उच्च रक्तदाबाकडं दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, नेमकं काय केलं पाहिजे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी तामिळ
सर्वसाधारणपणे उच्च रक्तदाब हा एक गंभीर आजार आहे असं मानलंच जात नाही. वैद्यकीय जगताकडून किंवा डॉक्टरांकडून सातत्याने इशारा दिला जातो की जर रक्तदाब व्यवस्थितपणं तपासला गेला नाही तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक आजार होण्याचा धोका निर्माण होतो.
मात्र इंडियन इस्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)नं अलीकडेच भारतातील उच्च रक्तदाबावर केलेल्या एका अभ्यासातून भारतीय या गोष्टीला गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून आलं आहे.
हा अभ्यास इंटरनॅशनल जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ (IJPH)मध्ये प्रकाशित झाला आहे. यातील माहितीनुसार 18 ते 54 वर्षांच्या वयोगटातील 30 टक्के भारतीय त्यांच्या रक्तदाबाची तपासणी करत नाहीत. याचाच अर्थ दहा पैकी तीन भारतीय रक्तदाब तपासून घेत नाहीत.
दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे सरासरी 76 टक्के लोक त्यांचा रक्तदाब तपासून घेतात. तर उत्तर भारतातील सरासरी 70 टक्के लोक त्यांच्या रक्तदाबाची तपासणी करतात.
डॉक्टर्स म्हणतात, जर नियमितपणं रक्तदाबावर लक्ष ठेवलं नाही तर अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. यात हृदयविकारासारखे आजार होऊन त्यात मृत्यूदेखील होऊ शकतो.
डॉक्टर्स असं देखील सांगतात की जर रक्तदाबाची नियमितपणं तपासणी केली आणि जीवनशैलीतील योग्य बदलांच्या माध्यमातून तो नियंत्रणात ठेवला तर कोणताही धोका उद्भवत नाही.
आधीच्या काळात वयाच्या 50-60 वर्षांनंतर रक्तदाबाची समस्या सुरू व्हायची. आता अगदी लहान मुलांना देखील उच्च रक्तदाबाचा आजार होतो आहे.
स्थूलपणा हे यामागचं मुख्य कारण आहे. त्याचबरोबर ताणतणाव, अर्धवट झोप, खूप जास्त मीठ असलेलं अन्न, चरबीयुक्त अन्न खाल्ल्यामुळंदेखील उच्च रक्तदाबाचा आजार उद्भवतो आहे.
''मधुमेहापेक्षा तणावामुळं अनेकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो आहे,'' असं चेन्नईतील स्टॅनले गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधील डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनचे प्रमुख प्राध्यापक चंद्रशेखर सांगतात.
अनेकजण उच्च रक्तदाब, तणाव यासंदर्भात कोणताही वैद्यकीय उपचार घेत नाहीत. चाचणी केल्यानंतर ते नॉर्मल असतात, निव्वळ या कारणास्तव ते औषधं घेत नाहीत.
प्रत्यक्षात असं व्हायला नको. रक्तदाबाची नियमितपणं तपासणी केली पाहिजे. जर लागोपाठच्या चाचण्यांमध्ये रक्तदाब कमी झालेला दिसून येत असेल तर औषधांचं प्रमाण कमी केलं पाहिजे.
अनेक गरीब व्यक्तींना याची जाणीव नसते की त्यांनादेखील नियमितपणं रक्तदाबावरील औषधं घेण्याची आवश्यकता असते. अगदी मध्यमवर्गीय जरी रक्तदाबावरील गोळ्या घेत असतील, तरी रक्तदाब नियंत्रणात आहे की नाही हे पाहण्यासाठी ते नियमितपणं तपासणी करत नाहीत.'' असं ते पुढं सांगतात.
रक्तदाबाशी निगडीत विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली.
रक्तदाब कोणत्या पातळीवर असल्यावर तात्काळ वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे?
नॉर्मल म्हणजे सर्वसाधारण निरोगी माणसाचा रक्तदाब 120/80 mm/Hg इतका असतो. यात 120 हा सिस्टॉल असतो.
हृदयाचे कप्पे आकुंचन पावतात तेव्हा ही एक बदलणारी स्थिती असते. तर 80 हा डायस्टोल असतो. म्हणजेच ह्रदयाच्या कप्प्यांमध्ये जेव्हा रक्त येतं तेव्हा ह्रदय शिथिल होण्याची ही स्थिती असते.
थोडक्यात हे दोन आकडे हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण पावण्याच्या स्थितीशी निगडित असतात.
मात्र जर रक्तदाब 140/90 इतका असेल, तर तुम्ही तत्काळ वैद्यकीय मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारचं अन्न घेतलं पाहिजे आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे याचंही मार्गदर्शन घेणं आवश्यक असतं.
त्याचबरोबर डॉक्टरांनी दिलेली औषधंच घेतली पाहिजेत. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय गोळ्यांच्या डोस किंवा संख्येत वाढ करू नका किंवा ती कमीदेखील करू नका. शिवाय नियमितपणं रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे.
घरच्या घरी रक्तदाब कसा तपासावा?
आधी डॉक्टर्स मर्क्युरी स्पायग्मोमॅनोमीटर्सचा वापर करायचे. मात्र आता रक्तदाब तपासण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणदेखील उपलब्ध झालं आहे.
साधारण 2,500 ते 3,000 रुपयांमध्ये चांगल्या प्रतीचं उपकरण विकत मिळतं. ते उपकरण कुठे आणि कसं बांधायचं यासाठी नर्स किंवा डॉक्टरकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे.
रक्तदाब तपासण्यापूर्वी 15-20 मिनिटं चहा किंवा कॉफीचं सेवन करू नये. त्याचबरोबर मद्यपान केल्यानंतर किंवा सिगारेट ओढल्यानंतर रक्तदाब तपासू नये.
साधारणपणे रक्तदाब तपासण्यापूर्वी 20 मिनिटं आधी मद्यपान केलेलं नसावं किंवा सिगारेट प्यायलेली नसावी.
रक्तदाब तपासताना अतिशय शांत असावं. एखाद्या खुर्चीत आरामात बसावं. रक्तदाब तपासताना मांडी मारून किंवा पाय दुमडून किंवा पाय एकमेकांवर ठेवून बसू नये.

फोटो स्रोत, Getty Images
रक्तदाबाची तपासणी करताना जर तो वाढलेला दिसून आला तर पुन्हा एकदा किंवा दोनदा तपासावा. जेणेकरून त्याबद्दलची खात्री होते.
त्याचबरोबर तुम्ही उजवा हात आणि डावा हात, दोघांवर रक्तदाब तपासू शकता आणि त्यातून सरासरी लक्षात येते.
रक्तदाब कोणत्या वेळेस तपासणं आवश्यक असतं?
फक्त सकाळीच रक्तदाब तपासावा असं अजिबात नाही. तुम्ही तो दुपारी किंवा रात्रीदेखील तपासू शकता. अगदी झोपण्यापूर्वी देखील रक्तदाब तपासता येतो.
आपण झोपल्यानंतर साधारणपणं रक्तदाब 15 ते 20 टक्क्यांनी खाली येतो. कारण निद्रेत असल्यामुळं आपलं शरीर अतिशय शिथिल झालेलं असतं. मात्र अलीकडं बहुतांश लोक दोन किंवा तीन वाजता झोपतात. अशावेळी त्यांचा रक्तदाब कमी होत नाही तर तो वाढलेलाच राहतो.
यालाच वैद्यकीय भाषेत नॉक्चर्नल हायपरटेंशन असं म्हणतात. म्हणूनच अनेक जणांना पहाटे हृदयविकाराचा झटका येतो.
बहुतांश लोकांना या गोष्टीची जाणीव नसते की दिवसातील 24 तास रक्तदाब नियंत्रणात असला पाहिजे. त्यामुळंच आपल्याला दिसून येतं की तरुण वयात ह्रदयविकाराचे झटके येत आहेत. तणाव आणि नैराश्यामुळं देखील रक्तदाब वाढतो. अगदी काही वेळा पेन किलर गोळ्या घेतल्यामुळं देखील रक्तदाब वाढू शकतो.

रक्तदाब दररोज तपासला पाहिजे का?
रोजच्या रोज रक्तदाब तपासण्याची आवश्यकता नाही. जर काही लक्षणं दिसत असतील किंवा काही त्रास होत असेल तर रक्तदाब नक्की तपासला पाहिजे.
उच्च रक्तदाबाचे शरीरावर काय परिणाम होतात?
जर सतत रक्तदाब वाढलेला राहत असेल तर त्याचा डोळ्यांवर परिणाम होतो. उच्च रक्तदाबामुळं ह्रदयाच्या कप्प्यांच्या भिंती, रक्तवाहिन्या, मूत्रपिंड या सर्वांवर गंभीर परिणाम होतो.
यामुळं मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना नुकसान झाल्यामुळं मेंदूवर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो. पेरिफरल आर्टरी डिझिज हा आजार होऊन त्यामुळे पायांकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो. याशिवाय शरीरातील सर्व रक्तवाहिन्या आणि सर्व अवयवांवर परिणाम होऊ शकतो.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
जसजसा रक्तदाब वाढतो तसतसे हृदयातील रक्तवाहिन्यांच्या आकार आकुंचतो. ह्रदयाच्या कप्प्यांच्या भिंती जाड होतात आणि त्यांना सूज येते. यामुळं हृदयाच्या आकुंचनावर परिणाम होतो. त्यामुळं उच्च रक्तदाबामुळं हृदयावर अनेक प्रकारे गंभीर परिणाम होतो. याशिवाय हृदयाचे ठोके देखील वाढतात.
उच्च रक्तदाबाची लक्षणं कोणती?
उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांमध्ये अनेकदा कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. अनेकजण विचारतात की मला कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत, मग मी गोळ्या का घ्याव्यात?
लक्षणं नंतरच्या टप्प्यात दिसू लागतात. तणाव, डोकेदुखी, चक्कर येणं, अंगदुखी, निद्रानाश, छोट्या-छोट्या गोष्टींची भिती वाटणं, पायांना सूज येणं इत्यादी लक्षणं नंतर दिसू लागतात.
उच्च रक्तदाब कसा टाळता येईल?
तुमचं वजन नियंत्रणात ठेवा. अन्नातून जास्तीचं मीठ खाऊ नका. नियमितपणं व्यायाम करा. यासाठी पायी चालणं, जॉगिंग, पोहणं, इत्यादी प्रकारचे विविध व्यायाम करू शकता. वजन उचलण्याचा व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
अनेकदा चर्चिल्या जाणाऱ्या भूमध्य सागरी आहारात भाजीपाला आणि फळांचं प्रमाण अधिक असतं. तर प्रोटिन आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी असतं. शरीराचं वजन 10 टक्क्यांनी कमी केल्यावर रक्तदाबात दोन आकडी घट होते. जे योग्य आहार घेत असतात त्यांचं वजनदेखील कमी होत नाही.
पाय चालण्याचा व्यायाम प्रत्येकजण करू शकतो. यासंदर्भात कोणतीही बंधनं नाहीत. ज्या लोकांना सांधेदुखी किंवा सांध्याशी निगडीत आजार आहेत ते हात आणि पाय ताणण्याचे व्यायाम करू शकतात. बागकाम करणं, घरातील कामं करणं हा देखील एक प्रकारचा व्यायामच असतो.
दररोज एकाच प्रकारचा व्यायाम करण्याऐवजी तुम्ही दररोज वेगवेगळे व्यायाम प्रकार करू शकता. दर आठवड्याला 150 मिनिटं व्यायाम केला पाहिजे. म्हणजेच आठवड्यातून किमान 5 दिवस व्यायाम केला पाहिजे. अमेरिकन हार्ट असोसिएनशननं व्यायामासंदर्भात हीच सूचना केली आहे.
जर हे सर्व केल्यानंतरसुद्धा रक्तदाब नियंत्रणात नसेल किंवा जर दोन किंवा अधिक आजार असतील तर अशावेळी वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं.
उच्च रक्तदाबासाठी मला आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील का? उच्च रक्तदाब पूर्ण बरा होऊ शकतो का?
अनेकजणांना बऱ्याच कालावधीसाठी गोळ्या घ्याव्या लागतात. मात्र उच्च रक्तदाबावर कायमस्वरुपी उपाय शोधण्यासंदर्भात संशोधन केलं जातं आहे.
जीवनशैलीत योग्य बदल करून आरोग्य मिळवता येतं हे वैज्ञानिक सत्य आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हायपोटेंशन काय आहे? त्याची लक्षणं कोणती?
हायपोटेंशन हा काही आजार नव्हे. महिलांचा रक्तदाब सर्वसाधारणपणे 90/60 इतका असतो. ही त्यांच्या शरीराची ठेवण असते.
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते ते गोळ्या घेतात आणि जर रक्तदाब नॉर्मल असेल तर काही लोकांना चक्कर येते किंवा थकवा येतो.
त्यामुळं त्यांचा रक्तदाब खाली येतो. त्यासाठी देखील ते गोळ्या घेऊ शकतात. शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळं देखील रक्तदाबावर परिणाम होतो.
काय खावं?
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी काय खावं आणि काय टाळावं याबद्दल चेन्नईस्थित आहारतज्ज्ञ भुवनेश्वरी सांगतात.
ज्या अन्नात जास्त प्रमाणात मीठ असतं ते टाळावं. दररोज शरीरात जाणारं मिठाचं प्रमाण कमी करावं. चिप्स, लोणची, खारट स्नॅक्स टाळावीत.
मीठ असलेले पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवावं. जागतिक आरोग्य केंद्रानुसार दररोज शरीरात सहा ग्रॅम मीठ जाणं पुरेसं आहे. भारतीय जेवणात 10-12 ग्रॅम मीठ असतं. त्यामुळं रोजच्या जेवणातील मीठाचं प्रमाण निम्म्यावर आणावं.
''मांसाहारात खूप जास्त चरबी असते. त्याचबरोबर मांसाहारी पदार्थांमध्ये आपण मीठ, तेल आणि मसाल्यांचा वापर करतो.
खूप जास्त चरबी असणारे मटणासारखे पदार्थ टाळावेत. त्यातुलनेत चिकन आणि माशांमध्ये चरबीचं प्रमाण कमी असतं. त्याचबरोबर किती प्रमाणात खाल्लं जातं आहे हेदेखील तितकंच महत्त्वाचं असतं.''











