गुगलच्या बार्डने चुकीचं उत्तर दिलं आणि कंपनीचं झालं 100 अब्ज डॉलर्सचं नुकसान

फोटो स्रोत, Getty Images
गुगलने आणलेल्या आर्टिफिशियल बॉट बार्डने चुकीचं उत्तर दिल्यामुळे कंपनीला 100 अब्ज डॉलर्सचा भुर्दंड सोसावा लागला आहे.
अल्फाबेट या मूळ कंपनीचे समभाग 7 टक्क्यांनी घसरले आहेत आणि तिच्या बाजारमूल्यात 100 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे.
या बॉटच्या जाहिरातसाठी ट्वीटरवर एक जाहिरात केली होती. यामध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने लावलेल्या शोधांबद्दल 9 वर्षे वयाच्या मुलांना काय सांगावं असा प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यात आपल्या सूर्यमालिकेच्या बाहेरच्या ग्रहाचा फोटो दाखवण्यात आला होता. हा शोध जेम्स वेब स्पेसने नाही तर युरोपमधील खगोल दुर्बिणीने लावलेला शोध आहे.
त्यामुळे यावर टीकाही झाली.
सध्या चॅटजीपीटीची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याला भविष्यातील 'सर्च इंजिन' असं देखील म्हटलं जातंय.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने तयार केलेला चॅटबॉट तुम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.
जीमेलचं इन्व्हेन्शन करणाऱ्या पॉल बुशिट यांच्या मते, हे चॅटजीपीटी गुगलच्या अस्तित्वाला सर्वांत मोठा धोका ठरू शकतं. पॉल असंही म्हणाले होते की, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्च इंजिनच्या रिझल्ट पेजला संपवून टाकेल.
पॉल यांनी म्हटलं, "पुढच्या एक ते दोन वर्षात गुगल संपून जाईल."
पण या धोक्याचा सामना करण्यासाठी गुगलने सुद्धा तयारी सुरू केलीय याचा अंदाज कदाचित पॉल बुशिट यांना आला नसावा.
थोडक्यात गुगल आता स्वतःचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट आणण्याच्या तयारीत असून तशी घोषणा देखील गुगलने केली आहे.
ही घोषणा करताना गुगलचे सर्वेसर्वा सुंदर पिचाई लिहितात की, "आजकाल ज्या नवनव्या गोष्टींवर काम केलं जातंय त्यात आर्टिफिशियल इंटेलिजेंस ही सर्वांत गंभीर बाब आहे. रोगांचं निदान करण्यापासून ते लोकांना त्यांच्याच भाषेत माहिती देण्यासाठी याचा वापर होताना दिसतोय."

फोटो स्रोत, Getty Images
गुगलने त्यांच्या या चॅटबॉटचं नामकरण बार्ड (Bard) असं केलंय. हा चॅटबॉट मोठ्या स्तरावर वापरण्यापूर्वी गुगल त्याचं टेस्टिंग करून घेईल. यासाठी एक स्पेशल ग्रुप हे चॅटबॉट वापरून पाहिल.
पिचाई लिहितात की, मागच्या दोन वर्षांपासून लँग्वेज मॉडेल फॉर डायलॉग ऍप्लिकेशन (LAMDA) नावाच्या लँग्वेज मॉडेलच्या माध्यमातून आर्टिफिशियल सर्व्हीससाठी काम सुरू होतं.
सुंदर पिचाई सांगतात की, "आम्ही या नव्या एआय टेक्नॉलॉजीला बार्ड असं नाव देतोय. या नव्या तंत्रज्ञानाच्या दिशेने आम्ही आणखीन एक पाऊल टाकलंय. ते सार्वजनिक करण्यापूर्वी त्याला टेस्टिंगसाठी पाठवलंय. येत्या काही दिवसांत ही टेक्नॉलॉजी सर्वांसाठी उपलब्ध असेल."
चॅटजीपीटीकडून आव्हान
चॅटजीपीटी हे एक चॅटबॉट आहे.
एखादा व्यक्ती ज्या पद्धतीने अचूक असा कॉन्टेट लिहू शकतो त्याचपद्धतीने हे चॅटबॉट सुद्धा कॉन्टेट लिहू शकतं.

त्यामुळे हे चॅटबॉट गुगलसाठी धोक्याचं ठरणार अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत.
जीमेलचे फाऊंडर पॉल असंसुद्धा म्हटले होते की, येणाऱ्या दोन वर्षात हे टूल गुगलच्या सर्व नाशाचं कारण ठरू शकतं.
तुम्ही इंटरनेटवर चॅटजीपीटी हा शब्द सर्च केला तर तुम्हाला वारंवार 'धोका' या शब्दाचा उल्लेख आढळेल. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की, हा प्रोग्राम खूप वेगात माणसाच्या मेंदूची कॉपी करू लागलाय.
आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणारा दुसरा एक चॅटबॉट बाजारात येतोय आणि त्यामागे गुगलसारखी मोठी कंपनी आहे.
गुगलच्या बार्ड चॅटबॉट विषयी बोलताना एका इंजिनिअरने सांगितलं की, हा चॅटबॉट मानवी मेंदूप्रमाणेच संवेदनशीलपणे प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो.

गुगलने त्यांच्या सर्च इंजिनमध्ये बरेच एआय टूल्स ऍड केले आहेत.
चॅटबॉट्स कशाप्रकारे काम करतात?
इंटरनेटच्या डेटाबेसमध्ये जे ज्ञानाचं भांडार असतं त्याचा वापर करून हे चॅटबॉट्स लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देतात. पण कधीकधी हे चॅटबॉट आक्षेपार्ह आणि चुकीची माहितीही देऊ शकतात.
सुंदर पिचाई म्हणतात की त्यांचा एआय बार्ड, गुगलच्या लँग्वेज मॉडेलच्या माध्यमातून जगातील ज्ञानाचं भांडार क्रिएटिव्हिटीशी जोडून लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देईल.
गुगलचं म्हणणं आहे की, ते बार्डला एक निर्भय आणि जबाबदार सर्व्हिस बनवू इच्छितात. पण यातून जर हानिकारक किंवा आक्षेपार्ह कॉन्टेंट शेअर झाला तर तो रोखणार कसा यावर गुगलने काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
विशेष म्हणजे मायक्रोसॉफ्ट देखील एक नवं चॅटबॉट आणणार असल्याच्या चर्चा असतानाच गुगलने त्यांच्या चॅटबॉटची घोषणा केलीय. मायक्रोसॉफ्टचं चॅटबॉट त्यांच्या बिंग या सर्च इंजिन सोबत काम करेल.
चॅटजीपीटी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो, तुमच्यासाठी भाषण, कविता, मार्केटिंग कॉप, न्यूज आर्टिकल आणि निबंध देखील लिहू शकतो.
सध्या चॅटजीपीटी तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकता. पण जेव्हा कोणी चॅटजीपीटीवर प्रश्न विचारतं तेव्हा त्याच्या मालक असलेल्या कंपनीला पैसे खर्च करावे लागतात. ओपनएआय ही त्याची मालक कंपनी असून त्यांनी हल्लीच सबस्क्रिप्शनची घोषणा केली आहे.
थोडक्यात इंटरनेट सर्चिंगमध्ये बदल करणं हे या चॅटबॉट्सचं अंतिम ध्येय आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आज जर आपण एखादी गोष्ट सर्च इंजिनमध्ये सर्च केली तर आपल्याला त्या इंटरनेटच्या पेजवर अनेक सर्च पेजेस दिसतात.
पण चॅटबॉट तुमच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देईल. ते तुमच्या पुढ्यात हजारो पानं उघडून ठेवत नाही.
गुगलचे बॉस सुंदर पिचाई यांनीही म्हटलंय की, हल्ली लोक गुगलवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात.
ते म्हणतात, "पूर्वी लोक गुगलवर सर्च करताना विचारायचे की, पियानोमध्ये एकूण किती बटन असतात. पण आजकाल लोक विचारतात की, गिटार शिकणं अवघड आहे की पियानो? आता आशा प्रश्नांची तथ्यात्मक उत्तरं देणं अवघड आहे."
त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरं देण्यात चॅटबॉट्स प्रभावी ठरतील यात काही दुमत नाही.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









