बिपरजॉय चक्रीवादळ एवढे दिवस का टिकून राहिलं? चक्रीवादळांचा कालावधी लांबतो आहे का?

बिपरजॉय चक्रीवादळ

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, बिपरजॉय चक्रीवादळ
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, मुंबई

जवळपास आठवडाभर अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावतंय. हे वादळ एवढे दिवस कसं काय टिकून राहू शकलं? चक्रीवादळांची ताकद आणि कालावधी का वाढतोय? जाणून घेऊयात.

6 जून 2023. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं. पुढच्या काही तासांतच बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती झाली.

7 जून 2023 चा दिवस संपण्यापूर्वी आधी सीव्हियर सायक्लोन म्हणजे तीव्र चक्रीवादळ आणि मग व्हेरी सिव्हियर सायक्लोन म्हणजे अती तीव्र चक्रीवादळ अशी बिपरजॉयची तीव्रता वाढत गेली.

अवघ्या चोवीस तासांत ज्या वेगानं हे चक्रीवादळ तयार झालं, ते अगदी थक्क करणारं आहे. इतकंच नाही तर या चक्रीवादळानं आपली ताकदही बरेच दिवस टिकवून ठेवली आहे.

६ जूनला हे चक्रीवादळ तयार झालं होतं आणि 15 जूनला ते किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. म्हणजे जवळपास दहा दिवस या वादळाची ताकद टिकून राहील असं दिसतंय.

पण एवढा काळ लांबलेलं हे यंदाचं म्हणजे 2023 सालातलं पहिलंच वादळ नाही.

विश्वविक्रमी फ्रेडी चक्रीवादळ

यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दक्षिण हिंदी महासागरात फ्रेडी चक्रीवादळ आलं होतं. हे चक्रीवादळ ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला इंडोनेशियाजवळ तयार झालं होतं आणि त्यानं हिंदी महासागर ओलांडून आफ्रिकेत धडक दिली होती.

फ्रेडी तब्बल पाच आठवडे आणि दोन दिवस टिकून राहिलं होतं. हा एक जागतिक विक्रम ठरला. नासाच्या सायंटिफिक व्हिज्युअलायझेशन स्टुडियोनं या वादळाचा मागोवा घेतला होता, तो मार्ग तुम्ही इथे पाहू शकता.

फ्रेडी

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, फ्रेडी चक्रीवादळानं ऑस्ट्रेलियापासून आफ्रिकेपर्यंत प्रवास केला होता.

त्याआधी 1994 साली हरिकेन/टायफून जॉन 31 दिवस घोंगावत होतं. 1899 साली हरिकेन सॅन सिरियाको 28 दिवस टिकलं तर 1992 च्या हरिकेन टिनाचा कालावधी 24 दिवस एवढा होता.

तसं वादळांनी लांबवरचा प्रवास करणं ही नवी गोष्ट नाही. कधीकधी एखाद्या चक्रीवादळाच्या अवशेषातून दुसरं वादळही तयार होतं, जसं 2021 साली गुलाब आणि शाहीन या चक्रीवादळांच्या बाबतीत घडलं होतं.

24 सप्टेंबर 2021 रोजी बांगलादेशच्या चितगावमध्ये गुलाब चक्रीवादळ तयार झालं होतं आणि दक्षिण भारताच्या किनाऱ्याला धडकलं होतं.

या वादळाच्या अवशेषांतून शाहीन चक्रीवादळ तयार झालं आणि भारतीय द्वीपकल्प ओलांडून अरबी समुद्रात गेलं आणि पुढे ओमानला जाऊन धडकलं होतं.

दीर्घकाळ टिकलेली चक्रीवादळं

2018 साली बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या गजा चक्रीवादळानंही भारतीय द्वीपकल्प ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश केला होता. जवळपास दहा दिवस ही वादळाची प्रणाली पुढे सरकत राहिली, पण मग समुद्रातच हे चक्रीवादळ विरून गेलं.

याउलट या प्रदेशात आलेल्या अन्य काही चक्रीवादळांमध्ये मात्र अगदी आठवडाभर विनाशकारी ताकद कायम राहिल्याचं दिसून आलं आहे.

चक्रीवादळ इतके दिवस टिकून राहणं किंवा त्यानं लांबवरचा प्रवास करणं हे नवं नसलं तरी अलीकडच्या काळात अशा घटना वाढत आहेत का असा प्रश्न निर्माण होतो.

कारण गेल्या काही वर्षांत अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात अशा अनेक वादळांची नोंद झाली आहे जी सहा दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली.

दीर्घकाळ चाललेली चक्रीवादळं

2019 मध्ये आलेलं वायू चक्रीवादळ आठ दिवस टिकलं होतं. 2014 साली ओखी चक्रीवादळ 7 दिवस टिकलं होतं. 2019 सालचं फणी चक्रीवादळ सात दिवस तर क्यार चक्रीवादळ सहा दिवस टिकलं होतं. 2020 साली आलेलं सुपर सायक्लोन अंफन सुमारे सहा दिवस टिकलं होतं.

चक्रीवादळं एवढे दिवस का टिकून राहत आहेत?

पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी अर्थात आयआयटीएमच्या 2021 सालच्या अहवालातून समोर आलं होतं.

या अहवालानुसार उत्तर हिंदी महासागरात म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात येणाऱ्या चक्रीवादळांचा कालावधी गेल्या चाळीस वर्षांत 80 टक्के वाढला आहे. तसंच अतीतीव्र चक्रीवादळांचा कालावाधी 260 टक्क्यांनी वाढला असल्याचंही हा अहवाल सांगतो.

चक्रीवादळं अशी अधिक काळ सक्रीय राहिली, तर त्याचा थेट परिणाम समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवर होतो. त्यांचे मासेमारी करण्याचे दिवस कमी होतात. तसंच अशा वादळांमुळे मोठं नुकसान होण्याची शक्यताही आणखी वाढू शकते.

पण चक्रीवादळं इतके दिवस का टिकून राहात आहेत? याचं उत्तर वादळांची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेत दडलं आहे. चक्रीवादळं कशी तयार होतात, याविषयी बीबीसी मराठीचा हा लेख तुम्ही वाचला असेल.

फणी चक्रीवादळ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फणी चक्रीवादळ

थोडक्यात सांगायचं तर समुद्राच्या एखाद्या भागात तापमान वाढलं की तिथली हवा वर सरकते आणि तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यातूनच चक्रीवादळाची निर्मिती होते.

म्हणजेच समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान जेवढं जास्त तेवढी वादळाला मिळणारी ऊर्जा जास्त असते आणि त्यातूनच वादळ ताकदवान बनतं, जास्त दिवस टिकून राहतं आणि जास्त अंतर पार करू शकतं.

याउलट चक्रीवादळ जमिनीला धडकतं किंवा थंड पाण्याच्या प्रदेशात सरकतं, तेव्हा त्याला मिळणारी ऊर्जा कमी होते आणि ते विरून जातं.

गेल्या काही दशकांत अरबी समुद्राचं तापमान सातत्यानं वाढत असल्याचं भारतीय हवामान विभागाच्या 2019 सालच्या अहवालात म्हटलं होतं. 1981-2010 च्या तुलनेत गेल्या 2019 साली अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान 0.36 अंश सेल्सियसनं वाढल्याचं हा अहवाल सांगतो. जागतिक तापमानवाढीमुळे हे होत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

म्हणजेच आपण करत असलेल्या कार्बन उत्सर्जनाशी बिपरजॉय सारख्या चक्रीवादळांच्या तीव्रतेचा थेट संबंध आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)