रकरण?
सरकारी नोकरी करणारे अखिलेश शुक्ला आणि वर्षा कल्वीकट्टे हे अजमेरा हाइट्स या सोसायटीत राहतात.अखिलेश यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात.
धूप लावल्याने वर्षा कल्वीकट्टे यांच्या घरात हा धूर जातो, त्यांच्या घरात असलेल्या तीन वर्षांच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला दम लागतो.ही बाब वर्षा यांनी गीता यांना सांगितली. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्यांच्या बाजूला राहणारे अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणानंतर शुक्ला यांना राग आला आणि त्यांनी काही लोकांना बोलवून या दोघांना मारहाण केली असे स्थानिक शेजारी सांगत आहेत.
किरण सपकाळ, स्थानिक शेजारी यांनी संपूर्ण घटनेची माहिती देत. पूर्वीपासून या परिसरात शुक्ला लोकांना धमकावण्याचं काम करतो. महिलांशीही असभ्य वर्तणूक करतो. तसेच अनेक सण-उत्सवांमध्ये देखील तो आणि त्याचे कुटुंबीय लोकांशी वाद निर्माण करतात.
मागील वर्षी महाशिवरात्रीच्या कार्यक्रमांमध्ये देखील रात्रीच्या वेळी अभिषेक सुरू होता, तो अभिषेक त्यांनी व त्यांच्या पत्नीने बंद पाडला. 'माझं तुम्ही काहीही करू शकणार नाही', अशी धमकी सर्वांना दिली होती. आता तर त्यांनी हद्दच केली, थेट मराठी माणसांना मारहाण केली, असं ते म्हणाले.
कल्याण येथील या घटनेनंतर कल्याणवासी एकत्र येत, या प्रकरणी न्यायाची मागणी करत होते. अशाप्रकारे मारहाण निषेधार्ह आहे. दोशींवर कडक कारवाई करायला हवी अशी मागणी सर्व शेजारी आणि कल्याणवासीयांनी एकत्रित येत केली, अशी माहिती समीर शिंदे, कल्याण रहिवाशी यांनी दिली.
या घटनेनंतर शुक्ला कुटुंबीय घर बंद करून बाहेर गेले आहेत. मारहाण आणि त्यांच्यावर जे आरोप होतात या संदर्भात त्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
याबाबत बीबीसी मराठी हे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अद्याप संपर्क झालेला नाही. शुक्ला यांच्याकडून प्रतिक्रिया आल्यावर ती येथे अपडेट केली जाईल.
आरोपी अखिलेश शुक्ला कोण आहे? त्यांच्यावरील आरोप काय?
अखिलेश शुक्ला हे एमटीडीसीमध्ये अकाऊंटंट आहेत. मात्र, ते आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगून, मंत्रालयात असे सांगून सोसायटीमधील रहिवाशांना धमकावायचे. तसेच ते खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरायचे. त्या गाडीचा इन्शुरन्सही 10 मार्च 2020 रोजी संपला असल्याच कैलास शिरसाट, हे स्थानिक शेजारी यांनी माहिती दिली आहे.
त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करणार, याकडे सर्वांची नजर आहे.
कल्याण येथील या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात आणि हिवाळी अधिवेशनात देखील उमटल्याचे पाहायला मिळत आहे.
या घटनेमुळे सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांची भेट घेत थेट कारवाई करा अन्यथा आम्ही पुढची भूमिका घेऊन स्पष्ट केलीय.
किरकोळ वादावरुन भांडणं झाली. शुक्ला आणि कल्वीकट्टे कुटुंबात दिवा आणि धूप लावण्यावरुन वादावादी झाली. त्यांचा वाद सोडवण्यासाठी देशमुख गेले होते. त्यांना इतकं मारलं आहे की त्यांची प्रकृती गंभीर आहे.
देशमुख कुटुंबासह आम्ही म्हणजेच मनसे उभी आहे. जर 24 तासांत या प्रकरणी आरोपींना अटक केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आंदोलन करणार असा इशारा मनसे नेते उल्हास भोईर यांनी दिला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले, "कल्याणमध्येच नव्हे, तर मुंबईतही हे असे प्रकार घडले आहेत. मी वारंवार बोलतोय, कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. मराठी माणसं घाणेरडी आहेत असं म्हटलं. शिव्या घातल्या."
"मुंबईतही मराठी बोलायचं नाही वगैरे म्हणत मराठी माणसाला जागा नाकाल्या जात आहेत. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना निर्माण केली. भाजपानं मराठी माणसाची संघटना फोडून मराठी माणूस कमजोर केला.
इथे मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळावी, मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी यासाठी हे केलं. मुबई अदानी, लोढा, गुंदेचा व्यापाऱ्यांच्या घश्यात घालावी यासाठी मोदी-शाहा व त्यांच्या व्यापारी गोतावळ्यानं मराठी माणसाला कमकुवत केलं आहे.
निवडणूक निकालांनंतर मराठी माणसावर हल्ले वाढू लागले आहेत. मराठी माणसाला मुंबईतून घालवण्याचे उद्योग चालू आहेत."
'मराठी माणूस वसई-विरारला कोणाच्या काळात गेला?'
याप्रकरणी शिवसेना ठाकरे गट आमदार हिवाळी अधिवेशनात देखील आक्रमक झाले. आमदार सुनील प्रभू यांनी कल्याणच प्रकरण सभागृहात उपस्थित केला आणि घटनेचे महिती दिली.
"मराठी माणसाला तो शुक्ला शिवीगाळ करतो आणि तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल अश्या धमक्या तो देतो," असं म्हणत कारवाईची मागणी केली.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरित उत्तर दिले. "हा मुद्दा गंभीर आहे. तो शुक्ला नावाचा अधिकारी कितीही मोठया बापाचा असला. तरी हयगय केली जाणार नाही. त्याच्यावर नक्कीच कडक कारवाई केली जाईल", असं आश्वासन उपमुख्यंत्री अजित पवार यांनी दिलं.
विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "भाजपाचं सरकार आलं म्हणून हे घडलं असं म्हणत असाल, तर कोणाच्या सरकारमध्ये मराठी माणूस वसई विरारमध्ये कसा गेला? मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. कधी कधी काही नमुने माज दाखवतात. ते आम्ही खपवून घेणार नाही."
"या आर्थिक राजधानीत देशातील लोक येतात. मुंबईत तीन-चार पिढ्यांपासून आलेले युपी बिहारचे लोक उत्तम मराठी बोलतात. गणपतीचा सण साजरा करतात."
"काही लोक माजोरडेपणा दाखवतात त्यामुळे गालबोट लागतं. कोणत्याही परिस्थितीत मराठी माणसावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. कोणी काय खायचं याचा अधिकार संविधानाने दिला आहे.
एखाद्या समाजाला, कोणाला घर नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्या आधारावर भेदभाव करणं हे मान्य नाही. तशी तक्रार आल्यावर कारवाई करू."
राज ठाकरे यांची फेसबूकवर पोस्ट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर फेसबूकवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
ते लिहितात,"मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका.
मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी."
राज ठाकरे यांची फेसबूकवरील पोस्ट पूर्ण वाचण्यासाठी क्लिक करा.
मारामारीचा गुन्हा दाखल आहे, चौकशी सुरू आहे- पोलीस
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे या घटना संदर्भात माहिती देताना म्हणाले की, या प्रकरणी पुढील तपास आम्ही करतो आहोत. देशमुख यांची तक्रार होती त्याप्रमाणे एफआयआर दाखल केली आहे.
तसंच शुक्ला यांच्या तक्रारीवरुनही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. देशमुख जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सोसायटीच्या काही तक्रारी आहेत, मारामारीचा गुन्हा दाखल आहे. शुक्ला हे सरकारी नोकरीवर आहेत ते काय काम करतात त्याची चौकशी करण्यात येते आहे.
या संदर्भात आमदार आदित्य ठाकरे आज हिवाळी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कल्याणची घटना दुर्दैवी आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकार आणि आताचे सरकार या वादाला हवा देत आहे का? मागच्या महिन्यात एका महिलेला मारवाडीत बोलायला लावले."
"मुंबई, महाराष्ट्र आमचा आहे. मुंबई आधी महाराष्ट्राची मग या देशाची आहे. तुम्ही या रहा, काम करा, काही हरकत नाही, काल मराठी माणसाला हत्याराने मारले, जर कोणी त्यांचं तोंड फोडलं तर पोलिसांनी बोलू नये. हे जे कोण आहेत ते एमटीडीसीमधले आहेत.
माझी विनंती आहे की, या पार्सलला आले तिथे पाठवावे. मटण-मांस खाण्यावरून बोलले जाते. मुंबई किंवा महाराष्ट्रात शाकाहारी सोसायटी करायचा प्रयत्न केला तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे, मराठी माणसांना घरं दिली नाही तर कारवाई झाली पाहिजे".
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)