'आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे 30 कोटी नोकऱ्या जाण्याची शक्यता' - गोल्डमन सॅक्स

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ख्रिस व्हॅलेन्स
- Role, तंत्रज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) भविष्यात सुमारे 30 कोटी पूर्णवेळ नोकऱ्यांमध्ये कपात केली जाऊ शकते, असा अहवाल गोल्डमन सॅक्स या इन्व्हेस्टमेंट बँकेने प्रसिद्ध केला आहे.
अहवालानुसार, अमेरिका आणि युरोपातील एकूण नोकऱ्यांपैकी एक चतुर्थांश नोकऱ्यांची जागा AI घेऊ शकतं. पण, त्यासोबतच यामुळे उत्पादकता आणि नव्या नोकऱ्यांच्या संधीही निर्माण होऊ शकतात, असं यामध्ये सांगण्यात आलं आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे जागतिक पातळीवर वस्तू आणि सेवांचं मूल्य जगभरात 7 टक्क्यांनी वाढण्याची शक्यताही या अहवालात वर्तवण्यात आली आहे.
जनरेटिव्ह AI प्रकारातील आर्टिफिशियल इंटेलिजन्समार्फत अगदी मानवाकडून जसा कंटेट तयार केला जातो तसा कंटेट तयार केला जाऊ शकतो. ही एक मोठी प्रगती असल्याचंही यामध्ये सांगण्यात आलं आहे.
रोजगार आणि AI
युकेमधील सरकार हे AI मधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यास उत्सुक आहे. त्यांच्या मते, यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल, उत्पादकताही वाढेल. यामुळे लोकांना याच्या वापराबाबत विश्वास देण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
युकेचे तंत्रज्ञान सचिव मिशेल डोनेलन यांनी द सन वेबसाईटला याबाबत सांगितलं, “आम्हाला हे सुनिश्चित करायचं आहे की युकेमध्ये आपण करत असलेल्या कामाच्या पद्धतीला पूरक म्हणून AI चा वापर करण्यात यावा. यामुळे कामात व्यत्यय येता कामा नये, यामुळे आपल्या नोकऱ्या काढून घेण्याऐवजी त्यांना यामुळे चांगली मदत व्हावी.”
गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार, वेगवेगळ्या क्षेत्रांत AI चा प्रभाव वेगवेगळ्या पद्धतीने दिसू शकतो.
प्रशासकीय क्षेत्रातील 46% आणि कायदेशीर व्यवसायातील 44% कार्ये स्वयंचलित पद्धतीने केली जाऊ शकतात. परंतु, बांधकाम क्षेत्रात 6% तर देखभाल (मेंटेनन्स) क्षेत्रात 4% प्रभाव दिसू शकेल.
बीबीसी न्यूजने काही दिवसांपूर्वी एक बातमी दिली होती. यामध्ये AI इमेज जनरेटरच्या प्रयोगामुळे कलाकारांच्या रोजगाराच्या संधी हिरावण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
'कमी वेतन'
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील ऑक्सफर्ड मार्टिन स्कूलच्या फ्यूचर ऑफ वर्क विभागाचे संचालक कार्ल बेनेडिक्ट फ्रे यांच्याशी बीबीसी न्यूजने AI संदर्भात संवाद साधला.
ते म्हणाले, “मला एकच गोष्ट सध्या माहीत आहे, ती म्हणजे जनरेटिव्ह AI मुळे नेमक्या किती जणांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, हे जाणून घेण्याचा मार्ग सध्यातरी नाही.”
ते म्हणतात, “चॅटजीपीटी हे सरासरी लेखन कौशल्य असलेल्या लोकांना निबंध आणि लेख तयार करण्यास मदत करतं.
“यामुळे पत्रकारांना अधिक स्पर्धेचा सामना करावा लागेल, किंवा त्यांचे वेतन त्यामुळे कमी होईल, असं म्हटलं जातं. पण जोपर्यंत अशा कामाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार नाही, तोपर्यंत तशी वेळ येणार नाही.”
"GPS तंत्रज्ञान आणि Uber सारख्या अॅप्सचा विचार केल्यास, लंडनमधील सर्व रस्ते माहीत असलेल्या ड्रायव्हर्सना अचानक आलेल्या या प्लॅटफॉर्मचा फटका नक्की बसला. यामध्ये तुम्हाला लंडनमधील सर्व रस्ते कळू शकतात. त्यामुळे ड्रायव्हर्सच्या वेतनात कपात झाल्याचं नंतरच्या काळात दिसून आलं. संशोधनानुसार ही कपात 10 टक्क्यांपर्यंत होती.”
पण, याचा परिणाम म्हणून वेतन कमी झालं तरी चालक मात्र कमी झाले नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने पुढील काही वर्षांत जनरेटिव्ह AI चा प्रभाव सर्जनशील कार्यांवर दिसून येऊ शकतो.
रोजगार कमी होईल, पण अंदाज लावणं कठीण
अहवालात नमूद केलेल्या संशोधनानुसार, आज घडीला 60 टक्के नोकरदार वर्ग अशा व्यवसायात आहे, जे व्यवसाय 1940 मध्ये बिलकुल अस्तित्वात नव्हते.
1980 मध्ये तंत्रज्ञानात बदल होत असताना नव्या नोकऱ्या निर्माण होण्याऐवजी नोकरदार वर्ग वेगाने विस्थापित झाला.
त्यामुळे जर जनरेटिव्ह AI हा माहिती-तंत्रज्ञानाच्या आगमनावेळी झालेल्या बदलांप्रमाणे असेल. तर अशा स्थितीत नजीकच्या काळात लोकांच्या नोकऱ्यांवर त्याचा परिणाम नक्की होऊ शकतो.
AI च्या वापरामुळे रोजगार कमी होण्याची शक्यता यामुळे निर्माण होते, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
AI च्या दीर्घकालीन प्रभावाबाबत बोलताना रिझोल्यूशन फाउंडेशन थिंक टँकचे मुख्य कार्यकारी टॉर्स्टन बेल यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, “सध्यातरी आपल्याला भविष्यातील बदलांबाबत नेमका अंदाज लावणं कठीण आहे.”
"आपल्याला माहीत नाही की हे तंत्रज्ञान कशा प्रकारे विकसित होईल किंवा कंपन्या ते कसं वापरात आणतील किंवा त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाईल.”
“पण म्हणून AI आपल्या कामातील अडसर ठरणार नाही. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. उत्पादकता वाढवणं, बदलांच्या आव्हानाला तोंड देण्याची तयारी ठेवणं, किफायत दरात सेवा पुरवणं, आदी कामे आपल्याला नक्कीच करावी लागतील.”
“कंपन्या आणि अर्थव्यवस्था तांत्रिक बदलांशी अधिक चांगल्या प्रकारे कसं जुळवून घेतात, त्यावर हे सगळं अवलंबून आहे, इतकंच याबाबत सांगता येईल,” असं टॉर्स्टन बेल यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








