टोनी चुंग: हाँगकाँगचा हा तरुण नेता चीनच्या तावडीतून पळून ब्रिटनला असा पोहोचला

चीन

फोटो स्रोत, Getty Images

एक प्रख्यात लोकशाही समर्थक कार्यकर्ता ब्रिटनमध्ये आश्रय घेण्यासाठी हाँगकाँगमधून पळून गेला आहे.

22 वर्षीय टोनी चुंग यांनी बीबीसीला सांगितलं की हाँगकाँगमध्ये त्याची सतत चौकशी केली जात होती, तिथे पोलिसांनी त्यांना प्रचंड दडपणाखाली ठेवलं होतं.

सहकारी कार्यकर्त्यांची माहिती देण्यासाठी पोलिसांनी भाग पाडलं असा दावा त्यांनी केला.

हाँगकाँग स्वतंत्र व्हावं यासाठी आवाहन केल्याबद्दल चुंग यांना चीनच्या कठोर सुरक्षा कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलं. जून 2023 मध्ये त्यांची सुटका झाली.

ते म्हणतात की जेलमधून सुटका झाल्यानंतरही बाहेरचं वातावरण त्यांच्यासाठी धोकादायक होतं. जेलपेक्षाही अधिक धोका बाहेर होता असं त्यांचं म्हणणं होतं.

एक वर्षं पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवली होती. त्यांना परदेश प्रवास करायचा असेल तरी सरकारी परवानगीची गरज होती.

अधिकाऱ्यांनी त्यांना 20 डिसेंबरला सहा दिवसांच्या सुट्टीसाठी जपानला जाण्याची परवानगी दिली.

त्यांनी सांगितलं की, ते तिथे असताना हाँगकाँगला परत न येण्याच्या विचाराने रडायला लागले होते आणि त्यावेळी ब्रिटनमध्ये आश्रय घेण्याचं ठरवलं.

याप्रकरणी प्रतिक्रियेसाठी बीबीसीने हाँगकाँग पोलिसांशी संपर्क साधला.

टोनी चुंग कोण आहेत?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

22 वर्षांचे टोनी चुंग हे विद्यार्थी नेते आहेत आणि गेल्या काही वर्षांत हाँगकाँगमधून पळून गेलेल्या लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांपैकी एक आहेत.

2019 मध्ये हाँगकाँगमधील अनेक महिन्यांच्या सामूहिक निदर्शनांनंतर, चीन सरकारने कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला होता. हा कायदा शहरामध्ये स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. विरोधी विचारांना बेकायदेशीर ठरवणारा हा कायदा चुंग यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या विरोधात सर्रास वापरला गेला.

2021 च्या उत्तरार्धात हाँगकाँगने स्वातंत्र्याचा पाठपुरावा केला पाहिजे असं म्हटल्याने चुंग यांना तीन वर्षे आणि सात महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण त्यांनी नेतृत्व केलेल्या स्थानिक विद्यार्थांचा गट हा कायदा लागू होण्यापूर्वी विसर्जित झाला होता.

डिसेंबर 2020 मध्ये एका वेगळ्या प्रकरणात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं होत. त्यांना त्याच वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाजवळ अटक करण्यात आली होती. त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की ते तिथे राजकीय आश्रय घेण्याच्या मार्गावर होते

चुंग यांचा पोलिसांकडून छळ

चुंग यांनी असा दावा केला की 5 जून रोजी त्यांची सुटका झाल्यानंतर, राष्ट्रीय सुरक्षा पोलिसांनी दर दोन ते चार आठवड्यांनी त्यांच्या समोर हजर राहण्यास सांगितलं. त्यांच्या हालचालींची तपशीलवार चौकशी केली जात असे, ते कोणाला भेटतात आणि कोणाच्या संपर्कात आहेत याची माहिती पोलीस घेत असत.

चुंग सांगतात की, "त्यांनी मला सांगितलं की या वर्षात नियमितपणे आम्हाला भेटावं लागेल."

चुंग सांगतात, "मी त्यांना कसं नाही म्हणणार? मी त्यांना अजिबात नाही म्हणू शकलो नाही."

चीन

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी सांगितलं की पोलिसांनी त्यांना हाँगकाँगमधील इतर लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांचा ठावठिकाणा आणि त्यांच्या हालाचालींची माहिती देण्याबाबत विचारलं होतं.

चुंग सांगतात की, "जरी मी केवळ बिनकामाची माहिती दिली, तरी मी इतर लोकांची माहिती पोलिसांना देत आहे, हे मला त्रासदायक वाटतं होत."

जेव्हा पोलिसांचं चुंग यांनी दिलेल्या माहितीने समाधान होत नसे, त्यावेळी त्यांनी अधिक माहिती द्यावी म्हणून जबरदस्ती केली जातं असे, धमकावलं जातं असे.

“ते मला म्हणायचे की मी काही लपवत नाहीये आणि विश्वासार्ह आहे हे मी सिद्ध करायला हवं. मी यामुळे खूप दबावात आलो. मी त्यांना (माझ्या सहकाऱ्यांना) सांगूही शकत नव्हतो की त्यांना लक्ष्य केलं जातंय.”

ते पुढे सांगतात की, "तुरुंगातून सुटण्यापूर्वी एका गोपनीय कागदपत्रावर त्यांच्याकडून स्वाक्षरी करुन घेण्यात आली. त्यानुसार राष्ट्रीय सुरक्षा पोलिसांशी त्यांचं काय बोलणं झालं हे ते ना त्यांच्या वकिलांना सांगू शकत होते ना इतर कोणत्या त्रयस्थ व्यक्तींना."

दोन महिन्यांच्या नियमित भेटीनंतर, पोलिसांनी त्यांच्याशी संभाषणानंतर 500 हाँगकाँग डॉलर ते 3000 हाँगकाँग डॉलरपर्यंतचे पैसे देऊ केले होते.

ते सांगतात की त्यांच्याकडे पर्याय नव्हता, कारण रक्कम स्वीकारली नाही तर तो सहकार्य करीत नाहीत अशी शंका निर्माण झाली असती.

पण ते पैसे घेतल्याने मला अपराधी वाटू लागलंय. " मी दिलेल्या माहितीचा कोणताही ठोस परिणाम होण्याची शक्यता नसली तरी मला अजूनही असं वाटतंय."

चुंग पुढे म्हणाले की, त्यांना असं वाटत होतं की त्यांचं आपल्या जीवनावर नियंत्रण नाही, पोलिसांकडे बँकेच्या तपशीलांच्या प्रती, विद्यार्थी आयडी आणि शाळेचं वेळापत्रक यासह सर्व वैयक्तिक माहिती जमा आहे.

ते सांगतात "माझ्या मनाला शांतता नव्हती, एका सेकंदासाठीही नाही." साधं पायी चालणं पण त्यांच्यासाठी तणावपूर्ण झालं होतं. ते म्हणाले, "कारण त्यांना आपल्या कृतींचं पोलिसांकडे समर्थन कसं करावं याचा सतत विचार करावा लागतो आणि अटकेची भीती वाटते."

चीनच्या तावडीतून पळून ब्रिटनला पोहोचले

टोनी चुंग यांनी आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर असणाऱ्या सततच्या दबावामुळे परदेशात जाण्याचा विचार सुरू केला. हाँगकाँग सुधार प्रशासनाने त्यांना 20 डिसेंबरपासून जपानला जाण्यासाठी अधिकृत परवानगी दिली. पण 25 डिसेंबर रोजी मायदेशी परतण्याची अट ठेवली होती.

"जेव्हा मी हॉटेलमध्ये (जपानमध्ये) माझ्या पुढच्या योजना आखत होतो, तेव्हा मी रडायला लागलो. मी एक दिवस हाँगकाँग सोडेन असा विचार केला होता, पण तरीही मी इतक्या लवकर हाँगकाँग सोडण्यास तयार नव्हतो," असं ते सांगतात.

" पण हा निर्णय आता बदलू शकत नाही, किमान नजीकच्या भविष्यात तरी."

आता ते ब्रिटनमध्ये आहेत आणि त्यांना अभ्यास पुन्हा सुरू करायचा आहे आणि तब्येत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे.

"आणि मी इथे ( ब्रिटनमध्ये ) स्थायिक झाल्यानंतर, मला आशा आहे की मी अजूनही हाँगकाँगसाठी काहीतरी करू शकेन."

लोकशाही समर्थकांवर हाँगकाँगमध्ये खटला

या महिन्याच्या सुरुवातीला हाय-प्रोफाइल लोकशाही समर्थक कार्यकर्त्या ऍग्नेस चाऊ यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं की त्यांना जामिन मिळला आहे. आणि कॅनडामधील त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्या हाँगकाँगला परत येणार नाहीत.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत 'परकीय शक्तींशी संगनमत केल्याबद्दल' अटक करण्यात आलेल्या चाऊ यांनी कठोर सरकारी निर्बंधांकडे लक्ष वेधलं. चौकशीत असताना चाऊ यांना परदेशात शिकण्याची परवानगी मिळाली.

चाऊ आणि चुंग हे आता हाँगकाँगच्या बाहेर राहणाऱ्या लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांमध्ये सामील झाले आहेत. तर इतर अनेकांवर हाँगकाँगमध्ये खटला सुरू आहे.

तुरुंगात टाकलेले मोठे मीडिया व्यावसायिक जिमी लाइ यांच्यावर अनेक राष्ट्रीय सुरक्षा गुन्ह्यांचा आरोप आहे, ज्यात 'विदेशी शक्तींशी संगनमत करणे' असे आरोप समाविष्ट आहेत.

तसंचं लोकशाही समर्थक प्रचारक आणि लोकप्रतिनिधी यांच्या 47 जणांच्या गटावर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला या खटल्याचा शेवटचा युक्तिवाद पूर्ण झाला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)