You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
20 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर होते उडू शकणारे डायनासोरसारखे प्राणी, नवं संशोधन काय सांगतं?
- Author, व्हिक्टोरिया गिल
- Role, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी
संशोधकांना टेरोसॉर प्राण्यांच्या एक नव्या प्रजातीचे अवशेष सापडले आहेत. टेरोसॉर हे 20 कोटी वर्षांपूर्वी उडणारे पण सरीसृप प्राणी होते.
टेरोसॉर हे सरपटणाऱ्या प्राणी होते पण त्याच वेळी त्यांना उडता देखील यायचं.
2011 साली अरिझोनामध्ये या प्राचीन प्राण्याच्या जबड्याचे अवशेष सापडले होते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने ही एक वेगळीच प्रजाती असल्याचं स्पष्ट झालं आहे.
यावर स्मिथ्सोनियन्स नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे संशोधक काम करत होते. त्यांनी याला इओटेफ्राडक्टिलस मसिन्ट्रए असं नाव दिलं आहे. याचा अर्थ राखेचे पंख असलेली पहाटेची देवता असा होतो.
एका प्राचीन नदीपात्रातमध्ये या प्रजातीची हाडं ज्वालामुखीच्या राखेमुळे सुरक्षित राहिली होती म्हणून असं नाव देण्यात आलं आहे. याचे अधिक तपशील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या निबंधपुस्तिकेत प्रसिद्ध झाले आहेत.
जवळपास 20 कोटी वर्षांपूर्वीचे हे अवशेष पाहाता उत्तर अमेरिकेत सापडलेले टेरोसॉरचे हे सर्वात प्राचीन अवशेष आहेत असं मानलं जातंय.
यावर संशोधन करणारे डॉ. क्लिग्मन म्हणाले, ट्रायासिक टेरोसॉरची हाडं अत्यंत लहान, बारीक आणि बहुतांशवेळा पोकळ असायची त्यामुळे त्यांचं जीवाश्म होण्याआधीच ती नष्ट व्हायची.
हे जीवाश्म जिथं सापडलंय तो पेट्रिफाईड फॉरेस्ट नॅशनल पार्कचा वाळवंटी भाग आहे.
20 कोटी वर्षांआधी इथं एका नदीचं पात्र होतं. तिच्या गाळाच्या थरांमध्ये हाडं आणि त्याकाळच्या जीवांच्या अस्तित्वाचे इतर पुरावे हळूहळू दबले गेले. ही नदी तेव्हाच्या एकमेव पँजिया खंडाच्या मध्यभागातून वाहात असे. या पँजियामधून आजचे सात खंड तयार झाले असं मानलं जातं.
याच जागेवर सापडलेल्या इतर अवशेषांमध्ये टेरॉसॉरच्या जबड्याबरोबर दात, हाडं, माशांचे खवले आणि जीवाश्मात रूपांतर झालेली विष्ठाही आहे.
डॉ. क्लिग्मन सांगतात, या टेरोसॉरच्या हाडांचं निरिक्षण करता जगात इतरत्र ठिकाणी असलेल्या ट्रायासिक खडकांमध्येही या प्राण्यांचे जीवाश्म असू शकतात.
इथं सापडलेल्या दातांच्या जीवाश्मावरुन सीगलच्या आकाराएवढ्या या प्राण्याचा आहार काय असेल याचाही कयास बांधता येतो.
हे उडणारे प्राणी कठीण पदार्थ खात असावेत असं डॉ. क्लिग्मन यांचं म्हणणं आहे. बीबीसी न्यूजशी बोलताना ते म्हणाले प्राचीन काळातल्या माशांना टोकदार हाडांसारखे खवले असत, त्या माशांना हे खात असावेत.
या भागात तेव्हाच्या परिसंस्थेतील प्राण्यांचा एक तुकडाच जपला गेला आहे असं संशोधक म्हणतात. हे प्राणी आता नामशेष झालेले आहेत. यात तेव्हाचे मोठे उभयचर प्राणी होते. आजच्या बेडकांबरोबर आणि कासवांबरोबर तेव्हा टोकदार त्वचा असलेल्या मगरीसारखे प्राणीही असायचे. त्यांचे जीवाश्म इथं आहेत.
20 कोटी वर्षांतल्या स्थित्यंतराचा पुरावा या नदीपात्रानं जपून ठेवलाय असं क्लिग्मन सांगतात.
हे ट्रायासिक काळातील प्राणी एकत्र राहात होते हे यातून समजतं, असं ते म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)