अमेरिकेतही MDH आणि एव्हरेस्ट मसाल्यांची चौकशी सुरू

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये MDH आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर बंदी आल्यानंतर आता अमेरिकेतही या मसाल्यांची चौकशी करण्यात येत आहे. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, आम्ही दोन भारतीय कंपन्यांच्या उत्पादनांची तपासणी करत आहोत.

हाँगकाँगने या महिन्यात केलेल्या तपासणीत दोन भारतीय मसाला कंपन्यांच्या मसाल्यांमध्ये एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण जास्त असल्याचे म्हटले होते. हाँगकाँगने एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या काही मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. यानंतर सिंगापूरनेही एव्हरेस्ट आणि एमडीएच उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली.

MDH आणि एव्हरेस्ट मसाले ही भारतातील सर्वात लोकप्रिय उत्पादने आहेत. हे मसाले युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेच्या बाजारपेठेतही विकले जातात.

मसाल्यांच्या गुणवत्तेवरून झालेल्या वादानंतर एव्हरेस्टने आपली उत्पादने सुरक्षित असल्याचे सांगितले होते.

दुसरीकडे, भारतीय अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनीही दोन्ही कंपन्यांच्या मसाल्यांची चौकशी सुरू केली आहे.

'MDH, एव्हरेस्ट मसाल्यात कॅन्सरचा धोका वाढवणारे घटक'

हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा विभागानं भारतातील एमडीएच आणि एव्हरेस्टच्या काही मसाल्यांमध्ये एथिलिन ऑक्साइड हे कीटकनाशक आढळल्याचा दावा केला आहे.

ग्राहकांनी या मसाल्यांचा वापर न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्याचबरोबर या मसाल्यांची विक्री थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

दुसरीकडे, सिंगापूरमध्येही एव्हरेस्टच्या फिश करी मसाले बाजारातून परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हाँगकाँच्या सेंटर फॉर फूड सेफ्टी संस्थेनं एमडीएचच्या मद्रास करी पावडर, सांबर मसाला मिक्स्ड पावडर आणि करी पावडर मिक्स्ड मसाला यात एथिलिन ऑक्साइड हे कीटनाशक आढळल्याचं म्हटलं आहे. तसंच, याचा वापर करू नये असंही म्हटलं आहे.

कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या संस्थेनं एथिलिन ऑक्साइडला ग्रुप 1 कार्सिनोजेनमध्ये ठेवलं आहे, असं कारण सेंटर फॉर फूड सेफ्टीनं विक्रीवर बंदी लावण्यासाठी दिलं आहे.

कार्सिनोजेनमुळं कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होत असतो.

सिंगापूरमध्ये एव्हरेस्ट फिश करी मसाल्यावर बंदी

फूड सेफ्टी विभागानं खाद्य पदार्थांमधील कीटनाशकांसंबंधीच्या नियमांचा (कॅप. 132सीएम) हवाला दिला आहे. त्यानुसार याचा समावेश असलेल्या खाद्यपदार्थांचा आरोग्यावर हानिकारक परिणाम होणार नसेल, तरच त्यांची विक्री करता येऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.

हाँगकाँगच्या सेंटर फॉर फूड सेफ्टीनं तीन रिटेल दुकानांवरून मसाल्यांचे सॅम्पल घेतले होते.

सेंटर फॉर फूड सेफ्टीच्या प्रवक्त्यांच्या मते, हाँगकाँगमध्ये खाद्यपदार्थांत एथिलिन ऑक्साइडसारख्या किटकनाशकांचा वापर करणाऱ्यांवर 50 हजार डॉलरपर्यंतच्या दंडाची कारवाई केली जाऊ शकते.

तसंच गुन्हा सिद्ध झाल्यास सहा महिन्याचा तुरुंगवासही होऊ शकतो.

दरम्यान, सिंगापूरनं एथिलिन ऑक्साइड आढळल्यानंतर एव्हरेस्ट फिश करी मसाले बाजारातून परत मागवण्याचे निर्देश दिले आहेत.

सिंगापूरमध्ये या मसाल्यांची आयात करणारे मुथैय्या अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडला हे उत्पादन बाजारातून परत मागवण्यास सांगण्यात आलं आहे.

सिंगापूरच्या फूड एजन्सीनं ग्राहकांनी एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्याचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे.

त्यासाठी त्यांनी हाँगकाँगच्या फूड सेफ्टी विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचा हवाला दिला आहे. या निर्देशांमध्ये एमडीएचचे तीन आणि एव्हरेस्टच्या फिश करी या मसाल्यांत कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणारे तत्वं असल्याचं म्हटलं होतं.

एव्हरेस्टने काय म्हटले?

सिंगापूरच्या फूड एजन्सीच्या मते, कमी प्रमाणातील एथिलिन ऑक्साइडमुळं कोणताही गंभीर धोका उद्भवत नाही. मात्र, दीर्घकाळ त्याचं सेवन केल्यास अशा प्रकारच्या रसायनामुळं आरोग्याला हानी पोहोचू शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

विऑन या वेबसाईटला याबाबत प्रतिक्रिया देताना एव्हरेस्टनं त्यांचा ब्रँड 50 वर्ष जुना आणि प्रतिष्ठित असल्याचं म्हटलं आहे.

"निर्यातीपूर्वी आमच्या उत्पादनांची स्पाइस बोर्ड ऑफ इंडियाकडून तपासणी होते. सध्या आम्ही अधिकृतपणे याबाबत माहिती मिळण्याची वाट पाहत आहोत. आमची क्वालिटी कंट्रोल टीम याची पूर्णपणे तपासणी करेल," असंही एव्हरेस्टनं म्हटलं आहे.

एथिलिन ऑक्साइड काय आहे?

एथिलिन ऑक्साइड हा एक रंगहीन आणि ज्वलनशील वायू आहे. त्याचा वापर साधारणपणे कृषी, आरोग्य सेवा आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रांमध्ये कीटनाशक, स्टरलंटचं फ्युमिगेंट तयार करण्यासाठी होतो.

मसाले आणि इतर कोरडया खाद्यपदार्थांमध्ये मायक्रोबायल प्रदूषण नष्ट करण्यासाठी आणि किड्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एथिलिन ऑक्साइडचा वापर केला जातो.

बॅक्टेरिया, बुरशी आणि किड्यांपासून खाद्यपदार्थांना सुरक्षित ठेवण्यासाठी एथिलिन ऑक्साइडचा वापर होतो.

पण आरोग्याशी संबंधित अनेक संस्था, संघटनांनी याला कार्सिनोजेन गटात ठेवलं आहे. कार्सिनोजेनमुळं कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.

एथिलिन ऑक्साइडचा धोका पाहता, अनेक देशांच्या खाद्य नियामकांनी याच्या खाद्यपदार्थातील वापराबाबत कठोर नियम तयार केले आहेत. या देशांमध्ये एथिलिन ऑक्साइडच्या प्रमाणाबाबत कठोर कायदे आहेत.

मसाल्यांवर अमेरिकेतही प्रश्नचिन्ह

भारतीय मसाले विदेशी नियमांमध्ये अडकल्याची काही प्रकरणं यापूर्वीही समोर आली आहेत.

2023 मध्ये अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्स अथॉरिटीनं एव्हरेस्टच्या सांबर मसाला आणि गरम मसाला बाजारातून परत मागवण्याचे निर्देश दिले होते.

हे मसाले साल्मोनेला पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. या बॅक्टेरियामुळं पोटदुखी, ताप, चक्कर येणे, उलटी असा त्रास होऊ शकतो.

बेबी फूड विक्री करणाऱ्या नेस्ले कंपनीच्याही आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील उत्पादनांमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असल्याचं नुकतंच समोर आलं आहे.

या उत्पादनांमध्ये लहान मुलांच्या खाद्यातील जगातील सर्वात मोठा ब्रँड सेरेलॅकचाही समावेश आहे. लहान मुलाना जास्त प्रमाणात साखर देऊ नये, असा सल्ला दिला जातो.

यासंबंधीचा अहवाल पब्लिक आय या स्विस संघटनेचा होता. इंटरनॅशनल बेबी फूड अॅक्शन नेटवर्कच्या साथीनं हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.

बेल्जियमच्या एका प्रयोगशाळेत उत्पादनांची तपासणी केल्यानंतर हा अहवाल जारी करण्यात आला होता.